जगात मानवी आश्चर्यं म्हणून ज्या वास्तू प्रसिद्ध आहेत, त्या तुलनेने अलीकडच्या काळातल्या आहेत. इसवीसनपूर्व पाच-सातशे वर्षांपासून सतराव्या शतकापर्यंत. आजच्यापेक्षा त्या काळी तंत्रज्ञान खूपच मागास होतं. त्यामुळे चीनच्या भिंतीपासून आपल्या ताजमहालपर्यंतच्या वास्तू त्या काळातल्या माणसांनी तेव्हाच्या तुटपुंज्या तंत्रज्ञानाच्या आधारे कशा उभ्या केल्या असतील याचा अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही. पण त्याहूनही आश्चर्य वाटतं ते अतिप्राचीन मानवनिर्मित कलाकृतींचं. अश्मयुगीन आदिमानवाने तब्बल १० हजार वर्षांपूर्वी गुहांमध्ये, कातळांवर काढलेली चित्रं हजारो वर्षांच्या उलथापालथी सहन करत आजही त्या काळातल्या माणसांची साक्ष देत आपल्यासमोर उभी आहेत. ती चित्रं, त्यातले विषय, चित्रकारांचं कौशल्य पाहून थक्क व्हायला होतं. शिवाय या चित्रांतील विषयांमुळे काही प्रश्नांची उत्तरं मिळतात, तर नव्याने काही प्रश्नही पडतात.
अशा अश्मयुगीन चित्रांचा विषय निघाला की आपल्याला आठवतं भीमबेटका. भीमबेटकामधली चित्रं १० हजार ते ७० हजार वर्षांपूर्वीची असावीत असा काहींचा दावा आहे. अशा चित्रांच्या परदेशातल्या खजिन्यांबद्दलही आपण ऐकून असतो. त्यापैकी एक म्हणजे पेरू देशातल्या ‘नाजका लाइन्स'. खडकांवर काढलेली ही चित्रं शंभर-दीडशे मीटर आकाराची आहेत. ती कशाची आहेत हे समजून घ्यायचं असेल तर विमानातून किंवा ड्रोनच्या मदतीनेच पाहावी लागतात. कातळात कोरलेली अशी चित्रं जगभरात आहेत. अमेरिकेत सर्वांत प्राचीन खोदचित्रं नेवाडा भागात आहेत. ती सुमारे १० ते १५ हजार वर्षांपूर्वीची असावीत.
मुद्दा असा, की अशी प्राचीन चित्रं सहसा लांब कुठे तरी परदेशांत असतात असा आपल्याकडचा समज. त्यामुळेच गेल्या दशकात आपल्या कोकणात एकूण ७० गावांत मिळून सतराशेहून अधिक खोदचित्रं सापडली आहेत हे आपल्या गावीच नाही. ही चित्रं सापडली आहेत, असं म्हणण्यापेक्षा ती उजेडात आली म्हणणं जास्त योग्य ठरेल. कारण त्यातली बरीचशी खोदचित्रं स्थानिकांना पूर्वीपासून माहीत होती. पण ‘आहे काही तरी तिकडे' अशा पूर्ण अनास्था वृत्तीमुळे हा खजिना जगापासून लपूनच राहिला होता. प्रांजळपणे सांगायचं, तर मलासुद्धा देवी हसोळ गावात दगडात कोरलेलं काही तरी आहे हे लहानपणापासून माहीत होतं. तिथे गेली काही शतकं दर मार्गशीर्षात मोठी जत्रा भरते. तिथल्या ‘आर्यादुर्गा' मंदिराच्या आणि ‘जाखादेवी' मंदिराच्या अगदी शेजारी कातळावर मोठ्या चौकोनात काही तरी गूढ कोरलेलं आहे हे त्या यात्रेला येणाऱ्या सर्वांना चांगलं माहीत होतं. किंबहुना, ही यात्रा या मोठ्या कोरलेल्या चौकोनावरच भरते. जवळच्या भालावली या गावातून तिथल्या देवीची पालखी याच चौकोनावर ठेवली जाते आणि पुढची पूजा केली जाते. पण हे माहीत असूनही हे काय आहे, कोणी आणि कधी खोदलं असावं, असे प्रश्न माझ्याही मनात कधी उमटले नव्हते.
