कराड सोडलं की सुर्लीचा घाट येतो. हा घाट चढून आल्यानंतर कडेगाव. नंतर कडेपूर. मग विटा. मग रेवणसिद्धाचा परिसर. उघडाबोडका. पूर्वेला पवनचक्क्यांची गरगर फिरणारी पाती दिसतात. रेवणगावच्या घाटातून वर जाताना ही पाती आपल्याला धडकतात की काय अशी भीती वाटते. त्यानंतर तामखडी हे थंड हवेचं ठिकाण लागतं. भूगोलाच्या पाठ्यपुस्तकांनी या गावाची दखल घेतलेली नसली तरी तिथे बाराही महिने गार हवेच्या झुळका अनुभवायला मिळतात. तामखडीचं आणखी एक वेगळेपण आहे. इथली जमीन लाल मातीची. पैलवान मंडळी आखाड्यासाठी इथली माती नेतात. तामखडीनंतर खानापूर आणि सुलतानगादे ही दोन गावं गेल्यावर भिवघाट लागतो. हा घाट उतरल्यावर सुरू होतो माणदेश. व्यंकटेश माडगूळकरांनी हा माणदेश तिथल्या माणसांच्या खाचाखोचांसह आपल्या साहित्यातून मराठी वाचकांच्या मनात पोहोचवला आहे.
माणदेशात उतरलं की पहिलं गावं लागतं मेटकरवाडी. या गावाजवळून पंढरपूर-गुहागर राज्यमार्ग गेलाय. पण त्यामुळे कुठलेही नवीन बदल या गावात आलेले नाहीत. गाव एकदम साधंच. जुन्या मराठी चित्रपटांत दाखवतात तसं. दगडमातीची साधी घरं. ओसाड शिवार. वर्णन न करताही दिसणारा दुष्काळ. मेटकरवाडीपासून तीन किलोमीटरवर आलो. मी आणि माझा एक सोबती. रस्त्याच्या कडेला गुलाबी फेट्यातला एक म्हातारा दिसला. त्याला विचारलं, ''बाबा, लेंगरेवाडी कुठं हाय वो?''
''लेंगऱ्यांची वाडी? लांब, खालतं राहिली. त्यो डोंगुर दिसतुया त्येच्या पल्याड.”
''किती टायम लागंल जायला?''
''न्हाय सांगता याचं. म्या कवा गेलो न्हाय. तुमी कुठनं आलाय पोरानू?''
''पुण्यास्नं आलुया आम्ही.”
''आऽऽरा! पुणं-मंबय लय लांब हाय.”
माणदेशातला हा आमचा पहिला संवाद.
विटा सोडताना कुणी तरी सांगितलं होतं, तडवळे गाव आलं की लेंगरेवाडीचा रस्ता विचारा. तडवळ्याची पाटी दिसल्यावर आम्ही थांबलो. चौकात काही तरुण उभे होते. त्यांच्याकडे चौकशी केली, ''लेंगरेवाडी कुठे आहे?''
''जवळच आहे. पुढे जाऊन उजवीकडे वळा.''
आम्हाला रस्ता सांगणाऱ्या तरुणाला लेंगरेवाडी जवळ वाटत होती, पण मघा भेटलेले आजोबा आयुष्यात कधीही त्या गावाला गेलेले नव्हते.
तडवळ्याहून लेंगरेवाडीच्या दिशेला जाताना रस्त्याच्या बाजूला छोट्या टेकड्या होत्या. त्यावर खुरटी झुडपं, तरवड, निवडुंग, केकताड अशा वनस्पती दिसत होत्या. कुरणावर मेंढरं चरत होती. काही अंतर गेल्यावर दूर एक गाव दिसायला लागलं... लेंगरेवाडी. हीच माडगूळकरांची बनगरवाडी! खात्री करावी म्हणून समोरून आलेल्या मध्यमवयीन टोपीवाल्याला विचारलं, ''दादा, समोर दिसतीया ती लेंगरेवाडीच ना?''
