
देवभोळ्या गावकऱ्यांच्या खचाखच गर्दीने भरलेला गावातला मंडप आणि तिथे दिवस-दिवस रंगणारी कीर्तनं हे खेड्यापाड्यांत नेहमी दिसणारं दृश्य. हरिनाम सप्ताह नावाची संस्कृती गेल्या पाच-पन्नास वर्षांमध्ये आपल्याकडे रुजली आहे. कुणाला वाटेल, हा सप्ताह म्हणजे केवळ भजन-कीर्तन; एकूण, फक्त धार्मिक प्रकरण. पण प्रत्यक्षात हा सप्ताह गावातल्या राजकीय-सामाजिक घडामोडींना व्यापून असतो. त्याचा सातारा-सांगली जिल्ह्यात फिरून घेतलेला हा धांडोळा.
सांगली-पुसेसावळी आणि पंढरपूर-कराड हे रस्ते जिथे भिडतात ते कडेपूर गाव. हे गाव पंचवीस वर्षांपूर्वी अण्णा बाळा यादव यांच्या हॉटेलमधल्या ‘कॉफी'साठी प्रसिद्ध होतं. पुण्या-मुंबईला जाणारी वाहनं इथे कॉफी प्यायला हमखास थांबायची. अगदी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणदेखील. आता या परिसरात ते बाजाराचं गाव म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यामुळे आसपासच्या पंधरा-वीस खेड्यांतल्या लोकांची या गावात वर्दळ असते. पूर्वीच्या खानापूर तालुक्याचं राजकारण या गावात ठरायचं. माजी आमदार संपतराव देशमुख इथलेच.
मी या गावी पोहोचलोय. गेल्या दोन दिवसांपासून गावात ‘अखंड हरिनाम सप्ताह' सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ असणाऱ्या मोकळ्या जागेत भव्य मंडप घातलेला आहे. आज तिथे भीमराव माने यांचं प्रवचन होणार आहे. संध्याकाळी पाच वाजल्यापासूनच त्याची गडबड सुरू झालीय. प्रवचनासाठी शेकडो लोक आलेत. काहीजण चौकात माने यांच्या दिशेला डोळे लावून बसलेत. थोड्या वेळात सांगलीकडून गाडी येते. गाडीतून गोरेपान, प्रसन्न चेहऱ्याचे भीमराव माने उतरतात. पांढरा शर्ट, पांढरी विजार. दाढी थोडीशी वाढलेली. संयोजक त्यांना मंडपाकडे घेऊन जातात. मंडपात डाव्या बाजूला स्त्रिया, तर उजव्या बाजूला पुरुष बसलेले. समोर एक लाकडी पलंग. त्यावर भीमराव माने बसतात. ‘पुंडलिक वरदा हारि विठ्ठऽल, श्रीज्ञानदेव तुकाऽराम'चा गजर होतो आणि प्रवचनाला सुरुवात होते.
त्यांचा भर अध्यात्म, मोक्ष, पाप-पुण्य यापेक्षा ग्रामस्वच्छता अभियानावर असतो. गावरान बोलीत ते सांगू लागतात, “हिंदकेसरी मारुती मानेभाऊंचा मी पुतण्या. म्हणूनच मला गावाने सरपंच केलं. यात माझं काही श्रेय नाही. मी अट्टल दारुड्या हुतो. एक दिवस सांगलीस्नं रात्री उशिरा आलो. खूप प्यालो होतो. रस्त्यावरून भेलकांडत निघालो होतो. रस्त्याच्या कडेला आयाबाया शौचाला बसलेल्या. मला पाहून त्यातली एकजण म्हणाली, ‘असली कशाला जगत्याती कुणास ठाऊक! पटकन मेल्याली बरी!' ते वाक्य मी ऐकलं नि मला रात्रभर झोप लागली नाही. विचार करत होतो, की समाजात आपली काय प्रतिमा आहे! दुसऱ्या दिवशीही कुठे गेलो नाही. विचार करत राहिलो... भाऊंनी काय केलं? मी काय करतोय? ते काही नाही, आपण काय तरी करायचं. नाव मिळवायचं. पहिल्यांदा दारू सोडली. मग गावात ग्रामस्वच्छता अभियान राबवलं. गावातली एकही भगिनी उघड्यावर शौचाला जाणार नाही अशी शपथ घेतली... आणि राज्यात गावाचा पहिला नंबर आला!'
या प्रास्ताविकाने भीमराव मान्यांनी सभामंडप जिंकतात. पुढे एक तास त्यांचं प्रवचन होतं; पण अध्यात्मावर बोलण्याचं टाळत ते गावगाडा, स्वच्छता अभियान याच विषयांवर आपली मतं मांडतात. तरुण श्रोते त्यांच्या प्रवचनाने विशेष प्रभावित झाले होते. प्रवचन संपल्यावर ते भीमरावांना भेटण्यासाठी गर्दी करतात.
“साहेब, तुम्ही अमरापूरलाबी या.” एकजण म्हणतो.
“हो, येतो की. मला फिरून जागृतीच करायची हाय. तरुणांचं संघटन करून आपल्याला गावं मजबूत करायची हायीत.” माने सांगत असतात. एकंदरीत आज त्यांनी कडेपूरकरांना जिंकलं असतं. हरिनाम सप्ताहात गावाच्या विकासाची ठिणगी पडते..