हेही वाचा - मोरयार गुड्डा - २५०० वर्षांपूर्वीचं आश्चर्य
सफरचंद आणि सर्वच वस्तू अनादिकालापासून खाली पडत आल्या आहेत; पण त्या का, हा प्रश्न न्यूटनसारख्या एखाद्यालाच पडतो. असंच काहीसं या खोदचित्रांच्या बाबतही झालं. या ‘काही तरी आहे तिकडे'पासून आजच्या ७० ठिकाणांच्या १७०० हून अधिक चित्रांचा ठावठिकाणा लागण्यात काही मोजक्या संशोधकांचा मोठा वाटा आहे. २००१ च्या आधी देवी हसोळ आणि निवळी (रत्नागिरी) इथली खोदचित्रं लोकांना माहीत होती, पण या चित्रांचं वेगळेपण कळलेलं नव्हतं. ही चित्रं पांडवकालीन आहेत असंच मानलं जात असे. २००१च्या सुमारास सिंधुदुर्गातील हिवाळे, कुडोपी या भागातील खोदचित्रं शोधण्याचा प्रयत्न सतीश लळीत यांनी केला. लळीत हे सावंतवाडीचे पत्रकारितेतील पदव्युत्तर पदविका घेतलेले गृहस्थ. ते काही काळ महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागात उपसंचालक होते. काही काळ मुख्यमंत्र्यांचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. तसंच दै. सकाळ, केसरी आणि महाराष्ट्र टाइम्सचं उपसंपादक पदही सांभाळलं होतं. त्यांचा पुरातत्त्व विभागाशी थेट संबंध नसला तरी त्यांनी या विषयातला मुंबई विद्यापीठाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पुरा केला होता. त्यामुळे आदिमानवाच्या काळातली खोदचित्रं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहेत, असं कळल्यावर त्यांना स्वस्थ बसवेना. त्यांनी हिवाळे आणि कुडोपी ही खोदचित्रांची दोन ठिकाणं स्थानिकांच्या मदतीने प्रकाशात आणली. नंतर त्यांना त्या भागात अशी बरीच खोदचित्रं सापडली. ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पं' या नावाचं त्यांचं पुस्तकही प्रसिद्ध झालेलं आहे.
त्यानंतर बऱ्याच काळाने रत्नागिरीतील सुधीर रिसबूड, डॉ. सुरेन्द्र ठाकूर देसाई, धनंजय मराठे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी कोकणातली कातळचित्रं शोधण्याचा ध्यासच घेतला. सुधीर रिसबूड हे खरं तर पेशाने विद्युत अभियंता आहेत, पण या हरहुन्नरी माणसाला अनेक छंद आहेत. ते वनस्पतिशास्त्राचेही अभ्यासक आहेत, तसंच त्यांचा प्राणी-पक्ष्यांचाही अभ्यास आहे. त्यांचं ‘कोकणातील पक्षी' या विषयावरचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई हे रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील भूगर्भशास्त्र या विषयाचे प्राध्यापक. तिसरे धनंजय मराठे हे इंजिनीअर आहेत. त्यांचाही पक्ष्यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यातही मलबार पाईड हॉर्नबिल या पक्ष्याच्या घरट्यांचा त्यांचा अभ्यास मोठा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धनासाठी या त्रयीने रत्नागिरीत ‘निसर्गयात्री' ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेमार्फत या तिघांनी रत्नागिरीतली कातळचित्रं शोधण्याची जबाबदारी आपणहून अंगावर घेतली.
एकेक करून या कातळचित्रांचा शोध लागत गेल्यावर पुरातत्त्व विभागाची मदत लागणार हे उघड होतं. या कामात निसर्गयात्री संस्थेला खऱ्या अर्थाने मदतीचा हात दिला तो तेजस गर्गे या पुरातत्त्व विभागाच्या तरुण संचालकाने. डॉ. तेजस गर्गे यांच्या पुढाकाराने पुरातत्त्व विभाग आणि निसर्गयात्री संस्था यांनी मिळून २०१८ साली रत्नागिरीत या विषयावर एक चर्चासत्र भरवलं. दोन दिवसांच्या या चर्चासत्रामुळे या विषयाला आणखी गती आली. मध्ये कोरोनाकाळात ती परत मंदावली असली तरी चर्चासत्रामुळे हा विषय खूप लोकांपर्यंत पोहोचला आणि खासगी जमिनींवरील खोदचित्रांचं जतन कसं करायचं याचे बारकावे आणि त्याबद्दलच्या काही शक्यता यावर जोरात विचार- विनिमय सुरू झाला.