''होय होय. तिथं चौकात सदाभावचं पिकाप शेड लागंल. तिथनं उगवतीला रस्ता गेलाय तो लेंगऱ्याच्या वाडीतच जातुया.” माझ्या जोडीदाराला ‘सदाभावचं पिकाप शेड' म्हणजे काय समजलं नाही. स्थानिक आमदाराच्या निधीतून ते पिकअप शेड म्हणजे बसथांब्यासारखी एक शेड उभारण्यात आली होती, पण माणसं त्या ‘पिकाप शेड'ला आमदारांच्या मालकीचं समजत होती. आम्ही ती पिकाप शेड मागे टाकून उगवतीच्या दिशेने निघालो.
लेंगरेवाडी जवळ येऊ लागलं तसा मनात बनगरवाडीचा परिसर जागा होऊ लागला. कादंबरी आमच्या डोळ्यांसमोर उलगडू लागली. स्वातंत्र्याआधीचा काळ. संस्थानी कारभार असणारा. एक पोरगेलासा, नुकता सातवी झालेला तरुण मुलगा धनगरांच्या पंचवीस-तीस उंबरा असणाऱ्या या गावात मास्तर म्हणून रुजू होतो. येताना मनात शंका असतात... हे धनगर आपल्याला आपलं म्हणतील का, पोरं शाळेत येतील का, या नवख्या गावात आपला पाड लागेल का.. पण हळूहळू हा मास्तर या आडदांड गावात रुजतो. गावातलाच एक होऊन जातो. सगळ्यांना मदत करण्याच्या स्वभावामुळे त्याच्याशिवाय गावाचं पान हलेनासं होतं. मास्तराच्या प्रयत्नांमुळे पोरं नियमित शाळेत येऊ लागतात. एके दिवशी मास्तराला वाटतं की या गावाने एकत्र येऊन काही तरी भव्यदिव्य करून दाखवावं. मातीची घरं असणाऱ्या या अडनिड्या गावात एखादी पक्की इमारत असावी. गावातल्या म्हाताऱ्या कारभाऱ्याच्या मदतीने तो गावकऱ्यांना राजी करतो आणि गावात तालीम बांधण्याचं काम अंगावर घेतलं जातं. कुणी पैसे देतो, कुणी श्रमदान करतो. इमारत पूर्ण होते आणि मास्तराच्या प्रयत्नांनी त्या इमारतीच्या उद्घाटनाला स्वतः राजा येतो. या धनगरवस्तीसाठी ते कोण अप्रूप असतं!
हेही वाचा - ‘खेड्यांचा भारत' हद्दपारीच्या टप्प्यात!
पुढे गावात दुष्काळ पडतो आणि एकेक करत सगळा गाव पोटापाण्याच्या शोधात बाहेर पडतो. मागे राहतात ती म्हातारीकोतारी आणि काम करू शकणारी चिल्लीपिल्ली. अखेर मास्तरही शाळेला कुलूप लावून नाइलाजाने बाहेर पडतो. एक शोकांतिका आपल्यासमोर मांडून बनगरवाडी संपते.
म्हटलं तर बनगरवाडीची कथा अशी साधीच आहे, पण त्यातून माडगूळकरांनी माणदेशातला धनगर गाव जिवंत केला आहे. मेंढरांमागे फिरणाऱ्या धनगरांची सुख-दुःखं, त्यांचे काबाडकष्ट, माणसांच्या स्वभावाच्या नाना तऱ्हा, त्यांचे मानापमान आणि त्यांनी उभी केलेली पात्रं यातून पुण्या-मुंबईपासून कित्येक मैल दूर असणाऱ्या ग्रामीण जगण्याचं अस्सल चित्र आपल्यासमोर उभं राहतं. त्यातला कारभारी चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांसह कायमचा आपल्या आयुष्यात येतो. आंदा रामोशी आणि आयूब मुलाण्यासारखी अतरंगी पात्रं आपल्याला गावाकडच्या माणसांचं अंतरंग दाखवतात. नांगरासाठी दुसरा बैल मिळू न शकल्याने स्वतः औत ओढणारी शेकू धनगराची बायको आपल्याला गावाकडच्या बाईचं खणखणीत रूप दाखवते.