...असे हरिनाम सप्ताह ग्रामीण महाराष्ट्रात गावोगावी सुरू आहेत. श्रावण महिन्यानंतर या सप्ताहांना सुरुवात होते. नाव सप्ताह असलं तरी ते तीन, पाच किंवा नऊ दिवसांचेही असतात. या सप्ताहात ‘ज्ञानेश्वरी गाथा' या ग्रंथाचं वाचन, कीर्तन, प्रवचन, भजन, काकड आरती, हरिपाठ असे कार्यक्रम असतात. गावाचा सार्वजनिक उत्सव म्हणून सकाळच्या ग्रंथवाचनापासून ते रात्रीच्या कीर्तनापर्यंत गावकरी उत्साहाने सहभाग नोंदवतात. एकंदरच, ग्रामीण जीवनात हरिनाम सप्ताहाने महत्त्वाचं स्थान मिळवलं आहे. गावकऱ्यांना जोडणारा तो एक धागा बनला आहे. सप्ताहासाठी मुंबई-पुण्याहून चाकरमाने सुट्टी काढून येतात. वर्षभर न भेटणारे गावकरी या सप्ताहात एकमेकांना भेटतात. माहेरवाशिणी पोराबाळांसह मुक्कामासाठी गावी येतात. जिथे पारायण सोहळा होत नाही अशी तुरळकच गावं असतील. काही गावांत तर वर्षातून दोन वेळा पारायण सोहळा होतो.
आळंदी, देहू, पंढरपूर, कराड, जेजुरी, पैठण अशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी कैक वर्षांपासून हरिनाम सप्ताह होत आलेले आहेत; पण अन्य ग्रामीण भागात त्यांची सुरुवात १९७२ च्या दुष्काळानंतर झाली असावी असं दिसतं. बहात्तरच्या दुष्काळात शेकडो लोकांना गावं सोडावी लागली. पोटासाठी वाट दिसेल तिकडे माणसं पांगली. जे बागायतदार गावाला रोजगार पुरवत होते, त्यांच्यावरही रोजगार हमीच्या कामांवर जायची वेळ आली. अचानक ओढवलेल्या या आपत्तीमुळे माणसं हतबल झाली, अगतिकतेपोटी हरिनामाकडे वळली. योगायोगाने या लोकांना त्यासाठी प्रवृत्त करणारेही भेटले. उदा. याच काळात सांगली जिल्ह्यातल्या रामापुरात नामानंद नावाचे एक कीर्तनकार आले. त्यांनी लोकांना परमेश्वराच्या नामाचा महिमा वगैरे गोष्टी सांगितल्या. रामापूर-कमळापूर दरम्यान असलेल्या येरळा नदीच्या वाळवंटात त्यांचं कीर्तन झालं. कीर्तनात गावकऱ्यांना दुष्काळामागचं कारण कळलं. कारण सांगितलं गेलं : आपली भक्ती कमी पडते म्हणून निसर्ग कोपला आहे. आपण भक्ती केली पाहिजे! यातूनच हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. नामानंदांच्या वाणीमुळे लोक इतके प्रभावित झाले होते, की ‘नामानंद नाम गोड, लावले भजनाचे वेड' या ओळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडी बसल्या. चैत्र महिन्यात गावातील जंगली महाराजांच्या मठात सात दिवस हा सोहळा होऊ लागला. सोहळ्यासाठी गावातील लोक धान्य-पैसे या स्वरूपात मदत करत. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या जेवणाची जबाबदारीही ते उचलत. हा हरिनाम सोहळा १९७४पासून आजतागायत अखंड सुरू आहे, पण दुष्काळही सुरू आहे!
१९७२-७३ नंतरच्या काळात सांगली-साताऱ्यासह इतर ठिकाणीही हरिनाम सप्ताह सुरू झाले. एका गावात सप्ताह सुरू झाला की आसपासच्या इतर गावांतही त्याचं अनुकरण होऊ लागलं.
तीर्थक्षेत्रावर ज्या पद्धतीने हरिनाम सप्ताह व्हायचे त्याच स्वरूपात गावाकडची पारायणं सुरू झाली. त्यासाठी अपरिहार्य असणारे घटक ओघाने तिथे आले. उदा. प्रवचनकार, कीर्तनकार, व्यासपीठ चालक, हरिपाठ-काकड आरती चालक वगैरे. अध्यात्माची आवड व संतसाहित्याचा व्यासंग असणाऱ्या लोकांनी कीर्तन-प्रवचन, हरिपाठ या गोष्टी शिकून घेतल्या. आज महाराष्ट्रभर किमान १० हजार प्रवचनकार आणि ८ हजार कीर्तनकार आहेत. यांच्यापैकी काही स्थानिक पातळीवर सेवा करतात. मोजके कीर्तनकार राज्यस्तरावर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या तारखा मिळवण्यासाठी हरिनाम सप्ताहाच्या संयोजकांना धडपड करावी लागते.