हेही वाचा - बिहार : पुरातन बौद्ध संस्कृतीचा चालता-बोलता इतिहास
अर्थात डॉ. तेजस गर्गे पूर्ण उत्साहाने यात लक्ष घालत असले तरी शेवटी त्यांच्यावर अन्य बऱ्याच ठिकाणांचीही जबाबदारी आहे. शिवाय सरकारी कामाचा स्वतःचा असा एक वेग असतो. त्या गतीने आज १७० ठिकाणांपैकी ४० ठिकाणांचं सरकारी सर्वेक्षण झालं आहे. त्यातील नऊ ठिकाणांचा जागतिक वारसास्थळं म्हणून मान्यता मिळण्यासाठीच्या प्राथमिक प्रस्तावित यादीत समावेश झाला आहे. त्या कामात महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे आणि डेक्कन कॉलेज पुणे येथील काही प्राध्यापकांचाही सहभाग आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील ऊक्षी, जांभरूण, कशेळी, रूंढे तळी, देविहसोळ, बारसू, देवाचे गोठणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी आणि फणसमाळ अशी ही ठिकाणं आहेत. या नऊ ठिकाणी पुरातत्व विभागाने या संदर्भातील काही नोटिसा लावल्या होत्या; पण त्या टिकाऊ नसल्याने आज नजरेस पडत नाहीत. त्या पुन्हा लावण्याची नक्कीच गरज आहे.
अर्थात लळीत काय किंवा रिसबूड-ठाकूरदेसाई-मराठे त्रयी काय, तिथल्या स्थानिकांच्या मदतीशिवाय ही मंडळी काहीच करू शकली नसती. गावोगाव जाऊन, स्थानिकांना भेटून, त्यातल्या त्यात सड्यांवर गुरांना घेऊन भटकणाऱ्या धनगरांना भेटून, तुम्ही हिंडता त्या परिसरात, तुमच्या गावाच्या परिसरात अशी काही खोदचित्रं आहेत का विचारायचं, त्यांना सोबत येण्याची विनंती करायची, प्रसंगी अशा लोकांना सोबत येण्यासाठी काही खाण्या-पिण्याचं आमिष दाखवायचं असं करून त्यांनी ही खोदचित्रं शोधून काढली. कित्येक गावाची खोदचित्रं गवतात लपलेली असायची. त्यावर शतकानुशतकांचा मातीचा थर असायचा. हे सारं बाजूला करून मूळ कातळशिल्पाला धक्का न लावता तो परिसर स्वच्छ करायचा आणि ही चित्रं उजेडात आणायची हे सारं कष्टाचं काम ही मंडळी न कंटाळता करत राहिली, तेव्हा कुठे २०१२ ते २०२२ या १० वर्षांत ही खोदचित्रांच्या सूचीची लांबी १७०० वर गेली आहे.
ही झाली सापडलेल्या खोदचित्रांची कहाणी; पण सापडण्याआधीच गायब झालेली चित्रं किती असतील कोण जाणे! आजही काही मंदिरांत भोळेपणाचा आव आणून त्रयस्थपणे चौकशा केल्या तर समजतं, की जिथे देवीच्या सोन्याच्या पादुका ठेवलेल्या आहेत, तिथे पूर्वी जमिनीवर कोरलेले मानवी (त्यांच्या भाषेत देवीचे) पाय होते. मग भक्तांच्या मंदिर मोठं करण्याच्या आणि जीर्णोद्धार करण्याच्या भावभक्तीचा परिपाक म्हणजे मूळच्या कोरीव पायांवर सिमेंटचा चौथरा करून आज तिथेच या सोन्याच्या पादुका उभ्या राहिल्या आहेत. हजारो वर्षांच्या मानवी संस्कृतीची साक्ष असणारी कातळचित्रं बुजवून तिथेच नवी देवळं बांधली गेली आहेत.
