आम्ही कोण?
मुलाखत 

विदर्भ एक्स्प्रेसच्या निमित्ताने दिग्दर्शक सौरभ हिवराळेशी संवाद

  • योगेश जगताप
  • 29.09.25
  • वाचनवेळ 4 मि.
vidarbha express

सौरभ हिवराळे हा बुलडाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील चांदूर बिस्वा गावचा तरुण. त्याने अझीम प्रेमजी विद्यापीठातून एमए (डेव्हलपमेंट) केलं. तिथे अभ्यासक्रमाचा भाग म्हणून त्याने संशोधन करून एक डॉक्युमेंटरी बनवली. मुंबईच्या दादर फ्लॉवर मार्केटमध्ये बुलडाण्यामधल्या शेकडो बायका सीजननुसार रानभाज्या आणि वेगवेगळ्या झाडांचा पाला विकायला घेऊन येतात. पूजेसाठी आणि औषधी उपयोगासाठी म्हणून त्या विकत घेतल्या जातात. या महिलांच्या नांदुरा ते दादर या प्रवासावर आणि कामावर ही डॉक्युमेंटरी बेतलेली आहे. या डॉक्युमेंटरीसाठी आवश्यक शूट, स्क्रिप्ट, एडिटिंग, व्हॉईस ओवर, सबटाईटल हे सगळं काम सौरभनेच केलं. त्यानिमित्ताने त्याच्याशी केलेला हा संवाद.

ही डॉक्युमेंटरी फिल्म तुला का करावीशी वाटली?

रिसर्च म्हटला की काहीतरी विषय घेऊन त्यावर इंटरव्ह्यू घेऊन इंग्लिशमध्ये लिहिणं, डाटा प्रेझेंट करणं असा एक समज असतो. मी या बायकांच्या कामावर रिसर्च करणार होतो. त्यांना सहज समजेल अशा पद्धतीने मला माझा रिसर्च मांडायचा होता. हा विषय चार सहा वर्षांपासून माझ्या डोक्यात होता. आता मी अझीम प्रेमजीमध्ये असताना सगळं जुळून आलं त्यामुळे ही डॉक्युमेंटरी करून टाकली. या विषयावर कुठे माध्यमांत कुणी बोललेलं किंवा लिहिलेलं पाहिलं नव्हतं. मग तर आपण हा विषय करायलाच पाहिजे असं वाटलं.

या महिला फक्त नांदुरा गावच्याच आहेत की इतरही?

नांदुरा आमचा तालुका आहे. तालुक्याला लागून खेडेगावं आहेत तिथल्या या बायका आहेत. पण खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून दादर फ्लॉवर मार्केटमध्ये बायका येतात असं म्हटलं तरी चालेल. कारण शिर्डी, नगर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर इथूनही आलेल्या बायकांशी बोललो होतो.

vidarbha express

त्या नेमका कसला पाला घेऊन येतात?

ठराविक असं काही नाही. त्यांच्या त्यांच्या भागात पिकतं ते त्या घेऊन येतात. म्हणजे कसाराकडच्या बायका आंब्याची पानं आणतात. बुलडाणामधल्या बायका कडुलिंब आणि बेलाची पानं घेऊन येतात. आदिवासी स्त्रिया पळसाची पानं, रानभाज्या, रानफळं आणतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर शहरात मिळत नाही ते सगळं त्या विकायला घेऊन येतात.

या पाल्याला स्थानिक मार्केट उपलब्ध नाही का?

तिथं ते सहज फुकट भरपूर उपलब्ध आहे. मग विकत कोण घेणार!

हा पाला विकून त्यांना एका ट्रिपचे किती पैसे मिळतात?

ते त्या त्या वेळच्या मागणीनुसार ठरतं. बाजारात कमी पाला आला असला तर त्या वीस रुपयांत कडुलिंबाच्या पाल्याची आणि कोथिंबिरीची अशा दोन जुड्या विकतात. एक मूठभर बेलाची पानं वीस रुपयाला देतात. त्यांना एका ट्रिपचे आठशे ते बाराशे रुपये मिळतात.

vidarbha express

गावाकडे या महिलांना याशिवाय काही कमाईचं साधन आहे का?

