तोहीद हा कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे गावचा रहिवासी. सध्या तो गडहिंग्लज येथील एका महाविद्यालयात फार्मसी विषयाचा प्राध्यापक म्हणून काम करतोय. तोहीदचं दहावीपर्यंतचं शिक्षण गावतील शाळेत झालं. वडील इंग्रजीचे शिक्षक तर आई गृहिणी. औषधनिर्माणशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण (एम फार्मसी) घेतलेल्या तोहीदला मुस्लिम समाजातील तरुणांमध्ये शिक्षणाविषयी दिसणारी उदासीनता सलत होती. स्वतः प्राध्यापक बनत असताना शिक्षण घेण्यात आलेले अडथळे तोहीदने जवळून अनुभवले होते.
संपूर्ण शिक्षण ग्रामीण भागात घेतलेल्या तोहीदने करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात सिप्ला या औषधनिर्माण कंपनीत काम केलं. टेरिटरी मॅनेजमेंट ऑफिसर या पदावर काम करत असताना औषधांच्या निर्मिती प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, डॉक्टरांचे सल्ले घेणं ही कामं तोहीद करायचा. या क्षेत्रातील बारकावे लक्षात आल्यानंतर प्राध्यापकी करत असतानाच फार्मसीच्या विद्यार्थ्यांना जॉबसाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचं प्रशिक्षण देण्याचं काम तोहीदने सुरू केलं. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात स्वतःमध्ये विकसित केलेल्या वक्तृत्व कौशल्याचा तोहीदला फायदा झाला. मुलांशी, शिक्षकांशी बोलताना तो शिक्षणाच्या उपयुक्ततेविषयी तळमळीने बोलायचा. या बोलण्याचा परिणाम विद्यार्थ्यांवरही होऊ लागला.
हेही वाचा - अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा : संभाजी ब्रिगेडचं रचनात्मक पाऊल
शालेय जीवनात तोहीदने एखाद्या वर्गात असलेल्या मुस्लिम मुला-मुलींच्या संख्येचं निरीक्षण केलेलं होतं. कुठल्याही वर्गात दोन किंवा तीन मुला-मुलींपेक्षा जास्त मुस्लिम विद्यार्थी संख्या तोहीदला आढळली नाही. एखाद्या मुस्लिमबहुल गावाचा अपवाद सोडला तर सगळीकडे हीच परिस्थिती. बरं, शाळा सोडून कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींमध्ये हे प्रमाण आणखी कमी झालेलं. मग मुस्लिम समाजातील मुलं-मुली नेमकं करतायत तरी काय? शिक्षण सोडून लग्न करण्याचा मार्ग स्वीकारलेल्या अनेक मुली तोहीदला आजूबाजूला दिसत होत्या. शिवाय भाजीपाला दुकान, फ्रुट स्टॉल, रंगकाम, बिगारी काम अशा कामात गुंतलेली मुस्लिम मुलंही तोहीदच्या पाहण्यात होतीच. या मुला-मुलींना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात आणावं, त्यांना चांगली नोकरी मिळवून द्यावी या उद्देशाने तोहीदने अबीद फाउंडेशन आणि IPTDP (इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल ट्रेनिंग, डेव्हलपमेंट अँड प्लेसमेंट अशा दोन संस्था सुरू केल्या. आबीद फाऊंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, अनाथ आणि अपंगांना मदत, गरजू मुलांना शालेय साहित्याचं वाटप, सामुहिक विवाह सोहळे, वृद्धाश्रमात मदत ही कामं केली जातात. याशिवाय विधवा, परित्यक्ता आणि देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठीही तोहीद काम करतो. गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तू आणि आरोग्यविषयक मदत मिळवून देणं हे काम प्रामुख्याने चालतं. कोल्हापूरमध्ये चालणाऱ्या या कामाचा हजारो महिलांना आधार आहे.