हरिनाम सप्ताहाच्या नियोजनात गावातले १०-१५ कार्यकर्ते पुढे असतात. बहुतेकदा त्या-त्या गावातील राजकीय पुढारी किंवा पुढारी होऊ इच्छिणारी मंडळी या जबाबदाऱ्या उचलतात. वर्गणी गोळा करणं, कीर्तनकार-प्रवचनकार यांच्या तारखा ठरवणं, सहभागी होणाऱ्या भाविकांच्या रोजच्या भोजनाची सोय करणं, या भोजनाचा खर्च उचलण्यासाठी गावातील दानशूर व्यक्तींना प्रवृत्त करणं ही त्यांची प्रमुख कामं असतात. हे आयोजक वारकरी किंवा संतविचारांचे पाईक असतातच असं नाही, पण अशा कामांमुळे ते चर्चेत राहतात आणि गावाचं नेतृत्व करण्याची आयती संधी त्यांच्यासाठी चालून येते. या हरिनाम सप्ताहांत गावपुढाऱ्यांचं मंडळ सक्रिय असलं तरी सप्ताहाचा सोहळा घडून येतो तो संपूर्ण गावाच्या ताकदीवर.
अर्थात, अलीकडच्या दहा-बारा वर्षांत या सप्ताहांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून धनवान पुढाऱ्यांनी एक नवी शक्कल लढवली आहे. ते स्वत:च हरिनाम सप्ताहाचं आयोजन करू लागले आहेत. त्यात त्या सात दिवसांचा खर्च त्यांचा एकट्याचा असतो. अशा हरिनाम सोहळ्याच्या डिजिटल ‘फ्लेक्स'वर संतांच्या फोटोंपेक्षा अशा प्रायोजक पुढाऱ्यांचेच मोठे फोटो दिसतात. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातल्या एका गावात असा एक सप्ताह पाहिला. गावात प्रवेश करतानाच प्रवेशद्वारावर ‘दादां'चा डिजिटल फोटो झळकत होता. दादा हात जोडून स्मित करत सर्वांचं स्वागत करत होते. त्यांच्या शेजारी हरिनाम सप्ताहाची डिजिटल कार्यक्रमपत्रिका दिसत होती. गावात शिरल्यावर पुढे ५० मीटरवर परत तसाच आणखी एक फोटो दिसला. गावात एकूण सात ठिकाणी असे फोटो होते. गावात हरिनाम सप्ताह आहे की ग्रामपंचायतीच्या निवडणुका, असं वाटावं असं हे चित्र होतं. तो पारायणाचा सहावा दिवस होता. मंडपात कीर्तनकारांचं रसाळ भाषेत निरूपण सुरू होतं- “पुत्र कसा असावा? आपल्या दादांसारखा. धार्मिक, दानशूर, सात्त्विक. पुत्र कसा असावा? ‘आपुलिया हिता जो असे जागता.' बघा, गावासाठी हरिनाम सप्ताह घेतला. सगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी गावात बोलावली. संतांचे पाय लागले आपल्या नगरीला. मोठं भाग्य तुम्हा मंडळींचं! संतसेवा घडली तुमच्या हातून. दादांच्यामुळं! दादांसारखी माणसं नाही भेटत समाजात. आज काय चाललंय? घरातली भाकरी गोड लागत नाही म्हणून पोरं ढाब्यावर पळायला लागलीत. अरे, तुमची आई सुगरण आहे. तिच्या हातची भाकर खा. कशाला नको ते खाता, नको ते पिता? या हिकडं कीर्तनाला. माळकरी व्हा, टाळकरी व्हा, वारकरी व्हा. संसाराचं सोनं होईल तुमच्या! तर काय, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता-पिता। तयाचिया कुळी कन्या-पुत्र होती, जे सात्त्विक तयाचा हरिख वाटे देवा. दादांसारखी माणसं गावागावांत तयार झाली तर गावांचा स्वर्ग होईल स्वर्ग!” शेवटच्या शब्दावर कीर्तनकारांनी असा जोर दिला, की भारावून ऐकणाऱ्या दादाच्या एका उत्साही कार्यकर्त्याने टाळी वाजवली, तशा बाकीच्यांनी खाडखाड खाडखाड टाळ्या वाजवल्या. (टाळ्या वाजवायला माणसं नेहमी उत्सुक असतात याचा प्रत्यय आला.) टाळ्या वाजणं त्या कीर्तनकारांना अनपेक्षित होतं. त्यांनी ‘विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई' म्हणायला सुरुवात केली. कीर्तन सुरू राहिलं...
कीर्तनकार ज्या दादांची कीर्ती गात होते त्यांची माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न केला. हे दादा पंचवीस वर्षं गलाई (सोनं-चांदी) व्यवसायाच्या निमित्ताने केरळ राज्यात होते. तिकडून ते वर्षभरापूर्वी गावात आले होते. त्यांना गावच्या राजकारणात रस वाटू लागला. पण बरीच वर्षं गावापासून दूर राहिल्याने लोकांशी त्यांची नाळ तुटलेली होती. मग त्यांनी लोकांच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी हा सप्ताहाचा सोपा मार्ग निवडला. कीर्तन सुटल्यावर लोक कीर्तनकारांसोबत दादांचेही पाय धरत होते. दादांच्या चेहऱ्यावर डिजिटल पोस्टरवर होतं तसंच स्मित उमटत होतं. आणखी एक-दोन वर्षांत दादा सरपंच होणार हे सांगायला ज्योतिष्याची गरज नव्हती!
