
वास्को-द-गामा हा दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला, ‘केप-ऑफ-गुडहोप'ला वळसा घालून भारतात आलेला पहिला युरोपियन. त्याचा प्रवास म्हणजे पुढच्या साम्राज्यविस्ताराची अन् जागतिकीकरणाची नांदी होती. हा पोर्तुगीज दर्यावर्दी तीन वेळा भारतात येऊन गेला आणि त्याचा मृत्यूही भारतातच झाला.
नव्या भूमीच्या शोधात बाहेर पडलेल्या शोधकांच्या इतिहासात वास्को-द-गामाचं स्थान महत्त्वाचं आहे. पण आपल्या वाट्याला आलेली त्याची क्रूर बाजू माहिती आहे?
मसाल्यांच्या शोधात निघालेला वास्को-द-गामा २० मे १४९८ रोजी पहिल्यांदा कोझीकोडेला उतरला आणि तिथल्या राजाची, झामोरिनची भेट घेऊन २९ ऑगस्ट १४९८ला लिस्बनला परत गेला. त्याला भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत, कोचीन, कन्नानोर इथे व्यापारी ठाणी सुरू करावयाची होती. पण पहिल्या भेटीत त्याला हे जमलं नाही.
१५०२ ला गामा पुन्हा भारतात आला. यावेळी त्याने भक्कम आरमार सोबत आणलं होतं. त्याने कोझीकोडेहून मक्केला चाललेलं ‘मिरीम' हे प्रवासी जहाज लुटून त्यावरील ४०० महिला-पुरुष-मुलांना जिवंत जाळलं. पोर्तुगीज आरमारापुढे आपला टिकाव लागणार नाही याचा अंदाज आल्याने झामोरिनने गामाशी बोलणी सुरू केली. मात्र 'कोझीकोडेतील सर्व मुस्लिमांना हद्दपार केलं, तरच बोलतो,' असा निरोप गामाने पाठविला. ते शक्य नव्हतं. झामोरिनने कोचीनच्या राजाला गामाच्या विरोधात मदत करण्याची विनंती केली. पण या राजाने ते पत्र जसंच्या तसं गामाकडे धाडलं. दरम्यान, झामोरिनने तलप्पना नंबुद्री या आपल्या पुरोहिताला गामाकडे पाठवलं. याच नंबुद्रीने पहिल्या वेळी गामा आणि झामोरीनची भेट घडवली होती. या नंबुद्रीला हेर समजून गामाने त्याचे ओठ-कान छाटले आणि त्याजागी कुत्र्याचे कान शिवले. तरीही राजा आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणून त्याने किनारपट्टीवरील एक गावही बेचिराख केलं. शेवटी नुकसानभरपाईच्या अटीवर त्याने झामोरिनबरोबर तह केला व व्यापारी ठाणी मिळवली. अशा रीतीने पोर्तुगीजांचा भारतात प्रवेश झाला.
त्यानंतर १५२४ मध्ये गामा पुन्हा भारतात आला, पण काही दिवसांतच मलेरियाने त्याचा मृत्यू झाला.
मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com
मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.