आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

बिहार : पुरातन बौद्ध संस्कृतीचा चालता-बोलता इतिहास

  • पुष्पा जोशी
  • 18.05.25
  • वाचनवेळ 13 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
bihar buddha

प्राचीन काळापासून मानवी वस्ती असलेल्या जगभरातील मोजक्या ठिकाणांपैकी एक म्हणजे बिहार. आजच्या बिहारची प्रतिमा मागास राज्य अशी असली तरी त्याच्या पोटात जवळपास तीन हजार वर्षांचा संपन्न इतिहास दडलेला आहे. त्या प्रदेशाची युनिक फीचर्सच्या मुशाफिरी या दिवाळी अंकात २०१४ साली प्रसिद्ध झालेली ही सफर.

बिहारची राजधानी पाटणा ही विशालकाय गंगेच्या किनाऱ्यावर वसली आहे. तिसऱ्या शतकात पहिला चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, दुसरा चंद्रगुप्त अशा महापराक्रमी सम्राटांनी बिहार व उत्तर प्रदेशचा काही भाग जिंकून साम्राज्यविस्तार केला होता त्या मगध देशाची राजधानी पाटलीपुत्र म्हणजे आजचं पाटणा. कालौघात गुप्त साम्राज्याचा अस्त झाला. नंतर शेरशहा सुरी याने पाटणा शहराचं पुनर्निर्माण केलं.

बिहारचा हा इतिहास मनात घोळवत आम्ही पाटण्याला पोहचलो. पर्यटनासाठी बिहारला जाणाऱ्यांची संख्या तशी कमीच. पण इतिहासाच्या ओढीने आम्ही तिथे जाऊन पोहचलो होतो. बिहारच्या मध्यभागातून पश्चिमेकडून पूर्वेकडे गंगानदी वाहते. नदीवरील साडेसात किलोमीटर लांबीचा पूल पार करून आम्ही पाटण्याहून हाजीपूर इथे गेलो. पुलावरून गंगेचं लांब-रुंद पाणी बराच वेळ दिसत राहतं. या पात्रात छोटी-छोटी बेटं-घरं आहेत, शेती आहे. हाजीपूरहून आम्ही वैशालीला गेलो. आमच्या इतिहास सफरीची सुरुवात वैशालीपासून होणार होती. वैशाली ही प्राचीन लिच्छवी राज्याची राजधानी. हे श्री वर्धमान महावीर यांचं जन्मस्थान आहे. भगवान गौतम बुद्धाने इथं शेवटचं प्रवचन दिलं होतं व परिनिर्वाणाची घोषणा केली होती. तिथे पुनर्बांधणी केलेला विटांचा एक मोठा स्तूप आहे. त्याच्या समोर सम्राट अशोकाने उभारलेला साठ फूट उंचीचा अशोकस्तंभ आहे. हा एकाच अखंड लालसर सँडस्टोनपासून तयार केलेला आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे यावर काळ्या पाषाणातील एकच सिंहमूर्ती आहे.

दुसऱ्या दिवशी पाटणा संग्रहालय बघायला गेलो. १९१७मध्ये तत्कालीन लेफ्टनंट जनरल एडवर्ड गेट यांनी या संग्रहालयाची स्थापना केली. प्राचीन हडप्पा संस्कृतीपासून मौर्य, कुशाण, गुप्त, पाल अशा अनेक कालखंडांतील संस्कृती, समाजव्यवस्था, उत्कृष्ट कला यांचं इथे दर्शन होतं. वैशाली येथील उत्खननात सापडलेल्या मातीच्या, टेराकोटाच्या अनेक मूर्ती व भांडी, तांबे व चांदी यापासून बनविलेली नाणी, सुवर्णप्रतिमा तसंच पाटणा, नालंदा, कटक, बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश अशा अनेक ठिकाणी सापडलेल्या वस्तूंचा संग्रह अतिशय उत्तम पद्धतीने इथे सांभाळलेला आहे. पन्नास हजारांहून अधिक वस्तूंचा हा संग्रह बारा वेगवेगळ्या विभागांत ठेवलेला आहे. १९१७मध्ये पाटण्यातील दीदारगंज इथे गंगेच्या किनाऱ्यापाशी मिळालेलं मौर्यकाळातील एक सुंदर शिल्प संग्रहालयात पाहता येते. उजव्या हातात चवरी घेतलेल्या यक्षिणीचं हे शिल्प चकचकीत पॉलिशच्या लालसर दगडामधलं आहे. दुर्दैवाने या शिल्पाचा डावा हात नाही, पण बाकी संपूर्ण उभी मूर्ती अत्यंत देखणी आहे. तिचे वस्त्र, अलंकार, मेखला, कांकणे, केशभूषा आणि सुडौलपणा पाहण्यासारखा आहे. अशीच लालसर दगडातील, डाव्या हाताने साल वृक्षाची फांदी पकडलेली एका नवयौवनेची कमनीय मूर्ती तिच्या चेहऱ्यावरील मुग्ध भावांमुळे लक्ष वेधून घेते.

