आम्ही कोण?
शोधाशोध 

पुस्तकांच्या गावात वाचन कमी, पर्यटनच जास्त?

  • योगेश जगताप
  • 18.02.25
  • वाचनवेळ 11 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
bhilar revised image

वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी पोंभुर्ले, नवेगाव बांध, वेरूळ, अंमळनेर आणि अंकलखोप ही ‘पुस्तकांची गावं’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय नुकताच झाला. आठ वर्षांपूर्वी भिलारमध्ये पहिलं पुस्तकांचं गाव उभं केलं गेलं होतं. या प्रयत्नांमधून तिथे आजवर काय घडलं, हे भिलारमध्ये जाऊन समजून घेण्याचा हा प्रयत्न..

वेल्श प्रांतातलं ‘हे ऑन वे’ हे गाव जगभरात पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही एक पुस्तकांचं गाव असावं, अशा विचाराने २०१७मध्ये महाबळेश्वर-पाचगणी या थंड हवेच्या पर्यटन स्थळांजवळच्या भिलार गावाची पुस्तकांचं गाव म्हणून निवड करण्यात आली. या दोन पर्यटनस्थळी जाणारे पर्यटक भिलारलाही येतील, तिथे राहतील, घरोघरी ठेवलेली पुस्तकं वाचतील, अशी कल्पना त्यामागे होती. त्यानुसार पुस्तकांचं गाव म्हणून भिलारची रंगरंगोटी झाली, घरा-घरांमध्ये वेगवेगळ्या साहित्य प्रकारांमधली पुस्तकं ठेवली गेली. या उपक्रमाला बरीच प्रसिद्धीही मिळाली.

या आठ वर्षांत भिलारमध्ये काय काय घडलं, किती वाचकांनी किती पुस्तकं वाचली आणि आज या गावातली परिस्थिती काय आहे, हे समजून घेण्यासाठी भिलारला चक्कर मारायची ठरवली.

पाचगणीहून महाबळेश्वरला जाताना सहा-सात किलोमीटर अंतरावर भिलारचा फाटा लागतो. तिथून आत अडीच-तीन किलोमीटर अंतरावर भिलार गाव आहे. गाव येण्याआधी रस्त्यांवर पुस्तकांच्या गावाची माहिती देणारे फलक झळकू लागतात. त्याचबरोबर पर्यटकांच्या राहण्याची सोय करणारे होम स्टेज आणि हॉटेलं यांची रांगच्या राग दिसते. ‘पुस्तकांच्या गावच्या फलकांपेक्षा ही रांगच मोठी आहे, असं मनात येत असतानाच गावाच्या अलीकडेच हिलरेंज शाळेत पुस्तकांचं एक दालन असल्याची खूण दिसली.

bhilar kadambari board

गाव जवळ आलं तसं लगेचच कादंबरी विभागाच्या पाटीने लक्ष वेधून घेतलं. पाटी दिसेल अशी ठळक होती, पण त्या घरापर्यंत जाण्यासाठी मात्र होम स्टेजच्या गर्दीतून शोधाशोधच करावी लागली. गावातील अभ्यासू नेते स्व. बाळासाहेब भिलारे यांच्या मालकीच्या जागेत हे दालन आहे. तळमजल्यावर एका खोलीत दोन कपाटं आणि एका वर्तुळाकार रॅकमध्ये हजारभर तरी पुस्तकं होती. काही पुस्तकं चाळली. ती चांगल्या अवस्थेत होती. या दालनाच्या शेजारीच स्ट्रॉबेरीचं शेत होतं. स्ट्रॉबेरी आणि पुस्तक या भिलारच्या दोन मुख्य ओळखीची गट्टी सुरुवातीलाच जमून आल्याचं दिसलं. शेतातल्या स्ट्रॉबेरी तोडून त्या खात पुस्तक वाचत बसण्याची कल्पना छानच वाटली. पण मी गेलो तेव्हा तरी तिथे कुणी वाचक दिसन नव्हते. तिथल्या नोंदवहीत वाचकांनी लिहिलेले काही अभिप्राय मात्र सापडले. कुतूहल आणि कौतुक दोन्ही त्या अभिप्रायांतून दिसून येत होतं.

या दालनातून बाहेर पडून पुढच्या रस्त्याला लागलो. थोड्या वेळाने दोन हॉटेलांमध्ये गुडूप झालेलं विज्ञानविषयक पुस्तकांचं दालन दिसलं. तिथे एकाच कपाटात सरमिसळ झालेली तीनेकशे पुस्तकं दिसत होती. त्यात ललित, कला, कथा, कादंबरी अशा सगळ्याच प्रकारांमधल्या पुस्तकांचा समावेश दिसत होता. नोंदवहीकडे बघता बऱ्याच दिवसांत तिथे कुणी फिरकलेलं दिसत नव्हतं. थोडक्यात, हे दालन अगदीच अडगळीत पडलेलं दिसलं.

