
आपलं मन नेमकं कसं काम करतं याबद्दलचं कुतूहल हजारो वर्षांपासून माणसाच्या मनात आहे. आपण आपल्या आसपासच्या माणसांच्या मनाचे काही ठोकताळे मांडतो, आणि असे ठोकताळे मोडून काढणारे क्षण तितक्याच वेळा आपल्यासमोर येत राहतात. एरवी अतिशय शांत वाटणारी व्यक्ती अत्यंत विक्षिप्त वागते; आपल्या अगदी चांगल्या परिचयाच्या व्यक्तीबाबत अगदीच अनपेक्षित काही तरी समजतं आणि आपण अवाक होतो.
माणूस मुळात असतो तरी कसा?
एखाद्या दिवशी अचानक एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या आत्महत्येची बातमी येते आणि आपण खडबडून जागे होतो. कारण तोपर्यंत आपल्याला असं वाटत असतं, की माणसाने खूप पैसा कमावला किंवा तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला की आनंदी राहत असेल. एखादी उच्चशिक्षित तरुणी तिच्या प्रियकराकडून अनेक दिवस मार खात राहते. एक दिवस क्रूरपणे मारून टाकली जाते आणि आपल्याला प्रश्न पडतो, की तिने हे सगळं का सहन केलं असावं? त्यानेही तिला असं का मारलं असावं?
अशा घटना आपल्या आसपास घडताना दिसतात आणि आपण विचार करायला लागतो, की माणूस मुळात असतो तरी कसा? चांगला की क्रूर, विवेकी की अविवेकी, मदत करणारा की आत्मकेंद्री? हे झालं आपल्या आसपासच्या घटनांबद्दल. कधी कधी आपल्या मनाचीही काही ना काही कारणाने घालमेल होत असते. एखाद्या अनपेक्षित अनुभवाला तोंड देताना आपण कोलमडून जाऊ शकतो, आपली ओढाताण होत असते. या सगळ्याला कसं तोंड द्यायचं हा प्रश्न पडतो. ही सगळी चिन्हं मनाकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित करतात.
मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करताना माणसाची अनेक रूपं समोर येतात. त्या अनुभवांच्या आधारे वाचकांशी मानसिक आरोग्याविषयी बोलण्यासाठी हा लेखनाचा खटाटोप.
माणसाचं वेगळेपण
माणूस निरीक्षणं करतो, ती नोंदवतो, त्यातून काही निष्कर्ष काढतो, हे त्याचं इतर प्राण्यांपेक्षा वेगळेपण आहे. माणसाच्या मनात अत्यंत आदिम अशा संताप, चिंता, मत्सर या भावना असतात. दुसऱ्या बाजूला करुणा, संयम, निग्रह अशा उत्क्रांत भावनांचाही प्रत्यय येत असतो. माणूस घडतो म्हणजे त्याचे विचार, भावना, मूल्यं आकार घेत असतात. याला (ढोबळमानाने) त्याच्या मनाची जडणघडण असं म्हणू शकतो. पण मनाची जडणघडण होते म्हणजे नेमकं काय होतं, आपल्या मेंदूत-शरीरात नक्की कोणत्या प्रक्रिया घडतात यावर अथक संशोधन सुरू आहे. त्यासाठी काही अचाट प्रयोगही झाले आहेत. मात्र, मागील काही दशकांत मनाबद्दलचा शास्त्रीय दृष्टिकोन तयार होतो आहे. मन निरोगी राखायला हवं याबद्दल अधिकाधिक जागरुकता निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत ही आश्वासक बाब आहे.
आपलं मन निरोगी आहे की नाही हे कसं ठरवायचं?