कुशाण काळातील बलराम, वासुदेव, बोधिसत्त्व यांच्या मूर्ती; गुप्तकाळातील सूर्य, विष्णू, ब्रह्मा, अग्नी, नृत्यमग्न कार्तिकेय, गौरी, गणेश हरिहर, गौतम बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग दर्शविणाऱ्या सुंदर मूर्ती हे इथे असलेले शिल्पकलेचे अजून काही उत्तम नमुने आहेत. डाव्या पायाच्या चवड्यावर उभी असलेली, अंगावर पोपट खेळवणारी एक सुंदर स्त्री तिच्या मुखावरील प्रसन्न, मिष्कील हास्याने लक्ष्य वेधून घेते. सोने, चांदी, तांबे, लोह, कास्य अशा मिश्र धातूंनी बनविलेल्या अनेक जैन तीर्थंकरांच्या मूर्ती; कुबेर, कल्पवृक्ष, विष्णू, सप्तमातृक, नवग्रह, उमा-महेश्वर, पार्वती, बुद्ध, बोधिसत्त्व अशा सहाव्या ते आठव्या शतकातील कलाकृती म्हणजे त्या काळातील हिंदू, बौद्ध, जैनधर्मीयांची गुण्यागोविंदाने नांदणारी, दुसऱ्या धर्माचा आदर करणारी सहअस्तित्वाची प्रतीके वाटतात.

राजस्थानी, मोगल, पहाडी शैलीतली अनेक पेंटिंग्ज इथल्या कलाविभागात आहेत. हस्तिदंत, अभ्रक यावरील चित्रं आहेत. तसेच इथे थांका चित्रांचा मोठा संग्रहही आहे. रेशमी व सुती कापडावर नैसर्गिक रंगांनी काढलेल्या चित्रांना ‘थांका' म्हणतात. या चित्रांचे विषय मुख्यत्वे बुद्ध, बोधिसत्त्व, लामा, धर्मगुरू, मठ असे असतात. साधारण शंभर वर्षांपूर्वी महान पंडित राहुल सांकृत्यायन यांना तिबेटमधील चिनी आक्रमणाच्या काळ्या, अशुभ सावलीची कल्पना आली आणि त्यांनी तिबेटमधील बौद्ध मठांतून जमतील तेवढे ज्ञानग्रंथ, हस्तलिखिते, थांका खेचरांवर लादून लपून-छपून भारतात आणले. इथली थांका चित्रं ही त्यापैकीच आहेत.

पाटणा संग्रहालयाच्या इमारतीत तळमल्यावर ‘भारतीय रिसर्च इन्स्टिट्यूट' आहे. तिथल्या दालनातील भिंतीजवळील मांडण्यांवर संस्कृत व पाली भाषेतील शेकडो ग्रंथ, हस्तलिखिते आहेत. आम्ही गेलो तेव्हा तिथे चार बुद्धिस्ट रिसर्च स्कॉलर्स लाल रेशमी वस्त्रांत गुंडाळलेल्या त्या पोथ्यांची विषयवार सूची बनवत होते. चौकशी केल्यावर त्यांनी सांगितलं, की ‘हे ग्रंथ गणित, विज्ञान, खगोलशास्त्र, व्याकरणशास्त्र, धर्मशास्त्र, वैद्यकशास्त्र अशा अनेक विषयांवरचे आहेत. आम्ही फक्त त्यांची विषयवार सूची बनवीत आहोत. या ग्रंथांचा अभ्यास करायला पुष्कळ वर्षे लागतील.' हे ग्रंथही पंडित राहुल सांकृत्यायन यांनी तिबेटहून आणलेल्या ग्रंथांपैकीच आहेत. काही ग्रंथ सारनाथ इथे आहेत.