हे सगळं मनात घोळवत आम्ही बनगरवाडीत (म्हणजे लेंगरेवाडीत) चाललो होतो. बनगरवाडीच्या निमित्ताने तात्या माडगूळकर यांनी लिहून ठेवलंय, ‘बनगरवाडी हे लहान गाव. माझ्या मनातल्या खडकावर वसलेलं. त्यातली पात्रं मनातल्या वाडीतच जन्मलेली. ती वावरू लागली लेंगरेवाडीच्या छपराखाली. मनात जन्मलेल्या पात्रांचे चेहरे वाडीतल्या काही चेहऱ्यांशी जुळतात. मग तो अमका, ती ही अमकी अशी नावं आपण देतो. मनातली वाडी हलके हलके साकार होते.' याचा अर्थ असा, की लेंगरेवाडीतली खरी माणसं आणि माडगूळकरांच्या मनातली पात्रं यांचं अजब मिश्रण होऊन बनगरवाडी आणि त्यातली पात्रं साकार झाली.
कादंबरीची पहिली आवृत्ती प्रकाशित होऊन आता साठ वर्षं झाली आहेत. आज लेंगरेवाडीत बनगरवाडीतल्या पात्रांच्या काही खाणाखुणा सापडतील का? त्या शोधण्यासाठी लेंगरेवाडीत जावं का? की मनातल्या बनगरवाडीला धक्का न लावता चुपचाप परतावं?
मनात नाना विचार येत होते, पण उत्सुकतेने त्या विचारांवर मात केली. दुष्काळामुळे सारं गाव रिकामं झालं खरं, पण त्यानंतर गावात पाऊस पडला का? दुष्काळामुळे गाव सोडून गेलेले गावकरी पुन्हा गावात आले का? बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू झाली का? या मेंढपाळांनी पुढे काही प्रगती केली का? असे अनेक प्रश्न मनात उमटले होते. ते आठवले आणि आम्ही गावाच्या दिशेने निघालो.
रस्त्यावर एक वस्ती लागली. हे ‘लेंगरेवाडी ॲनेक्स' असावं. सिमेंटचं घर दिसलं. दारात दोन दुचाक्या. लहान मुलं अंगणात खेळत होती. पांढऱ्या कडक कपड्यांतला एक माणूस दारातल्या आरामखुर्चीत बसला होता. त्याच्या कडक कपड्यांकडे पाहून वाटलं, हा गावातला सरपंच किंवा पुढारी असावा. गाडी थांबवून आम्ही त्याच्याशी बोलू लागतो.
''काय पाव्हणं, काय म्हणता?'' असं म्हणत तो आम्हाला सामोरा आला.
''पुण्याहून आलोय. बनगरवाडी बघायला.”
''कसली वाडी?''
''बनगरवाडी कादंबरी हो. व्यंकटेश माडगूळकरांनी लिहिलेली. या गावात एक मास्तर येतो... तुम्ही कादंबरी वाचली असंल...”
''आपन तसल्या भानगडीत नसतुया. आपुन भलं, आपलं काम भलं! कशाला आपुन तसल्या भानगडीत पडायचं?'' एका दमात तो बोलला.
''मग आम्ही कुणाला भेटू?''
''जाणत्या माणसाकडं जावा.”
आम्ही पुढे निघालो. रस्ता डांबरी होता. ‘लेंगरेवाडी एक किमी' असा मैलाचा दगड दिसला. आली लेंगरेवाडी. गाव दिसू लागलं. सिमेंटची घरं. घरावर टीव्हीचे अँटेना. गावात गेल्यागेल्याच शाळेची इमारत दिसली. तिच्या पुढ्यात प्रशस्त क्रीडांगण. आवारात मुलं सायकल फिरवत होती. शाळेच्या जवळच ग्रामपंचायत सोसायटीची इमारत होती.
मुलांना विचारलं, ''गावात शाळा कितवीपर्यंत आहे?''
''दहावी. पण सातवीपतुर वर्ग हितं भरत्यात. हायस्कूल तिकडं भरतं.” असं म्हणून त्याने बोट दाखवलं.