गावातल्या मुख्य चौकाकडे जात असताना उजव्या हाताला मोठ्या हौसिंग सोसायट्या दिसतात. यातली बहुतेक घरं गुजराती-राजस्थानी लोकांची आहेत असं तिथल्या नावांवरून लक्षात येतं. आणखी थोडं पुढे गेल्यावर भिलार गाव सुरू झाल्याची पाटी लागली. पुस्तकांची विक्री, त्यांचं नियोजन, देखभाल करणारं एक ऑफिस गावात आहे. आधी तिथे जाऊन या उपक्रमाची माहिती घ्यावी आणि मग पुस्तकांच्या वेगवेगळ्या दालनांमध्ये चक्कर मारावी असं ठरवलं. त्यानुसार चौकशी केली तर हे ऑफिस कृषीकांचन नावाच्या इमारतीत असल्याचं कळलं. शोधत शोधत तिथे जाऊन पोहोचलो.

शशिकांत भिलारे यांच्या मालकीच्या इमारतीत हे ऑफिस आहे. ग्रामस्थांनी पुस्तकांच्या दालनांसाठी आपापल्या घरात जागा करून दिली आहे, तशीच भिलारे यांनी आपल्या इमारतीत ऑफिससाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. ऑफिसमध्ये जायच्या आधी भिलारेंची भेट झाली. पुस्तकांची गाव ही ओळख गांभीर्याने घेतलेला हा पुस्तकप्रेमी अवलिया. पुस्तकांच्या गावावर लेख लिहिण्यासाठी आलोय म्हटल्यावर त्यांनी भरभरून माहिती दिली. ते म्हणाले, “गावात काही लोकांना वाचनाची गोडी लागलीय. पन्नाशी पार केलेली १५-२० तरी माणसं असतील ज्यांनी २०१७ पासून पुस्तक वाचनात सातत्य ठेवलंय. या लोकांनी प्रत्येकी १००हून अधिक पुस्तकं वाचली असतील. नारायण भिलारे, तुकाराम भिलारे ही त्यातली काही नावं. एवढंच नव्हे, पण माझ्या दुकानात काम करणारे मजूर, स्ट्रॉबेरी शेतात काम करणारे शेतमजूरसुद्धा आता पुस्तक वाचू लागलेत म्हणजे बघा.”

bhilar man

भिलारे यांनी स्वतः २०१७पासून ३०० हून अधिक पुस्तकं वाचलेली आहेत. एवढंच नव्हे, तर दोन वर्षांपूर्वी त्यांनी मुलीच्या लग्नात पाहुण्यांना तीन लाखांहून अधिक किंमतीची पुस्तकं भेट दिली होती.

त्यांच्याशी बोलत बोलतच पुस्तकांच्या गावाच्या ऑफिसमध्ये आलो. सरकारने पुस्तकांच्या समन्वयासाठी इथे लोकांची नेमणूक करण्यात आली आहे. इथे समन्वयक म्हणून काम करणाऱ्या राजेश जाधवांनी उपक्रमाची माहिती देणारी चित्रफीत दाखवली. त्यातून बरीच माहिती समोर आली. तीन-साडेतीन हजार लोकसंख्येच्या या गावात सुरुवातीच्या टप्प्यात पुस्तकं ठेवण्यासाठी २५ ठिकाणं निवडण्यात आली होती. गावकऱ्यांनी जागा उपलब्ध करून द्यायची आणि शासनाने पुस्तकांची सोय करून द्यायची या तत्वावर हा उपक्रम सुरू झाला.

पुस्तकाच्या गावाचं मॉडेल डेव्हलप होण्यासाठी राज्य शासनातर्फे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळ, राज्य मराठी विकास संस्था, विश्वकोश निर्मिती मंडळ आणि भाषा संचालनालय या चार संस्था काम करतात. राजेश जाधव यांच्यासोबत ग्रंथपाल उमा शिंदे आणि आणखी दोन सहकारी तिथे पूर्णवेळ काम करतात. कुणी पुस्तकं भेट दिली तर ती निवडून योग्य त्या दालनांत ठेवणं, त्याची व्यवस्थित नोंद ठेवणं, वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन करणं अशी कामं जाधव आणि शिंदे करतात. ऑफिसच्या इतर कामासोबतच गावातल्या महिलांना वाचनाचं महत्त्व समजावून सांगणं, त्यांना वाचण्यासाठी सोपी आणि चांगली पुस्तकं सुचवणं अशी कामंही शिंदे करतात. या महिलांच्या महिना-दोन महिन्यातून बैठकाही घेतात.