त्यानंतर आम्ही थडकलो ‘गोलघर' बघायला. पाटण्यामध्ये ‘गोलघर' नावाचं स्तुपाच्या आकारातलं भलं मोठं धान्यकोठार आहे. २५ मीटर उंच आणि १२५ मीटरचा घेर असलेलं हे अवाढव्य बांधकाम १७८६मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा इंजिनियर व आर्किटेक्ट कॅप्टन जॉन गार्स्टिन यांनी केलं आहे. १७७०मधील बंगाल, बिहारच्या भयानक दुष्काळानंतर दोन लाख टन धान्य साठवण्याची सोय करण्यासाठी तत्कालीन गव्हर्नर वॉरन हेस्टिंग्ज याच्या आज्ञेवरून हे बांधकाम झाले. याच्या अंतर्भागात गोल चढत जाणाऱ्या तिरक्या १४५ पायऱ्या आहेत. आतल्या निरनिराळ्या कप्प्यांमध्ये धान्य साठवण्याची सोय करण्यात आली होती. आज मात्र हे रिकामे गोलघर फक्त बाहेरून बघता येतं.

शीख धर्मियांचे दहावे गुरू, गुरू गोविंदसिंह यांचा जन्म पाटण्याचा. त्यामुळे तख्त श्री हरमंदिरसाहेब हे भव्य कलापूर्ण गुरुद्वारा इथे आहे. गुरू नानक व गुरू तेगबहादूर यांनी पाटणा इथे अनेक वेळा भेट दिली होती. हा गुरुद्वारा पाहण्याजोगा आहे.

आम्हाला सर्वांत जास्त उत्सुकता होती ती बोधगयेला भेट देण्याची. पाटण्याहून साधारण शंभर किलोमीटरवर निरंजना नदीजवळ बोधगया हे ठिकाण आहे. इ.स.पूर्व ५८८मध्ये, म्हणजे साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान गौतमबुद्धांना येथील अश्वत्थ (पिंपळ) वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली व बौद्ध धर्माचा उदय झाला. पुढे कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याच्या छत्राखाली बौद्ध धर्म सुदूर पसरत गेला. आज जगभरातून, विशेषत: जपान, थायलंड, कोरिया, श्रीलंका, तिबेट, म्यानमार, चीन येथून दर वर्षी सुमारे बारा लाख भाविक बोधगया येथे येतात. (जपानमधील क्योटो शहरातील एका भव्य बुद्धमंदिरात ‘बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सहाव्या शतकात भारतातून येथे नागार्जुन व वसुबंधू नावाचे बौद्ध भिक्षू आले होते' अशी पाटी लिहिलेली पाहिली होती.) २००२ साली युनेस्कोने बोधगयेला ‘वर्ल्ड हेरिटेज'चा दर्जा दिला आहे.

भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सुमारे अडीचशे वर्षांनी सम्राट अशोकाने बोधगया इथे महाबोधी मंदिर बांधले. विटांचं बांधकाम असलेले हे मंदिर गुप्तकालीन स्थापत्यकलेचा सुंदर नमुना आहे. मंदिराचा मधला मनोरा व त्यावरील कळस याची उंची १८० फूट आहे. त्याभोवती चार दिशांना त्याच पद्धतीचे चार छोटे मनोरे आहेत. पाचव्या शतकात भारतात आलेल्या फा हिएन या चिनी बौद्ध भिक्षूने लिहून ठेवलं आहे, की या ठिकाणी अनेक स्तंभलेख, स्तूप, विविध शिल्पाकृती, कोरीव स्तंभ व मोनेस्ट्रीज आहेत. इ.स. ७१० ते १२०० या पाला साम्राज्यकाळात या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले होते. नंतर ब्रिटिश अधिकारी अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी १८८३ साली कालौघात दुर्लक्षित झालेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

