काही वर्षांपूर्वी कोणार्कचं सूर्यमंदिर बघायला गेलो होतो. तिथला गाइड म्हणे, ‘भारत का इकलौता सूर्यमंदिर!' आमची कोकणी अस्मिता तत्काळ दुखावली. ‘आमच्या कोकणात किती सूर्यमंदिरं आहेत आणि तीही अजिबात पडीक वगैरे नाहीत, तर चांगली पूजाअर्चा होणारी', हे त्या गाइडला ताबडतोब ऐकवलं.
मुळात भारतामध्ये अनेक सूर्यमंदिरं पूर्वीपासून आहेतच. गुजरात आणि आंध्र प्रदेशातली अनेक भव्य सूर्यमंदिरं प्रसिद्ध आहेत. कोणार्कचं मंदिर तर प्रचंड मोठं आहे. त्यावरील नक्षीकाम अप्रतिम आहे. कोकणामधली सूर्यमंदिरं मात्र त्यामानाने फार दुर्लक्षित राहिली आहेत. फरक इतकाच, की कोकणासारख्या दुर्गम भागात अगदी सर्वसाधारण कौलारू घरांसारख्या छोटेखानी देवळांमधून या मूर्ती असल्याने इथे मूर्तिभंजकांचं लक्ष गेलं नाही आणि म्हणूनच गेली अनेक शतकं इथे पूजाअर्चा चालू आहे. त्यापैकी राजापूर तालुक्यातलं कशेळीचं कनकादित्य मंदिर सर्वांत जुनं आहे. कित्येकांच्या मते अद्याप पूजा होत असलेलं हे सर्वांत जुनं सूर्यमंदिर आहे.
कशेळीचा कनकादित्य म्हणजे माझ्या अतिशय आवडत्या स्थानांपैकी एक. मंदिर म्हणूनच नाही, तर ही एकूण जागाच इतकी शांत आणि प्रसन्न आहे! समुद्रापासून किंचित दूर, गर्द हिरव्यागार झाडीमध्ये वसलेला हा सूर्यनारायण म्हणजे समुद्रकिनारी संध्याकाळी ढगांच्या आड लपून रंगांची उधळण करणाऱ्या आकाशातल्या सूर्यासारखाच. याचं नावही वेगळं- कनकादित्य. सुवर्णझळाळीचं हे नाव त्याला मिळालंय ते कनका नावाच्या एका सूर्यभक्त गणिकेमुळे. अशी दंतकथा सांगितली जाते, की गुजरातमधल्या वेरावळहून एक व्यापारी माल घेऊन दक्षिणेकडे निघाला होता. त्याच्या जहाजात ही मूर्ती होती. हे जहाज कशेळीच्या समुद्रकिनारी थांबलं आणि कितीही सायास केले तरी ते पुढे जाईना, जागचं हलेचना. व्यापाऱ्याच्या काय मनात आलं कुणास ठाऊक, त्याने जहाजातली मूर्ती काढून कशेळी किनाऱ्याजवळच्या एका गुहेत ठेवली. त्यानंतर त्याचं जहाज पुढे जाऊ लागलं. तेव्हा कशेळीत कनका नावाची गणिका राहत होती. ती सूर्यभक्त होती. सूर्यनारायणाने तिला स्वप्नात सांगितलं, की मी अशा एका गुहेमध्ये आहे. मला गावात घेऊन ये आणि माझी विधीवत स्थापना कर. या दृष्टांतानुसार गावकऱ्यांनी समुद्रकिनारी शोध घेतल्यावर मूर्ती मिळाली. याच कनकेने मंदिरासाठी मदत केली आणि म्हणूनच हा सूर्यदेव कनकादित्य झाला.
हेही वाचा - सोमनाथ- वेगळ्या नजरेतून
या घटनेकडे इतिहासाच्या नजरेतूनही पाहता येतं. सौराष्ट्रावर होत असलेल्या मुस्लिम आक्रमणांपासून वाचण्यासाठी तिथल्या अनेक देवळांमधल्या मूर्ती हलवल्या गेल्या. प्रभासपट्टण हे श्रीकृष्णाचं गाव समजलं जातं. इथल्या भव्य मंदिरात बारा सूर्यमूर्ती होत्या. हल्ल्याची खबर येताच मंदिरांच्या पुजाऱ्यांनी या मूर्ती वेगवेगळ्या गलबतांवर ठेवून विविध दिशेने नेल्या, जेणेकरून त्या लपवल्या जातील. त्यांपैकी एक मूर्ती कशेळीमध्ये आणली गेली असा अनेकांचा कयास आहे.