''तू कितवीला आहेस?''
''सहावीला.”
शाळेच्या बाहेरच एक किराणाचं दुकान दिसलं. दुकानावर एका पक्षाच्या नेत्याचा बोर्ड. दुकानासमोर आलो.
''बोला, काय पायजेल?'' दुकानातल्या तरुणाने विचारलं.
''आम्ही बनगरवाडी कादंबरी आणि तुमचं गाव यांचा अभ्यास करायला आलोय.”
''कुठनं आलाय?''
''पुण्याहून..”
''आवंऽ, आमच्या गावाला लय डिमांड हाय. मागं पिच्चरवालीबी आली हुती. पण पिकतं तिथं इकत न्हाय!” म्हणत त्याने गावमहिमा सांगायला सुरुवात केली. एखाद्या किल्ल्यावर गेल्यावर तिथला गाइड जशी माहिती सांगतो तसंच वाटत होतं. बनगरवाडीतला लिंब, तालीम, शाळा दाखवायला तो आमच्यासोबत आला. त्याने कादंबरी वाचली होती.
आम्ही हे सारं बघत असतानाच समोरून गुलाबी फेटा, धोतर आणि बंडी अशा माणदेशी पेहरावातला एक म्हातारा आला. त्याला बघून दुकानदार तरुण म्हणाला, ''ह्यो म्हातारा त्या आंदा रामोशाचा पुतण्या हाय.”
आम्ही त्या म्हाताऱ्याला विचारलं, ''आबा, तुमच्या गावात राजा आला होता, ते आठवतं का तुम्हाला?''
''कुठला राजा आन् कुठला प्रधान?''
''तालीम बघायला आलावता बघा!”
''काय माह्यत न्हाय बाबा!” असं म्हणत म्हातारा निघून गेला.
समोर बनगरवाडीतला लिंब होता. पहिल्यांदा वाडीत आलेला तरुण मास्तर इथेच बसला होता. इथेच त्याची, बालट्याची आणि कारभाऱ्याची पहिली भेट झाली होती. आमच्या डोक्यात बनगरवाडीची दृश्यं समांतर चालू होती.
हेही वाचा - गाव तिथे एसटीः आजही फक्त स्वप्नच?
आता त्या लिंबाच्या पारावर पाचसहाजण गप्पा मारत बसले होते. जवळच तालीम होती. आम्ही त्या लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसलो. मोठा लिंब. अनेक वर्षांचा. मी विचारलं, ''हा लिंब कधीपासून इथे आहे?''
''लय जुना हाय. गावचे कारभारी इथं बसूनच न्यायनिवाडा करत.”
''ही तालीम कुणी बांधली?''
''अेक मास्तर आलावता, त्येनं बांधलीया.”
''तुम्ही बघितलं का त्या मास्तराला?''
''न्हाय न्हाय. आम्ही कुठलं बघायला? माणसं म्हणत्याती.”
''तुमच्या गावावर एक पुस्तक आलंय ‘बनगरवाडी' म्हणून. माहिती आहे का?''
''बनगरवाडी नव्हं, बंडगरवाडी म्हणा. आवंऽ पाव्हणं, त्ये गाव हे नव्हं. बंडगरवाडी तिकडं राहिलं.” एका आजोबांनी खुलासा केला.
त्यांचं बोलणं ऐकून एक तरुण त्यांच्यावर खेकसला, ''तुम्ही गप बसा! काय माहिती नसतंय... उगं बोलायचं!” माझ्याकडे बघत तो म्हणाला, ''पाव्हणं, तुम्ही म्हणताय ते हेच गाव बरं का. फक्त पुस्तकाला नाव बनगरवाडी दिलंय.”
आमचा हा संवाद सुरू असतानाच ४०-४५ वयाचा, कपाळावर टिळा लावलेला वारकरी गृहस्थ आला. त्याने आम्हाला विचारलं, ''कुंच्या गावचं पाव्हणं?''
''पुण्याकडचे.”
''बोला, काय काम काढलंय?''
''तुमचं गाव बघायला आलोय.”
''काय बघताय आमचं गाव?''