आजही परिस्थिती पूर्ण बदलली आहे, अशातला भाग नाही. कोट हे रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातलं गाव. हे राणी लक्ष्मीबाईच्या सासुरवाडीचं नेवाळकरांचं गाव. या गावात नुकतीच बरीच खोदचित्रं सापडली. ती सापडली तेव्हा त्या खोदचित्रांवरच शेणाच्या गोवऱ्या वाळत टाकल्या जात असत. त्यावरच भाताची मळणी करण्यासाठी शेणाने सारवलंही जात होतं. सड्यावर अजिबात माती नसते. त्यामुळे भाताची मळणी झाल्यानंतर त्यावरच गवताच्या पेंढ्या ठेवल्या जात असत. या चित्रांबद्दल माहिती कळल्यावर रिसबूड आणि सहकाऱ्यांनी या गावाला भेट दिली. तिथल्या सरपंचांना भेटून गावकऱ्यांना एकत्र करून त्यांना या खोदचित्रांचं महत्त्व पटवून तो परिसर स्वच्छ करवून घेतला. या कामात माझाही खारीचा वाटा होता.
कोकणातील खोदचित्रांची काही वैशिष्ट्यं सांगता येतील. इथली कातळचित्रं समूहाने असतात. एका समूहामध्ये दोन-चार रचनांपासून १२० रचनांचा समूहही आढळतो. या कातळचित्रांमध्ये मूर्त-अमूर्त दोन्ही प्रकारची चित्रं आहेत. मूर्त रचनांमध्ये तत्कालीन मानवाने त्याच्या आजूबाजूस दिसणारे विविध जाती-प्रजातींचे प्राणी, पक्षी तसंच मनुष्याकृती यांची निर्मिती केलेली दिसून येते. त्यातही जंगली प्राण्यांची संख्या जास्त आढळते. चौशिंग्या, चितळ, सांबर, नीलगाय, गवा रेडा, माकड, ससा, डुक्कर, एकशिंगी गेंडा, हत्ती, पाणघोडा असे शाकाहारी प्राणी; कांडेचोर, उदमांजर यांसारखे मिश्रहारी, तर वाघ, कोल्हा, तरस यांसारखे शिकारी प्राणीही या चित्रांमध्ये आहेत.
बऱ्याच चित्रांमध्ये आढळणारा प्रमुख प्राणी म्हणजे हत्ती. यापैकी ऊक्षीतल्या कातळचित्रांवरचा हत्ती खऱ्या हत्तीच्या आकाराचा आहे, तर कशेळी-गावखडीच्या सड्यावर कोरलेला हत्ती त्याहूनही मोठा आहे. १६ मीटर लांब आणि १४ मीटर रुंदीची हत्तीची रचना भव्य या सदरात मोडणारी आहे. अन्य बऱ्याच ठिकाणी छोटे हत्ती आहेत. या बहुतांश हत्तींचे कान मात्र डोक्याच्या दोन बाजूंस न काढता डोक्याच्या वर दिसतात. त्या काळात हत्तींचे कान तसेच होते की खोदचित्र काढणाऱ्याच्या मर्यादेमुळे ते तसं दाखवलं गेलं आहे की या चित्रकाराने ‘आर्टिस्टिक लिबर्टी' घेतली आहे, हा संशोधनाचा भाग आहे; परंतु एकूण विविध ठिकाणच्या हत्तींची चित्रं पाहता ही चित्रं काढली त्या काळात या भागात हत्ती होते असा अर्थ काढावा का? प्राण्यांच्या रचनांमध्ये मगर, घोरपड यांसह समुद्री कासवांच्या रचनांचादेखील समावेश आहे.
कशेळी (रत्नागिरी) इथल्या वर उल्लेख केलेल्या महाकाय हत्तीच्या पोटावर आणि भोवती अन्य असंख्य प्राण्यांची चित्रं आहेत. हे खोदचित्र बहुधा आशियातील सर्वांत मोठं खोदचित्र आहे. पश्चिमेकडे पाय असलेल्या या रचनेतील हत्तीच्या पायाची रुंदी चार फुटांच्या घरात आहे, कानाची लांबी सात फूट, तर सोंडेची लांबी १८ फूट आहे. त्यातल्या तब्बल १२० खोदचित्र रचनांच्या समूहातून एका नजरेत न मावणारी ही चित्ररचना अनुभवणं हे सोपं काम नव्हे. हत्तीच्या रचनेच्या कानाच्या बाजूला उभं राहिल्यास शेपटीचा भाग नजरेच्या पल्याड जातो. वास्तवातील आकाराशी साधर्म्य असलेल्या रानडुक्कर, माकड, वाघ, एकशिंगी गेंड्याचं पिल्लू, कांडेचोर वर्गातील प्राणी, कोल्हा, हत्ती, कांगारूसदृश प्राणी असे विविध जाती-प्रजातींचे जंगली प्राणी; मोर, गरुड, बगळावर्गीय पक्षी अशी अनेक खोदचित्रं इथे आहेत. कांगारू हा प्राणी तर जगात फक्त ऑस्ट्रेलिया खंडात आहे. मग इथल्या चित्रात हा प्राणी कसा, हे एक मोठं कोडं आहे.
