
या पुस्तकाला २०२० साली बुकर पुरस्कार मिळाला. तेव्हा मी या लेखकाची एक मुलाखत वाचली होती. ‘This is the story of poverty, Thatcherism and addiction..’ असं त्यात म्हटलं होतं. मी पुस्तक वाचताना त्यातल्या Thatcherism चा कथानकात सतत शोध घेत होते. पुस्तकात ते पावलोपावली दिसतंच, पण अप्रत्यक्षपणे. त्याचा उघड उच्चार कुठेही केलेला नाही. लेखकाचा तो उद्देशही नाही. जगातल्या सर्वच मोठ्या शहरांमध्ये या ना त्या फरकाने माणसं अशा सामाजिक-राजकीय गुंतवड्यात अडकतात. शहरांच्या अंधार्या कोपर्यांमध्ये त्यांच्या कथा खितपत पडतात. आणि कधीतरी अशा पुस्तकांमधून जगापुढे येतात.
१९९० च्या दशकाची सुरुवात. स्कॉटलंडची राजधानी ग्लासगो. १५-१६ वर्षांचा एक मुलगा, शगी, कॉट-बेसिसवर एकटाच राहतोय. एका सुपरमार्केटच्या स्नॅक्स काऊंटरवर जेमतेम नोकरी करतोय. त्याच्या अवतीभोवती स्थानिक गरीब, नाहीतर स्थलांतरित माणसं. अभावग्रस्त जीवन. शगीला हेअरड्रेसर व्हायचंय..
कादंबरीच्या पहिल्या काही पानांमध्येच शगीच्या परिसराचं नेमकं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. तो रात्री जिथे झोपतो त्या जागेचं वर्णन अंगावर येतं. Something is not right - हा विचार आपलं मन कुरतडायला लागतो.
हेअरड्रेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल न होईल, पण आधी शगीला रोज येणार्या दिवसाला एकट्याने तोंड द्यायचंय. ही गोष्ट त्याच्या पाचवीलाच पुजलेली आहे- काय वाट्टेल ते करून रोज येणार्या दिवसाला तोंड देणं. असं का? कोण आहे हा शगी?
त्याची गोष्ट सांगण्यासाठी कादंबरी आपल्याला ११ वर्षं मागे नेते.
ग्लासगोच्या एका भागातल्या एका उंचच्या उंच इमारतीतलं सोळाव्या मजल्यावरचं एक घर. घरात आजी-आजोबा, मुलगी-जावई, तीन नातवंडं. या नातवंडांमधला सर्वात धाकटा- शगी. या वर्णनावरून जे छानशा कुटुंबाचं चित्र समोर उभं राहतं, त्यापेक्षा प्रत्यक्षातली परिस्थिती पार वेगळी असते. ते राहतायत ती इमारत म्हणजे सरकारने कष्टकर्यांसाठी बांधलेल्या एकसुरी, हताश, अंगावर येणार्या उंच काँक्रीट ठोकळ्यांपैकी एक. हे कष्टकरी म्हणजे मुख्यत्वे कोळसा खाण कामगार. पण ७० च्या दशकात भरभराट झालेला तो कोळसा उद्योग आता पार झोपलाय. माणसांच्या हातांना काम नाही. सगळीकडे रिकामपण, हतबलता, बेकारी, गरीबी आणि... व्यसनं.
शगीची आई- ॲग्नेस- हिला दारूचं व्यसन आहे. कारण तिचा नवरा, बिग शग, बाहेरख्याली आहे. हे तिचं दुसरं लग्न. बिग शगनेच तिला तरुण वयात नादाला लावलं. तिचं पहिलं लग्न मोडलं. बिग शग टॅक्सी चालवतो. ग्लासगोतले अनेक खाणकामगार आता टॅक्स्या चालवतात. जेमतेम कमावतात. हताशपणे जगतात. स्त्रियांची नोकरी करण्याची तयारी आहे, पण नोकर्या नाहीत. नोकर्या नाहीत, म्हणून हतबलता. हतबलतेतून व्यसनं. कोंबडी आधी की अंड आधी अशी परिस्थिती. ॲग्नेसला एकाकीपणाने घेरलंय. तिचे आई-वडील आता म्हातारे झालेत. ते तिला थोडाफार मानसिक आधार देतात. मुलांना रोज बर्यापैकी खाऊ-पिऊ घालतात. तिचं व्यसन एक दिवस तिचा घात करेल हे तिला सतत सांगत असतात..
