आम्ही कोण?
आडवा छेद 

जेव्हा दीपक कुमार मुहम्मद दीपक बनतो..

  • मृदगंधा दीक्षित
  • 13.02.26
  • वाचनवेळ 6 मि.
muhommad deepak

मुसलमानांकडून वस्तू-भाजी-फुलं यांची खरेदी करायची नाही, त्यांच्या हॉटेलात जेवायचं नाही, त्यांना आपल्या सोसायट्यांमध्ये घरं द्यायची नाहीत इथपर्यंत अनेक गोष्टी अलीकडे सर्रास बोलल्या, लिहिल्या जाताहेत. याहूनही क्रूर भाषेत हेट स्पीच दिली जाताहेत, मॉब लिंचिंग होत आली आहेत. अशा वातावरणात सर्वसामान्य सहिष्णू हिंदू माणसाने काय करावं असा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या त्या प्रश्नाचं उत्तर २६ जानेवारी २०२६ला उत्तराखंडच्या दीपक कुमार यांनी दिलं आहे

नेमकं काय घडलं?

उत्तराखंडमधील कोटद्वारमधील दुकानांनी गजबजलेला पटेल मार्ग. तिथे वकील अहमद आणि त्यांचा मुलगा शोएब अहमद यांचं ‘बाबा स्कूल ड्रेस अँड मॅचिंग सेंटर’ नावाचं दुकान आहे. अहमद हे ७० वर्षांचे गृहस्थ. गेल्या ३०-३५ वर्षांपासून ते तिथे शांततेने आपला व्यवसाय करताहेत. त्यांच्या आजूबाजूला सगळे हिंदू दुकानदार आहेत. पण त्यात काही वेगळं-वावगं आहे, असं आजवर कुणाला वाटलं नव्हतं.

पण २६ जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताकाच्या दिवशी, स्वतःला बजरंग दलाचे कार्यकर्ते म्हणवणारे काही तरुण अहमद यांच्या दुकानात आले. ‘तुम्ही मुस्लिम अन दुकानाला बाबा नाव कसं दिलं? बाबा हे नाव हिंदू आहे, तुम्ही लोकांची फसवणूक करत आहात. नाव आताच्या आता बदला, नाहीतर दुकान बंद करा,’ असा एकच गलका त्यांनी सुरू केला.

हेही वाचा - सलोख्याची वीण उसवतेय..

वातावरण तंग झालं होतं. त्याला हिंसक वळण लागण्याची चिन्हं होती. अहमद बाप-लेक साहजिकच घाबरून गेले होते. आजूबाजूचे काही लोक दुकानं बंद करून तिथून पसार झाले, उरलेले गपगुमान उभे राहून तमाशा पाहत होते.

अहमद यांच्या दुकानाच्या समोरच जिम चालवणारे दीपक कुमार हा दंगा ऐकून बाहेर आले. मुस्लिम बाप-लेकाला धमकावणाऱ्या तरुणांना त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. ‘यांनी आपल्या दुकानाचं काय नाव ठेवावं हे ठरवणारे तुम्ही कोण? हे दुकान ३० वर्षांपासून इथे आहे. तुम्ही म्हणता म्हणून त्यांनी नाव का बदलावं?’ यावर जमावातल्या एकाने दीपक यांना दरडावून विचारलं, ‘अरे, तू हिंदू आहेस ना? त्यांची बाजू काय घेतोस? नाव काय तुझं?’ तेव्हा दीपकने ताडकन उत्तर दिलं, ‘माझं नाव मुहम्मद दीपक आहे! बोला, काय करायचंय तुम्हाला?’

दीपक यांची ही प्रतिक्रिया जमावासाठी अनपेक्षित होती. त्यामुळे क्षणभर तेही लोक थबकले. दीपक यांच्या हस्तक्षेपाने हिंसा टळली. पुढे पोलीस आले आणि परिस्थिती तेवढ्यापुरती का होईना निवळली.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांनी धार्मिक सलोखा राखण्यासाठी आणि इंग्रजांच्या विभाजनाच्या नीतीला उत्तर देण्यासाठी अशी नावं धारण केल्याची उदाहरणं आहेत. शहीद उधम सिंह यांनी १९४० मध्ये लंडनच्या कोर्टात आपलं नाव ‘राम मुहम्मद सिंह आझाद’ असं सांगितलं होतं. तुम्ही धर्माच्या नावाने माणसांमध्ये फूट पाडणार असाल तर मी दोन्ही धर्मांच्या बाजूने उभा आहे, असंच दीपक यांनाही म्हणायचं होतं.

यंत्रणेने काय केलं?

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. देशभरातून लोकांनी दीपक यांचं कौतुक केलं. काही इंग्रजी दैनिकांमध्येही बातम्या छापून आल्या. पण हे झालं मीडियामध्ये. प्रत्यक्षात काय घडलं? मुस्लिमद्वेष पसरवणाऱ्या समाजविघातक घटकांना आळा घालण्याऐवजी त्यांनी दीपक कुमार यांच्यावरच दबाव टाकायला सुरुवात केली. दीपक यांनी तसा आरोपच केला आहे.

हेही वाचा - क्षुल्लक कारणांवरून माणसं संतापतायत का?