ऊक्षीच्या हत्तीच्या खोदचित्राच्या जवळच आणखी एके ठिकाणी बऱ्याच गूढ चित्रांचा एक समूह आहे. निरनिराळी वर्तुळं आणि रेषा यांनी साकारलेल्या अमूर्त चित्रांमधून त्या चित्रकाराला काय व्यक्त करायचं असेल ते समजत नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातच ‘चवे देऊड' या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण चित्रसमूह आहे. किमान २५ चित्रांच्या या समूहात हरिण, माकड, तरस, मोर, उदमांजर प्रजातीतील प्राणी; उडती खारसदृश प्राणी आहेत. या सर्व रचना वास्तवातील त्या प्राण्यांच्या आकाराशी मिळत्या-जुळत्या आहेतच, पण सोबत काही लहान, तर काही भले थोरले पावलांचे ठसे असावेत, अशा रचना आहेत. पण खरं आश्चर्य म्हणजे इथे सहा बाय तीन मीटर अशा आकाराचा एकशिंगी गेंडा कातळात कोरलेला आहे. याचा अर्थ काय काढावा? आज किंवा माहीत असलेल्या इतिहासात या भागात कधीही गेंडा नव्हता. मग या खोदकर्त्याला गेंडा कुठे पाहायला मिळाला? कोकणामध्ये एकशिंगी गेंडा, पाणघोडा यांच्या अस्तित्वाचे पुरावे उपलब्ध नाहीत, मग या चित्ररचनांमध्ये त्यांचं चित्रण कसं काय? कधीकाळी एकशिंगी गेंड्याचं, पाणघोड्याचं वास्तव्य कोकणात होतं का? मग त्या काळी इथली भौगोलिक परिस्थिती कशी होती? कातळचित्रं पाहताना अशा अनेक बाबी आपल्या मनात निर्माण झालेल्या कुतूहलाची जागा विविध विचारांनी व्यापून टाकतात आणि या चित्रांभोवतीचं गूढतेचं वलय अधिक गडद करतात.
याच भागात आणखी एके ठिकाणी बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीचं चित्र वाटावं असं एक खोदचित्र आहे. असे दोन पाय कोरलेली अन्य बरीच ठिकाणं आहेत. याला मातृदेवता असं मानलं गेलं आहे.
बारसू या राजापूरच्या जवळ असलेल्या एका गावाच्या सड्यावर दोन वाघ आणि त्यांना दूर करणारी दोन हात पसरलेली एक मानवी आकृती खोदलेली आहे. या चित्राचा आकारही अवाढव्य आहे. दोन भले थोरले वाघ आणि त्यांच्या मध्ये १२ फुटांपेक्षा अधिक लांबीची मनुष्याकृती, अशी तब्बल ५७ फूट लांब आणि १५ फूट उंच अशी ही रचना आहे.
याच बारसूच्या सड्याच्या दुसऱ्या टोकाला देवाचे गोठणे गावाच्या सड्यावर एक मानवी आकृती खोदलेली आहे. या आकृतीला रावण म्हणतात. या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे या आकृतीच्या २५ मीटर परिसरात चुंबकीय सुई नीट काम करत नाही. सर्वसाधारणपणे पृथ्वीवर ती दक्षिण-उत्तर दिशा दाखवते, परंतु इथे मात्र निरनिराळ्या ठिकाणी सुई निरनिराळ्या दिशा दाखवते. एकापेक्षा अधिक सुया थोड्या थोड्या अंतरावर ठेवल्या तर प्रत्येक सुई निरनिराळ्या दिशेला वळलेली असते. याचं कारण काय याचा अजून उलगडा झालेला नाही.
इथून जवळ असलेल्या सोगमवाडी भागातही विविध खोदचित्रं आढळतात. देवीहसोळ भागात देवळाजवळचा याआधी उल्लेख केलेला चौकोन तर आहेच, पण दोन किलोमीटर परिसरात असंख्य कातळचित्रं आहेत.