हरिनाम सप्ताह ही खरं तर वारकरी संप्रदायाची चळवळ. पण आता असे सप्ताह म्हणजे त्या-त्या गावाचे उत्सव बनले आहेत. सप्ताहाची तारीख जसजशी जवळ येते तशी गावकारभाऱ्यांची लगबग सुरू होते. पूर्वीच्या काळी सप्ताहाच्या नियोजनाच्या कामी निःस्वार्थी लोक असत. सप्ताहातून पुण्यसंचय, संतांच्या विचाराचं जागरण, गावाची एकी यावर त्यांचा भर होता. पारायणामुळे गावात समृद्धी येईल, हा भाबडा आशावाद होता. आता मात्र ‘पेशाने पुढारी' असलेल्या लोकांनी या पारायण सोहळ्याचं कारभारीपण पटकावलं आहे. गावावर प्रभाव असणारे सात-आठ पुढारी एकत्र येतात, मन मानेल ती वर्गणी ठरवतात आणि मग त्यांचं वसुली पथक टोळधाडीसारखं गावभर फिरतं. गावातील लोकांकडून सक्तीने वर्गणी वसूल करणं, जो देणार नाही त्याचं नाव लाऊडस्पीकरवरून पुकारणं असेही प्रकार घडू लागले आहेत. मिळणारी वर्गणी कशी खर्च केली जाते याचं गणित गावाला कळत नाही. पण उरलेले पैसे हे लोक वर्षभर वापरतात. काही ठिकाणी सप्ताहात शिल्लक राहिलेले पैसे व्याजानेही देण्याचे प्रकार घडतात. या पैशाच्या वसुलीसाठीही हेच हरिनामाचे संयोजक संघटितपणे फिरतात. हे लोक नव्या माणसाला आपल्या कारभारात सहजी लुडबूड करू देत नाहीत. पारायणातील शिल्लक रकमेचा हिशेब मागितला म्हणून दमदाटी व मारामारी करण्याच्या घटनाही घडल्याचं ऐकिवात येत असतं. अशा प्रकारे चालणारी पारायणं समाजात व गावात असे कोणते बदल करणार आहेत?
हरिनाम सप्ताहवाल्यांच्या अशा मनमानी कारभारामुळे एका खेड्यात घडलेली गमतीशीर घटना. गावात अनेक वर्षांपासून सप्ताह सुरू होता. कारभाऱ्यांची मनमानी सुरू होती. या मनमानीला कंटाळून गावातील चार तरुणांनी वर्गणी न देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत अजून काही गावकरी तयार झाले. मग त्यांनी वेगळी बैठक घेतली व स्वतंत्र वर्गणी जमा करायला सुरुवात केली. जुन्या सप्ताहाच्या कारभाऱ्यांनी त्यांना दटावलं, पण काही फरक पडला नाही. अखेर सप्ताहाचा दिवस उजाडला. त्याच संध्याकाळी गावात दुसरा स्पीकर लागला व त्यावरून ‘आज रात्रौ ठीक नऊ वाजता मारुती देवालयाच्या भव्य पटांगणात ‘संत सखूबाई' हा चित्रपट पाहण्याची संधी दवडू नका!' अशी घोषणा व्हायला सुरुवात झाली. हे ऐकून सप्ताहवाल्यांचं धाबं दणाणलं. ते त्या पोरांकडे गेले व ‘पिक्चर रद्द करा' असं म्हणू लागले. पण पोरं हुशार होती. ती म्हणाली, “देवाचा पिच्चर हाय- रद्द कसा करू?” हात हलवत कारभारी परत फिरले. त्या दिवशीच्या कीर्तनाला टाळकरी सोडून फक्त दहा-बारा माणसं होती. बाकी सर्वजण ‘संत सखूबाई' बघायला गेली होती. अगदी सप्ताहाच्या पुढाऱ्यांच्या बायकाही पिक्चरला गेल्या होत्या. दरवर्षी कीर्तनासाठी सभामंडप खचाखच भरलेला असायचा, तो या मुलांनी सात दिवस सात ‘देवांचे'च चित्रपट ठेवल्यामुळे ओस पडला. शेवटच्या दिवशी चित्रपटाला येणाऱ्या रसिकांना मुलांनी खिरीचा प्रसाद वाटला. अर्थातच, पुढल्या वर्षी हरिनाम सप्ताहाच्या कारभाऱ्यांनी त्या मुलांनाही कारभारीपणात घेतलं.'
ग्रंथवाचन हा सप्ताहातील एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो. अशा एका कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो होतो. मंडपात चार रांगा होत्या- दोन पुरुषांच्या, दोन स्त्रियांच्या. प्रत्येकाच्या समोर छोटा स्टँड. त्यावर ग्रंथ. हे सप्ताहातील वाचक. त्यांच्या पुढ्यात एका मोठ्या स्टेजवर दोघंजण बसलेले. ते व्यासपीठ चालक. त्यांच्यासमोर माइक होता. ते इतक्या भरभर ओव्या वाचत होते की त्यांचे उच्चारही कळत नव्हते. खाली बसलेले वाचकही त्याच सुरात भरभर वाचत होते. काहीजण फक्त ओळीवरून बोट फिरवत होते. वाचता वाचता व्यासपीठ चालक मध्येच थांबले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली- “ज्याचं भाग्य आहे तोच इथं येतो. या ग्रंथाचा महिमा थोर आहे. नशिबाशिवाय हे नाही...” वाचन थांबलं. मी सहभागी असणाऱ्यांशी बोललो. बरेचसे पुण्याईच्या प्रभावाने आले होते. अर्थातच त्यांना ओव्यांचा अर्थ समजलेला नव्हता. भरभर वाचनाने त्यांना काहीच कळत नव्हतं.
