आम्ही कोण?
आडवा छेद 

ट्रंपनी ‘गाझवलेली’ शांतता कुठाय ?

  • निळू दामले
  • 10.06.26
  • वाचनवेळ 4 मि.
trump on gaza

डोनल्ड ट्रंप भाषण करतात, जग डोलतं, पुढे काही होत नाही. युक्रेन युद्ध थांबवलं म्हणाले, युद्ध सुरूच आहे. ट्रंप नवं भाषण करतात, पुन्हा जग डोलतं, काहीही होत नाही. गाझा युद्ध स्थगितीचं उदाहरण घ्या.

२५ जानेवारी २०२६ रोजी डोनल्ड ट्रंप यांनी गाझा युद्ध स्थगित झाल्याची घोषणा गेली. ठरलं असं, की युद्ध थांबल्यावर हमास शस्त्रं टाकेल; इस्रायलची सेना सुरवातीला ५३ टक्के गाझामधून सैन्य मागे घेऊन पूर्ण माघारीची पावलं उचलेल; एक कारभारी मंडळ स्थापन होईल; हे मंडळ गाझाच्या भविष्याची आखणी करेल; एक शांतता मंडळ स्थापन होईल, ते गाझाचा विकास करेल. यथावकाश इस्रायल आणि पॅलेस्टाईन असे दोन देश स्थापन करण्याचा विचार केला जाईल.

शांतता मंडळाला (पीस बोर्ड) युनायटेड नेशन्सने आशिर्वाद दिला खरा, पण हे मंडळ स्थापन केलं डोनल्ड ट्रंप यांनी. ट्रंप यांचे जावई कुश्नर, ट्रंप यांचे बिझनेस पार्टनर स्टीव विटकॉफ, परराष्ट्रमंत्री रुबियो इत्यादी मंडळी या बोर्डात होती. १९ फेब्रुवारी रोजी ट्रंपनी व्हाईट हाऊसमध्ये शांतता मंडळाची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी जाहीर केलं, की गाझाचा पुनर्विकास करण्यासाठी ७० अब्ज डॉलर्सची योजना असेल आणि सुरुवातीला श्रीमंत अरब देश या विकास फंडाला १७ अब्ज डॉलर्स देतील. 

हेही वाचा - ट्रंप यांच्या 'धमकी' फॉर्म्युल्याने नेमकं काय साधलं?

ट्रंप यांनी असंही जाहीर केलं, की या विकास मंडळाचे सदस्य होण्यासाठी देशांना किंवा व्यक्तींना प्रत्येकी १ अब्ज डॉलरची फी द्यावी लागेल. गणित असं, की ४०-५० देश मिळून ५० अब्ज डॉलर्स देतील. त्यात अमेरिका आणि अरब देश भर घालून ७० अब्जाचा आकडा गाठतील.

हे आकडे आले कुठून? ट्रंपनी कोणाशी चर्चा केली होती? कोणाशीही नाही. अरब देशाचे प्रमुख म्हणाले, की त्यांच्याशी सल्लामसलत न करता ट्रंपनी वरील आकडे जाहीर केले आहेत. मुळात ७० अब्जांचा आकडा कुठून आला तेही कळत नाही. ट्रंप नुसतेच बोलत सुटले होते. व्हाईट हाऊसमध्ये शांतता मंडळाची बैठक झाली आणि काही दिवसांत अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केले. तसंच इस्रायलने गाझावरही हल्ले सुरू केले. 

शांतता मंडळाचं सदस्यत्व कुठल्या कुठल्या देशांनी स्वीकारलं? किती देशांनी पैसे दिले? अमेरिकन सरकार, व्हाईट हाऊस, डोनल्ड ट्रंप कोणतीही माहिती देत नाहीत. युरोपातले देश, चीन, रशिया, जपान-कोरिया-ऑस्ट्रेलिया यातला कोणताही देश ट्रंप यांच्या शांतता मंडळात गेला नाही, त्यांनी मंडळाला पैसेही दिले नाहीत.

इजिप्त, तुर्किये, सौदी, कतार, अमिराती इत्यादी देश म्हणत होते, की गाझात शांतता स्थापन झाल्यानंतरच ते पैसे घालायला तयार होतील. गाझामध्ये शांतता होतच नव्हती. कारण युद्धस्थगिती करार झाल्यादिवसापासून इस्रायलने गाझावर हल्ले सुरू केले. स्थगिती करारानुसार हमासने शस्त्रं खाली ठेवायची होती आणि राज्यकारभारात सामिल व्हायचं होतं. पण हमासचं म्हणणं होतं, की इस्रायल एका बाजूने ठोकाठोकी करत राहणार असेल तर हमासने तरी शस्त्रं खाली का ठेवायची? 