IPTDP या संस्थेच्या माध्यमातून नर्सिंग, डेंटल, बीएएमएस, एमबीबीएस, फार्मसी या विषयातील महत्त्वाच्या करिअर संधींविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. या संस्थेत सध्या वेगवेगळ्या प्रकारचे १० कोर्सेस शिकवले जातात. मेडिकल कोडिंग आणि मेडिकल स्क्राइबिंग हे परदेशातील आरोग्यव्यवस्थेत चालणारे महत्त्वाचे कोर्सेस महत्त्वाचे आहेत. यामध्ये पेशंटच्या समस्येचं निदान झाल्यापासून ते पेशंट पूर्णपणे बरा होईपर्यंत चालणाऱ्या प्रक्रियेची माहिती कोडिंगच्या माध्यमातून नोंदवणं, डॉक्टरांना असिस्ट करणं, गरजेच्या प्रसंगी पेशंटचं समुपदेशन करणं याचा समावेश होतो. आखाती देशांमध्ये म्हणजेच कुवैत, बहरीन, कतार, ओमान, सौदी अरेबिया आणि दुबईतील आरोग्यक्षेत्रात अशा प्रकारच्या आरोग्यसेवकांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या असतात याची माहिती तोहीदला होती. त्यानुसार त्याने विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केलं.
तोहीद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून मागील आठ वर्षांच्या काळात २० हजारहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं. या प्रशिक्षणामुळे दहा हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना देशासह परदेशात नोकरी मिळण्यासाठी मदत झाली. भारतातील मुंबई, पुणे, बंगलोर, हैद्राबाद, चेन्नई, नागपूर, नोएडा, विशाखापट्टणम, दिल्ली, गुजरात या मोठ्या शहरांमध्ये तोहीदचे विद्यार्थी काम करतायत. या नोकरीतून मिळणारा पगार प्रतिमहिना पंचवीस हजार ते दीड लाखांपर्यंत असल्याचं तोहीद सांगतो. ज्या विद्यार्थ्यांना वाटायचं की शिक्षण घेऊन आपल्याला मनासारखी नोकरी मिळणार नाही त्यांचा समज खोटा ठरवत तोहीदने त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम केलं. अनेक विद्यार्थ्यांना कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच इंटर्नशिप आणि नोकरीसुद्धा मिळाली. तोहीदमुळे नोकरी लागलेले तरुण-तरुणी भारतातील अनेक राज्यांत विखुरलेले आहेत. त्यापैकी काही उदाहरणं..
हेही वाचा - खेड्यापाड्यांत सोईसुविधा आणि रोजगार उभारणारा तन्वीर इनामदार
पंकज पाटील हा कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील नित्तुरचा तरुण. २०२२ साली बीफार्मसीचं शिक्षण घेतल्यानंतर त्याने एक वर्षं मेडिकलमध्ये काम केलं. हे काम सांभाळतच तो घरची शेतीही करत होता. पुन्हा शेतीमध्ये जास्त लक्ष दिल्यानंतर त्याने मेडिकलचा जॉब सोडला. मात्र त्यानंतर दीड वर्षांनी पैशांची चणचण भासल्याने तो पुन्हा काम शोधू लागला. मात्र वर्षभर त्याला मनासारखं काम मिळालं नाही. या काळात त्याने सेन्टरिंग काम, शेतमजुरीही केली. पुढे तोहीदच्या संपर्कात आल्यानंतर पंकजला सिप्ला कंपनीत नोकरी मिळाली. आता तो वार्षिक ४ लाख रुपये कमावत आहे.
. विनायक परीट हा राधानगरीजवळील शिरगावचा रहिवासी. बीएससी झालेल्या विनायकने काही दिवस गोव्यातील एका फार्मा कंपनीत काम केलं. पुन्हा करिअरची दिशा बदलत तो स्पर्धा परिक्षेकडे वळला. मात्र ३-४ वर्षांच्या प्रयत्नानंतरही अपेक्षित यश न मिळाल्याने त्याने पुन्हा फार्मा कंपनीत नोकरी शोधण्यासाठी धडपड सुरु केली. नोकरीमध्ये चार वर्षांचा गॅप असल्याने सहजासहजी नोकरी मिळत नव्हती. मात्र तोहीदच्या संपर्कातून विनायकला बेळगावच्या आनंद लाईफ सायन्सेस या फार्मा कंपनीत काम मिळालं.