या संदर्भात गेल्या २५ वर्षांपासून ज्ञानेश्वरीची शेकडो पारायणं केलेल्या राजाराम कदम यांना विचारलं. ते म्हणाले, “हा ग्रंथ वाचण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी आहे. पारायण सोहळ्यात हा ग्रंथ समजून घेतला पाहिजे. यांत्रिकपणे केवळ वाचायचं म्हणून वाचून काय उपयोग?”
अखंड हरिनाम म्हणजे अखंडपणे नामस्मरण करणे. काही गावांत अखंड वीणासेवा केली जाते. एकाने वीणा घ्यायची, वाजवायची, दुसऱ्याच्या गळ्यात अडकवायची; त्याने तिसऱ्याच्या. असं अनेक वर्षं सुरू आहे. घेतलेली वीणा खाली ठेवली गेलेली नाही. गावाने बैठक घेऊन प्रत्येकाला त्याची वेळ व दिवस ठरवून दिला आहे. काही गावांत ही प्रथा श्रावण महिन्यापुरती असते. एक किस्सा सांगण्यासारखा आहे. कवठे महांकाळ तालुक्यात शिरढोणला व मसूरजवळ कवठ्याला ही प्रथा अनेक वर्षं सुरू होती. काही गावांनी शक्कल लढवून गावातील वेडसर, अंध अशा लोकांना या कामासाठी नेमून त्यांच्या कायमस्वरूपी ‘भाकरी'ची सोय केली आहे. गावातील ‘बीझी' माणसंही आपल्या जागेवर अशांनाच वीणासेवेसाठी पाठवतात. “एवढी ओढूनताणून ही प्रथा का चालवली जात आहे?” असं विचारल्यावर “चालत आलंय, मोडायचं कसं?” असा प्रतिप्रश्न आपल्यालाच केला जातो. अशी ही जुलमाने चाललेली भक्ती. ही प्रथा बंद केली तर गावावर संकट येईल, अशी भीती त्यांना वाटते.
हे अखंड वीणाप्रकरण हरिनाम सप्ताहाच्या सात दिवसांतही असतं. दिवसा वीणा घ्यायला हौसेने भाविक तयार असतात, पण रात्री मात्र शोधून ‘भक्त' आणावे लागतात. एक दगडू नावाचा सांगकाम्या मुलगा होता. रात्री तो मंदिरात झोपायला जायचा. त्या मंदिरात सप्ताह सुरू होता. सप्ताहातील कीर्तन सुटल्यावर काही मुलं हौसेने वीणा घ्यायला आली. एकाने अर्धा-पाऊण तास वीणा घेतली. मग तो कंटाळला. त्याच्या पुढच्यालाही कंटाळा आला होता, पण वीणा खाली ठेवायची नसते हे मनावर बिंबलेलं. मग त्यांनी दगडूला उठवलं. गोड बोलून त्याच्या गळ्यात वीणा अडकवली. ते त्याच्या पाया पडले. त्यालाही बरं वाटलं. आयुष्यात पहिल्यांदाच कुणी तरी त्याच्या पाया पडत होतं. सर्वजण त्याला ‘आम्ही परत येईपर्यंत वीणा खाली ठेवू नको' असं बजावून निघून गेले. बिचारा दगडू रात्रभर एकटाच उभा राहिला. अखेर पहाटे काकड आरतीला बुवा आल्यावरच त्याची सुटका झाली.
स्थानिक हरिनाम सप्ताहात गोळा होणारी वर्गणी हा अजून एक चर्चेचा मुद्दा ठरतो. ही वर्गणी मुख्यत्वे प्रवचन-कीर्तनकारांच्या मानधनावर खर्च होते. किमान तसं सांगितलं तरी जातं. वक्त्याचं नाव, त्याची कीर्ती, जिथे कीर्तन-प्रवचन होणार ते ठिकाण अथवा गाव किती सधन आहे यावर मानधनाच्या रकमा ठरतात. साधारण ५०० रुपयांपासून २५ हजार रुपयांपर्यंत मानधन दिलं जातं. छोट्या गावांना जास्त मानधन घेणारे कीर्तनकार परवडत नाहीत. त्यांच्या एका कीर्तनाच्या रकमेत सात छोटे कीर्तनकार बसतात. त्यामुळे छोटी गावं सुप्रसिद्ध महाराजांच्या नादी लागत नाहीत. दुष्काळी पट्ट्यातील गावांनाही महागडे कीर्तनकार परवडत नाहीत. मोठी सधन गावं, पुढाऱ्यांनी आयोजित केलेले हरिनाम सप्ताह अशा ठिकाणी मात्र नामांकित, महागडे कीर्तनकार सेवा करतात.
