आम्ही कोण?
आमची शिफारस 

होमबाउंड : भारतातील जातपात आणि रोजगार वास्तवाचं नेमकं चित्रण

  • योगेश जगताप
  • 06.10.25
  • वाचनवेळ 4 मि.
homebound

दिग्दर्शक नीरज घायवान हे नाव भारतीयांना परिचित झालं ते त्यांच्या 'मसान' या चित्रपटामुळे. 'मसान'च्या निमित्ताने भारतातील जातव्यवस्थेवर, त्यामुळे वाट्याला येणाऱ्या घुसमटीवर नीरज यांनी भाष्य केलं होतं. 'होमबाउंड'सुद्धा त्याच प्रकारातील संवेदनशील चित्रपट. स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षं झाली तरीही आज भारतात कित्येक माणसांना जगण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. त्याच संघर्षाचं चित्रण 'होमबाउंड'मध्ये आहे.

चंदन कुमार (विशाल जेठवा) आणि मोहम्मद शोएब (ईशान खट्टर) या दोन मित्रांच्या जगण्याची कहाणी या चित्रपटात आहे. २०२० मधील कोरोनापूर्वीच्या काळातली दोघांची मैत्री, काम मिळवण्यासाठी त्यांना करावी लागणारी धडपड आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांची जाणीव यांभोवती ही कहाणी गुंफलेली आहे.

आपल्याकडे बरेच तरुण-तरुणी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सरकारी नोकरीच्या मागे लागलेले असतात. ही नोकरी पोलीसदल, सैन्यदलं, बँक, रेल्वे, स्थानिक स्वराज्य संस्था, अनेक शासकीय अथवा निमशासकीय कार्यालयातील लिपिक पद, अशी कुठलीही असू शकते. मात्र या नोकरीसाठी उपलब्ध असलेल्या जागा आणि इच्छुक उमेदवारांची संख्या यांचं प्रमाण पाहिलं तर कुणाच्याही मनात नैराश्य दाटून येईल अशी आज परिस्थिती आहे. चित्रपटातलं पहिलं दृश्यच या भयाण वास्तवाची जाणीव करून देतं. शिक्षणासाठी गाठीशी पुरेसा पैसा नाही, शिकूनसुद्धा काम मिळेल याची खात्री नाही; अशा विवंचनेत चंदन आणि शोएब हे दोन मित्र पोलीसभरतीच्या लेखी परीक्षेसाठी निघालेले असतात. याच परीक्षेला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर शेकडो तरुणांचा लोंढा आलेला असतो.

चंदन आणि शोएब दोघंही बारावी शिकलेले. पोलीस भरतीमधून कॉन्स्टेबल होणं हे दोघांचं पहिलं टार्गेट असतं. चंदनचे आई, वडील, बहीण हे तिघंही रोजचा घरखर्च भागावा, स्वतःचं पक्कं घर बांधावं आणि चंदनला सरकारी नोकरी मिळेपर्यंत त्याला हातभार लावावा, म्हणून काम करत असतात. तर शोएबला दुबईत कामाची संधी आलेली असूनही घरी आई-वडिलांना एकटं सोडून जायला नको म्हणून त्याने ती नोकरी नाकारलेली असते.

रेल्वे स्टेशनवरच त्यांना सुधा भारती (जान्हवी कपूर) नावाची मुलगी भेटते. तिथल्या थोडक्या ओळखीवर सुधा आणि चंदन मित्र होतात. पुढे परीक्षा दिल्यानंतर अनेक महिने निकाल लागत नाही. घरची परिस्थिती बेताची असल्याने आणि वडिलांच्या आजारपणामुळे शोएब एका खासगी कंपनीत ऑफिसबॉय म्हणून कामाला सुरुवात करतो. चंदन पोलीस भरतीत काहीतरी होईल, या आशेवर राहतो.