''तुमच्या गावावर बनगरवाडी नावाचं पुस्तक लिहिलंय माडगूळकरांनी, माहिती आहे?''
''तसं याक पुस्तक हाय पण म्या वाचलेलं न्हाय. आमच्या धाकट्या गड्यानं वाचलंय. पण तो आता जत्रंला गेलाय.”
''मागं एक पिक्चरबी आला होता वाडीवर.” त्याने आणखी माहिती पुरवली.
लिंबाचा पार सोडून आम्ही तालमीकडे गेलो. गावकऱ्यांच्या श्रमदानातून मास्तरने उभारलेली तालीम ती हीच. गावात त्या काळात झालेलं एकमेव विधायक काम. याच तालमीच्या उद्घाटनाला राजा गावात आला होता. एकीच्या बळावर वाडीचं नाव सगळ्या संस्थानात पोहोचलं होतं. तालीम बाहेरून बरी दिसत होती, पण आत जाऊन पाहतो तो आखाड्याची दुरवस्था झालेली. लाल मातीपेक्षा काट्याकुट्याचा कचराच तिथे जास्त होता. तालीम अनेक वर्षांपासून बंद असावी. पारावर बसलेल्या लोकांना विचारलं,
''तालीम का बंद आहे?''
''आवं, कुस्त्या कुणी खेळायच्या? तरणी पोरं बॅट-बॉल खेळत्याती.”
''गावात जुने मल्ल तरी आहेत की नाही?''
''न्हाय न्हाय.. एकबी पैलवान गावात झालेला न्हाय.”
मास्तराने जीव ओतून तालीम उभारली, पण या तालमीतून मल्ल तयार झाले नाहीत. आज तर तालीम पुरती ओसच पडली आहे. म्हणजे या गावाला तालमीची गरज नव्हती की काय?
वाडीतल्या दगडमातीच्या घरांचीही पडझड झालेली होती. जवळजवळ सगळीकडे सिमेंटची घरं उभी राहिली होती. तीही मोजकीच. असतील वीसेक. आमच्यासोबतच्या दुकानदाराला विचारलं,
''गावात एवढीच घरं? गाव लहान दिसतंया.”
''लोकांनी शेतात घरं बांधलीत. आवं, ह्येच्या तिप्पट गाव रानात हाय. तीन वस्त्या हायत्या.”
आम्ही फिरत असताना एका पत्र्याच्या खोलीजवळ आलो. त्यावर वाचनालयाचा बोर्ड होता, पण दाराला कुलूप. बरेच दिवस दार उघडलं नसावं. दारात कचरा होता. विचारलं,
''वाचनालय कधी उघडतात?''
''कधी तरी उघडतात, साहेब आल्यावर.”
''पुस्तकं किती आहेत?''
''काय माहिती न्हाय. मी आत गेलो नाही कधी.”
आम्ही लोकांसोबत बोलत उभे असतानाच एका बोळातून पिपाणीचे सूर ऐकू येऊ लागले. तिघंजण वाजंत्री वाजवत आले. त्यांच्यापाठोपाठ आठ-दहाजण चालत येत होते. ‘मावल्याआईचं चांऽऽगभलंऽ' असं म्हणत ते निघाले होते. पिपाणीचे सूर अस्सल माणदेशी होते. सर्वांच्या अंगावर घोंगडं, डोक्याला मुंडासं, धोतर असा वेश होता. हे दृश्य थेट बनगरवाडी कादंबरीत घेऊन जाणारं होतं. मी कॅमेरा काढला आणि ते दृश्य टिपण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यांनी लगेच वाजवणं बंद केलं आणि ते तोंड लपवायला लागले.
काय झालं ते आम्हाला समजेना.
''फोटू काढू नका. कोण हायसा तुम्ही?'' असं म्हणत त्यांनी पिपाण्या खाली धरल्या.
मी आसपासच्या लोकांना विचारलं, ''ही लोकं असं का करायला लागल्याती?''
''आवो, ती घाबरल्याती.”
''का?''
''एका पत्रकारानं केलीया आमची गंमत. लावलंय कामाला आम्हास्नी.”
''काय झालंय?''