कीर्तनकारांच्या मोठमोठ्या बिदाग्यांबद्दल विचारण्यासाठी कीर्तनकार मल्हारी जावरे यांना गाठलं. ते म्हणाले, “आज हरिनामाच्या नावाखाली लाखो रुपयांच्या देणग्या गोळा होतात. मग कीर्तन-प्रवचनकारांना मानधन मिळालं तर काय हरकत आहे? कीर्तनकारही पूर्णवेळ हेच काम करतात. त्यांच्यावरही आपल्या कुटुंबाची जबाबदारी असते. याचाही विचार करायला हवा.” ते पुढे म्हणाले, “अर्थात निव्वळ पैशासाठी कीर्तन करणाऱ्यांबद्दल मी काहीही बोलणार नाही. दर ठरवून कीर्तनाला जाणं याचंही समर्थन करता येणार नाही. पण याचा अर्थ कीर्तनकारांनी फुकट कीर्तन करावं असंही नाही.”
नामांकित कीर्तनकारांच्या वाणीवर सामान्य लोक प्रेम करतात. कीर्तनं ऐकण्यासाठी आसपासच्या गावांतून वाहनं करून ते येतात. हे लोक हरिनाम सप्ताहाकडे का वळतात? या लोकांमध्ये प्रपंचाने ग्रासलेले दु:खी, गरीब वर्गातलेच जास्त असतात. ‘नामस्मरण केल्याने आपली सर्व दु:खं दूर होतील' हे त्यांच्या मनावर बिंबलेलं असतं. कीर्तन-प्रवचनातही त्यांना हाच संदेश मिळतो. तिथे त्यांना सुखाची हमी मिळते. पुराणातले दाखले, परमेश्वर भक्ताच्या मदतीला कसा धावून गेला याची वर्णनं ऐकून ही माणसं स्वत:वरही परमेश्वरकृपा व्हावी यासाठी सायास करतात. हरिनाम सप्ताहात संतपंगत म्हणून एक प्रकार असतो. संतपंगत म्हणजे ग्रंथवाचनासाठी बसलेले वाचक, कीर्तनकार, टाळकरी, विणेकरी, चोपदार यांना जेवण देणं. परिस्थिती नसतानाही काहीजण ही संतपंगत घालतात. अन्नदानातून मिळणाऱ्या पुण्याच्या गोष्टी त्यांनी कीर्तनातून, प्रवचनातून ऐकलेल्या असतात. त्याच त्यांना हे करण्यासाठी प्रवृत्त करतात.
कीर्तनकाराची लोकप्रियता जशी वाढत जाते, तशी त्यांच्या मानधनातही वाढ होते. कोणते कीर्तनकार लोकप्रिय होतात? जे रसाळ भाषेत निरुपण करतात. ज्यांच्या मांडणीत विचारापेक्षा गोष्टी वेल्हाळपणा जास्त असतो. संत साहित्याचा व्यासंगी अभ्यासकांना सप्ताहात बोलायला नेले तर त्यांचे कोणी ऐकणार नाही, पण रसाळ भाषा, दिव्य गोष्टी सांगणारे कीर्तनकार मात्र लोकांच्या गळ्यातील ताईत बनतात. स्वत:ची लोकप्रियता लक्षात आल्यावर कीर्तनकारही बिदागीत वाढ करतात. आज अशा ‘लोकप्रिय' निरुपणकारांची बिदागी लाखाच्या घरात पोहचली आहे. पण त्यांच्या भाषाप्रभुत्वाचा भाविकांवर एवढा प्रभाव आहे, की त्याच्यापुढे मानधन वगैरे गोष्टी मिथ्या ठरतात! या गोष्टीची चर्चा करणेही भाविकांना गैर वाटते.
संत गाडगेबाबासारख्या कीर्तनकारांनी कधी पायपीट करत तर कधी मिळेल त्या वाहनाने प्रवास करून महाराष्ट्राचे प्रबोधन केले. त्यानंतरही जिजाबा मोहिते या राष्ट्रीय कीर्तनकारांनी हा वारसा समर्थपणे चालवला होता. पण आज त्यांचा नि:स्पृहसेवेचा वारसा चालवण्यासाठी कोण पुढे येणार, हा प्रश्न आहे.
कीर्तनाच्या माध्यमातून लोकप्रिय बनलेल्या कीर्तनकारांचीही संस्थाने उभा राहिली आहेत. या संस्थानाचा प्रभाव हरिनाम सप्ताहाखेरीज राजकीय सत्तेवरही जाणवतो. राज्यपातळीवरचे नेतेही त्यांच्या श्रोतेवर्गात असतात. एकंदरीत या रसाळ वाणीचा असा प्रभाव पडत आहे.
‘संताचा चरणाचा दास' असं म्हणवून स्वत:च्या नम्रतेचे जाहीर प्रदर्शन करणाऱ्या निरुपणकारांचा हेकेखोरपणाही अनेकदा भाविकांना पहायला मिळतो. एका समृद्ध खेड्यात नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन होते. मानधनही खूप होते. आसपासच्या २०-२५ गावातून भाविक ऐकायला आणि ‘दर्शना'ला आलेले मंडप खचाखच माणसांनी भरलेला. महाराज आले. कीर्तन सुरू झालं. लोक कानात जीव गोळा करून ऐकायला लागले आणि अवघ्या वीस मिनिटात त्यांनी कीर्तन बंद करायची भाषा त्यांच्या तोंडून यायला लागली. हळूहळू त्यांनी कीर्तन बंद केले. लोक हळहळले. ते महाराजांची अमृतवाणी ऐकायला आले. पण त्यांचा भ्रमनिरास झाला होता. चेौकशी केल्यावर एक गोष्ट समजली, ते महाराज दुपारी आले होते. त्यांच्यासोबत काही सहकारी होते. त्यांना जेवणाचा आग्रह केल्यावर त्यांनी सप्ताहातील शिरा-भात हे साधे जेवण नाकारले. मग त्यांच्यासाठी तालुक्याला जाऊन जेवण आणले. विश्रातीनंतर त्यांची तब्येत बिघडली (?). मग ते कीर्तनाला नकार द्यायला लागले. तोपर्यंत लोक जमलेले. सप्ताह चालकाच्या तोंडचं पाणी पळालं. खूप विनंती केल्यावर ते कीर्तनाला उभे राहिले, पण पूर्ण न संपवताच पसार झाले. त्यामागचं कारण मात्र गुलदस्तातच राहिलं. असे नाना प्रकार...