हेही वाचा - गाझा शांती प्रस्ताव: ट्रंप यांची नवी पुडी

परिणाम असा, की शांतता मंडळाकडे एक खडकूही नाहीये, १७ अब्ज आणि ७० अब्ज वगैरेचा प्रश्नच येत नाही. मुळात शांतता मंडळही स्थापन झालेलं नाही. ६ महिने होऊन गेले, ‘गाझा विकास’मधला ‘वि’सुद्धा कागदावर उमटलेला नाही. बल्गेरियाचे मुत्सद्दी निकोलाय म्लादेनोव यांना शांतता मंडळाचं प्रतिनिधित्व करायला सांगण्यात आलं. युनायटेड नेशन्सच्या संबंधित कमिटीने म्लादेनोव बोलावलं आणि गाझाचा विकास कुठवर आलाय याची विचारणा केली. म्लादेनोव काय सांगणार?

युद्ध एकतर्फी होतं. इस्रायलचं आधुनिक बलाढ्य सैन्य हमासच्या अगदी अशक्त सैन्याला कुटून काढत होतं. तोफ विरुद्ध पिस्तूल अशी लढाई होती. इस्रायलला युद्ध थांबवायचं नव्हतं. जगाच्या आणि अमेरिकेच्या दबावाखाली इस्रायलने युद्ध थांबवलं होतं. युद्ध थांबलं तेव्हा गाझाच्या ५३ टक्के जमिनीवर इस्रायलचं सैन्य पसरलेलं होतं. स्थगितीला सहा महिने झाले, त्या काळात इस्रायलने ६० टक्के गाझा व्यापलं. मे महिन्याच्या शेवटल्या आठवड्यात नेतान्याहू यांनी सैन्याला आदेश दिला, की सैन्याने ७० टक्के गाझा ताब्यात घ्यावं.

जगाने मनगटाला चुना लावून बो बो बोंबा मारत बसावं, इस्रायल पुढल्या काही महिन्यात ९० टक्के गाझा व्यापून टाकेल.

युनायटेड नेशन्सचा रिपोर्ट सांगतो, की गाझातल्या ८५ टक्के इमारती नष्ट तरी झाल्या आहेत किंवा दुरुस्ती अशक्य होण्याइतक्या मोडलेल्या आहेत. गाझाभर सुमारे ७ कोटी टनांचा राडारोडा जमा झाला आहे आणि त्याच राड्यात अनेक न फुटलेले बाँब आणि सुरुंग लपलेले आहेत. 

हेही वाचा - युनायटेड नेशन्सचा पोकळ पाठिंबा, पण पॅलेस्टाईनला उपयोग काय?

इस्रायलने व्यापलेल्या ६५ टक्के जमिनीवर आता एकही पॅलेस्टिनी शिल्लक नाही अशी खबर आहे. जमीन निर्मनुष्य झालीय, तिथे लवकरच ज्यू लोकांच्या वस्त्या उभ्या रहायच्या आहेत. इस्रायलच्या प्लॅननुसार जेमतेम १० टक्के जमिनीवर पॅलेस्टिनी जीव मुठीत धरून राहतील, उरलेला सर्व गाझा वास्तवात इस्रायल झालेला असेल.

कुठाय शांतता मंडळ? कुठे आहेत ७० अब्ज डॉलर? कुठे आहे ट्रंप आणि जावयाचा रिव्हियेरा?

इस्रायल आणि अमेरिका जगाला गंडवतंय. वेस्ट बँकची ७० टक्केपेक्षा जास्त जमीन इस्रायलने आधीच घेतलेली आहे. जग बसलंय ठणाणा करत. लेबनॉनही इस्रायल बळकावतंय. गाझा इस्रायलच्या ताब्यात जाईल. तिथे ट्रंप, कुश्नर, विटकॉफ, अल थानी, महंमद बिन सलमान यांचे टॉवर आणि कसिनो उभे राहतील. 

ट्रंप बोलतात एक, त्यांना करायचं असतं दुसरंच काही तरी.

निळू दामले | 9820971567 | damlenilkanth@gmail.com

निळू दामले हे जगभरातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि सहज शैलीत लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results