ज्या नैसर्गिक गुहेमध्ये ही मूर्ती मिळाली त्याला देवाची खोली म्हणतात. जमिनीपासून ७०-८० फूट उंचीवर एखाद्या मोठ्या खोलीइतकीच ती गुहा किनाऱ्याच्या कड्यावर नैसर्गिक पद्धतीने बनलेली आहे. ओहोटीच्या वेळी गावातल्या माहीतगार लोकांबरोबर या ठिकाणी जाता येतं. ती जागाही अतिशय सुंदर आणि रम्य आहे.
आपल्या देशात चालीरीती आणि परंपरा यांचं एक अनोखं मिश्रण सर्वत्र दिसून येतं. तामिळनाडूमध्ये राहत असताना पोंगल आला की दारोदारी चुलीवर ठेवलेला घडा आणि त्यातून उतू जाणाऱ्या दुधाची रांगोळी हमखास काढली जायची ते पाहिलं होतं. रंगीबेरंगी नाजूक अशा त्या रांगोळ्यांवरच कित्येकदा पोंगलचा महत्त्वाचा विधी असतो दूध उतू घालवण्याचा. अंगणामध्ये चूल मांडून, त्यावर मातीचं भांडं ठेवून सूर्यनारायणाच्या साक्षीने दूध उतू घालवलं जायचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं प्रतीक म्हणून! हे पाहत असताना मला महाराष्ट्रातला रथसप्तमीचा उत्सव हमखास आठवे. तेव्हाही असंच अंगणामध्ये चूल मांडून सूर्याच्या साक्षीने दूध उतू घालवलं जातंच.
कशेळीच्या कनकादित्य मंदिरातही दरवर्षी रथसप्तमीला एक मोठा लग्नसोहळ्याचा उत्सव होतो. त्याच्यामागे एक कथा आहे. कशेळीपासून जवळच आडिवरे इथे महाकालीचं भव्य मंदिर आहे. तिथे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन बहिणी आहेत. जवळच असलेली भगवती आणि जाकादेवी यादेखील यांच्या बहिणी. आडिवऱ्यामध्येच असलेल्या कालिकावाडीमधली कालिकादेवी ही सहावी बहिण. या सहा बहिणींपैकी कालिकादेवी ही सर्वांत धाकटी आणि सोवळ्यातली. कनकादित्य देखील सोवळ्यातला देव. म्हणजे याचे पुजारी ब्राह्मण. इतर ठिकाणी गुरव असतात. महालक्ष्मी जाखादेवीसाठी मुलगा बघायला म्हणून कालिकादेवीला कनकादित्याकडे पाठवतात; पण प्रत्यक्षात कालिकादेवी आणि कनकादित्य एकमेकांना आवडतात आणि लग्न करायचं ठरवतात, या गोष्टीचा जाकादेवीला खूप राग येतो आणि ती आयुष्यात कधीही कालिका आणि कनकादित्याचं तोंडदेखील पाहायचं नाही असं ठरवते. दरवर्षी रथसप्तमीला मंदिराचे विश्वस्त कालिकादेवीला निमंत्रण देतात. कालिकादेवीची पालखी मोठ्या मानाने वाजतगाजत, मिरवत कशेळीमध्ये येते. वास्तविक, सूर्याच्या लग्नाचा मुहूर्त रात्री बाराचा आहे, (बरोबर! दिवसाढवळ्या हा सूर्यभगवान लग्नाला निघून गेला तर आपलं काय!!) पण कालिकादेवीची पालखी कधीच बारा वाजेपर्यंत येत नाही. ती रात्री एक-दीडनंतरच येते. तेव्हा वाटेतच असलेल्या जाकादेवीच्या देवळाचे दरवाजे बंद ठेवलेले असतात. भगवतीची पालखी पाठराखीण म्हणून येते. तिचाही चार दिवस इथेच मुक्काम असतो. महालक्ष्मीच्या देवळामधून मानपान सरंजाम येतो. कनकादित्य मंडळी वधूकडील मंडळींना दोन मण तांदूळ शिधा देतात. रात्री देवीचा मुखवटा कनकादित्याच्या शेजारी ठेवला जातो. रथसप्तमीच्या उत्सवाला कशेळीमध्ये प्रचंड गर्दी असते, किर्तन, प्रवचन, विविध कार्यक्रम असतात. पण प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पालखी नाचवण्याचा सोहळा. नजरेचं पारणं फिटावं अशा नजाकतीने आणि कौशल्याने देवाची ही लाकडी पालखी नाचवली जाते. उत्सवापूर्वी गावामधले सर्व लोक जमून सभामंडपामधे छताला पताकांची सुरेख आरास करतात. ही आरास वर्षभर टिकते. साध्या रंगीबेरंगी कागदांमधून अतिशय सुंदर रचना आकाराला आलेल्या असतात. त्यामुळे छत दरवर्षी नवनवीन पद्धतीने सजलेलं दिसतं.