मग कळलं, या गावात नवसाने झालेली मुलं मंदिराच्या कळसावरून खाली टाकून घोंगड्यात झेलण्याची प्रथा आहे. दोन महिन्यांपूर्वी एका स्थानिक पत्रकाराने फोटोसह याची बातमी छापली. त्या बातमीमुळे प्रशासनाकडून हालचाली झाल्या आणि काही लोकांवर कारवाई झाली. अजूनही त्याचं सावट होतं. कोणतीही पूजा केली की पोलिस पकडतील, अशी समजूत होऊन बिचारे गावकरी घाबरत होते. त्यामुळेच त्यांनी वाजवणं बंद केलं होतं.
हेही वाचा - पुस्तकांच्या गावात वाचन कमी, पर्यटनच जास्त?
दुपार झाली. गावातली मंडळी आपापल्या कामाला निघून गेली. मी आणि माझा दोस्त दोघंच मागे राहिलो. गावातून फिरता फिरता चालत शिवाराकडे आलो. रानाकडे बघून मेंढ्यांना पळवून नेणारा लांडगा मारणाऱ्या शाळकरी पोराची, सताची गोष्ट आठवली. सता अजून हयात असेल का? असेल तर आज तो बराच म्हातारा झाला असेल...
जवळच पिपरणीच्या झाडाखाली सावलीला एक म्हातारा बसला होता. आम्ही त्याच्या जवळ जाऊन थांबलो.
''राम राम!”
''राम राम! बोला पाव्हणं.”
''मामा, लांडगा मारणाऱ्या सताचं घर कुठं हाय गावात?''
''काय, लांडगा मारला? न्हाय वं पाव्हणं. तसं कोण न्हाय इथं.”
''आता नव्हं, पूर्वीची गोष्ट आहे ही.”
''मग ती केस आता उपाटलीया काय? तुम्ही कोण ‘शायडी पुलिस' हायसा का?''
आम्हाला तो सीआयडी पोलिस समजत होता. ते ऐकून बसलेल्या धक्क्यातून आम्ही सावरतोय तोवर तो म्हणाला, ''तरीच तुम्ही सकाळपसनं गरागरा फिरताया. सकाळी तालमीजवळ तुम्हीच हुता नव्हं का? मला कायसुदिक माहिती न्हाय लांडग्याची...” असं म्हणून त्याने तोंड फिरवलं.
थांबण्यात अर्थ नव्हता. आम्ही तिथून हललो.
जुनं ‘बनगरवाडी' आजच्या लेंगरेवाडीला फारसं माहिती दिसत नव्हतं. म्हटलं, नाही तर नाही. आपण आजचं गाव तरी समजून घ्यावं. म्हणून पुन्हा गावात आलो. लोकांशी गप्पाटप्पा करू लागलो.
बनगरवाडी हे मुख्यतः धनगरांचं गाव होतं. लेंगरेवाडीतही धनगर समाजच मोठ्या प्रमाणावर आहे. त्याबरोबरच होलार, वाणी, रामोशी, नाभिक या समाजाचेही लोक आहेत. पण धनगरांमधले लेंगरे आडनावाचे लोक संख्येने जास्त. त्यामुळे गावाचं नावं लेंगरेवाडी. आटपाडी-कवठेमहांकाळ मतदारसंघाचे माजी आमदार अण्णासाहेब लेंगरे याच गावचे. ते या गावचे सरपंचही होते. दहा वर्षांपूर्वीपर्यंत इथे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होत होती; पण त्यानंतर मात्र दोन गटांत सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. गावात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या तीनही पक्षांचे कार्यकर्ते आहेत. एकूण राजकीयदृष्ट्या गाव चांगलं जागृत वाटलं.
आम्ही ग्रामपंचायत कार्यालयात डोकावलो. तिकडे बरीच बक्षिसं मांडून ठेवली होती. लेंगरेवाडीला पाच वर्षांपूर्वी ग्रामस्वच्छता अभियानात पहिला क्रमांक मिळालाय. गावच्या महिला सरपंच राजश्री लेंगरे यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. गावाला याचा मोठा अभिमान आहे. गावकऱ्यांच्या बोलण्यातून हे जाणवत होतं.