हे पुस्तक म्हणजे ॲग्नेसच्या व्यसनाची, शगीच्या निरागस हतबलतेची, त्या कुटुंबाच्या अभावग्रस्ततेची, उपासमारीची, तरीही शगी आणि ॲग्नेसमधल्या नितळ नात्याची हेलपाटून टाकणारी गोष्ट आहे.
एरवी ॲग्नेस हुशार, चलाख, चारचौघींत उठून दिसणारी. तिला छानछोकीने राहण्याची आवड असते. मोठी दोन मुलं तिच्या आधीच्या लग्नातली. कॅथरीन आणि लीक. कॅथरीनने ठरवून टाकलंय, लग्न करायचं आणि इथून बाहेर पडायचं. लीकला चित्रकलेची आवड असते; फर्निचर डिझाइन करण्यात गती असते. पण आपल्याला ड्रॉइंग स्कूलला जायला मिळेल का याची त्याला शाश्वती नसते. कारण, घरची परिस्थिती, आईचं व्यसन. शगी पाच वर्षांचा असतो. आई हेच त्याचं विश्व. त्याला बाकी काही कळत नसतं.
बिग शग एक दिवस बायको आणि तीन मुलांना घेऊन त्या घरातून बाहेर पडतो. ग्लासगोच्याच दुसर्या एका कष्टकर्यांच्या वस्तीतल्या एका घरात सामान हलवतो. गावाच्या बाहेर रहायला आल्याने ॲग्नेसला तितक्या सहजतेने दारू मिळणार नाही, असा त्याचा उद्देश असतो. शिवाय तिथे राहिल्याने त्याला आपले बाहेरचे धंदेही बिनबोभाट सुरू ठेवता येणार असतात.
ती वस्ती आधीच्या घरापेक्षा, परिसरापेक्षाही हताश करून टाकणारी असते. त्याने ॲग्नेस अधिकच खचते. तिची दारू सुटत नाही, हे कारण देऊन बिग शग तिला सोडून जातो. लवकरच कॅथरीनही लग्न करून जाते. मागे उरतात ॲग्नेस, लीक आणि शगी. दर आठवड्याला मिळणार्या सरकारी मदतीवर त्यांची गुजराण सुरू होते.
या नव्या वस्तीत त्यांच्या आसपास सगळी कुटुंबं कमी-अधिक फरकाने अशीच असतात. बेकारी, गरीबी, व्यसनं यांत अडकलेली. वस्तीत एक शाळा असते. तिथे शगीचं नाव घातलं जातं. पण त्याचा सारा जीव आईपाशी असतो आणि आई सदासर्वकाळ दारूच्या नशेत असते. आईकडे लक्ष ठेवणं, आपल्या भुकेचा विचार न करता तिची काळजी घेणं, अतोनात दारू पिऊन तिला उलट्या होतात तेव्हा ते साफ करण्याची आधीपासून तयारी करणं... ते ७-८ वर्षांचं मूल अगदी आपलेपणाने आणि मन लावून हे सारं करत असतं. त्याला वाटत असतं, आपण आईची जितकी काळजी घेऊ तितकी ती लवकर बरी होईल, दारूपासून लांब जाईल.
हे सगळं वातावरण हळूहळू आपल्याला घेरायला लागतं. शगीची गोष्ट हेलपाटून टाकणारी म्हटतेय, शीर्षकात ’झाकोळ’ शब्द वापरलाय, त्यावरून या पुस्तकाच्या कथनाबद्दल काही अंदाज बांधाल तर तो कदाचित चुकीचा ठरेल. कारण पुस्तकाची भाषा, निवेदन अतिशय neutral आहे. त्यात गळेकाढू भाषा जराही नाही. वाचकांच्या हृदयाला हात घालणारे शब्द नाहीत. आर्तता, अपरिमित परिस्थिती दर्शवणारी विशेषणं-क्रियाविशेषणं नाहीत. उलट काही ठिकाणी नर्मविनोदच आहे. स्कॉटिश बोली भाषेमुळेही वेगळेपणा जाणवतो.