महाबोधी मंदिराच्या अंतर्गृहात भगवान बुद्धांची अतिशय देखणी आणि भव्य अशी बसलेली मूर्ती आहे. मूळ काळ्या पाषाणातील या मूर्तीवर संपूर्ण सोन्याचं आवरण आहे. मूर्तीला तांबूस-सोनेरी रंगाची चकचकीत रेशमी वस्त्रे नेसवलेली असतात. कुठल्याही बुद्धमूर्तीच्या चेहऱ्यावर एक शांत, सौम्य हसू असते तसेच या मूर्तीच्या चेहऱ्यावरही आहे. अंतर्गृहामध्ये सुगंध आणि शांतता भरून राहिलेली असते. देशोदेशींचे भाविक अतिशय श्रद्धेने बुद्धचरणाशी लीन होताना दिसतात.

मंदिराच्या आवारात दगडी पार असलेला बोधिवृक्ष आहे. मूळ बोधिवृक्षाची ही पाचवी पिढी समजली जाते. ११६ वर्षे वयाच्या व ८० फूट उंचीच्या या ज्ञानवृक्षाच्या सावलीत शेकडो स्त्री-पुरुष अगदी शांतपणे बुद्धाचे स्मरण करीत होते. अन्य भाविक वाऱ्यावर भिरभिरत येणारी त्या अश्वत्थ वृक्षाची पानं प्रसाद म्हणून गोळा करीत होते.

बोधिवृक्षाजवळील थाई बुद्धमंदिराच्या पसरट उतरत्या छतावरील विटांना सोन्याचा मुलामा दिलेला आहे. मंदिराच्या बाह्य भागावर बुद्धाच्या आयुष्यातील विविध प्रसंग दाखविणाऱ्या शिल्पाकृती आहेत. आतमध्ये ब्राँझची भव्य बुद्धमूर्ती आहे. तसेच या परिसरात चीन, म्यानमार, भूतान, जपान, तिबेट अशा अनेक देशांची बुद्धमंदिरे, स्तूप व मोनेस्ट्रीज आहेत. इथल्या विस्तीर्ण बागांमध्ये अनेक देशांतील भाविक शांतपणे प्रार्थना करीत होते. काहीजण अखंड साष्टांग नमस्कार घालत होते, तर काहींच्या हातात जपमाळा होत्या. कुणाच्या पुढ्यात फिरणारी धम्मचक्रे होती. काहीजण हातातील छोट्या चाळणीतून लहान-मोठे खडे वेचत नामस्मरण करीत होते. जवळच्या छोट्या सरोवरात मधोमध संगमरवरी बुद्धमूर्ती आहे. संपूर्ण परिसर बुद्धमय, शांत, समाधानी आहे.

बोधगयापासून जवळच गया हे हिन्दुधर्मीयांचे श्रद्धा व श्राद्धस्थान आहे. फाल्गू नदीकाठच्या विष्णुपाद मंदिरात श्रीविष्णूंच्या पावलाचा दगडातील ठसा व त्यावरील शंख, चक्र, गदा अशी चिन्हे दाखवली जातात. गयासुराच्या मस्तकावर भगवान विष्णूंनी आपलं उजवं पाऊल ठेवून त्याला पाताळात गाडले अशी पुराणकथा आहे. रामायणकाळात रामाने सीतेसह इथे भेट दिली होती असं सांगितलं जातं. सन १७८७ मध्ये इंदूरच्या राणी अहल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. भारतभरचे भाविक पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून इथे पिंडदान करतात. आम्ही पोचलो तेव्हा तिथेच एका गरीब, लहान मुलीचं लग्न लागलं होतं. ती हमसाहमशी रडत होती. ते पाहून विचाराने पोटात कालवाकालव झाली.

