हातात विशिष्ट आकाराची एकतारी घेऊन ते गावोगाव गाणी गात फिरत असतात. त्यांच्या गीतांमध्ये मानवमुक्तीचं तत्त्वज्ञान आणि परस्परप्रेमाची महती सांगितली जाते. हे पश्चिम बंगालमधील कलाकार ‘बाऊल' नावाने ओळखले जातात. बाऊल समाज म्हणजे पश्चिम बंगालमधील संयुक्त धार्मिक परंपरा जोपासणारा आणखी एक अनोखा समाज आहे. त्यांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानात कोणत्याही भेदभावाला स्थान नाही. अर्थात, बाऊल समाजाविषयी आणखी काही सांगण्यापूर्वी एक बाब नोंदवायला हवी. ती म्हणजे भारतातील अन्य कोणत्याही प्रदेशात झाले नसतील इतके तीव्र अत्याचार बंगालमध्ये झाले होते. ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी ‘फोडा आणि झोडा' ही नीती सर्वप्रथम वापरली ती संयुक्त बंगाल प्रांतात. भारतात सर्वांत तीव्र धार्मिक दंगलींची पहिली नोंद बंगालमध्येच आढळते. फाळणीच्या वेदना या प्रदेशाने दोन वेळा अनुभवल्या. पहिल्यांदा १९०५ साली ब्रिटिशांनी घडवून आणलेली धार्मिक फाळणी आणि त्यानंतर १९४७ साली भारताच्या स्वातंत्र्यावेळी झालेली दुसरी फाळणी. या दुसऱ्या फाळणीनंतर स्वतंत्र भारतातील पश्चिम बंगाल हे राज्य आणि पूर्व पाकिस्तान अस्तित्वात आलं. पुढे पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगला देश हे स्वतंत्र राष्ट्र जन्माला आलं.
खरं तर १९४७ साली झालेली बंगालची फाळणी म्हणजे पूर्णपणे गोंधळाचा कारभार होता. फाळणीसाठी योग्य त्या व्यवस्थाही आखल्या गेल्या नव्हत्या हे उघड आहे. कारण या फाळणीनंतर बांगला देशातून स्वतंत्र भारताच्या पश्चिम बंगालमध्ये निर्वासितांचा ओघ सतत सुरूच राहिला. हिंदू आणि मुस्लिम नागरिकांना धर्माच्या आधारे विभाजित करण्याचा उद्देश बंगालमध्ये तरी पूर्णपणे फसला असंच म्हणावं लागेल. आजही पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांचं प्रमाण पंचवीस टक्के आहे. भारतातील इतर अनेक राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण बरंच जास्त आहे. आजही कोलकत्यातीच्या मध्यमवर्गातील बहुसंख्य हिंदू जुन्या पूर्व पाकिस्तानातील आपली घरं आणि जमिनी सोडून आलेले नागरिक आहेत. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता आणि इतर शहरांत आणि गावांतील जमिनींच्या मालकीबाबत आजही मोठा ताण जाणवतो. म्हणूनच हिंदू-मुस्लिम धार्मिक विद्वेष पसरवण्यास इथे मोठा वाव आहे.
मात्र, तरीही पश्चिम बंगालमध्ये हिंदू-मुस्लिम धार्मिक तणावाचं प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे, हेही तितकंच खरं. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे पश्चिम बंगालमध्ये दीर्घकाळ टिकलेली कम्युनिस्टांची राजवट. डाव्यांच्या दबावामुळे धर्माच्या आधारावर लोकांना संघटित करण्याची कुणाचीही हिंमतच झाली नाही. तर काही विचारवंतांच्या मते या धार्मिक सलोख्याच्या मागे आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. त्यांचं म्हणणं असं, की शतकानुशतकं एकत्र नांदलेल्या पश्चिम बंगालमधील विविध समाजांची सांस्कृतिक अस्मिता धर्मापेक्षा भाषेच्या आधारावर बेतलेली आहे. माझ्या मते बंगालमधील या धार्मिक सलोख्यामागे आणखी एक घटक आहे, तो म्हणजे बंगालमधील इस्लामच्या पहिल्या पुरस्कर्त्यांनी त्यांच्या धर्माची मांडणीच मुळी संयुक्त धार्मिक परंपरांच्या आधारावर केली. मात्र, या मूळ मांडणीत सोयीस्कर बदल करून इस्लामच्या तथाकथित ‘शुद्धीकरणा'चे प्रयत्न मूलतत्त्ववाद्यांकडून सुरू आहेत.