या प्रयत्नांतून आता पुस्तकांची घरं आणि पुस्तकं दोन्हीच्या संख्येत वाढ झालीय. ११ घरं, ११ लॉज, ६ सामाईक घरं आणि लॉज, ४ मंदिरं, २ शाळा आणि १ कार्यालय अशा एकूण ३५ ठिकाणी लोकांना पुस्तकं वाचता येतात. यामध्ये कथा, कादंबरी, चरित्र-आत्मचरित्र, विज्ञान, शिवाजी महाराजांवरील साहित्य, बालसाहित्य, सामाजिक चळवळीचं साहित्य, विनोदी साहित्य, स्त्रीसाहित्य, ललित साहित्य, दिवाळी अंक आणि मासिकं, शेतीविषयक साहित्य या आणि अशा प्रकारच्या २५ हून अधिक दालनांचा समावेश आहे. या दालनांच्या देखभाल-दुरुस्तीचं काम गावकरीच करतात.

कृषीकांचनच्या भेटीनंतर पुन्हा गावात फेरफटका मारायचं ठरवलं. ग्रामपंचायतीच्या ऑफिसच्या खाली काही माणसं गप्पा टाकत बसली होती. त्यांना पुस्तकांच्या गावाबद्दल विचारलं, तर त्यांचं म्हणणं होतं, आम्हाला वाचायला वेळ कुठे असतो आणि वेळ मिळालाच तरी वाचून करणार काय?

bhilar woman

जवळच सामाजिक चळवळीच्या पुस्तकाचं दालन होतं. या दालनासाठी ज्यांनी घर उपलब्ध करून दिलंय, त्या कुटुंबातील शारदा भिलारे रस्त्यातच भेटल्या. त्यांच्या घराच्या भिंतीवर काढलेलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र लक्ष वेधून घेत होतं. त्याखाली ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेशही लिहिलेला होता. गावातील महिलांना सोबत घेऊन मी सावित्रीबाई, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सुधा मूर्ती यांची पुस्तकं वाचली असल्याचं शारदाताईंनी अभिमानाने सांगितलं. घरी येणाऱ्या पाहुण्यांना आवर्जून पुस्तक दालनात घेऊन जात असल्याचं त्यांनी सांगितलं. इथे वाचकांचा प्रतिसाद कसा आहे, असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, “केवळ वाचन करण्यासाठी म्हणून येऊन राहणारे लोकही आहेत. हे लोक पुस्तकांच्या दालनातील घरात राहतात किंवा इतर ठिकाणी भाड्याने रूम घेतात आणि या दालनांमध्ये वाचनासाठी येतात.” शारदाताई आणि शशिकांत भिलारे यांच्याकडून वाचकांचा चांगला प्रतिसाद असल्याचं ऐकायला मिळालं. पण आमच्या भटकंतीत मात्र असे फारसे वाचक भेटले नाहीत, की तशा नोंदीही पुस्तकांच्या दालनांमध्ये आढळल्या नाहीत.

शारदाताईंच्या भेटीनंतर चहा-नाष्टा करण्यासाठी जवळचं हॉटेल शोधलं. एका टेबलावर सात-आठ जणांच्या गप्पांचा फड रंगला होता. पण त्यांच्या गप्पांचे विषय शेती-माती आणि राजकारण हेच होते. पुस्तकाचं गाव म्हणून मागील काही वर्षांत गावात काय काय बदललं, हे मला जाणून घ्यायचं होतं. म्हणून तिथे बसलेल्या रूपक भिलारेशी गप्पा सुरू केल्या. तो म्हणाला, “मागील ७-८ वर्षांत पर्यटनामुळे भिलारच्या अर्थव्यस्थेला चालना मिळाली आहे. स्ट्रॉबेरी उत्पादक गाव म्हणून भिलार आधी प्रसिद्ध होतंच, मात्र देशातील पुस्तकांचं पहिलं गाव म्हणून भिलारला जी प्रसिद्धी मिळाली त्यानेही अनेक पर्यटकांना भिलारमध्ये आणलं. वाढलेल्या पर्यटनामुळे भिलारमध्ये हॉटेलिंग आणि राहण्या-खाण्याच्या सोयीसुविधाही वाढल्या. लोकांना रोजगार मिळाला.” गावातील तरुण पोरं-पोरी वाचतात का, या प्रश्नावर मात्र त्याचं उत्तर नकारात्मक होतं. तरुण मुलं पोटापाण्याची सोय करण्यासाठी धडपडत असतात. त्यांना वाचायला कुठे वेळ मिळणार, असं त्याचं म्हणणं होतं.