हे ठरवण्यासाठी काही चाचण्या असतात तसंच काही कसोट्याही असतात. प्रत्येक मानसिक समस्येची लक्षणं ठरलेली असतात. तापाच्या बाबतीत जसं कोणता ताप मलेरियाचा आणि कोणता टायफॉइडचा हे लक्षणांवरून समजतं, तसंच कोणत्या लक्षणांना उदासपणा म्हणायचं आणि कशाला नैराश्य म्हणायचं हेही ठरलेलं असतं. प्रत्येक समस्येच्या लक्षणांवरून निदान केलं जातं. पण किती तरी समस्या अशा असतात की ज्या अशा लक्षणांच्या यादीत नेमक्या बसत नाहीत, तरीही तो माणूस मात्र त्रासलेला असतो. उदा.: काही माणसांचा स्वत:च्या भावनांवर चांगला ताबा असतो. ते व्यवस्थित काम करतात, कोणालाही त्रास देत नाहीत; पण त्यांना कोणाशीच जवळचं नातं निर्माण करता येत नाही. काही माणसं इतर लोकांशी खूप चांगलं वागतात, पण कोणत्याच कामात टिकत नाहीत. यातल्या कशाला फक्त कामातल्या अडचणी म्हणायचं आणि कशाला मानसिक समस्या म्हणायचं हे ठरवण्याचं काम मानसोपचारतज्ज्ञाचं असतं.
कोणत्याही लक्षणांचं समस्या म्हणून निदान होणं ही खूप नंतरची गोष्ट आहे. त्याआधी बराच काळ त्या व्यक्तीला कमी-अधिक काही प्रमाणात ताण जाणवत असतो; पण बहुतेकदा तो नाकारला जातो किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. कित्येकदा आपल्या त्रासाबद्दल कोणाला सांगितलं तर लोक आपल्याला नाकारतील, अशी भीतीही असते. मनाला कुरतडणाऱ्या अशा गोष्टी बाहेर निघाल्या नाहीत तर काय होतं, ते होऊ नये म्हणून काय काय करता येऊ शकतं, अशा मुद्द्यांची चर्चा आपण या लेखमालेत करणार आहोत.
या विषयाचे अनेक पैलू आहेत. मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी त्या व्यक्तीला आणि मानसोपचारतज्ज्ञालाही विविध पातळ्यांवर काम करावं लागतं. त्याच्या खोलात शिरण्यापूर्वी मानसिक आरोग्यासंबंधी आणखी थोडी माहिती करून घेऊ या.
मानसिक आरोग्याच्या दृष्टीने लोकांचे साधारण चार गट पडतात. त्याला आपण ४-डी म्हणू या.
१. पहिला गट आहे, ‘डेव्हलपमेंट'. या गटातली माणसं शारीरिक आणि मानसिकदृष्या निरोगी असतात. त्यांना भावनांचं नियोजन बऱ्यापैकी जमतं. आयुष्यात काही ध्येयं ठरवून ती पूर्ण करण्याचा आनंद त्यांना घेता येतो. तसंच भविष्यकालीन नियोजन करता येतं, ते प्रत्यक्षात आणता येतं. आसपासच्या काही लोकांशी त्यांचं अगदी जवळचं नातं तयार होतं, तर समाजातील इतर लोकांबरोबरही त्यांना जुळवून घेता येऊ शकतं. आपल्याला व्यवस्थित जगायचं असेल तर हे जग कसं चालतं हे नीट समजून घेतलं पाहिजे याची त्यांना जाणीव असते. जगाबरोबर जुळवून घेताना काही प्रमाणात आजूबाजूच्या परिस्थितीत बदल घडवणं त्यांना जमतं.
२. दुसऱ्या गटाला ‘डिस्ट्रेस' असं नाव आहे. नावावरूनच दिसतं, की या गटातल्या माणसांच्या बाबतीत ‘माझं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मला सतत झगडावं लागणार आहे' अशीच आयुष्याची थीम असते. उदा. : एखाद्या व्यक्तीला वाटतं, की अमुक इतकी संपत्ती जमा केल्याशिवाय लोक माझी दखल घेणार नाहीत. अशी व्यक्ती सतत काम करत राहते. जरासा आराम केला तरी तिला अपराधी वाटायला लागतं. तसंच प्रत्येक काम बिनचूकच झालं पाहिजे असा तिचा अट्टहासही असतो. अशा लोकांनी कामं कितीही नीट करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना समाधान वाटत नाही. अनेक गोष्टींना वेळच पुरत नाही. जवळच्या नातेसंबंधांसाठी वेळ दिला तर आर्थिक घडी ढासळते. आर्थिक बाबी नीट करायच्या म्हटलं तर मनासारखं आयुष्य जगता येत नाही.