या प्रकरणात एफआयआर दाखल झाली, पण त्यातही बरेच गोंधळ आहेत. प्रत्यक्षात जे घडलं आणि पोलिसांनी एफआयआरमध्ये जे नोंदवलं त्यात जमीन-अस्मानाचा फरक असल्याचं दीपक यांचं म्हणणं आहे. दीपक यांनी मध्ये पडून अनुचित घटना टाळण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्यक्षात त्यांनाच ‘विवाद निर्माण करणारा’ ठरवण्याचा प्रयत्न केला गेलाय. दीपक यांनी जमावातील काही लोकांची नावं स्पष्टपणे लेखी तक्रारीत देऊनही पोलिसांनी गुन्हा मात्र अज्ञात लोकांविरुद्ध नोंदवला आहे.

धैर्य आणि सहिष्णूतेची किंमत

धैर्याची किंमत किती मोठी असते, याचा प्रत्यय दीपक यांना काही दिवसातच आला. दीपक यांच्या जिममध्ये दीडशेहून अधिक लोक व्यायामासाठी यायचे. पण या घटनेनंतर स्थानिक स्तरावर दीपक यांच्या विरोधात झालेल्या अपप्रचारामुळे ही संख्या आता फक्त पंधरावर आलीय.

दीपक यांना ‘अँटी-हिंदू’, ‘मुस्लिमांचा दलाल’ अशी विशेषणं लावून सोशल मीडियावरून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं जात आहे. दीपक यांच्यासारख्या एका मध्यमवर्गीय व्यक्तीसाठी हा मोठा आर्थिक फटका आहे. पण हे नुकसान सोसूनही दीपक त्यांच्या मतावर ठाम आहेत. ‘माझी जिम रिकामी झाली तरी चालेल, पण एका निष्पाप माणसावर होणारा अन्याय मी उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. मला पोटाची काळजी नाही, माझ्या ईमानाची काळजी आहे,’ असं वक्तव्य दीपक यांनी एका मुलाखतीत केलं आहे.

या पार्श्वभूमीवर ‘आपल्याला दुकान मालकाचा धर्म समजेल अशा पद्धतीने ते दुकानांची नावं का देत नाहीत? जर ते काही चुकीचं करत नाहीयेत, तर हिंदू नावांच्या मागे लपायची त्यांना काय गरज आहे?’ असं वक्तव्य करून भाजपचे स्थानिक नेते सौरभ नौटीयाल यांनी दीपक यांच्यावरच आगीत तेल ओतल्याचे आरोप केले आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी दीपक यांच्या जिमला भेट दिली आणि स्वतः त्यांच्या जिमची मेंबरशिप घेतली. दीपक यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या १५ ज्येष्ठ वकिलांनीही त्यांच्या जिमची मेंबरशिप घेतली आहे. त्याही पुढे जाऊन त्यांच्यावरील कायदेशीर कारवायांविरुद्ध मोफत कायदेशीर मदत देण्याचं आश्वासनही दिलं आहे.

हेही वाचा - आपली संतप्त सार्वजनिक संस्कृती

‘मी धर्मांतर केलेलं नाही. मी स्वतः सश्रद्ध हिंदू आहे. हनुमानभक्त आहे. पण माझा राम आणि माझा हनुमान मला कोणाचं घर जाळायला किंवा कोणाच्या पोटावर पाय द्यायला शिकवत नाही. जर काही तरुण हिंदू धर्माच्या नावावर विनाकारण एखाद्या वृद्ध माणसाला धमकावत असतील, तर तेच हिंदू धर्माचा अपमान करत आहेत, मी नव्हे’, असं दीपक प्रत्येक मुलाखतीत सांगत आहे.

त्यादिवशी दीपक यांच्यासोबत त्यांचे मित्र विजय रावत हेसुद्धा होते. ‘आमच्या पहाडी संस्कृतीत आम्ही कधीच धर्मावरून भेदभाव केलेला नाही. वकील अहमद आमचे काका आहेत. ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांच्या दुकानाचं नाव बदलायला सांगणारे हे लोक आमच्या संस्कृतीचा भाग नाहीत. ते नफरत पसरवणारे लोक आहेत’, असं विजय यांचं म्हणणं आहे.

अहमद यांनी दीपकविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते म्हणतात, ‘त्या दिवशी दीपक नसते तर त्या लोकांनी माझं दुकान जाळलं असतं किंवा मला मारलं असतं. तो मुलगा माझ्यासाठी देवासारखा धावून आला. लोक त्याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण माझ्यासाठी तो माझा मुलगाच आहे."

सामान्य माणसाने आवाज उठवणं गरजेचं

सामान्य माणूस गप्प बसला तर द्वेष पसरवणाऱ्या टोळीचं फावतं. ते संख्येने कमी असूनही बहुसंख्याकांच्या वतीने बोलत-वागत असल्याप्रमाणे खुलेआम वावरतात. तुम्ही आमचे प्रतिनिधी नाही, हे सामान्य माणसांनी त्यांना ठणकावून सांगावं लागतं. तसं केलं तर हिंसक जमावही मागे हटू शकतो. उत्तराखंडमध्येच काही महिन्यांपूर्वी शैला नेगी यांनी एका केसमध्ये हे करून दाखवलं. पुण्यात मुकुंदनगरच्या दर्गा अतिक्रमण प्रकरणात हाच अनुभव आला आहे.

संविधानाने दिलेल्या अधिकारांचं रक्षण करण्याची जबाबदारी फक्त न्यायालयं, यंत्रणा यांची नाही, तर ती सामान्य नागरिकांचीही आहे, हे अशा घटनेतून वारंवार सिद्ध होत असतं.  

मृदगंधा दीक्षित | mrudgandha.uniqueportal@gmail.com

मृदगंधा दीक्षित युनिक फीचर्समध्ये संपादकीय विभागात कार्यरत असून त्यांना कथा-कादंबरी-कविता लिहिण्यातही रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results