कराडची पायल पुजारी ही मेहनती मुलगी. घरच्या बिकट परिस्थितीतून मार्ग काढत तिने एमफार्मचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही पायलला मनासारखं काम मिळत नव्हतं. शिवाय काही कंपन्यांच्या मुलाखती देताना पायल खूपच नर्व्हस झाली होती. पायलची ही अडचण तोहीदला समजल्यानंतर तोहीदने तिला ६ महिन्यांच्या क्रॅश कोर्सद्वारे मुलाखतीसाठी तयार केलं. याचा चांगला परिणाम पायलवर झाला. तिला बेळगावच्या खाजगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. एकूणातच काय केवळ मुस्लिम तरुणांना नाही, तर नोकरी आणि कौशल्याची आवश्यकता असणाऱ्या सर्व जाती-धर्मीय मुलांना मदत करण्यासाठी तोहीद प्रयत्नशील आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासोबतच विविध कॉलेजमधील शिक्षकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवण्याचं काम तोहीद करतोय. यामध्ये महाविद्यालयातील शिक्षकांना आरोग्यसेवा क्षेत्रातील नवीन संधींविषयी माहिती देणं, ही संधी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणती तयारी करून घ्यायची याविषयी चर्चा करणं हे काम तोहीद करतो. साधारण चार वर्षांपूर्वी महत्त्वाच्या औषधनिर्माण कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक तोहीदने घेतली. फार्मा कंपनीतील नोकरीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रशिक्षणाची चर्चा या बैठकीत करण्यात आली. शिवाय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालय पातळीवर कोणत्या उपाययोजना करता येतील यासंदर्भात प्राचार्यांच्या बैठकीचं नियोजनही तोहीद वरचेवर करत असतो.
हेही वाचा - व्यवस्थेला आव्हान देणारी शेतकरी महिला
महाविद्यालयीन जीवनातच शिक्षणाविषयीचं गांभीर्य ओळखलेल्या तोहीदने मुस्लिम समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी अनेक कल्पनांवर काम करायला सुरुवात केली आहे. मुस्लिम समाजात मदरशांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या मदरशांमध्ये जसं धार्मिक शिक्षण दिलं जातं त्याच प्रकारे रोजगार-नोकरीसाठी आवश्यक असणारं कौशल्य शिक्षणही दिलं जावं हा विचार तोहीदच्या मनात आहे. मुस्लिम समाजात उच्च शिक्षण घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज लक्षात घेऊनच त्यांच्यासाठी स्वतंत्र कॉलेजेस, विद्यापीठं सुरू करण्याचा तोहीदचा विचार आहे. महाविद्यालयांच्या मानांकनासाठी आवश्यक कागदपत्रांची, त्यासाठी लागणाऱ्या परवानग्यांची माहिती तोहीदने अनुभवातून मिळवली आहे. नॅशनल एक्रीडिएशन बोर्डच्या माध्यमातून महाविद्यालयांच्या पडताळणीसाठी जी प्रक्रिया राबवली जाते त्यात तोहीद प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी आहे. UGC, AICTE, MUHS, MSBTE सारख्या देशातील आणि राज्यांतील अनेक संस्थांच्या अंतर्गत जी महाविद्यालयं सुरू केली जातात त्यासाठी मुस्लिम बांधवांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्याची तोहीदची तयारी आहे. मुस्लिम समाजातील उद्योगपती, अल्पसंख्याक बोर्डाचे पदाधिकारी, वक्फ बोर्डाचे अधिकारी, मोठ्या मशिदींचे मौलाना, मुस्लिम स्कॉलर आणि संशोधक यांनी मुस्लिम समाजातील तरुणांसाठी स्वतंत्र कॉलेजेस सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी तोहीदची मागणी आहे. मुस्लिमांसाठी सुरू होणाऱ्या अशा प्रकारच्या कॉलेजांमुळे या समाजात शिक्षणाविषयीचं महत्त्व पटायला मदत होईल असं तोहीदला वाटतं.
कोरोना कालखंडापासून वैद्यकीय आणि फार्मसी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं निरीक्षण तोहीद नोंदवतो. कोरोना आल्यानंतर आरोग्यविषयक सोयी सुविधांची गरज जास्त जाणवू लागली. त्यामुळे अनेक औषधांच्या कंपन्या सुरू झाल्या, नवनवीन औषधं बाजारात आली. मेडिकलची संख्या वाढली. पर्यायाने नोकऱ्यांची संख्याही वाढली. मुस्लिम समाजातील तरुणांनी सद्यस्थितीत वाढलेल्या नोकऱ्यांची संधी हेरून स्वतःला सिद्ध करावं असं तोहीद म्हणतो. वैद्यकीय क्षेत्रातील मागील १०-११ वर्षांच्या अनुभवाने तोहीदला समृद्ध केलेलं असल्याने तो ठामपणे या क्षेत्रातील करिअरविषयी बोलू शकतो. याला जोडूनच युनानी ही प्राचीन वैद्यकीय पद्धती शिकून घेण्याचा सल्लाही तोहीद देतो. या उपचारपद्धतीचा मुस्लिम तरुण-तरुणींना सरकारी दवाखान्यांमध्ये तसेच खाजगी प्रॅक्टिससाठी फायदा करून घेता येईल असं तोहीदचं म्हणणं आहे.