याची मुळं लहानपणापासून तयार झालेल्या काही धारणांमध्ये असतात. आपण सगळ्याच माणसांना आवडलो पाहिजे असा अट्टहास यांच्या मनात लहानपणापासूनच असतो. त्यामुळे सतत इतरांना खूष करण्याच्या प्रयत्नांत त्यांचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही जातात. समोरची व्यक्ती नाराज दिसली तर ही माणसंही उदास होतात, स्वतःला कमी लेखायला लागतात. यातील आणखी एक प्रकार म्हणजे आपण कितीही केलं तरी कमीच पडणार, या विचाराने अशा व्यक्ती एकटेपण निवडतात. हळूहळू व्यक्त होणं बंद करतात. याचा त्यांच्यावर ताण यायला लागतो. कधी तरी हा ताण असह्य झाला की त्यातून सुटका मिळवण्यासाठी तात्पुरते उपाय शोधले जातात. उदा. व्हिडिओ गेम्स खेळणं, अति खाणं, सतत सोशल मीडियावर वेळ घालवणं वगैरे. त्यातून नव्या समस्या उद्भवतात त्या वेगळ्याच.
३. तिसऱ्या गटातल्या माणसांमध्ये मानसिक ताणाची तीव्रता अधिक असते. त्यांना होणारा त्रास म्हणजे ‘मानसिक समस्या' (डिस्ऑर्डर) म्हटली जाते. चिंता, नैराश्य, अपराधभाव, संताप या भावनांनी व्यक्तीचा ताबा घेतलेला असतो. सततच्या अशा अनुभवांनी ती व्यक्ती दमलेली असते. मानसिक ताण समुपदेशनाने (काउन्सिलिंग) कमी होऊ शकतो. मानसिक त्रासाची तीव्रता अधिक असते. अशा वेळी मानसोपचाराची मदत घ्यावी लागते. एखाद्या व्यक्तीला मानसिक ताण आहे की समस्या हे ओळखण्याच्या काही कसोट्या आहेत. नकारात्मक भावनांचा आवेग किती आहे (तीव्रता), ती व्यक्ती किती प्रमाणात त्या भावनेच्या आहारी जाते हे बघावं लागतं. कारण अशा वेळी व्यक्तीमध्ये अनेक शारीरिक बदल घडत असतात. उदा. श्वास नीट न घेता येणं, पोटात गोळा येणं, वगैरे.
अतितीव्र चिंता, नैराश्य यामुळे माणसाच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्याला इतर कुठेही लक्ष देणं जमत नाही. तो लवकर थकू लागतो. नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाताना किंवा परीक्षेला जाताना हा अनुभव तुम्हाला कदाचित आला असेल. काहीजणांना मनातील असे विचार थांबवताच येत नाहीत. अशा वेळी जीव अगदी मेटाकुटीला येऊ शकतो.
तसंच, अशी नकारात्मक भावना दिवसभरात किती वेळा त्रास देते (वारंवारिता) हे बघावं लागतं. उदा. दिवसातील बराचसा वेळ जुन्या चुका उगाळण्यात जात असेल, तर त्यातून नैराश्य आणि अपराधभाव तयार होतात आणि नवीन गोष्टींचा आनंद घेणं जवळजवळ संपतं. आयुष्याचा एक पक्का साचा होऊन जातो. नातेसंबंधावर ताण येतो, सामाजिक संबंध दुरावतात. कोणतीही नवीन गोष्ट करणं, अनुभवणं जड जाऊ लागतं.
एकदा नकारात्मक विचार व भावनांचं चक्र सुरू झालं की ते किती काळ टिकतं (कालावधी) हे पाहणंही महत्त्वाचं असतं. ही अवस्था साधारण दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त टिकत असेल तर ती मानसिक समस्या ठरू शकते. अशी अवस्था सहा महिने ते दोन वर्षं किंवा त्यापेक्षा अधिक काळ टिकते तेव्हा तो मानसिक आजार होतो.