पाटण्याहून साठ किलोमीटरवर राजगीर हे ठिकाण आहे. पाचव्या शतकापर्यंत ही मगध साम्राज्याची राजधानी होती. त्या वेळी मगध साम्राज्य अफगाणिस्तानपर्यंत पसरलेले होते. महाभारतातील जरासंध, बिंबिसार हे राजे इथलेच. भीम व अर्जुन यांना घेऊन श्रीकृष्ण इथे आला होता. इथे भीमाने जरासंधाला द्वंद्वयुद्धात ठार केले असे सांगितले जाते. इथे चिनी बौद्ध भिक्षूंनी दोनशे वर्षांपूर्वी उभारलेले बुद्धमंदिर आहे. इथल्या गृद्धकूट पर्वतपायथ्याशी गौतम बुद्धांनी अनेक वेळा प्रवचने दिली होती. गृद्धकूट पर्वताच्या पायथ्यापासून रत्नागिरी पर्वतमाथ्यापर्यंत जाण्यासाठी सात किलोमीटर लांबीचा रोप-वे आहे. हा भारतातला पहिला रोप-वे. जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी जपान सरकारने तो बांधला. चारी बाजूंनी उघड्या असलेल्या खुर्चीवर बसून रोप-वेने वर जाताना थोडी धाकधूकच वाटते. माथ्यावर जपान सरकारने बांधलेला खूप मोठा, शुभ्र संगमरवराचा स्तूप आहे. १५०० फूट उंचीच्या रत्नागिरी पर्वतमाथ्यावरील या शांतिस्तुपाच्या चारी बाजूंना भगवान बुद्धांच्या आयुष्यातील वेगवेगळे प्रसंग दर्शविणारे, सोन्याचा मुलामा असलेले भव्य बुद्ध पुतळे आहेत. राजगीर हे जैन धर्मीयांचंही तीर्थक्षेत्र आहे. राजगीरच्या भोवती असणाऱ्या बहुतांश टेकड्यांवर अनेक जैन मंदिरे आहेत.

इथून जवळच असलेल्या वेणुवन नावाच्या उद्यानात अनेक तऱ्हेचे वृक्ष व तलाव आहे. विभना टेकडीच्या पायथ्याशी असलेली ‘सोने भंडार' गुंफा बघायला गेलो. या लेण्यांच्या बाहेरील बाजूस घोडे, हत्ती, माकडे, बैल अशा आकृत्या अस्पष्ट स्वरूपात कोरलेल्या आहेत. असं म्हणतात, की इथल्या एका दगडी दरवाज्यामागे जरासंधाचा सुवर्ण-खजिना दडवलेला आहे असे सांगितले जाते. या दरवाज्यावर सांकेतिक लिपीमध्ये काही मजकूर लिहिलेला आहे. ब्रिटिशांनीसुद्धा या सुवर्णभांडाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या तोफगोळ्यांच्या काळ्या खुणा त्या दरवाज्यावर दाखवल्या जातात. राजगीरला उष्ण पाण्याची अनेक कुंडं आहेत. या औषधी पाण्यात स्नान करण्यासाठी भाविकांची झुंबड उडालेली असते.

राजगीरहून साधारण चाळीस किलोमीटरवर पावापुरी हे जैन तीर्थक्षेत्र आहे. हजारो लालसर कमळकळ्यांनी बहरलेल्या विस्तीर्ण तलावाच्या मध्ये शुभ्र संगमवरी जलमंदिर आहे. जैन तीर्थंकर वर्धमान महावीर यांचं इथे निधन झाले. त्यांच्या पादुका या मंदिरात आहेत.

पाटण्याहून साधारण ९० किलोमीटरवर नालंदा हे प्राचीन ज्ञानपीठ आहे. आज भग्नावशेषांच्या रूपाने उरलेली त्या वैभवशाली, ज्ञानसंपन्न कालखंडाची झलक पाहताना आपण विस्मयचकित होतो. वसतिगृहांची सोय असलेलं हे एक आंतरराष्ट्रीय विद्यापीठ होतं. हिंदुस्थानातील तसेच इतर अनेक पौर्वात्य देशांतील विद्यार्थी इथे बौद्ध धर्माच्या व इतर विषयांच्या अध्ययनासाठी येत असत. इथे वेगवेगळी विद्यासंकुले, वसतिगृहे, देवालये, मोनेस्ट्रीज, मठ, भोजनशाला, अनेक विहार व भव्य ग्रंथालये होती. विद्यापीठाभोवती दगडी तट होता व त्याला एक भव्य प्रवेशद्वार होते. सारं बांधकाम लाल विटांचं व दगडांचं होते. गुप्त, मौर्य व पाला साम्राज्यकाळात विद्यापीठाला राजाश्रय होता. चौथ्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत इथे अखंड ज्ञानयज्ञ सुरू होता.