आरवली आणि माखजनचा आदित्यनारायण, परुळ्याचा आदिनारायण; गावडेगुडे, नेवरे, कायळघे, आजगाव, सातार्डे, खारेपाटण इथला आदित्यनाथ; मुरूड, कुर्धे इथला सूर्यनारायण, अशा विविध गावांमधून राहणारा हा सूर्यबाप्पा मुळात इथे पोचला कसा काय याच्या अनेक कहाण्या आहेत. कोकणातल्या अनेक मोठ्या मंदिरांमधून सूर्यनारायणाची मूर्ती हमखास असते. संगमेश्वरच्या कर्णेश्वर मंदिरामध्येही सूर्याचं छोटंसं मंदिर आहे. रत्नागिरीचं ग्रामदैवत असलेल्या भैरीच्या देवळामध्येही एक सुबक, सुंदर अशी सूर्याची मूर्ती आहे.
हेही वाचा - बिहार : पुरातन बौद्ध संस्कृतीचा चालता-बोलता इतिहास
साधारण एक हजार वर्षांपूर्वी कनकादित्याच्या रूपात कोकणात आलेला सूर्यदेव कोकणी देवदेवतांच्या कुटुंबामध्ये अलगद सामावून गेलेला आहे. संस्कृतीच्या या मिश्रणामध्ये ज्या काही कथा तयार होतात त्या फारच रोचक आणि मजेदार असतात. मानवी भावभावनांचा लेप या देवत्वाला लागतो आणि देवसुद्धा मानवी होऊन जातात.
सूर्य हा निसर्गदेव गेल्या हजारो वर्षांपासून आपल्या मिथककथांमध्येही आलेला आहे. निसर्गामधल्या ज्या शक्तींनी मानवी जीवन सुसह्य आणि समृद्ध केलं आहे त्या सर्वांनाच प्रत्येक जुन्या संस्कृतीत दैवतस्थान मिळालेलं आहे. संस्कृतीच्या देवाणघेवाणीमध्ये, मिश्रणामध्ये अनेकदा अशा भन्नाट गोष्टी पाहायला मिळतात. अन्यथा, लोकदैवतांच्या भूमीमध्ये- कोकणामध्ये या आदिम निसर्गदेवाचं, सूर्यनारायणाचं प्रस्थ कसं पाहायला मिळालं असतं?
सूर्य हा वैदिक देव. गायत्रीमंत्र हा सविता अर्थात सूर्याचा मंत्र. त्याचा पिता कश्यप. तो अदितीचा पुत्र, म्हणून त्याचं नाव आदित्य. म्हणूनच कदाचित ऋग्वेदामध्ये आकाशाला अदिती असंही म्हटलं असावं. यम, यमी, शनी आणि अश्विनीकुमार ही सूर्य आणि अश्विनीची अपत्यं. महाभारतातला कुंतीला वर देणारा आणि कर्णाचा पिता असलेला हाच सूर्य. वैदिक काळात जरी सूर्योपासना प्रचलित असली तरी त्याला मूर्तिरूप मिळालं ते मात्र दुसऱ्या-तिसऱ्या शतकामध्ये. शक, कुशाण, ग्रीक यांच्या आक्रमणांनंतर भारतभरात त्यांचा संस्कृतिसंगम झाला. आचारविचारांची, दैवतांची, कथा-लोककथांची बेमालूम देवाणघेवाण झाली आणि सूर्यनारायण मूर्तिरूपामध्ये देवळांत वसला. म्हणूनच, कोकणामधला असूनही इथला आदित्यनाथ इराणी मूर्तिकलेप्रमाणे गमबूटसारखे मोठे बूट घालून उभा आहे. कशेळीचा कनकादित्य म्हणजे या सर्व सूर्यमंदिरामधलं प्रशस्त आणि जुनं मंदिर.