तरी पुस्तक वाचकांच्या डोक्यात-मनात घुसतं, घर करतं. ॲग्नेसचं व्यसन, अधिक व्यसन... आणि शगी तिच्या पाठीशी उभा असणं; ॲग्नेसला नशेत कपड्यांची देखील शुद्ध नसणं... आणि शगीने तिला सावरून घेणं; अनेक पुरुषांनी ॲग्नेसचा फायदा घेणं... पण शाळेतून घरी आल्या आल्या आई झोपली आहे की जागी आहे, तिच्या खुर्चीत बसली आहे हे शगीनं शोधणं, ती झोपलेली दिसली तर सुटकेचा निःश्वास टाकणं, तिचा हात हातात घेऊन कुरवाळत राहणं; हे असं सतत पुस्तकात येत राहतं; पण अगदी neutral पद्धतीने. ना खंत ना खेद अशा शांत सुरात.
तरीही काही ठिकाणी वाचकांना बेसावध गाठलं जातं. ते प्रसंग आपल्याला असे काही फटकावून काढतात की तिथून पुढे वाचणंही मुश्किल होतं, पण पुस्तक बाजूला ठेवून देणंही शक्य नसतं. त्यातलाच एक प्रसंग- एका न्यू इयर पार्टीला ॲग्नेस अशीच दारूच्या नशेत कुणा टॅक्सीवाल्याबरोबर निघून जाते. शगीला खूप भूक लागलेली असते. त्याने बराच वेळ तळमळत काढलेला असतो. शेवटी तो नाईलाजाने आईच्या दारूच्या एका कॅनमधली थोडी दारू पितो. हा क्षण इ-त-का अनपेक्षितपणे आणि त्याच शांत लयीत येतो, की वाचताना आपण कोलमडूनच जातो. पण आपल्याला सावरण्याचा जराही अवधी दिला जात नाही, कारण शगीला आपल्या आईचा शोध घ्यायचा असतो. ती कुठे गेलीय, कधी येणारे, त्याला काहीच माहिती नसतं. त्यानंतरचे त्याचे शोधाशोधीचे शिस्तबद्ध प्रयत्न, अंधारात एकट्याने बाहेर पडणं, स्वतःचा sexual abuse स्वीकारून, सहन करून अखेर आईला शोधून काढणं, आणि तिला अर्धनग्न अवस्थेत घरी परत आणणं- हा सर्व घटनाक्रम आणि पुस्तकातलं त्याचं ’झालं हे असं झालं’ या सुरातलं वर्णन, सगळंच खूप तणावपूर्ण आहे.
या सगळ्यात ॲग्नेस मध्येच AA ची देखील (अल्कॉहॉलिक्स ॲनॉनिमस) मदत घेते. मनात अनेक शंका-कुशंका असूनही दारूपासून दूर राहण्याचा निश्चय करते. तिला एका पेट्रोल पंपाच्या कन्व्हिनियन्स स्टोअरमध्ये रात्रीची नोकरी मिळते. तिथे युजीन या टॅक्सी ड्रायव्हरशी तिची ओळख होते. दोघं date करायला लागतात. शगी आणि लीकशीही युजीनची ओळख होते. शगीला दिसतं, की आई दारूपासून दूर आहे आणि या माणसासोबत असली की ती खूश असते. त्याला तेवढं बास असतं.
ॲग्नेस चक्क एक वर्ष दारूपासून दूर राहते. पण युजीनच्या आग्रहाखातर एक दिवस पुन्हा ती हॉटेलमध्ये दारू काय पिते, तिचं व्यसन तिला पुन्हा जखडतं.
दरम्यान ॲग्नेसच्या आई-वडिलांचा वयोमानानुसार मृत्यू होतो. ती व्यसनाच्या गर्तेत आणखीनच खचते. आत्महत्येचा प्रयत्न करते. लीक आणि शगी कसंबसं तिला वाचवतात. लीक शगीला समजावतो, की आई यातून बाहेर पडणं कठीण आहे, पण आपण बाहेर पडू शकतो.