कोकणातील खोदचित्रांमध्ये शार्क, वाघळी, देवमासा अशा विविध जाती-प्रजातींच्या जलचरांची चित्रं आढळून येतात. यांचं चित्र देखील वास्तवातील त्या जलचरांच्या आकाराचं आहे. अपवाद म्हणून नेवरे गाव सड्यावरील ८ मीटर लांब आणि २.५ मीटर रुंदीची माशाची भली थोरली रचना आपल्याला बुचकळ्यात पाडते.
कोकणातील कातळ खोदचित्र रचनांमध्ये गरुड, ससाणा, घार, बगळा, मोर इत्यादी पक्ष्यांचं चित्रण केल्याचं आढळून आलं आहे. या रचना त्या पक्ष्यांच्या वास्तवातील आकाराच्या आहेत. मात्र, उपळे गावात पंख पसरून उडणाऱ्या २४ फूट लांबीच्या पक्ष्याचंं खोदचित्र आहे. हा ससाणा असावा असा अंदाज आहे. या पक्ष्याच्या पंखांचा विस्तार तब्बल ३७ फूट आहे. विशेष म्हणजे या चित्रांत पक्षाच्या पंखांच्या टोकाकडील पिसंदेखील दाखवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. एका ठिकाणची रचना बुचकळ्यात पाडणारी आहे. शेतात उभ्या असलेल्या बगळ्यासारख्या दिसणाऱ्या या पक्ष्याची उंची तब्बल १२ फुटांच्या घरात आहे; पण हा पक्षी बगळा या वर्गातील नसून तो हजारेक वर्षांपूर्वी नामशेष झालेला ‘हत्ती पक्षी' असावा असं दिसतं. पण हा पक्षी केवळ मादागास्कर बेटावर होता असं मानलं जातं. मग आपल्याकडे कोकणात त्याचं चित्र कुठून आलं, हा अभ्यासाचा विषय आहे.
कापडगाव इथे १८ फूट लांबीच्या माशाच्या रचनेसह सुमारे २८ फूट लांब आणि २० फूट रुंदीचा विविध चित्ररचनांचा समूह आहे.
कोटमधल्या याआधी उल्लेख केलेल्या खोदचित्रात ८ मीटर लांब आणि ३ मीटर उंच गवा रेडा आहे. या रेड्याची ६० सेंटिमीटर लांबीची वक्राकार शिंगं पाहून त्याच्या ताकदीची कल्पना येते. या गव्यासोबत ६ मीटर उंच आणि २ मीटर रुंद पक्षी आहे. पक्ष्याच्या डोक्यावरील आकर्षक तुरा, मजबूत पाय आणि १५० सेंटिमीटर लांबीच्या नख्या यावरून या पक्ष्याची भव्यता जाणवते.
कोटमधल्या चित्रसमूहांमध्ये एक ते दोन मीटर लांबीपर्यंतचे विविध प्रजातींतील मासे, दोन मीटर लांबीची घोरपडीसदृश आकृती, विविध प्रजातींचे प्राणी-पक्षी, मोठ्या आकाराची चौकोनी उठावाची रचना आणि काही अनाकलनीय आणि लहान आकाराच्या भौमितिक रचना अशा ३० पेक्षा अधिक खोदचित्र रचनांचा समूह आहे. या सर्वांसोबत असलेली १२ फूट लांब व जवळपास तेवढीच रुंद भौमितिक रचना आपलं लक्ष वेधून घेते.
जांभरूण येथील मानवी चित्रं इतर ठिकाणांच्या चित्रांपेक्षा सुबक वाटतात. कदाचित ती त्यातल्या त्यात अलीकडच्या काळातली असावीत असा अंदाज बांधता येतो.
पण गंमत म्हणजे या खोदचित्रांमध्ये इतके विविध पक्षी-प्राणी खोदलेले असूनही आज आपण पाळतो त्यापैकी कोणत्याही प्राण्यांची चित्रं त्यात आढळत नाहीत. याचं कारण काय असावं?
हे झालं प्राणी-पक्षी याबाबत. त्यांच्या सुबकतेवरून त्यातील कोणती चित्रं प्राचीन असावीत आणि कोणती तुलनेने नवी, असा फरक करू शकतो. त्यातली काही चित्रं बरीच तरुण असावीत. अमूर्त भौमितिक आकृत्या या त्या खोदणाऱ्या व्यक्तीच्या हाती बरंच कसब आणि विचारक्षमता निर्माण झाल्याचं लक्षण आहे.
