नोकरी आणि रोजगाराच्या शोधात स्वतःचं गाव सोडून इतर जिल्ह्यात, राज्यात जाणारे कोट्यवधी लोक आपल्या देशात आहेत. आहे त्या ठिकाणी पोटापाण्याची सोय करण्यासाठी पुरेशी संधी नसल्यामुळे किंवा अनुकूल वातावरण नसल्यामुळे हे स्थलांतर वर्षानुवर्षं होत आलेलं आहे. शिवाय बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, छत्तीसगड या राज्यांतून कामाच्या शोधात महाराष्ट्रात आलेले लोक भरपूर आहेत. बरीच वर्षं महाराष्ट्रात राहणाऱ्या अशाच दोघांशी दिवाळीच्या निमित्त केलेला हा संवाद.
१
पप्पू महातो हे बिहारच्या मुझफ्फरपूर मधील बसंतपूर गावचे रहिवासी. त्यांच्या कुटुंबातील पुरुष मंडळी कामाच्या शोधात कायम घर सोडून दूर राहिलेली. गावी ३ एकर शेती. त्यात गहू, बटाटा, कांदा ही पिकं घेतली जातात. पप्पू यांचे आजोबा आणि वडील कोलकात्यामध्ये जाऊन हातगाडीवर पाण्याचे माठ विकायचे. वडील पहिले मुंबईत आणि नंतर पुण्यात स्थलांतरित झाले. माठाचं काम सिझनल असायचं. पुन्हा त्याच्या जोडीला त्यांनी नर्सरीचं काम सुरु केलं. छोटी झाडं, शोभेची झाडं, कुंड्या विकू लागले. पप्पू महातो १९९६ मध्ये पहिल्यांदा पुण्यात आले. तेव्हापासून ते इथलेच झाले. सुरुवातीला त्यांनी वडिलांना जमेल ती मदत केली. त्यानंतर वडील गावी स्थायिक झाले आणि पप्पू महातो पुण्यात. २००१ साली पप्पू भाऊंचं लग्न झालं. लग्नानंतर बायको गावाकडेच. वर्षातून ३-४ वेळा गावाला जाणं होईल तेवढीच काय ती भेटगाठ. दरम्यानच्या काळात पप्पू भाऊंनी पुण्यात व्यवस्थित जम बसवला. आधी भांडारकर रस्ता आणि नंतर पौड रस्त्याला त्यांनी नर्सरीचं दुकान उभं केलं. दुकानाच्या व्यापाशिवाय ते नशामुक्तीच्या कामातही सक्रिय आहेत. मोकळ्या वेळेत ते हे काम मनापासून करतात.
२०१५ पासून बायको आणि मुलं पप्पू भाऊंसोबत पुण्यात राहू लागली. मुलांचं उच्च शिक्षण पुण्यातच झालं. एक मुलगा त्यांना नर्सरी व्यवसायात मदत करतोय. मुलगी खासगी कंपनीत जॉब करते. बायकोसुद्धा एका दुकानात कामाला आहे. एकूण काय तर महातो कुटुंब आता पुण्यात स्थिरस्थावर झालंय. पुण्यातच एखादं घर घेण्याचा त्यांचा विचार आता सुरूय.
मागील ३० वर्षांच्या प्रवासाची आठवण महातो सांगतात, "महाराष्ट्राची संस्कृती मला आवडली. इथल्या लोकांची मदत करण्याची भावना, एकमेकांना साथ देणं यामुळे मला पुण्यात काम करण्यात समाधान मिळालं. त्यामुळेच माझ्या कुटुंबियांनाही मी पुण्यात आणलं. माझी मुलं मराठी शाळेत शिकली, ती व्यवस्थित मराठी बोलतात. त्यांचा व्यवहार चांगला आहे. या सगळ्यामध्ये मला महाराष्ट्रातील संतांचा, समाजसुधारकांचा विचार महत्त्वाचा वाटतो. इथले सण-उत्सव-परंपरा आणि सामाजिक बांधिलकी माझ्यासारख्या परक्या माणसाला खूप आपलेपणा देऊन गेलेत."
पप्पू भाऊंच्या मागील ३० वर्षांतील जवळपास वीसहून अधिक दिवाळी पुण्यातच साजऱ्या झाल्यात. दिवाळीमध्ये नवीन कपडे घेणं, लक्ष्मीपूजन करणं, रामाच्या प्रतिमेचं पूजन करणं या गोष्टी ते आवर्जून करतात. प्रतिमांसमोर दिवा लावला जातो. ते कुशवाह समाजातले असल्याने शेतीविषयीची बांधिलकी त्यांच्यात आहे. महातो यांचं गावाकडे कपड्याचं दुकान आहे. त्यांनी ते नातेवाईकांना चालवायला दिलंय. त्यांच्या गावाकडेही दिवाळी उत्साहात साजरी केली जाते. दिवाळीच्या सणानंतर येणारा छटपूजा उत्सव हा पप्पू महातो यांच्यासाठी विशेष महत्त्वाचा. ते सांगतात त्यानुसार पुण्यात वास्तव्य करणारे हजारो बिहारी बांधव भुगावच्या पुढे असलेल्या नदीकिनारी एकत्र जमतात आणि सूर्य आणि नदीपूजनाचा सोहळा छटच्या काळात पार पाडतात. दिवाळीनंतरच्या पौर्णिमेला चार दिवस हा उत्सव चालतो. सूर्य हा एकमेव दिसणारा देव असून सूर्योदय आणि सूर्यास्त या कालावधीत त्याची पूजा केली जाते.
