आम्ही कोण?
माणसं आणि कामं 

उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन देणारा अवलिया - स्वप्नील पाटील

  • योगेश जगताप
  • 17.10.25
  • वाचनवेळ 5 मि.
swapnil patil

स्वप्नील बळवंत पाटील. करवीर तालुक्यातल्या कसबे आरळे गावचा तरुण. वडील एमआयडीसीमध्ये एका खाजगी कंपनीत कामाला, तर आई गृहिणी. परिस्थिती तशी जेमतेमच. घरी असलेल्या ५-६ गायींच्या दुधावर उदरनिर्वाह चालायचा. शाळेतल्या अभ्यासात स्वप्नील फारसा रमला नाही. तो सतत चित्र काढत असायचा. आसपास घडलेला कुठलाही प्रसंग असो, तो एकदा स्वप्नीलच्या मनात बसला की तो लगेच त्याचं चित्र काढायला घ्यायचा. पाचवीनंतर पी. डी. कुंभार या कलाशिक्षकांच्या मदतीने त्याने चित्रकलेत आणखी गती मिळवली. शाळेच्या गॅदरिंगमध्ये भाग घेत तो नाटक, डान्स आणि मिमीक्रीही करायचा. कलेशी संबंधित सगळ्या गोष्टी तो मन लावून करायचा. पुढे कुंभार सरांच्या मार्गदर्शनाखालीच तो चित्रकलेमधल्या एलिमेंटरी आणि इंटरमिडीएट या परीक्षाही चांगल्या ग्रेडने पास झाला. आठवी पूर्ण होईपर्यंत स्वप्नीलने स्वतः ८००हून अधिक चित्रं काढली होती.

चित्रकलेत पारंगत असला तरी अभ्यासात म्हणावी तशी गती नसल्याने त्यावरून त्याला शाळेत सतत बोलणी खावी लागायची. शाळेत त्याला सतत ‘तुझा काही उपयोग नाही’ हे वाक्य ऐकून घ्यावं लागायचं. त्यामुळे त्याने दहावीतच शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याला नैराश्याने ग्रासलं. स्वतः चाढलेली ४००-४५० चित्रंही त्याने त्याकाळात जाळून टाकली.

पण सुदैवाने स्वप्नील लवकरच सावरला. नैराश्यायातून बाहेर पाडण्यासाठी चित्रकलाच आपल्याला साथ देईल असं त्याला वाटलं. कोल्हापूरमधले नावाजलेले चित्रकार संजय शेलार यांच्याकडे शिकायला जायचं त्याने ठरवलं. त्यांना दाखवायला स्वतःची चित्रही तो सोबत घेऊन गेला. शेलार यांना स्वप्नीलची चित्रं आवडली, मात्र त्याचा दहावीतून शाळा सोडण्याचा निर्णय पटला नाही. तू दहावी पूर्ण केलीस तरच तुला माझ्याकडे शिकता येईल, असं त्यांनी त्याला सांगितलं. त्यांच्या सांगण्यावरून स्वप्नीलने दहावी पूर्ण केली.

swapnil patil

चित्रकलेच्या आवडीपायी गाव सोडून स्वप्नील कोल्हापूरला आला. शेलार यांच्याकडे चित्रकला शिकायला लागला. स्वतःचा खर्च भागवण्यासाठी त्याने बिल्डिंग पेंटिंगची कामं करायला सुरुवात केली. शाळांच्या भिंतींवर चित्र काढून द्यायचं कामही तो करायचा. पोट्रेट पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंगही त्याने शिकून घेतलं. हळूहळू त्याने काढलेल्या चित्रांना कोल्हापूरमधल्या जाणकारांकडून मागणी येऊ लागली. याच जोरावर २०१०मध्ये कोल्हापूरात त्याच्या चित्रांचं पहिलंवहिलं प्रदर्शन भरलं.

वयाच्या १८व्या वर्षीच स्वप्नीलने हा टप्पा गाठला होता. त्याच्या या प्रदर्शनाची बातमी राज्यभर कुठे कुठे पोचली. लोकांनी फोन करून, प्रत्यक्ष भेटून त्याचं कौतुक केलं. पुढच्या दोनेक वर्षांत व्यावसायिक चित्रकार म्हणून तो स्थिरावू लागला. त्याच्या चित्रांना चांगली मागणी येऊ लागली. पुढे सांगली, पुणे, मुंबई या शहरांतही त्याच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं. मुंबईत नेहरू सेंटर आणि जहांगीर आर्ट गॅलरी इथं भरलेल्या त्याच्या प्रदर्शनालाही उत्तम प्रतिसाद मिळाला.