गावात पाणलोटातून विकासकामं झाली आहेत. शेततळी, पाझर तलाव, सिमेंट बंधारे झाले आहेत. अडीचशे एकरांत वनीकरणही झालं आहे. पाणलोटामुळे गावातील विहिरींचा पाणीसाठा वाढलाय. थोडंफार पाणी आल्यामुळे शेतकरी डाळिंबासारख्या नगदी पिकाकडे वळले आहेत. कधी काळी दुष्काळात होरपळणाऱ्या या वाडीची डाळिंबं आता परदेशांत निर्यात होताहेत. केवळ मेंढपाळी करणाऱ्या गावकऱ्यांनी आज उत्पन्नाचे अनेक मार्ग शोधलेत. अनेक मंडळी रोजगाराच्या शोधात बाहेरही पडलीयत. काही साखर कारखान्यांत कामगार म्हणून, काही मुंबईला माथाडीत, तर एक-दोघं शिक्षक झाले आहेत. काही तरुण दुधाचा व्यवसाय करताहेत. मेंढपाळी करणारेही आहेत, पण अगदीच थोडके. त्यामुळे तिन्हीसांजेला वस्तीकडे परतणाऱ्या मेंढ्यांचा कोलाहल आणि मेंढरं जुळवण्यासाठी मेंढक्यांची (मेंढपाळ) होणारी तारांबळ हे बनगरवाडीमुळे मनावर बिंबलेलं दृश्य आता आजच्या लेंगरेवाडीत दिसत नाही.
संध्याकाळ झालीय. सारे गावकरी आपापल्या घरांत टीव्ही बघताहेत. तरुण पोरं क्रिकेट खेळताहेत. लिंबापाशी कोणी तरी एकटाच म्हातारा बसून आहे.
दुसऱ्या दिवशीची सकाळ. बनगरवाडीच्या वस्तीवर पहाटेचा कोंबडा आरवतोय. थोड्या वेळाने गावचे व्यवहार चालू होतील. आता घराघरांतून भक्तिसंगीताचे सूर ऐकायला येत आहेत. पोलिस भरतीसाठी प्रयत्न करणारी मुलं माडगुळे रस्त्याला पळायला गेली आहेत. जगातल्या घडामोडींची चाहूल घेऊन आलेली वर्तमानपत्राची गाडी पेपरचे गठ्ठे टाकून निघून गेली आहे. पूर्वीच्या बनगरवाडीपेक्षा हे चित्र वेगळं आहे. आता मास्तर वाडीत राहत नाही. गावात राहावं असं त्याला वाटत नाही. पूर्वी तो चोवीस तास गावाला उपलब्ध असायचा. तो मास्तर होताच, पण त्यांच्यातला एक गावकरीही होता. आता तो घंटेच्या ठोक्यावर शाळेत येतो. घंटेच्या ठोक्यावर बाहेर पडतो.
एकूण, कादंबरीतली बनगरवाडी आणि आजची लेंगरेवाडी यात खूप बदल झाला आहे. काही बदल चांगले आहेत, काही खुपणारे आहेत. कोणते बदल व्हावेत अन् कोणते नाही हे आपल्या हातात नाही. त्या बदलांना चांगलं-वाईट ठरवण्याचा अधिकार तरी आपण का घ्या? पण अडाणी मेढपाळांची वस्ती असणारं गाव आता बदललंय. जिथे कधी पोस्टमनही यायचा नाही तिथे आज फेसबुक पोहोचलं आहे. कोरड्यास आणि भाकरीशिवाय खाण्याचे पदार्थ असतात हे माहिती नसणाऱ्या गावात आता नाना पदार्थांच्या जेवणावळी झडतात. रात्री सातनंतर अंधारात गुडुप होणारं गाव आज सौर दिव्यांनी उजळून गेलंय. पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर घागर घेऊन मैलोन्मैल वणवण करणारी बाई आता दिसत नाही, कारण तिच्या दारात नळ आला आहे. पूर्वी कोणी आजारी पडलं, अपघात झाला की घरगुती उपचारांवरच भिस्त असायची. त्यात माणसं दगावायची. बनगरवाडीतला कारभारी असाच रात्री ढाळ-वांत्या सुरू होऊन सकाळी मरण पावला होता. पण आता आरोग्यसेवा गावात येऊन पोहोचलीय. आजारी माणसाला मोठ्या गावात न्यायला हाताशी दुचाकी आहे. एक-दोन घरांत चारचाकीही आहे.