एक दिवस काहीतरी वादावादी होऊन ॲग्नेसच लीकला घराबाहेर काढते. शगीला मात्र आईला एकटीला सोडून जाण्याची कल्पनाही सहन होत नाही. त्याची ही आईप्रति समर्पणाची भावना, अकाली प्रौढ होणं, त्यातच कधीतरी स्वतःच्या समलैंगिकतेची जाणीव होणं, शाळेतल्या मुलांचे टोमणे, खोचक बोलणं, सगळं तो शांतपणे सहन करतो. एक दिवस आई बरी होईल या आशेवर प्रत्येक दिवसाला जमेल तसं तोंड देतो.
कधीतरी ॲग्नेस तिरीमिरीत घर बदलते. ग्लासगोच्या मध्यभागी एका सरकारी हाऊसिंग स्कीममधलं घर शोधते. दोघं तिथे रहायला लागतात. शगी तिथल्या शाळेत जायला लागतो. तिथे एका मुलीशी त्याची ओळख होते. इथे पुन्हा एकदा एका प्रसंगात वाचकांना बेसावध गाठलं जातं. त्या मुलीच्या घरीही हीच परिस्थिती असते- आईचं व्यसन, वडील परागंदा. शगी आणि ती मुलगी एकमेकांना आपापली परिस्थिती सांगतात... दोन शाळकरी मुलं आपल्या आवडत्या व्हिडिओ गेमबद्दल एकमेकांना जसं सांगतील तितक्या सहजतेने! ते वाचताना अंगावर काटा येतो.
पुस्तकात ॲग्नेसच्या मृत्यूचा प्रसंगही अगदी शांतपणे, धीमेपणाने कथन केला आहे.
शगीचं आयुष्य एक नकोसं वळण घेतं, आईला मागे सोडून पुढे निघणं त्याच्यासाठी अपरिहार्य असतं. ते त्याला अतिशय जड जातं, पण ते करणं तर भागच असतं. हा कोवळा मुलगा आता एकटा कसा आयुष्य घालवणार, हा प्रश्नच तिथे अप्रस्तुत असतो. कारण त्याने वयाच्या पाचव्या वर्षापासून एकट्यानेच तर आयुष्य कंठलेलं असतं.
पुस्तकात लेखकाचं स्वतःचं बालपणच दर्शवलेलं आहे. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर लेखकाने आधी हे जाहीरपणे स्वीकारलेलं नव्हतं. मात्र पुढे पुढे त्याच्या मुलाखतींमधून त्याने त्याची प्रांजळ कबुली दिली आहे. गेली वीस वर्षं तो अमेरिकेत एक यशस्वी फॅशन डिझायनर म्हणून काम करतोय. आपल्या पार्टनरसोबत राहतोय. पण ‘ग्लासगो हेच माझं पहिलं प्रेम आहे, तिथे गेलं की घरी गेल्यासारखं वाटतं,’ असं तो सांगतो.
या पुस्तकाला २०२० साली बुकर पुरस्कार मिळाला. तेव्हा मी या लेखकाची एक मुलाखत वाचली होती. ‘This is the story of poverty, Thatcherism and addiction..’ असं त्यात म्हटलं होतं. मी पुस्तक वाचताना त्यातल्या Thatcherism चा कथानकात सतत शोध घेत होते. पुस्तकात ते पावलोपावली दिसतंच, पण अप्रत्यक्षपणे. त्याचा उघड उच्चार कुठेही केलेला नाही. लेखकाचा तो उद्देशही नाही.
जगातल्या सर्वच मोठ्या शहरांमध्ये या ना त्या फरकाने माणसं अशा सामाजिक-राजकीय गुंतवड्यात अडकतात. शहरांच्या अंधार्या कोपर्यांमध्ये त्यांच्या कथा खितपत पडतात. आणि कधीतरी अशा पुस्तकांमधून जगापुढे येतात.
प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com
प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.