फारसं नाही. त्यातल्या बहुतांश बायका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांतल्या आहेत. आणखी एक महत्वाचं म्हणजे यातल्या बहुतेकजणी वयस्कर आहेत. त्यांच्याकडून इतर कष्टाची, मोलमजुरीची कामं होत नाहीत. त्यामुळे त्यांना हे काम करणं सोयीचं वाटतं. कारण या भाज्या, फळं, पाला त्यांना सहज उपलब्ध आहे.

या महिलांची मुलं/मुली आणि कुटुंबातील इतर लोक काय करतात?

शेती. मजुरी.

हा प्रवास त्या किती वर्षांपासून करतायत?

कोणी दहा, पाच, दोन वर्षं करतायत, तर कोणी वीस-तीस वर्षांपासून.

vidarbha express

इतक्या प्रवासाचा त्रास होत नाही का?

त्रास होतो, पण नाईलाज आहे. डॉक्युमेंटरीमध्ये दाखवल्याप्रमाणे जनरल डब्यात किती गर्दी असते हे आपल्याला माहितीच आहे. कधी कधी त्या स्लीपर कोचमध्ये घुसतात, मग रेल्वे कर्मचारी त्यांना तिथून हाकलून लावतात, लोक तुच्छतेने बघतात. शिवाय प्रवास करून शारीरिक आणि मानसिक थकवा येतोच. आपण साधं रिकाम्या हाताने प्रवास करून आलो तरी दमतो. या तर वीस तीस किलोचं ओझं घेऊन प्रवास करतात.

या महिला तिकीट काढत नाहीत ही गोष्ट खरी आहे का?

हो, खरी आहे. त्यांना येऊन जाऊन एका ट्रिपचं ४०० रुपये तिकीट पडतं. बदल्यात त्यांना एका ट्रिपचे हजार रुपये मिळतात असं पकडू. तरी, चारशेचं तिकीट काढून सहाशे रुपयांसाठी जायला परवडेल का इतक्या लांब?

vidarbha express

तिकीट काढत नाहीत म्हणून कारवाई होत नाही..?

त्या जनरल डब्यात बसतात. तिथे टीसी सहसा येत नाही. किंवा मग स्लीपर कोचमध्ये संडासाजवळ, दरवाज्याजवळ या बायका चोरासारख्या बसतात. टीसी निघून जातो आणि बोललाच तर गयावया करून या सोडवून घेतात.

मुंबईत राहण्या-खाण्याची, सुरक्षेची काही सोय असते का?

काही बायका मुंबईत राहतात. काही येऊन-जाऊन करतात. रात्री दहा-अकरा वाजता नांदुरावरून बसल्या की सकाळी सहाच्या सुमारास बाजारात येतात. बारा-एक वाजेपर्यंत सगळा माल विकून परत त्याच दिवशी परतीच्या प्रवासाला निघतात. पुन्हा एक-दोन दिवसांनी असाच प्रवास करतात. हे चक्र सुरू असतं.

vidarbha express

स्थानिक लोकप्रतिनिधींना याची माहिती आहे का? त्यांची यावर काय भूमिका आहे?

मी अजून त्यांच्याशी बोललो नाहीय, पण बोलणार आहे. डॉक्युमेंटरी करून या विषयातून मी मोकळा होणार नाहीय. हा विषय लावून धरायचा, हे माझ्या डोक्यात आहेच.

ही फिल्म बनवल्यानंतरची तुझी भावना काय होती?

हो, समाधान आहे. इतक्या लांबून या बायका फक्त हजार-पाचशे रुपयांसाठी येतात हे कुठे कुणाला माहिती होतं? दादर मार्केट म्हटलं की नजरेसमोर सुंदर फुलं आणि अॅस्थेटिक फोटो, व्हिडिओ येतात. पण तिथं असेही अनेक महत्वाचे विषय आहेत हे लोकांपर्यंत पोहोचतंय, पोहचेल याचं समाधान आहेच.

'विदर्भ एक्स्प्रेस' ही डॉक्युमेंटरी युट्युबवर उपलब्ध आहे.