हॉटेलमधल्या झणझणीत मिसळीवर ताव मारल्यानंतर पुन्हा गावात चक्कर टाकली. छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकाचं दालन बघण्यासाठी प्रशांत भिलारे यांच्या घरी गेलो. काँग्रेसचे जुने जाणते नेते देशभक्त भिकू भिलारे यांचं हे घर. शिवरायांच्या जीवनावरील काही नेहमीच्या कादंबऱ्या तिथं पहायला मिळाल्या. शिवकालीन इतिहास, गडकिल्ले यावरही काही थोडीफार पुस्तकं होती. जेमतेम पुस्तकं आणि तीही जुनीच. शिवरायांचा इतिहास समजून घेण्यासाठी कुणी नवखं इथे आलं तर त्याचा अपेक्षाभंग होऊ शकतो, असं वाटून गेलं.

त्यातल्या त्यात शाळा पातळीवर विद्यार्थ्यांना वाचनात गुंतवून ठेवण्यातही भिलार यशस्वी झालंय, असं म्हणून शकतो. गावातल्या शाळांमध्येही मुलांमध्ये वाचन रुजवण्यासाठी अनेक कार्यक्रम चालतात. इथल्या जिल्हा परिषद शाळेत आणि हिलरेंज नावाच्या खाजगी मराठी माध्यमाच्या शाळेत मुलांना वाचनासाठी प्रोत्साहित केलं जातं. शाळेतच पुस्तकांचं दालन असल्याने विद्यार्थी जमेल तशी पुस्तकं वाचतात. दोन वर्षांपूर्वी महाबळेश्वर तालुक्यातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चार वेगवेगळ्या गटांत निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत भिलारमधील जवळपास १० विद्यार्थ्यांनी यश मिळवलं. गावात स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकाचं एक दालन आहे. त्याठिकाणीही अलीकडे काही विद्यार्थी जाऊन बसत आहेत. अभ्यास करत आहेत.

शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सहली ही भिलार आणि एकुणातच वाचनाविषयी जागरूकता निर्माण करणारी महत्वाची गोष्ट आहे. विद्यार्थी येतात, सहलीचा भाग म्हणून पुस्तकं चाळतात आणि परत जातात. अर्थात, या सहलीही महाबळेश्वर आणि पाचगणीच्या ट्रिप्सना जोडून निघतात, हे वेगळं सांगायला नको.

पुस्तकाचं गाव तयार झाल्यानंतर गावातील शाळांमध्ये बालवाचनालय सुरू करून देण्यात आलं. त्यावेळी लहान मुलांसाठी जवळपास हजारहून अधिक पुस्तकं सहज उपलब्ध झाली. पुस्तक हाताळायला मिळाली की ती वाचण्याची इच्छाही मुलांमध्ये आपसूकच तयार झाली. शाळेत रोजच्या परिपाठाला पुस्तकाचं वाचन आम्ही घेतो. वर्षभर महामानवांची जयंती-पुण्यतिथी साजरी करत असताना त्यांच्याविषयीच्या पुस्तकांमधून माहिती दिली जाते. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांविषयी बोलण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिलं जातं. या सगळ्याचा परिणाम म्हणून मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण झालीय. दरवर्षी शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या तालुका आणि जिल्हास्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये भिलार गावचे विद्यार्थी नंबर मिळवतात हे या वाचन चळवळीचं यश आहे, असं इथल्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पुरुषोत्तम माने सांगतात.

bhilar resort

मात्र तरीही पुस्तक वाचणारे गावकरी आणि पर्यटक मोठ्या संख्येने तयार व्हावेत, वाचनसंस्कृती रुजावी हा हेतू असला नेमकेपणाने वास्तवात उतरताना दिसत नाही पुस्तकांचं गाव अशी ओळख गावाला मिळालेली असली तरी गाव हे आता पर्यटकांचं मुक्काम स्थान बनलं आहे. पाचगणी आणि महाबळेश्वर येथे फिरायला येणाऱ्या पर्यटकांना त्या ठिकाणच्या गर्दीमुळे नको नको होतं. अशा परिस्थितीत ते भिलारमधील लॉज/हॉटेल/रिसॉर्ट याठिकाणी राहायला प्राधान्य देतात. भिलारमध्ये प्रवेश करताना अशी मोठाली हॉटेल्स आणि घरं लक्ष वेधून घेतात. गावकऱ्यांच्या मते पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्धी मिळाल्यानंतर या ठिकाणी येणारे पर्यटकही वाढले. पण आता येणारे पर्यटक हे पुस्तकांसाठी कमी आणि फिरण्यासाठीच जास्त हे वास्तव आहे. काही हॉटेल्सच्या गर्दीत पुस्तकांची दालनं झाकोळली गेली आहेत हे बघताक्षणीच लक्षात येतं.