महातो आता पुणेकर झालेत असं समजायला हरकत नाही. पुण्यातील गणेशोत्सव, दुर्गोत्सव, होळी, ईद, नाताळ या सणांमध्येही ते सहभागी होतात. पोटापाण्याच्या शोधात गाव सोडून हजारो किलोमीटर दूर आलेल्या पप्पू महातो आणि कुटुंबियांना पुणे शहर, इथले सण आणि संस्कृती त्यांची वाटते.
२
रिंकू गुज्जर हा अवघ्या २१ वर्षांचा तरुण. चार वर्षांपूर्वी तो राजस्थानहून पुण्यात आला. त्याचं गाव चंबळच्या खोऱ्यातलं धौलपूर. शिक्षण बारावी पास. गावी वडील शेती करतात तर आई एका शाळेत स्वयंपाकाचं काम करते. लहान भाऊ आणि बहीण शिक्षण घेतायत. पुण्यात त्याचा चुलतभाऊ आणि तो दोघे मिळून खोली घेऊन राहतात. दोघेही आधी रिकूंच्या मामाकडे काम करायचे, आता स्वतः व्यवसाय करतात. त्यांचा व्यवसाय आहे हातगाडीवर भाजी आणि फळं विकायचा. लॉकडाऊन काळात घरची परिस्थिती बेताची झाली आणि रिंकूला शिक्षण सोडून कामाच्या शोधात घर सोडावं लागलं.
रिंकूचा दिवस सकाळी पाच वाजता सुरू होतो. सकाळी टेम्पो घेऊन तो आणि त्याचा भाऊ मार्केटयार्डमध्ये भाजी, फळं आणायला जातात. कोथरूड आणि आसपासच्या परिसरात दिवसभर हातगाडीवरून ते भाजीपाला आणि फळं विकतात. सुरुवातीला या कामातून त्यांना आठ हजार रुपये मिळायचे, आता जवळपास वीस हजार मिळतात. या पैशांसाठी तो ओव्हरटाईमही करतो. म्हणजे काय तर फळांचा गाडा रात्री १० पर्यंत चालवायचा. त्याने आता स्वतःला पुण्यात सेट केलय. कधीकधी तो सिझनल वस्तू विक्रीही करतो. दिवाळीच्या वेळेस त्याच्याकडे लाह्या-बत्तासे विक्रीला असतात. रिंकू हा कायम पुण्यात नसतो. इकडे ३-४ महिने काम करतो, पुन्हा गावाकडे दीड-दोन महिने जाऊन येतो. घरच्यांसोबत रहायची खूप इच्छा असली तरी तिकडे पैशा-पाण्याचं गणित जुळत नसल्याने तो पुण्यात माघारी येतो.
रिंकूने दोन महिन्यांपूर्वीच लग्न केलं. बायको गावाकडेच. इथं कुणाला आणायचं म्हटलं तर खर्च वाढणार या भीतीने तो आणत नाही. तो जसा पुण्यात आलाय तशी प्रत्येक वर्षीची त्याची दिवाळी पुण्यातच साजरी झाली आहे. दिवाळीला लागणारे कपडे तो आधीच गावावरून येताना घेऊन येतो. पुण्यात सगळं महाग आहे असं म्हणतो. रिंकूच्या गावातच फटाके बनवण्याचा कारखाना आहे. तिकडे फटाके स्वस्त मिळतात असं तो सांगत होता. इथं मात्र दोनच पाकीट फटाके वाजवतो, तेही महागच मिळतात असं त्याचं म्हणणं. गावाकडे कमीत कमी गरजांत आणि खर्चात जगायची सवय लागलेल्या रिंकुला शहरात स्वतःसाठी वेगळं जग तयार करावं लागलं आहे. केलेल्या कमाईतले दहा ते बारा हजार रुपये तो गावाकडे पाठवतो. गावाकडे दिवाळी साजरी करताना रिंकू मित्रांसोबत मस्त फिरायला जायचा, वाढत्या जबाबदारीमुळे त्याचं हे फिरणं थांबलं. दिवाळीच्या दिवशी घरात लक्ष्मीपूजन करणं, नवीन कपडे घालून शहरात फेरफटका मारणं, एखाद्या मंदिरात थोडा वेळ घालवणं हे काम रिंकू करतो.
कामाच्या शोधात घर आणि कुटुंब सोडून परराज्यात यावं लागलेली ही दोन प्रातिनिधिक उदाहरणं. तुमच्या आसपासही अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सापडतील. त्यांची दिवाळी पाहून तुम्हाला काय वाटतं? गाव सोडून दुसऱ्या राज्यात जाऊन राहणं ही कल्पना तुम्हाला कशी वाटते?