पाचव्या शतकात भारतात आलेला चिनी प्रवासी ह्युएनत्संग हा काही वर्षे नालंदा इथे राहिला होता. त्याने शीलभद्र नावाच्या गुरूंजवळ तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, व्याकरण, वैद्यकशास्त्र, अथर्ववेद तसेच बौद्ध धर्माचा सहा वर्षे अभ्यास केला. नंतर त्याने इथे अध्यापनकार्यही केले. त्याने केलेले विद्यापीठाच्या व्यवस्थेविषयीचे, शिक्षणपद्धतीविषयीचे सविस्तर लिखाण विश्वासार्ह मानले जाते.

सातव्या शतकात इथे आलेल्या यीजिंग या चिनी बौद्ध भिक्षूने या विद्यापीठाचं सुंदर वर्णन केलं आहे. त्याने लिहून ठेवल्यानुसार येथील धर्मगंज नावाच्या संकुलात वाचनालयाच्या तीन भव्य इमारती होत्या. रत्नसागर, रत्नदधी, रत्नरजक अशी त्यांची नावे होती. त्यातील रत्नदधी ही इमारत नऊ मजली होती. या इमारतींना लावलेले सोन्याचे पत्रे व त्यात जडविलेल्या रत्नांच्या कलाकृतींमुळे या इमारती उन्हामध्ये चमकत असत. या वाचनालयांमध्ये धर्मशास्त्राबरोबरच व्याकरणशास्त्र, खगोलशास्त्र, तर्कशास्त्र, गणित, योगशास्त्र, वेद यावरील अनेक ग्रंथ होते, अनेक हस्तलिखिते होती. ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती बनविण्याचे कामही इथे चाललेले असे. येथील ग्रंथपाल ज्ञानी व तत्परतेने मदत, मार्गदर्शन करणारे होते.

११९३मध्ये तुर्की मुसलमान बख्तियार खिलजीनेनालंदावर आक्रमण केले. सुवर्ण, रत्ने, माणके यांची लूट केली. इथल्या काही भिक्षूंना क्रूरपणे ठार मारण्यात आले. काही भिक्षू पळून जाण्यात यशस्वी झाले, तर काही इथेच लपून राहिले. इथल्या सुसंपन्न ज्ञानभांडाराला आग लावण्यात आली. अमूल्य असा हा ज्ञानवारसा ‘अग्नेय स्वाहा' झाला. असं म्हणतात, की ही आग तीन महिने धुमसत होती.

कालौघामध्ये नालंदा विद्यापीठ विस्मृतीत गेले. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ लंडन' यांनी दिलेल्या देणगीमुळे १८७२मध्ये ब्रॅडले या संशोधकाने इथे थोडे उत्खनन केले. नंतर १९१५मध्ये अजून थोडे उत्खनन झाले. स्वातंत्र्यानंतर भारताचे पुरातत्त्व खाते व बिहार सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नाने इथे काळजीपूर्वक उत्खनन करून अनेक भग्नावशेष परिश्रमपूर्वक जतन केले गेले. आज खूप मोठ्या परिसरावरील स्वच्छ व नेटक्या बागांमधील हे अवशेष पाहताना आपल्याला त्या भव्य, ज्ञानश्रीमंत विद्यापीठाची थोडीफार कल्पना येऊ शकते. तांबे व लोखंड वितळवून त्यापासून मूर्तिकाम व इतर वस्तू बनवण्याची कला तेव्हा अवगत होती. धातू वितळवण्यासाठी उपयोगात आणली जाणारी विटांची भट्टी, स्वयंपाक करण्याची जागा, विहार, रुंद रस्ते, चैत्य ध्यानगुंफा, गुरूंसाठीचे उच्चासन व समोर विद्यार्थ्यांना बसण्याची जागा अशा अनेक ठिकाणांचे भग्नावशेष आज इथे आहेत.