हे काम करत असताना तोहीदच्या डोळ्यांसमोर पश्चिम बंगालमधील वली रहमानी या तरुणाचं उदाहरण आहे. वली हा कॉलेज जीवनात असल्यापासूनच सामाजिक कामांत सक्रिय होता. त्याचं काम प्रामुख्याने अनाथ मुलं आणि शिक्षण या विषयातील आहे. या कामासाठी त्याने स्वतःची उमेद फाउंडेशन ही संस्था सुरू केली. २८ वर्षीय वलीने २०२३ मध्ये अनाथ, गरजू आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी शंभर रुपये देण्याचं आवाहन लोकांना केलं होतं. दहा लाख लोकांनी शंभर रुपये दिले तर आपण जागतिक दर्जाची शाळा उभारू शकू असं वलीचं म्हणणं होतं. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी आठवडाभरातच तब्बल ७ कोटी रुपयांची मदत उभी केली. या मदतीतून वलीने अवघ्या एका वर्षांत दोन एकर जागेत सुसज्ज असं ग्लोबल स्कुल उभं केलं. आताच्या काळात मुलांना पारंपरिक शिक्षणासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कोडिंग आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सक्षम करणं गरजेचं असल्याचं वलीला वाटतं. वलीने त्याचं काम मागास आणि अल्पसंख्यांक मुलांसाठी सुरू केलेलं असलं तरी त्याच्या शाळेत सर्व जाती-धर्माच्या मुलांना मुक्त प्रवेश आहे.
हेही वाचा - उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन देणारा अवलिया - स्वप्नील पाटील
वलीच्या विचाराने प्रभावित झालेल्या तोहीदलाही महाराष्ट्रात गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी असंच काम उभारण्याची इच्छा आहे. भारतीय समाजावर प्रभाव असलेले माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम नॉलेज सिटी या नावाने हे काम उभं करण्याचा तोहीदचा मानस आहे. हे करत असताना तोहीदच्या डोळ्यांसमोर शिक्षणापासून वंचित असलेला मुस्लिम समुदाय प्रामुख्याने असला तरी इतर जातधर्मीय विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ मिळवून देण्याचा तोहीदचा विचार आहे. रमजानच्या महिन्यात प्रत्येक मुस्लिम बांधव जकात स्वरूपात काहीएक रक्कम धर्मकार्यासाठी जमा करत असतो. यापैकी काही मदत शैक्षणिक कामाकडे वळवली तर मुलांना चांगलं शिक्षण देता येऊ शकतं याचं कागदोपत्री हिशोब तोहीदकडे आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर भागात हुमायून मुरसल आणि सोलापूर भागात सरफराज अहमद यांनी अशाच प्रकारचं काम उभं केलेलं आहे. तोहीदला अशाच कामाचा विस्तार महाराष्ट्रभर करायचा आहे. सध्या तोहीदच्या संस्थेची कोल्हापूर (व्हीनस कॉर्नर), पुणे (शिवाजीनगर), मुंबई (कलिना) आणि गोवा (म्हापसा) अशा चार ठिकाणी ऑफिस आहेत. तिथे ५० हून अधिक जण स्वयंप्रेरणेने काम करतात. अर्थातच त्यांचं बाकी काम सांभाळत. यामध्ये विनोद चौगले, नोमन मुलाणी, गणेश कांबळे, आलिया पाटील, स्नेहल पाटील या सहकाऱ्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. दहा वर्षांतील सातत्यपूर्ण कामाच्या जोरावर तोहीदने देशभर चांगल्या सीएसआर कंपन्या, सामाजिक संस्थां आणि आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कामाच्या माणसांचं नेटवर्क तयार केलं आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्यासाठी तो कायम तत्पर आहे.
तोहीदच्या कामाला हातभार लावण्याची इच्छा असेल तर अधिक माहितीसाठी संपर्क - 9561593259