तरीही बंगालमध्ये हिंदू आणि इस्लाममध्ये झालेल्या संवादातून अन् देवाणघेवाणीतून अतिशय मनोज्ञ अशा संयुक्त परंपरा निर्माण झाल्या आहेत, विशेषत: नृत्य-नाट्य-गायन-कला आणि हस्तकलेच्या क्षेत्रात. भटक्या बाऊल गायकांची परंपरा ही त्यापैकीच एक. आजही बंगालमधील बाऊल गायक बंगाल राज्यातच नव्हे तर भारतात प्रसिद्ध आहेत. बाऊल गायक हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मांतले असतात. बंगालमधील गावागावांत असा बाऊल गायन करणारा पंथ आढळतो. हातात एकतारा घेऊन ‘सर्वांचा देव एक आहे' असा संदेश देणारी गाणी गात पायघोळ वस्त्रं परिधान करणारे बाऊल गायक एका गावातून दुसऱ्या गावात भटकत असतात. (काही बाऊल गायक देशभरात एका संगीत महोत्सवातून दुसऱ्या संगीत महोत्सवात फिरतानाही आढळतात.)
बाऊल गायकांचा भर असतो तो ईश्वरप्रेमाच्या गूढ आध्यात्मिक कल्पनेवर. सर्व बाऊल स्वत:ला प्रस्थापित धर्मरचनेपासून स्वतंत्र मानतात. बंगालमधील वैष्णव भक्तिपंथाचे धर्मसुधारक चैतन्य महाप्रभूंचा बाऊल पंथातील हिंदूंवर मोठा प्रभाव आहे, तर मुस्लिम धर्मातील सुफी तत्त्वज्ञानाचा बाऊल पंथातील मुस्लिमांवर. त्यामुळेच बाऊल पंथाला हिंदू धर्मातील भक्तिपरंपरा आणि इस्लाममधील सुफी पंथ यांचं संयुक्त रूप म्हणता येईल.
इथे लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे बाऊल हिंदू किंवा मुस्लिम या दोन्ही धर्मांतील कोणत्याही प्रथा-परंपरा पाळत नाहीत. किंबहुना कर्मकांडांना त्यांचा पूर्ण विरोधच असतो. अतिशय उत्कटतेने गायलेली गाणी आणि त्यावर बेभान होऊन केलेलं नृत्य हेच त्यांचं मुख्य धर्माचरण आणि तीच त्यांची धार्मिक ओळख. बंगालमध्ये वैष्णव भक्तिपंथाचा व्यापक प्रभाव आहे. वैष्णव पंथाचा मुख्य भक्तिमार्ग म्हणजे संगीत, तर सुफी पंथाचा मुख्य भक्तिमार्ग म्हणजे नृत्य व गायनाचा समावेश असलेलं ‘सेमा' सादर करणं. बाऊलपंथीय असं तत्त्वज्ञान सांगतात, की देव मंदिरात नाही आणि मशिदीतही नाही, तर देव माणसाच्या हृदयात आहे. त्यामुळेच अनेक बाऊल गीतं हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांवर कोरडे ओढतात. बंगालमधील प्रसिद्ध बाऊल गायक मदन बाऊल यांच्या एका गीताचा मथितार्थ असा-
तुला कोंडिले मशिदि-मंदिरी
तुझी साद पडे जरि कानी
येउ कसा मी तुजपाशी
पुराण, कुराण, तस्बिह, जपमाळा
आणि लावले हे टाळे तव द्वारी
येउ कसा अन् कशी घेउ दीक्षा,
कसा साहू सजा ही,
झुरतो, मरतो तव दारी
मदन मरतो, झुरतो तुझ्या दारी
बाऊल पंथाने बंगालला अनेक अविस्मरणीय गीतं दिली आहेत. बंगालचे ज्येष्ठ साहित्यिक रवींद्रनाथ टागोरही त्यांनी निर्मिलेल्या रवींद्र संगीतातल्या अनेक रचनांचं श्रेय फिरस्त्या बाऊल गायकांना देतात. बाऊल गायकांविषयी त्यांनी नोंदवलेला एक अनुभव बोलका आहे. ते म्हणतात, 'एकदा एका फिरस्त्या बाऊल गायकाचं गाणं मी योगायोगाने ऐकलं. तो एक भिकारी होता. त्याच्या गाण्याने मला चकित केलं. त्या गाण्यात देवाबद्दलच्या त्याच्या भावना अगदी सहज-सोप्या शब्दांत व्यक्त झाल्या होत्या. त्यात उगाच शब्दांची आरास नव्हती की देवाचं बटबटीत वर्णन नव्हतं किंवा आध्यात्मिक तत्त्वभेदांचं स्तोमही नव्हतं.' तेव्हापासून रवींद्रनाथांना बाऊल संगीताने भुरळ घातली. बाऊल संगीतातील अनेक चाली त्यांनी रवींद्र संगीतात वापरलेल्या दिसतात.