विदर्भ एक्स्प्रेस - https://youtu.be/cxwnXUmyaLg?feature=shared

योगेश जगताप | 9561190500 | yogeshjagtap8819@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

सौरभ हिवराळे01.10.25
डॉक्युमेंटरी च्या शूट दरम्यान हा फोटो घेतला तेव्हा ज्या आजोबांचा हा माल होता, ते म्हणाले, का हो, फोटू काढून काही कारवाई करसान का बॉ? आमचा जीव भेते राजा. त्यांना नंतर मी कशासाठी काढतोय हे समजावून सांगितल्यानंतर ते भरभरून बोलले. जी आजी मार्केट मध्ये बसून बोलतेय, ती मलकापूर जवळच्या एका खेडे गावातील आहे. इतर म्हाताऱ्यांसोबत मार्केट मध्येच ती राहते. गावाकडून येणाऱ्या बायांकडून बेलाची पाने सहाशे रुपयाला विकत घेते आणि तिथेच बसून त्यावर शे दिडशे कमाई होईपर्यंत पूर्ण पाला विकून, जसं पाला विकल्या गेला तसा परत विकत घेऊन तिची ही सायकल सुरू असते. दोन तीन आठवड्यातून एकदा घरी जाते म्हणाली. इंटरव्ह्यू घेताना मार्केट मध्येच तिच्या शेजारी बसतो त्या फेरीवाल्याने तिला विचारलं होतं की कौन है ये? ती म्हणाली माह्या नातू हाय न बापा. आता मागल्या महिन्यात तिथे मार्केट ला तिच्या शोधात गेलो तेव्हा पुलाखाली बसलेली दिसली, मी जवळ जाऊन म्हणालो, ओळखलं काय? तिने पाच दहा सेकंद घेत म्हटलं, आठीच त भेटलो होतो न आपून. चेहऱ्यावरून हात फिरवला, तिला सांगितलं मला इथेच मुंबईमध्ये नोकरी लागली तेव्हा माझी सख्खी आजी खुश झाली असती तशीच खुश होऊन म्हणाली, "चांगल्या सोबत चांगलंच होत असते भाऊ." नंतर आम्ही चहा घेतला, निघतांना तिला काहीतरी देऊन जाऊ असा विचार करत असतानाच, पैशे साठवायची प्लास्टिकची पन्नी काढून मला वीस रुपयाची नोट काढून देऊ लागली. मला डेंजर लाज वाटली. मी जास्त काही न बोलता तिच्या पोराचा नंबर घेऊन, पुन्हा आलो की तुला काहीतरी घेऊन येतो म्हणून निघालो. आता गेल्यावर तिच्यासाठी लुगडं घेऊन जाणाराय. एका बाईला माहिती विचारू म्हणून तिच्याशी विचारपूस करत होतो तेव्हा, तिसऱ्या प्रश्नाला ती चिडून म्हणाली जाय रे भाऊ, डोकं नको, खाऊ, लोकं दुसराच काही विचार करता. आणि मला हाकलवून लावलं. काही लोकं यांच्याकडे या सेक्स वर्कही करत असतील या दृष्टिकोनातून पाहतात. मी गेल्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मार्केटमध्ये फिरलो तेव्हापेक्षा पहलगाम घटनेनंतर जे सगळं झालं, त्याचा परिणाम म्हणून मार्केट मधल्या फेरीवाल्यांच्या आणि या बायकांच्या तिथे बसून पोटापाण्यासाठी आपला धंदा करण्यावर परिणाम झाला. आता प्रत्येक पुलाखाली इथे फेरीवाल्यांना बसण्यास सक्त मनाई आहे असे बोर्ड लागलेले दिसले, जे की काही महिन्यांपूर्वी फक्त एक दोन ठिकाणी होते. आता जास्त वेळ यांना तिथे बसू देत नाहीत. मनपा ची गाडी आली अक्षरशः या लोकांची तारांबळ उडते, ते लोकं जे हातात येईल ते उचलून गाडीत भरून घेऊन जातात. सतत रस्त्याकडे लक्ष ठेवून बसावं लागतं, साधं मुतायला जायला ही भितात की, आपण गेलो आणि आपला माल उचलून नेला तर? ही लोकं इतका संघर्ष करूनही, वाईट अनुभव येऊनही इतकी साधी आणि मायाळू कशी असू शकतात असं बऱ्याच वेळा वाटलं. पण यांच्याकडे त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची पॉवर कुठे उरलीय? जे काही आहे त्यावरून उठवलाही आवाज तर, कितीसा वेळ लागणाराय व्यवस्थेला यांना उध्वस्त करायला?

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results