२०१२मध्ये स्वप्नील चित्रकला आणि चित्रपट क्षेत्रातील पुढच्या कामासाठी मुंबईत दाखल झाला. लहानपणी शाळेच्या गॅदरिंगमध्ये नाटकासाठी स्क्रिप्ट लिहिणारा स्वप्नील आता शॉर्टफिल्म, डॉक्युमेंटरी करण्यासाठी उत्सुक होता. चित्रपटाचा स्टोरीबोर्ड तयार करण्याचं काम तो कौशल्याने करायचा. मुंबईत गेल्यानंतर सुरुवातीला त्याला फोटोग्राफी आणि कला दिग्दर्शनाच्या भरपूर ऑफर मिळाल्या. यामध्ये हिरकणी, तु. का. पाटील, न्यूड, डार्लिंग, इलू इलू या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय तुझ्यात जीव रंगला या मराठी मालिकेसाठी सहायक कला दिग्दर्शक म्हणूनही स्वप्नीलने काम केलं. मधुबाला या स्वप्नीलने दिग्दर्शित केलेल्या शॉर्टफिल्मला फिल्मफेअर पुरस्कारासाठीचं नामांकन मिळालेलं होतं. हे करत असतानाच उपवन, ठाणे, डोंबिवली आणि मीरा रोड भागात झालेल्या चित्रकला प्रदर्शनांतही त्याच्या चित्रांचा चांगलाच बोलबाला झाला. सध्या तो 'डोंगर आड येतूय' या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनात व्यग्र आहे. स्वप्नीलचं सिनेलाईनचं काम हे चित्रकलेला पूरक असंच आहे.

swapnil patil

स्वप्नीलने काढलेली चित्रं भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड देशातील शेकडो लोकांनी चांगल्या किंमतीत विकत घेतली आहेत. अनेक नामवंत मराठी उद्योगपतींनी, रसिक मंडळीनीही त्याच्याकडून चित्रं घेतली आहेत. ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार, प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या घरातल्या, कार्यालयातल्या भिंतींवरही स्वप्नीलने काढलेली चित्रं पहायला मिळतात.

कोल्हापूरला ऐतिहासिक आणि कला परंपरेचा मोठा वारसा आहे. या वारशाची जाण ठेवून छत्रपती राजर्षि शाहू महाराज, महाराणी ताराराणी, कलामहर्षी बाबूराव पेंटर, पंत अमात्य बावडेकर, भालजी पेंढारकर, समशेर बहादूर आटोळे यांची चित्रं स्वप्नीलने काढली आहेत. इतिहास संशोधक प्रा डॉ जयसिंगराव पवार यांच्या शाहू महाराजांवरील चरित्राचं मुखपृष्ठही त्यानेच केलं आहे.

२०१८ मध्ये मुंबईतील धावपळीच्या जगण्याला अर्धविराम देत स्वप्नील कोल्हापूरला आला. कला संवर्धनासाठी गावी काहीतरी खटपट करावी, हा हेतू त्यामागे होता. त्याने नवोदित चित्रकारांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. कोल्हापूरमध्ये आपल्या घरीच त्याने स्टुडिओ सेटअप उभा केला. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रकलेविषयीची रंजक माहिती द्यायला सुरुवात केली. कला क्षेत्रात वर्षानुवर्षं काम करत असूनही ज्यांची कला लोकांपर्यंत पोहोचली नाही किंवा ज्यांना पुरेसं व्यासपीठ मिळालं नाही त्यांना स्वप्नीलने शोधून काढलं. त्यांची कला लोकांना दाखवण्यासाठी त्याने कार्यक्रम आयोजित करायला सुरूवात केली. या कार्यक्रमांचं व्हिडिओ शूट करून ते तो सोशल मीडियावरही शेअर करू लागला. त्याच्या या अनोख्या उपक्रमामुळे महाराष्ट्रभरातील हजारो चित्रकार मंडळी त्याच्या संपर्कात आली आणि त्यांना एक नवं व्यासपीठ मिळालं.