थोडक्यात काय, गावं बदलतात. अगदी कादंबरीतलीही गावं बदलतात.
लेंगरेवाडीतून आम्ही निघालो. संध्याकाळचे पाच वाजले आहेत. आटपाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक शेतकरी शेत नांगरतोय. हे दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासारखं होतं. त्याच्या जवळ गेलो. गप्पागोष्टी केल्या. त्याला म्हटलं. “बाबा, तुमचा फोटो काढू का?''
''माझा? काढा की!”
त्याला नांगर चालवायला सांगून आम्ही फोटो काढू लागलो. तेवढ्यात एक बाई डोक्यावर पाटी घेऊन तरातरा आली. त्याची बायको असावी. ती त्या शेतकऱ्याजवळ जाऊन काही तरी बोलली, तसा तो शेतकरी आमच्याकडे पाहून जोराने म्हणाला,
''आरं, हे काय चांगलं करत न्हायसा. बरं पडायचं न्हाय!” असं म्हणून तो जवळपास धावतच आमच्याकडे आला. आम्हाला कळेना म्हातारा अचानक का बिथरला. जवळ आल्यावर म्हणाला, ''त्या केऱ्याला सांगा, कितीबी फोटू काढ- माझ्या हयातीत तुला जमीन मिळणार न्हाय!”
तो काय बोलतोय, आम्हाला कळेना. या जमिनीवरून काही तरी कोर्टकज्जा सुरू असावा, एवढंच काय ते आमच्या लक्षात आलं. म्हातारबाबांचा आमच्याबद्दल गैरसमज झाला होता. मी त्यांना म्हणालो,
''बाबा, तुम्ही शांत व्हा बरं आधी.”
''न्हाय न्हाय. आमच्या भांडणात तुम्ही नका पडू! आमचं आम्ही बघून घिऊ!”
''बाबा, आमचा आणि कुण्या केरूबिरूचा काय संबध न्हाय. आम्ही तुमचं गाव बघायला आलुय. मागं पिक्चरबी आला होता, तसंच आम्ही लेख लिहिणार आहे. म्हणून फोटो काढला. बाकी काही नाही.”
''खरं सांगताय?''
''काय करू आम्ही म्हंजी तुम्हाला पटंल?''
आसपासच्या गावातल्या माहितीच्या माणसांची ओळख सांगितली. नशिबाने म्हाताऱ्याचा विश्वास बसला. तोवर त्याची बायको तणतणत आली. पण आता तो तिच्यावर ओरडला, ''ये तारे, गप्प बस! काय तरी होरं सांगतीस. ही पोरं त्यातली न्हायती.” आणि आमच्याकडे वळून म्हणाला, ''पोरानू, मघाचं काय मनावर घिऊ नका. अडाणी माणूस हाय मी.”
मला बनगरवाडीतला कारभारी आठवला. त्याच्या पोरीला चोळी आणून दिली, असं वाटून मास्तरवर भडकलेला. त्याच्याशी बोलणं टाकलेला. पण मास्तरच्या वागण्यात काही खोट दिसत नाही, हे कळल्यावर आपणहून त्याची माफी मागणारा. वाटलं, लेंगरेवाडी बदललं असलं तरी अजून तात्या माडगूळकरांच्या ‘बनगरवाडी'शी तिचं काही तरी नातं टिकून आहे!
(अनुभव, मे २०१५च्या अंकातून साभार..)
(अनुभवमधील या लेखासाठी बनगरवाडी पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्र वापरण्याची परवानगी चित्रकार बाळ ठाकूर यांच्याकडून मिळाली होती. तेच चित्र इथे वापरत आहोत.)