हरिनाम सप्ताह म्हणजे लाखो वारकऱ्यांना एकत्र जोडणारी चळवळ असेल आणि हे वारकरी एकदिलाने एकत्र येत असतील असं कुणाला वाटू शकतं, पण प्रत्यक्षात हरिनाम सप्ताहांचा सगळा पसारा फडांच्या गटबाजीत अडकला असल्याचा प्रत्यय येतो. हरिनाम सप्ताहाचे संयोजक या गटबाजीपासून दूर आहेत; पण अलीकडे कीर्तन करणाऱ्या मंडळींनी मात्र कीर्तनातून स्वत:च्या फडाचं महत्त्व पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
‘भेदाभेद भ्रम अमंगळ' हे वचन मुखात असणाऱ्या वारकऱ्यांतही फडाचं राजकारण असतं याचा हा एक किस्सा. एका महाराजांचं कीर्तन सुरू होतं. त्यांनी कीर्तनासाठी अभंग चांगला घेतला होता : ‘पिकलीया शेंदाड कडू गोड झाले'। विठ्ठलाची भक्ती केली आणि आमचं जीवन सुखी झालं, असा त्या अभंगाचा आशय होता. पण बोलता बोलता त्यांनी दुसऱ्या फडावर जोरदार टीका चालू केली. ते ऐकताच पाच-सहा टाळकरी चुळबूळ करू लागले. कारण महाराज ज्या फडावर टीका करत होते त्याच फडाचे ते टाळकरी होते. शेवटी कीर्तनकार जास्तच बोलायला लागल्यावर त्यांनी टाळ खाली ठेवले आणि ते निघून गेले. कीर्तनाला आलेले लोक अवाक होऊन या प्रकाराकडे बघत राहिले. टाळकरी निघून गेल्यावर बुवा चवताळले. त्यांनी जास्तच बोलायला सुरुवात केली. त्यांचा थाट असा होता, की ते जणू एखाद्या प्रचारसभेत बोलत आहेत!
कीर्तनाची सुरुवात ‘रूप पाहता लोचनी' या अभंगाने करायची की ‘सुंदर ते ध्यान' या अभंगाने करायची यावरही देहूकर व वास्कर या फडातील कीर्तनकारांत मतभेद आहेत. कीर्तनाच्या शेवटी तुकारामांची आरती म्हणणं, न म्हणणं यावरूनही मोठे वाद झाले होते. समतेची वाट चालणाऱ्या वारकऱ्यांतही अजून भेदाभेदाचे भ्रम आहेत असं दिसतं.
मात्र, हरिनाम सप्ताहाबाबत वेगवेगळी मतं, त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीविषयी आक्षेप असतानाही ते गावोगावी नव्या स्वरूपात भरत आहेत. अनेक गावांतल्या पारायण सोहळ्यांत स्त्रीभ्रूणहत्या, व्यसनमुक्ती, आरोग्य, शेती या विषयांवरची व्याख्यानं व्हायला लागली आहेत. या पारायणांकडे प्रबोधनाचं माध्यम म्हणून बघणाऱ्यांची संख्या वाढत आहे. निव्वळ पुराणकथा हा विषय दिवसेंदिवस बाजूला पडत चालला आहे. शिवाय हरिनाम सप्ताह केवळ महाराष्ट्रात सुरू आहेत अशातला भाग नाही. देशभर विखुरलेल्या मराठी भाषकांनी भागवतधर्माची पताका आपल्यासोबत त्या-त्या प्रांतात नेली आहे. तामिळनाडूतील वेल्लूर जिल्ह्यातील गुडीआतम या गावात दरवर्षी तिथले मराठी भाषक हरिनाम सप्ताह भरवतात. या पारायणाचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथवाचन-कीर्तन-प्रवचनासोबत तिथे रक्तदान शिबिराचंही आयोजन होतं. वेल्लूर जिल्ह्यात काही वर्षांतच या पारायणाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
गावागावांतल्या हरिनाम सप्ताहांबाबत बोलताना पत्रकार ह.भ.प. दत्ता खंडागळे म्हणाले, “अनेक गावांत गेल्या पंचवीस वर्षांपासून पारायणं सुरू आहेत; पण या पंचवीस वर्षांत नेमका काय बदल झाला, गावात पंचवीस माणसं तरी घडली काय, याचा विचार करायला हवा. जे जत्रेचे कारभारी तमाशा ठरवायला जातात, तेच सप्ताहातील प्रवचनांच्या तारखा ठरवतात. ते पारायणांकडे काय म्हणून बघतात हे महत्त्वाचं आहे. पारायण म्हणजे गंमत नाही, हा लोकांना बदलवणारा विषय आहे हे लक्षात घ्या. कर्मकांड व परंपरा म्हणून पारायणं केली तर समाजात काहीही बदल होणार नाही.”