४. ‘४-डी'मधला चौथा गट, म्हणजे ‘मानसिक आजार' (डिसीज). मानसिक समस्या इथे आजाराचं रूप घेते, पण त्याआधी मनात-मेंदूत आणखी खूप काही घडलेलं असतं. मानसिक आजारांमध्येही अनेक प्रकार असतात. काही प्रकारांत ती व्यक्ती स्वत:चं असं वेगळं जग तयार करते. त्या व्यक्तीला भास आणि भ्रम होऊ लागतात. कधी त्या व्यक्तीला टोकाच्या भावनांचा अनुभव (मूड डिस्ऑर्डर्स) येतो. काही लोकांना स्मृतिभ्रंश होतो. मानसिक आजार असलेल्या व्यक्तीला स्वतःच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठीही इतरांच्या मदतीची गरज लागते. त्यांच्या उपचारांमध्ये मानसोपचार आणि औषधं दोन्ही आवश्यक असतात.
ही ४-डी विभागणी अगदी ढोबळ म्हणता येईल, पण समोरच्या माणसाच्या मनाचा तळ गाठताना मानसोपचारतज्ज्ञाला कुठून सुरुवात करावी लागते त्याची यावरून कल्पना येऊ शकते. तसंच, कोणतीही व्यक्ती अचानक मानसिक आजारी होत नाही हेदेखील लक्षात घ्यायला हवं. त्या व्यक्तीला आधी काही प्रकारचा ताण जाणवत असतो; पण बोलीभाषेत आपण त्याला विक्षिप्तपणा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. हा ताण म्हणा, विक्षिप्तपणा म्हणा, पुढे कोणकोणता परिणाम करणार, त्याची परिणती मानसिक आजारात होणार का, हे एक तर जैविक घटकांनी ठरतं (नेचर), किंवा त्यात जडणघडणीचा वाटा असू शकतो (नर्चर), नाही तर मग त्या व्यक्तीचा सांस्कृतिक भवताल (कल्चर) त्याला हातभार लावू शकतो. काही आजारांमध्ये जनुकं महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. विविध प्रयोगांतून आता असं लक्षात येत आहे, की माणूस स्वत:च्या धारणा आणि जीवनशैलीत बदल करून जनुकीय घटकांवर मात करू शकतो; पण यावर अजून पुरेसं संशोधन उपलब्ध नाही.
नर्चर, म्हणजे लहानपणापासून मिळालेलं वातावरण, आई-वडिलांचा स्वभाव, त्यांच्याकडून मिळालेला स्वीकार, नातेवाईक, शाळा, आजूबाजूचा परिसर या सगळ्यांचा एकत्रित परिणाम. उदा. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिस्त महत्त्वाची असते, पण आई-वडील अति कडक असतील तर मुलांवर सतत टीका केली जाते. अशा वेळी मूल सतत स्वत:चा धिक्कार करत ‘नीट' वागत राहतं. तर ज्या घरात पालक संयमी असतात तिथे मूल स्वत:ला समजून घेऊन स्वत:मध्ये बदल करतं. मुलांच्या वागण्यातला बदल दोन्ही ठिकाणी दिसतो, पण पहिल्या प्रकारच्या घरात मुलांची भावनिक पडझड बरीच झालेली असते.
सांस्कृतिक घटक म्हणजे कोणते?
तर, त्या व्यक्तीच्या घरातल्या आधीच्या अनेक पिढ्यांचे अनुभव, तिचा धर्म-वंश-प्रदेश मिळून तिने अनुभवलेलं वातावरण, अशा सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या व्यक्तीच्या मनावर होत असतो. आता, आधीच्या पिढ्या, धर्म, वंश या गोष्टी समजू शकतो; पण प्रदेशाचा इथे कसा काय संबंध येतो? एक उदाहरण बघू या. उत्क्रांतीदरम्यान आपल्या मनात अनिश्चिततेची भीती तयार झाली आहे. पण ग्रामीण भागातील व्यक्ती आणि शहरातील व्यक्ती यांच्या मनातील अनिश्चिततेचा अनुभव वेगळा असतो. ग्रामीण भागात एकदा वीज गेली की नेमकी कधी येईल हे आजही सांगता येत नाही. हातातोंडाशी आलेली पिकं अवकाळी पावसाने गिळली तर काय, ही अनिश्चितता सतत मन पोखरत असते.