बाऊल पंथात सर्व जाती-धर्मांचे लोक असले तरी सामान्यत: बंगालमध्ये बाऊल पंथाला मुस्लिम धर्मातील एक पंथ मानलं जातं. लांबच्या लांब दाट दाढी आणि काळ्या किंवा रंगीत पॅचवर्क केलेल्या कफन्या अशा फकिरांच्या वेषात बाऊल वावरतात. बाऊल उत्तम संगीतकार असतात. या बाऊल संगीतकारांपैकी एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले लालन फकीर हे सर्वाधिक गाजलेलं नाव. त्यांची अदाकारी अशी काही कमालीची होती की त्या पद्धतीला आजही ‘लालन गान' म्हणून ओळखलं जातं. हिंदू धर्मातले बाऊल गायक केशरी रंग अधिक पसंत करतात. मात्र, हिंदू किंवा मुस्लिम दोन्हींपैकी कोणत्याही धर्माचे बाऊल गायक गीतं मात्र तीच गातात. त्यांचं आध्यात्मिक तत्त्वज्ञान आणि साहित्यही एकच असतं.
बाऊल पंथ तसा जुना पंथ आहे. बाऊल पंथाच्या पहिल्या खाणाखुणा सोळाव्या शतकातल्या नादिया जिल्ह्यात सापडतात. काही इतिहासतज्ज्ञांच्या मते सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात वैष्णवांमध्येही ब्राह्मणीकरणाचं पुनरुज्जीवन होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे वैष्णव भक्तिपंथातील चैतन्य महाप्रभूंचे अनेक अनुयायी पंथातून बाहेर पडले आणि बाऊल पंथाकडे ओढले गेले. दुसऱ्या बाजूला, सुफी पंथातील ईश्वराशी थेट नातं जोडण्याच्या परंपरेमुळे अनेक मुस्लिमधर्मीयही बाऊल पंथाकडे आकर्षित झाले.
बंगालमध्ये ठिकठिकाणी बाऊलपंथीयांचे मेळे भरतात. यापैकी सर्वांत मोठा ‘केंदुली जयदेव मेळा' वर्धमान जिल्ह्यातील केंदुली इथे अजय नदीच्या किनाऱ्यावर भरतो. ‘गीत गोविंद' या अतिशय सुंदर भक्तिरचना लिहिणाऱ्या जयदेव यांचं केंदुली हे जन्मगाव. दरवर्षी १५ जानेवारीच्या आसपास हजारो बाऊल केंदुली गावात जमतात. अजय नदीच्या किनाऱ्यावर तीन दिवस बाऊल संगीतमेळा अखंड सुरू असतो. तो अनुभव केवळ अवर्णनीय! त्यांच्या गीत-संगीतातून बाऊल तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. त्यांची गाणी अत्यंत साधंसुधं, सामान्य माणसाचं तत्त्वज्ञान सांगतात. एक गीत म्हणतं :
एक फकीर गात होता : (मथितार्थ )
वादविवाद आणि विचारानंतर
मी मला ओळखू लागलो.
मी तोच आहे, मी तोच आहे
होय, मी म्हणजेच तो!
आता लोक मला दूषणं देतात
पण माझ्यापासूनच तो निर्माण झाला
तो अल्ला आणि त्याचे प्रेषितही
म्हणूनच म्हणतो, जो ओळखी स्वत:ला
तोच जाणतो देवाला!