पण दुसरीकडे, सप्ताहांकडे सकारात्मक पद्धतीने पाहायला हवं, असं इकडचे सामाजिक कार्यकर्ते मोहनराव यादव यांना वाटतं. ते म्हणाले, “हरिनाम सप्ताह ही अंधश्रद्धा नव्हे. अशा सप्ताहात गावगाड्यातील लोक एकत्र येऊन काही तरी करतात. त्या निमित्ताने गावात एकोपा होतो. या लोकांकडून थेट क्रांतिकारी विचाराची अपेक्षा करणं गैर आहे. किमान या सोहळ्यास एखादा भोंदूबाबा येऊन चमत्कार करून लोकांना फसवत तर नाही! सप्ताहात त्या-त्या भागातले लोक प्रवचन-कीर्तन सांगतात यात आक्षेपार्ह काय? कीर्तनातले काही मुद्दे पटत नसतील, पण लोकांनी ऐकलं पाहिजे. मुळात ग्रामीण भागात घरातून बायका-गडी बाहेर पडून काही ऐकणं ही परंपरा नव्हती. हरिनाम सप्ताहामुळे ती सुरू झाली आहे.”
विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. बाबुराव गुरव यांच्याशी बोललो, तर त्यांचं मत थोडंसं वेगळं होतं. ते म्हणाले, “हरिनाम सप्ताहातील कीर्तनकार व प्रवचनकारांनी आता पुराणातील भाकडकथा सांगू नयेत. लोकांचे प्रश्न काय आहेत ते त्यांनी ओळखावं. हरिनामाच्या स्टेजवर समाजाच्या नव्या प्रश्नांची चर्चा व्हावी. आज झाडं तोडली जात आहेत. अशा वेळी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' हा संत तुकारामांचा विचार प्रभावीपणे मांडला गेला पाहिजे. पर्यावरणाला वाचवण्याचं काम हरिनाम सप्ताहातून घडू शकतं.”
जाता जाता दोन किस्से. हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गावाखेड्यांत नेमकं काय घडतं हे सांगणारे. सांगली जिल्ह्यातल्या शिरगावात पारायण सोहळा साजरा झाल्यानंतर गावकरी हिशेब करण्यासाठी एकत्र बसले. पालखीतल्या नारळाचा विषय निघाला. तो नारळ कोणाकडे ठेवायचा यावरून वाद सुरू झाला. शेवटी त्या नारळाचा लिलाव करायचं ठरलं. बोली सुरू झाली. एक, दोन, तीन रुपये, पाचशे, हजार असं करत शेवटी एकाने तो नारळ अकरा हजाराला विकत घेतला. कारभारी खूष झाले. कारण उघड होतं. दुसरीकडे तो माणूसही खुषीत होता. मानाचा नारळ त्याला मिळाल्यामुळे आता त्याचं भाग्य फळफळणार होतं!
दुसरा किस्सा काल्याच्या कीर्तनाच्या वेळचा. काल्याचं कीर्तन म्हणजे हरिनाम सप्ताहाच्या समारोपाचं कीर्तन. बुवा शब्दांशी खेळत, रंगवत सांगत होते- “काला, तुम्ही इथं का आला?” त्यांच्या तोंडून गोकुळातील कृष्णलीला ऐकताना लोकांची हसून मुरकुंडी वळत होती. कीर्तन सुरू असताना बाहेर दहीहंडी फोडली जात होती. झाडाला टांगलेली दहीहंडी फोडण्यासाठी एक कार्यकर्ता पताका घेऊन गेला. प्रसादासाठी खाली हीऽ गर्दी झालेली. दहीहंडी फुटली. एकाने मोठ्या भांड्यात तो प्रसाद झेलला. बाकीचे धडपडत होते. ढकलाढकली सुरू होती. म्हाताऱ्या बाया, मुलं, तरुण सगळेच त्यात होते. एकाला दहीहंडीच्या मडक्याचं खापर सापडलं. त्याने ते खिशात टाकलं. तो म्हणाला, “हे जुंधळ्यात, कणगीत टाकलं की धनधान्य वाढतं, बरकत येती.”
ते ऐकलं आणि संत तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आठवला- असाध्य ते साध्य करता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे। बरकत येण्यासाठी शेतात जाऊन राबावं लागेल असं संतांना म्हणायचं होतं. पण तो वेडा मनुष्य मात्र आयुष्यात चमत्कार होईल या भ्रमात होता. दहीहंडीच्या मडक्याचं खापर कणगीत टाकून बरकत येणार नाही, हे त्याला कुणी तरी खडसावून सांगण्याची गरज होती. आतल्या कीर्तनात आता अलौकिक विश्वाचा विषय सुरू होता. मोक्षाच्या स्वप्नाचं तत्त्वज्ञान सुरू होतं. कीर्तनानंतर सर्वांसाठी महाप्रसाद होताच. मी तिथून निघालो. दूरवरून कीर्तनाचा आवाज येत होता. खापरं गोळा करणारा तो भोळाभाबडा भाविक आठवत होता. त्याला हरिनामातून नको तेच मिळालं होतं. संताच्या विज्ञानवादापासून तो शेकडो योजनं दूर होता...