swapnil patil

स्वप्नीलला आज अनेक सामाजिक संस्थांकडून चित्रकलेविषयी मार्गदर्शन करण्यासाठीही बोलावलं जातं. यामध्ये अपंग, भटके विमुक्त, बांधकाम आणि वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांचा समावेश आहे. या मुलांच्या आयुष्यात कलेच्या माध्यमातून आनंद निर्माण करण्याचं काम तो करतोय. स्वप्नीलला अनेक नामांकित कॉलेज आणि विद्यापीठातून फिल्म मेकिंग सोबतच चित्रकला कोर्सच्या मार्गदर्शनासाठी बोलावलं जातं. तसा कॉलेजात गेलो नाही तरी असा आता जात असतो, असं तो गंमतीने म्हणतो.

दोन वर्षांपासून स्वप्नील पन्हाळा किल्ल्यावर चित्रकला आणि शिल्पकला स्पर्धा भरवतो. या स्पर्धेला महाराष्ट्रभरातून प्रतिसाद मिळतोय. दोन्ही वर्षी जवळपास ४०० स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. येत्या काळात या स्पर्धेत देशभरातील कलाकार सहभागी व्हावेत असा त्याचा प्रयत्न आहे. कलेला कुठल्याही भाषेचं, प्रांताचं, विचारसरणीचं बंधन नसावं, याच कलेच्या माध्यमातून लोक जोडले जावेत, एकमेकांच्या कलेची देवाण-घेवाण व्हावी हा विचार घेऊन स्वप्नीलची वाटचाल सुरु आहे. शहरी भागात सहजगत्या मिळणारी कलेच्या संसाधनांची उपलब्धता ग्रामीण भागातही तयार व्हावी, यादृष्टीने तो काम करतोय. आहे. चांगलं काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला व्यासपीठ मिळवून देण्यासाठीची त्याची ही धडपड आहे.

सोशल मीडियाचा विधायक वापर करत असतानाच त्यावरच्या लाईक्स आणि झटपट यशाच्या मागे न धावता कलेचा पाया पक्का करण्याचा संदेश स्वप्नील नवोदित तरुणांना देत असतो. तुमची कला, कलेचा दर्जा आणि त्याविषयीचं ज्ञानच कलाकाराला मोठं करत असते, असं तो म्हणतो.

संपर्क - 7350562933 | वेबसाईट - https://neelashwstudio.com/

योगेश जगताप | 9561190500 | yogeshjagtap8819@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 4

Swapniil Paatil04.11.25
धन्यवाद योगेश दादा व युनिकफीचर्स. आपण माझ्या कामाची व कला प्रवासाची दखल घेतली या बद्दल आभार व या पुढील प्रवासात ही अजून उत्तम पद्धतीने कार्य करत राहीण.

Rajendra Ghorpade18.10.25
सुंदर...अशीच भरभराट पुढे चालु राहू दे

Nitin Bhosale18.10.25
अतिशय उत्तम आणि वास्तव असा प्रसिद्धी परान्मुख स्वप्निलचा परिचय! त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्यातील कला, कलेचा दर्जा आणि कलेचं खरखूर ज्ञान यांनी त्याला मोठेपणा प्राप्त झाला आहे. अर्थातच त्यामागे अपार कष्ट, मेहनत आहेत हेही तितकंच खरे आहेत.

Bhalchandra Gholkar 18.10.25
कलावंताच्या रूपात उदयास येणाऱ्या या तरुणाची वाटचाल खरंच प्रेरणादायी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, ग्रामीण भागातील साध्या कुटुंबात जन्म घेऊनही त्याने आपल्या कलेच्या बळावर चित्रकला, चित्रपट निर्मिती आणि आर्ट डायरेक्शन या क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याची जिद्द, मेहनत आणि कलेबद्दलची निष्ठा खरंच वाखाणण्याजोगी आहे. अशा कलाकारांकडूनच नव्या पिढीला प्रेरणा मिळते, आणि समाजालाही त्यांच्या माध्यमातून सौंदर्यदृष्टी मिळते. या उदयोन्मुख कलावंताला मनःपूर्वक शुभेच्छा — त्याच्या कलेचा दरवळ जगभर पसरू दे आणि तो अधिक उंच भरारी घेऊ दे हीच सदिच्छा.

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results