एका विशिष्ट जातीतल्या लोकांना इतरांकडून मिळणारी वागणूक बदलायची असेल तर चांगलं शिक्षण घ्यायला हवं, मोक्याच्या पदांवर पोहचायला हवं आणि स्वतःची ओळख घडवायला हवी, असं सुधाला वाटत असतं. ती चंदनला याच गोष्टी समजावून सांगते आणि पुढील शिक्षण घ्यायला प्रवृत्त करते. चंदन पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतो खरा, पण दरम्यान पोलीस भरतीच्या परीक्षेचा निकाल लागतो. त्याची पुढच्या शारीरिक चाचणीसाठी निवड होते. शोएबला मात्र या परीक्षेत यश मिळत नाही. यानंतर दोघांच्यात काही कारणाने वादविवाद होतात. चंदनला पुढील शिक्षण घेण्यापेक्षा पोलीसात भरती होण्याचं ध्येय पुरेसं असतं. त्याचा हा विचार मर्यादित वाटल्याने सुधासुद्धा नाराज होते. एकूणच दोन मित्रांनी एकत्र मिळून जी स्वप्नं बघितलेली असतात, त्याला कुठेतरी सुरुंग लागतो.

पुढे चंदनला सरकारी नोकरी मिळते का? शोएबचं पुढे काय होतं? त्यांच्या भोवतालच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमुळे त्यांच्या आयुष्यावर नेमका कसा परिणाम होतो? हे सगळं समजून घेण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.

ज्या लोकांचा आवाज किंवा भूमिका कधीच समोर येत नाही असे कोट्यवधी लोक आपल्या देशात आहेत. त्या सर्वांची व्यथा, वेदना ‘होमबाउंड’मध्ये पहायला मिळेल. चित्रपटाचे संवाद नीरज घायवान आणि वरुण ग्रोव्हर यांनी लिहिले आहेत. या दोघांच्याही भारतीय समाजाबद्दलच्या प्रगल्भ जाणिवांची छाप चित्रपटात दिसून येते.

ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर या तीनही तरुण कलाकारांनी समरसून अभिनय केला आहे. त्याशिवाय हर्षिका परमार (चंदनची बहीण) आणि शालिनी वत्स (चंदनची आई) या दोघींच्या भूमिकाही लक्षात राहणाऱ्या आहेत.

हॉलिवूडचे ख्यातनाम दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेसी 'होमबाउंड'चे कार्यकारी निर्माते आहेत. त्यांच्या नावाचा आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचा फायदा झाल्याचं दिग्दर्शक नीरज घायवान यांनी नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं. 'मोहम्मद शोएब या पात्राच्या आयुष्यात रोमॅंटिकपणा दाखवायची गरज नाही, अशी स्पष्ट सूचना स्कॉर्सेसी यांनी केली होती. त्यामुळे चित्रपटाचा बराचसा भाग पुन्हा एडिट करावा लागला. तुम्ही चित्रपट पहाल तेव्हा स्कॉर्सेसी यांची सूचना किती महत्वाची होती, हे तुमच्या लक्षात येईल,’ असंही नीरज यांनी सांगितलं.

या चित्रपटाने लॉकडाऊन काळातील आठवणी जाग्या होऊ शकतात. काही जणांसाठी तो लॉकडाऊन मजेत गेला असेल; मात्र काहींचं आयुष्य त्या काळात भयानक पद्धतीने बदललं, हे वास्तवही ‘होमबाउंड’मधून पुन्हा एकदा पुढे येतं. ‘होमबाउंड’ शब्दाचा नेमका संदर्भ चित्रपटाच्या उत्तरार्धात सापडतो.

आपल्या समाजाविषयी, त्यात घडणाऱ्या घटनांविषयी जागरूक आणि संवेदनशील असणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून पहायला हवा, असा हा चित्रपट आहे.

योगेश जगताप | 9561190500 | yogeshjagtap8819@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

सचिन घोरपडे07.10.25
कथेवरून चित्रपट चांगला वाटतोय पाहिला पाहिजे

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results