दोन्ही बाजूंचे धर्ममार्तंड या बाऊलपंथीयांचा तिरस्कार का करत असतील हे आपल्याला या गीतावरून समजून येतं. एकुणात, बंगालमध्ये बाऊलपंथीयांना त्यांच्या त्यांच्या मार्गाने जाऊ दिलं जात असलं, तरी बांगला देशच्या सीमावर्ती भागात, म्हणजे नादिया आणि मुर्शिदाबाद या दोन जिल्ह्यांत मुस्लिम धर्मातल्या बाऊल फकिरांवर हल्ले झाल्याच्या नोंदी आहेत. नादिया जिल्ह्यातील कुरचैदंगा गावातील सदर फकिराची कहाणी बघा. हा सदर फकीर सदोदित एकतारीवर गाणी गाण्यात मग्न असे, त्याच्या गाण्यांत प्रस्थापित धर्मावर टीका असे. तो म्हणत असे, ''अल्ला किंवा देवाचा शोध घेणं निष्फळ आहे. सर्व मानवजातीवर प्रेम करण्यानेच मनुष्याला मुक्ती मिळू शकते.'' मुल्ला-मौलवींना हे कसं मान्य व्हावं? सप्टेंबर १९९६ मध्ये या मुल्ला-मौलवींनी एक धर्मपरिषद भरवून सदर फकिराला काफीर, म्हणजेच धर्मभ्रष्ट ठरवलं. अर्थात, सदर फकिरावर त्याचा परिणाम होण्याचं कारण नव्हतं. तो स्वत:ला कधीच आस्तिक म्हणवत नव्हता. पण धर्माचे ठेकेदार एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी सदर फकिराच्या जमिनीवरील पिकं जमीनदोस्त केली, त्याचं घर उद्ध्वस्त केलं. एवढंच नाही, तर गावाच्या वेशीत त्याने आपली बाऊल गीतं गायची नाहीत अशी बंदी घातली. त्यावर त्याची प्रतिक्रिया होती, ''त्यांनी माझ्या आत्म्यावरच घाला घातला आहे.”
नादिया जिल्ह्यातील ओमर शाह या बाऊललाही अशाच छळाला तोंड द्यावं लागलं होतं. ओमर शाह हा नादिया जिल्ह्यातील अलीनगर गावातला. गावकऱ्यांनी सभा घेऊन ओमर शाहला अपवित्र (पापी) ठरवलं. त्याला घरातून ओढून सभेच्या ठिकाणी आणलं गेलं. त्याची दाढी जबरदस्तीने उतरवण्यात आली. त्याला वाळीत टाकण्याचा फतवा काढला गेला. या बहिष्कारापासून सुटका करून घेण्यासाठी ओमर शाहचा मुलगा घर सोडून निघून गेला. पण नंतर या मुलाला पुन्हा कधीच स्वतःजवळ येऊ द्यायचं नाही, असाही आदेश धर्ममार्तंडांनी दिला. अशाच प्रकारचे सामाजिक बहिष्काराचे प्रसंग शेजारच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या बाऊल फकिरांवरही आले. १९९७ साली धरमपूर खेड्यातल्या दहा फकिरांना बहिष्कृत घोषित करण्यात आलं. काझेम शेख या दहा फकिरांपैकी एक. त्याने या आदेशाबद्दल आपलं म्हणणं सांगितलं. “आम्ही असं म्हणतो, की आम्ही आधी माणूस आहोत. आम्ही हिंदू किंवा मुस्लिम आहोत हा निव्वळ योगायोग. हे म्हणणं हाच आमचा गुन्हा.”
हिंदू बाऊल फकिरांनासुद्धा अशाच प्रकारे धर्ममार्तंडांचा छळ सोसावा लागला. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलदंगा हे हिंदुबहुल गाव. या गावातील गौरंगा हाजरा या हिंदू बाऊल फकिराने एका मुस्लिम फकिराला आपला गुरू मानल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली, त्याची झोपडी जाळून टाकण्यात आली. त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला.
परंतु बाऊल पंथाविरुद्ध अशा स्फोटक, हिंसक घटना क्वचितच घडतात. बंगालमध्ये बाऊलांची एक संघटना आहे. या संघटनेचे अध्यक्ष शक्तिनाथ झा म्हणतात, ''धर्मांध हिंदू आणि धर्मपिसाट मुस्लिम दोन्ही गट एकमेकांना आव्हान देत असतात. कधी कधी त्यांच्या भांडणात आम्ही सापडतो. मग आम्हाला लक्ष्य केलं जातं. पण आम्ही बाऊल गायक संघटित झालो तर नक्कीच या मूलतत्त्ववाद्यांचा सामना करू शकतो. कारण सामान्य बंगाली माणसं आमच्यासोबत आहेत. आमची बाऊल गीतं ही त्यांच्या जगण्याचा भाग आहेत”
गावखेड्यांतली ही बाऊल गायकी म्हणजे बंगालच्या सामाजिक रचनेतील एक अद्वितीय असं वैशिष्ट्य आहे. हिंदू असोत किंवा मुस्लिम, भारतीय असोत किंवा बांगलादेशी- बाऊल पंथ म्हणजे सर्व बंगाली माणसांच्या सामाजिक सद्भावाचं प्रतीक आहे!
(समकालीन प्रकाशनाच्या 'सलोख्याचे प्रदेश' या पुस्तकातून साभार.)
(अनुवाद – प्रमोद मुजुमदार)
सबा नक्वी
सबा नक्वी या दिल्लीस्थित पत्रकार आणि लेखिका आहेत.