१९७१मध्ये इथे एका भव्य बागेमध्ये ‘नालंदा म्युझियम'ची स्थापना करण्यात आली. उत्खननात सापडलेल्या अनेक अमूल्य वस्तू इथे नेटकेपणाने जतन केल्या गेल्या आहेत. यात हस्तलिखितं, बुद्धाचे विविध मुद्रांमधील पुतळे; विष्णू, बलराम, शिवपार्वती, सूर्य, दुर्गा, महिषासुरमर्दिनी यांचे कातीव दगडांचे व ब्राँझमधील देखणे पुतळे आहेत. ताम्रपत्र, शीलालेख, विटांवर कोरलेला पाली व संस्कृत भाषेतील मजकूर; मातीची भांडी, घडे, धातूचे दागिने अशाही अनेक गोष्टी आहेत. नालंदा विद्यापीठाचे टेराकोटामधील बोधचिन्हही येथे आहे. काही मूर्ती थोड्या भग्न स्थितीमध्ये आहेत, तरीही त्यांची प्रमाणबद्धता, भावमुद्रा, वस्त्रालंकार यावरून या संपन्न कालखंडाची कल्पना येते.

इथून जवळच बिहार सरकारने पाली भाषेच्या अभ्यासाचे संशोधन केंद्र उभारलेले आहे. देश-विदेशांतील संशोधक इथे पाली भाषेचा, बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी येतात. नालंदा विद्यापीठाचे पुनर्निर्माण करण्यासाठी भारत, सिंगापूर, चीन, जपान व इतर अनेक देश २००६मधील आशियाई देशांच्या परिषदेत एकत्र आले. नालंदा इथे एक आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापावे, प्राचीन इतिहासाबरोबरच आधुनिक विषयांचे तेे ज्ञानपीठ व्हावे अशी योजना आहे. त्यासाठी या सर्व देशांमध्ये नुकताच सामंजस्य करार झाला आहे, असं आम्हाला समजलं.

साधारण १५०० वर्षांपूर्वी गांधार (अफगाणिस्तान) इथे १८० फूट उंचीची बुद्धमूर्ती पर्वताच्या पोटात खोदण्यात आली. अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यापेक्षाही उंच अशी ही मूर्ती होती. शिवाय त्याच्या आसपास अनेक बुद्धमूर्ती, लेणी, भित्तिचित्रेही होती. तालिबान्यांनी या मूर्ती उद्ध्वस्त केल्या. दोन वर्षांपूर्वी बोधगया येथील महाबोधी मंदिराच्या आवारात बॉम्बस्फोट झाले.

बोधिवृक्षाची पानं जतन करून ज्ञानी होता येणार नाही हे जसं खरं आहे, तसंच बुद्धमूर्ती उद्ध्वस्त करून, बॉम्बस्फोट करून बुद्धाचं तत्त्वज्ञान उद्ध्वस्त होणार नाही हेही तितकंच खरं.

सम्राट अशोकाची कन्या संघमित्रा हिने बोधिवृक्षाची फांदी श्रीलंकेमध्ये नेऊन रुजविली. काही दिवसांपूर्वी वाचलं, की बोधगया येथील बोधिवृक्षाची फांदी अमेरिकेतल्या टेक्सास येथील ऑस्टिन युनिव्हर्सिटीत नेऊन रुजवण्यात आली आहे. आज भारतासह साऱ्या जगातली अस्वस्थता, अशांतता, रक्तपात पाहिला की वाटतं, बोधिवृक्ष आणखी अनेक ठिकाणी रुजेल, परंतु गौतमबुद्धाचीं अहिंसा, करुणा, प्रेम ही शिकवण जेव्हा रुजेल तेव्हाच जगात शांतता नांदेल.

हे विचार घोळवत आणि बिहारचं पूर्ण वेगळं रूप मनात साठवत आम्ही या प्राचीन प्रांताचा निरोप घेतला.

(मुशाफिरी, दिवाळी २०१४मधून साभार)

पुष्पा जोशी







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 2

Nitin Vilas Gaikwad18.05.25
खूपच छान आणि रंजक पद्धतीने प्रवास वर्णन केल आहे, पण एक गोष्ट खटकली, प्रत्येक ठिकाणी बुद्ध मंदिर असा उल्लेख केला आहे त्याऐवजी बुद्ध विहार असा पाहिजे होता का?
धनंजय 18.05.25
अत्यंत उपयुक्त, अभ्यासपूर्ण विवेचन. उत्तम मांडणी करून बिहारचे वैभव प्रत्यक्षात उभे केले आहे. या दृष्टीतून बिहार पुन्हा पाहण्याचा मोह आवरत नाही.
See More

Select search criteria first for better results