शहरात आपण घराबाहेर पडलो तर नेमक्या स्थळी पोहोचायला किती वेळ लागेल हे आताच्या ट्राफिकमध्ये सांगणं केवळ अशक्य असतं. किंवा, नेमका कोणता नाला बुजवून तिथे आपलं घर उभं केलं असेल आणि भविष्यात त्यातून काय संकट उभं राहील हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे त्या-त्या परिस्थितीतल्या लोकांना अनिश्चिततेचेच पण वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुभव येतात.
या सगळ्यांबरोबर वातावरण, पर्यावरणातील बदल, भौगोलिक परिस्थिती या सगळ्यांची मिळून वेगवेगळी मानसिक समीकरणं तयार होतात. प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे त्या समीकरणांशी लढत असतो. त्यातूनच मानसिक ताणतणाव निर्माण होतात, वाढतात आणि वर म्हटलं तसे त्याचे पुढचे टप्पे येऊ शकतात.
मानसिक समस्येमुळे होणारे परिणाम हादेखील मोठा विषय आहे. अशा समस्येने ग्रासलेल्या माणसाकडे पूर्वीइतकं काम करण्याची ताकद उरत नाही. आजूबाजूच्या लोकांना ती व्यक्ती आळशी वाटू लागते. अगदी लहानसहान कामं टाळली जातात किंवा पुढे ढकलली जातात. कारण नकारात्मक भावना दमवणाऱ्या असतात. त्यामुळे आठवड्यातील अनेक दिवस झोपून राहावंसं वाटतं, घराबाहेर पडावंसं वाटत नाही. असं केल्याने पुन्हा अपराधभाव तयार होतो आणि व्यक्ती या चक्रात अडकत जाते. नकारात्मक भावनांचा शरीरावर खूप परिणाम होत असतो. मानसिक समस्यांमुळे अनेक शारीरिक व्याधी जडू शकतात.
या साऱ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय, तर मानसोपचार.
लहान मुलांपासून वृद्धापर्यंत कोणालाही मानसोपचाराची गरज भासू शकते. मानसोपचार ही काही काळ चालणारी प्रक्रिया आहे. यामध्ये त्या व्यक्तीच्या दृढ झालेल्या धारणा, मूल्यं, तसंच जीवनशैली बदलण्यासाठी प्रयत्न केले जातात. समस्येनुसार मानसोपचार पद्धतीमध्ये फरक केला जातो. हे घडवून आणण्यात मानसोपचारतज्ज्ञ मुख्य भूमिका बजावतो, हे खरं असलं तरी समाजातील प्रत्येक घटकाचा यात सहभाग असतो. माणूस काही बेटावर राहणारा नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती समाजावर आणि समाज व्यक्तीवर परिणाम करत असतोच.
या सदरातल्या लेखांमधून अशा परस्परसंबंधांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न असेल. वेगवेगळ्या मानसिक समस्या, आजार आणि त्याला तोंड देण्याच्या पद्धती याची चर्चा आपण करू. जोडीला काही केस-स्टडीजही पाहू. मानसिक समस्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन एका रात्रीत बदलण्याची शक्यता नाहीच, पण या लेखांमार्फत त्या दिशेने काही पावलं तरी टाकली जावीत इतकी आशा असेल. आणि इतर कोणतेही उपचार न करता मानसिक आरोग्य केवळ ॲन्टि-डिप्रेसन्ट औषधांच्या मदतीने चांगलं राहील हा अनेकांचा भ्रम दूर व्हावा, ही अपेक्षाही असेल.
गौरी जानवेकर | gjanvekar@gmail.com
या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि समुपदेशक आहेत. त्या या विषयावर लेखन करतात, कार्यशाळाही घेतात.