सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यात येरळा नदीच्या काठावर वसलेलं खातगूण हे माझं गाव. गावात श्री राजेवली पिरसाहेबांचा दर्गा आहे. या दर्ग्याची खासियत म्हणजे इथले मुजावर (पुजारी) हिंदू आहेत. धार्मिक सलोखा आणि सहिष्णुतेची परंपरा गावात रुजलेली असल्यामुळे कोणताच सण कुणाला दुसऱ्यांचा वाटला नाही, त्यात नेहमी आपलेपणाचीच भावना राहिली. घरात मराठी कॅलेंडरमधले सण बऱ्यापैकी साजरे केले जातात. आमचं कुटुंब शेतकरी. आजोबा स्वतः शेती करायचे, त्यामुळे शेतीशी संबंधित असणारा बेंदूर तर हमखास साजरा व्हायचा. शेतकऱ्यांसाठी दिवाळी हा आणखी एक महत्त्वाचा सण. तोही घरात अगदी धामधुमीत साजरा व्हायचा आणि आजही साजरा केला जातो.
खरंतर रमजान ईद नंतर दिवाळीच असा सण आहे जेव्हा आमचा संपूर्ण परिवार एकत्र येतो. दिवाळीची धामधूम घरात आठवडाभर चालूच असते. दिवाळीसाठी सातारहून काका मंडळी गावाकडे येतात. घरात लहान-मोठ्या भावंडांचा किलबिलाट सुरू असतो. नवीन कपडेलत्ते विकत घेतले जातात. दिवाळीच्या फराळाचा घमघमाट घरात दरवळत असतो. घरावर रोषणाई चढवण्याचं काम सुरू असतं. घराची स्वच्छता, सजावट करणं, मागच्या वर्षीचा आकाशकंदील साफ करून तो घरावर चढवणं ही कामं आम्ही मुलं आनंदाने करत आलो आहोत. दिवाळीच्या पहिल्या पहाटे आई अंगणात सडा-रांगोळी करते. अभ्यंगस्नान करून, नवे कपडे अंगावर चढवून, छान आवरून दारासमोर पणत्या लावणं हे माझं आवडीचं काम. पहाटेच्या वेळी त्या संथ प्रकाशात मला नेहमी शांत आणि आश्वासक वाटत आलं आहे.
धनत्रयोदशीला धान्यराशी, तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात धनराशी, नवी केरसुणी पुजली जाते. त्याला चुरमुरे आणि तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो. पाडव्याच्या दिवशी शेतातले पांडव पुजले जातात. त्यादिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो. भाऊबीजेला बारा बलुतेदारांच्या घरातील स्त्रिया घरी येतात. आम्हाला भाऊ मानून ओवाळतात. पिकांच्या लावणीपासून ते काढणीपर्यंत शेतातल्या कामात हे बलुतेदारच आमचा आधार असतात. त्याची पोचपावती म्हणून घरी आलेल्या या बहिणींच्या हाती धान्य, साडी-चोळी अशी ओवाळणी देण्याची प्रथा आमच्या घरात आहे. गल्लीतल्या, नात्यातल्या लोकांकडून फराळाची ताटं येतात, आमच्या घरूनही इतर घरांमध्ये दिली जातात. शिवाय त्या दिवशी एकमेकांकडे जाऊन फराळ करण्याची पद्धत आहेच.
कडाक्याच्या थंडीत पहाटे उठून आम्ही चुलीवर पाणी गरम करत ठेवायचो, आज्जी भावंडांना तेल-उटणं लावून अंघोळ घालायची. आत घरात गिझर आलाय. तयार फराळही बाजारात मिळू लागलाय. एवढंच कशाला तयार किल्लेही मिळतात. त्यामुळे स्वरूप बदलत गेलं आहे पण दिवाळीचा उत्साह मात्र आहे तसा आहे. लहानपणी दिवाळीतला बराचसा वेळ किल्ल्याभोवती जायचा. मी, माझे चुलत भाऊ आणि आजूबाजूला राहणारे मित्र आम्ही सगळे मिळून किल्ला बनवायचो. उजाडल्यावर त्या किल्ल्यावर खेळणी मांडली जायची. आजोबांना आमच्या किल्ल्याचं कौतुक होतं. ते दरवर्षी फोटोग्राफरला बोलावून किल्ल्यासोबत आमचे फोटो काढून घ्यायचे. वर्षातून दोन वेळा हा फोटोग्राफर हमखास आमच्या घरी यायचा. एक म्हणजे माझा वाढदिवस आणि दुसरं म्हणजे दिवाळीचं हे फोटोशूट. बालपणी फटाक्यांचंही अप्रूप होतं. आता ते राहिलं नाहीय.
दिवाळीतल्या या सगळ्या मजेसोबत डोक्याला खुराकही असतो, तो म्हणजे दिवाळी अंक. आमच्या घरात सगळी माणसं वाचनवेडी आहेत. आई वडील प्राथमिक शिक्षक असल्यामुळे घरात दिवाळी अंक येतात. अगदी 'किशोर' ते 'मौज'पर्यंत. त्यातल्या आवडलेल्या गोष्टींचं टिपण ठेवणं, आवडलेली कविता डायरीत लिहून ठेवणं हे माझं आवडतं काम. दिवाळीत कपड्यांच्या खरेदीसोबत चार-दोन पुस्तकांची खरेदीही हमखास होत आलेली आहे. दिवाळीच्या स्वच्छतेच्या निमित्ताने घरातली सगळी पुस्तकं बाहेर काढून ती पुन्हा हाताळणं, चाळणं हा माझा आवडीचा छंद. फराळासोबत आम्ही असा कित्येक पुस्तकांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर मी शाळेत जायचो तो माहितीचा मोठा खजिना घेऊनच आणि मग त्यावरून य़थेच्छ भाव मारायचो.
गेले काही वर्षं मी सुलेखनकलाही शिकतोय. दिवाळीच्या शुभेच्छा आणि त्यावरच्या कवितांचं सुलेखन करून ते मित्रपरिवाराला पाठवणं हा गेल्या काही वर्षांला माझा नवीन छंद.
तुमच्या घरी दिवाळी साजरी केली जाते का? तुम्हीही दिवाळी साजरी करता?, असे भुवया उंचावणारे प्रश्न आजवर मला कुणी विचारले नाहीत, हे मात्र सुदैव. मुस्लिम असूनही दिवाळी साजरी करतो यात अप्रूप वाटण्यासारखं काही आहे असंही आजवर कधी वाटलं नाही. एका सणामुळे सगळेजण एकत्र येतात, सांस्कृतिक आदानप्रदान होतं, ही गोष्ट मात्र आजघडीला महत्त्वाची वाटायला लागली आहे. दिवाळीमध्ये कृषी संस्कृतीतले धागे असल्यामुळे त्यात सर्वसमावेशकता आहे. शेतात सुगी, घरादारात उत्साह, कुटुंबाने-समाजाने एकत्र येणं याहून एखाद्या सणाकडून आपल्याला काय हवं असतं!
मन्सूर मुल्ला
मन्सूर युनिक फीचर्समध्ये संपादकीय विभागात कार्यरत असून डिजिटल मीडिया हा त्याचा आवडीचा विषय आहे.