हेही वाचा- कोकणातला कातळखजिना
चिऱ्याच्या दगडांचं बांधकाम असलेलं मूळ मंदिर सुमारे आठ-नऊ शतकं जुनं आहे. मंदिराच्या लाकडी छताला वेगवेगळ्या देवीदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूला गणपतीचं छोटंसं सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या आवारात श्रीशंकर, दुर्गा, मारुती आदी छोटी देवळं आहेत. मंदिराचे पुजारी सांगतात, की मंदिरातली कनकादित्याची मूर्ती ग्रीक धाटणीची आहे. ग्रीक सूर्योपासक होते. मंदिराचा लाकडी सभामंडप एकशेऐंशी वर्षांपूर्वीचा आहे. मुंबईचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या कै. नाना शंकरशेट यांनी तो बांधला. पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी कनकादित्याला नवस बोलला होता; नवसपूर्तीसाठी त्यांनी हा सभामंडप बांधून दिला, असे उल्लेख आहेत. नुकताच एक-दोन वर्षांपूर्वी अस्सल सागवानी लाकडाने हा सभामंडप नव्याने बांधून घेतला गेला आहे. हे नवं बांधकाम जुन्या बांधकामासोबत अगदी बेमालूमपणे मिसळलं गेलं आहे, त्यामुळे देवळाच्या पुरातन वास्तुसौंदर्याला जराही धक्का लागत नाही. या नवीन बांधकामामुळे देऊळ आणि परिसर बेंगरूळ दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली गेलेली आहे. मूळ मंदिराच्या छतावर तांब्याचा पत्रा चढवलेला आहे. मंदिरामध्ये एक जुना, साडेसात किलो वजनाचा ताम्रपट होता. ‘पन्हाळगडच्या शिलाहार राजा गंडरादित्य द्वितीय यांनी शके १११३ मध्ये बारा ब्राह्मण लोकांना दररोज भोजन देण्यासाठी गोविंद भट भागवत यांना हा कशेळी गाव इनाम म्हणून दिला' असं या ताम्रपटामध्ये नमूद केलेलं आहे. संस्कृत भाषेमध्ये आणि देवनागरी लिपीमध्ये लिहिलेला हा ताम्रपट सध्या सुरक्षिततेच्या कारणास्तव मंदिरामध्ये ठेवलेला नाही, मात्र मंदिराचे पुजारी आपल्याला त्याचे फोटो तसंच मराठी भाषांतर आवर्जून दाखवतात. गोविंद भट यांचे वंशज आज मंदिराचे पुजारी आहेत. या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांचे चरण लागल्याचं आजही गावात अभिमानाने सांगितलं जातं. मंदिराच्या आवारात खोल विहीर आहे. त्या विहीरीचं पाणी काढण्यासाठी बांबूची एक वैशिष्ट्यपूर्ण रचना वापरली जाते, त्याला कोळंबं म्हणतात. अशा रचनेच्या फार थोड्या विहिरी हल्ली कोकणातून दिसतात.
रा. चिं. ढेऱ्यांनी आपल्या संशोधनामधून भारतातल्या सूर्यपूजेचा इतिहास सविस्तररीत्या मांडला आहे. त्यांच्या ‘लोकदैवतांचे विश्व' पुस्तकातल्या एका लेखात आदित्य राणूबाईची कहाणी घेऊन इराणी सूर्योपासकांचा भारतीय संस्कृतीसोबत झालेला संगम अतिशय लालित्यपूर्ण भाषेत विषद केलेला आहे. आदित्य राणूबाईची ही कहाणी मुळातून वाचण्यासारखी आहे. यांसारख्या लोककथांमधून अजूनही त्या इतिहासाशी आपली नाळ कुठे तरी जुळून राहिलेली आहे. मी इतिहास संशोधक वगैरे नाही, पण मला या लोककथांचं, त्यातून वाहत आलेल्या परंपरेचं प्रचंड आकर्षण आहे. कोकणामध्ये असलेली बहुतेक सूर्यमंदिरं परकीय संस्कृतीच्या संगमातून निर्माण झालेली असली तरी आज ही सर्व देवळं कोकणी परंपरेमध्ये अगदी छान मुरलेली आहेत.
आज पितांबर ल्यायलेली, फुलांचं आभूषण घातलेली आणि समई-निरांजनाच्या प्रकाशात सुवर्णासारखी दिसणारी कनकादित्याची गंडकी शिळेची मूर्ती कोकणातलीच वाटते. कुठून कुठे निघालेल्या या आदित्याला इथेच राहावंसं का वाटलं ते त्यालाच माहीत असावं. पण हजारभर वर्षांपूर्वी हा आदित्य कोकणच्या भूमीवर स्थिरावला, इथेच राहिला आणि कदाचित इथल्या मनमोकळ्या आणि गर्द हिरवाईच्या प्रेमात पडून इथलाच जावईदेखील झाला. आज कनकादित्य इथल्या स्थानिक लोकसंस्कृतीचा अविभाज्य अंग बनून अनेक भाविकांना आशीर्वाद देत उभा आहे.
(मुशाफिरी, दिवाळी २०१७च्या अंकातून साभार)
नंदिनी देसाई | Nandini2911@gmail.com
नंदिनी देसाई यांनी पत्रकारिता आणि जनसंपर्क क्षेत्रात काम केलं आहे. सध्या त्या स्वतंत्रपणे लेखन-अनुवादाचं काम करतात.