मागील तीन वर्षांत पुस्तकांच्या दालनात नवीन पुस्तकांची विशेष भर पडली नसल्याचंही काही दर्दी वाचक सांगतात. उपक्रम सुरू झाल्यापासून पुस्तकांचा आकडा १५ हजारांहून चाळीस हजारांवर गेला असला तरी बरीच पुस्तकं ही जुनी आणि कुणाकडून तरी भेट मिळालेली अशीच आहेत. पुस्तकांच्या दालनात वर्गीकरण करून पुस्तकं ठेवली गेलीत असंही पहायला मिळत नाही. सुरुवातीच्या टप्प्यात केलेलं वर्गीकरण अजूनही जसंच्या तसं पहायला मिळतं. दिवाळी अंकाच्या आणि मासिकांच्या दालनात तर अगदीच मोजके आणि जुनेच दिवाळी अंक पहायला मिळाले.

वेगवेगळ्या दालनात वाचकांसाठी ज्या नोंदवह्या आणि अभिप्राय वह्या ठेवल्या आहेत त्या २ ते ३ वर्षं झालं तरी पूर्णपणे भरलेल्या नाहीत. पहिल्या भेटीनंतर असलेलं अप्रूप वगळता विशेष अभिप्राय वाचायला मिळत नाहीत. ज्या गावकऱ्यांनी आपली घरं पुस्तकांच्या दालनासाठी खुली करून दिली आहेत त्यांच्या मते अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक दालनाला भेट देण्यासाठी येतात. त्यापैकीही काहीच जण काही वेळासाठी पुस्तकं चाळतात आणि निघून जातात.

२०१७-१८ साली जेवढे कार्यक्रम भिलारमध्ये झाले त्याच्या तुलनेत मागील तीन ते चार वर्षांतील कार्यक्रमांची संख्या बरीच कमी झाली आहे. कोरोना काळात या कार्यक्रमांना ब्रेक लागला. शिवाय काही अंशी राजकीय उदासीनतेमुळे पुस्तकांच्या गावाकडे दुर्लक्ष झाल्याचं गावातील जाणकार मंडळी सांगतात.

शासकीय आणि प्रशासकीय पातळीवरील उदासीनतेवरही गावातली काही मंडळी बोट ठेवतात. “वरिष्ठ पातळीवरील अधिकारी लोक वर्षभरात दोन-तीन कार्यक्रम घेण्यापलीकडे वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी काहीही करत नाहीत. गावातील लोकांचं इतकं सहकार्य मिळत असेल तर हा उपक्रम गांभीर्याने लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी शासनाची आहे,” असं शशिकांत भिलारे म्हणतात. भिलारचा आदर्श राज्यातील आणि देशांतील इतर गावांपुढे ठेवायचा असेल तर आणखी संघटित प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी गावातील पुस्तकांच्या दालनांसाठी वेळोवेळी चांगली पुस्तकं खरेदी करणं, लोकांमध्ये वाचनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी वन टू वन संपर्क करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी नोंदवलं.

सध्या महाराष्ट्रात पोंभुरले (सिंधुदुर्ग), नवेगाव बांध (नागपूर), वेरूळ (छत्रपती संभाजीनगर), अमळनेर (जळगाव), अंकलखोप (सांगली) या ठिकाणी भिलारच्या धरतीवर पुस्तकांचं गाव उभारण्याचा विचार सुरू आहे. कल्पना चांगली असली तरी नेमके आणि सातत्यपूर्ण प्रयत्न झाले नाहीत, तर तिथेही वाचन कमी आणि पर्यटन जास्त हेच भिलार मॉडेल तयार होणार का, असा प्रश्न भिलारमधून बाहेर पडताना पडला.

योगेश जगताप | 9561190500 | yogeshjagtap8819@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

सुरेश दीक्षित 18.02.25
सुंदर लेख..सरकारचा हा प्रयत्न चांगला आहे, पण त्याचे यश बर्‍याच गोष्टी वर अवलंबून आहे..आम्ही तिथे गेलो होतो, लोकांचे सहकार्य चांगले आहे...
See More

Select search criteria first for better results