अशीच एक अत्यंत सुंदर आकृती आडिवरे या गावाजवळच्या रुंधेतळीच्या सड्यावर आढळते. माझ्या मते इथलं खोदचित्र कदाचित कोकणातील सर्वांत तरुण, म्हणजे तुलनेने अलीकडच्या काळातील चित्रांपैकी एक असावं. या खोदचित्रात बऱ्याच ठिकाणी मानवी आकृत्या आहेत. हे चित्र खोदणारा मानव तुलनेने प्रगत असावा असं वाटतं. कारण रुंधेतळीचं चित्र इतर चित्रांपेक्षा अधिक सुबक, प्रमाणबद्ध आणि अमूर्त आहे. ते एखाद्या कुशल कारागिराने काढलेलं असावं असं वाटतं. यातल्या एका चौकोनात बऱ्याच पाकळ्यांसारखे गोल काढलेले आहेत. या पाकळ्यांसदृश आकृत्या ३६० अंशाचे समान भाग करून एकसारख्या आकाराच्या काढलेल्या दिसतात. चार बाजूंना गणितातल्या अधिकच्या चिन्हासारख्या काही खुणा आहेत. त्याशेजारी एखाद्या मोठ्या मधमाशीसारखं किंवा एखाद्या एकच पंख काढलेल्या कासवासारखं एक चित्र, एक वाघाचं चित्र, शार्कसदृश माशाचं चित्र आणि दोन मानवी पाय अशी अन्य चित्रंही आहेत.
ही सारी खोदचित्रं आज खासगी जमिनीत आहेत. त्यांचं जतन करणं आवश्यक आहे. परंतु खासगी मालकांवर त्यांच्या जतनाची जबाबदारी कशी टाकावी आणि त्यांचा नाश कसा थांबवावा हा पुरातत्त्व खात्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न सुटावा आणि आहेत ती खोदचित्रं तरी नीट जतन व्हावीत यासाठी रिसबूड आणि डॉ. तेजस गर्गे यांचे प्रयत्न सुरू आहेत.
या खोदचित्रांच्या माध्यमातून कोकण पर्यटन वाढवणंही शक्य आहे. अर्थात त्यासाठी आधी बरीच तयारी करावी लागेल. त्यांच्या संरक्षणाची यंत्रणा उभी करावी लागेल. ऊक्षीमधल्या हत्तीच्या प्रसिद्ध खोदचित्राभोवती ग्रामपंचायतीमार्फत कुंपणभिंत बांधली आहे आणि उंचावरून हत्ती पाहण्यासाठी एक चबुतराही उभारला गेला आहे.
या पर्यटनामुळे पर्यावरणाला हानी होऊ नये, किंबहुना कोकणाला सड्यावरचा निसर्ग हेही पर्यटनाचं आकर्षण ठरावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसं झालं तर इथल्या लोकांना काही प्रमाणात मार्गदर्शक म्हणून, तसंच घरगुती निवास व्यवस्थेतून उपजीविकेचे मार्ग मिळू शकतील.
या कातळचित्रांपर्यंत कसं पोहोचायचं याबद्दलचे मार्गदर्शक फलक कुठेही लावलेले नाहीत. त्या त्या गावातल्या लोकांनाही त्यांच्या परिसरातल्या सर्व कातळचित्रांची माहिती असेलच असं नाही. त्यामुळे हा लेख वाचून कोणी तिथे जायचा प्रयत्न केला तर चित्रं बघायला मिळतील याची खात्री नाही. त्यापेक्षा रिसबूड, डॉ. ठाकूरदेसाई किंवा माझ्यासारख्या व्यक्तीला संपर्क केला तर चित्रं सापडण्याची खात्री. चित्रांना धक्का न पोहोचता ती कशी बघावीत याचं मार्गदर्शन आणि चित्रांबद्दलची शक्य तितकी माहिती मिळू शकेल. पुढच्या काळात आपल्या परिसरात वावरलेल्या आदिमानवाच्या कलेचं मोल आपल्याला कळेल. या चित्रांचं जतन होईल, लोकांना हा अमूल्य ठेवा पाहता यावा यासाठी पुरेशा सोई तयार होतील, अशी आशा करू यात.
(छायाचित्र सौजन्य - सुधीर रिसबुड, सुहास गुर्जर)
(अनुभव, दिवाळी २०२२च्या अंकातून साभार.)
