पैठणी साडी हे महाराष्ट्राचं पारंपरिक वैभव. त्यातही ‘कापसे पैठणी’ या ब्रँडने गेल्या काही काळात देश-विदेशातल्या महिलांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. हा भरजरी ब्रँड उभा केलाय बाळासाहेब कापसे यांनी. ही झेप त्यांनी कशी घेतली याबद्दल त्यांच्याशी मारलेल्या गप्पा.
आपला आणि पैठणी व्यवसायाचा संबंध सर्वांत आधी कसा आला?
वयाच्या अकराव्या वर्षांपासून मी लहान-मोठ्या नोकऱ्या सुरू केल्या. आधी डॉ. अभय पटनी यांच्या हॉस्पिटलमध्ये झाडलोट, साफसफाई, संडास धुणे अशी कामं करत असे. तिथं दीड वर्ष काम केलं. मग ‘व्यंकटेश ट्रेडिंग कंपनी'त मालकाचं घर स्वच्छ करणं, गाईच्या धारा काढणं, शेण गोळा करणं आणि त्यांच्या दुकानातल्या उपरण्यांना गाठी मारणं अशी कामं होती. त्यानंतर ‘सोनी पैठणी' या दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या दुकानात नोकरी मिळाली. तिथे सलग अकरा वर्ष पडलेल्या कामापासून पैठणीच्या मार्केटिंगपर्यंत सगळी कामं केली. त्यातूनच मला पैठणीचं मार्केट पैठणी विणण्याचं तंत्र आणि एकूण व्यवसाय शिकता आला.
स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा कशी मिळाली?
‘सोनी पैठणी'साठी काम करत असताना मी मुंबई, कोलकाता, बेंगळुरू आणि अहमदाबाद अशा अनेक महानगरात मार्केटिंगसाठी जात असे. पण तिथे केवळ २२०० रुपये महिना इतक्या कमी पगारावर मला काम करावं लागत होतं. अनेकदा विनंती करूनही सोनी यांनी पगारवाढ अमान्य केल्याने स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. ‘कापसे पैठणी'ची सुरुवात अशी झाली.
‘सोनी पैठणी'मधून बाहेर पडल्यावर लगेच स्वत:चा व्यवसाय सुरू केला का?
नाही. माझ्याकडे वडिलोपार्जित अगदी थोडी शेती होती. त्या शेतात मी काम करू लागलो. मी बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात असल्याने संघात माझे बरेच मित्र होते. एवढा मार्केटिंगचा अनुभव असताना मी शेतात काम करणं त्यांना पाहवेना. इतक्या वर्षांमध्ये मिळवलेलं पैठणी व्यवसायाचं ज्ञान वापरून मी स्वतःचा उद्योग सुरू करावा, असं या मित्रांचं म्हणणं पडलं. म्हणून माझे धाकटे भाऊ आणि कुटुंबियांच्या मदतीने पहिला हातमाग घेतला आणि पैठण्या विणायला सुरुवात केली. पैठणी विणायचा वेग खूप कमी असतो म्हणून इतरांकडून पैठण्या घेऊन मार्केटिंग सुरू केलं. जसजसा मार्केटिंगमध्ये जम बसला तसतसे हातमाग वाढवले आणि व्यवसाय वाढत गेला.
येवल्याच्या इतर पैठणी उत्पादकांपेक्षा ‘कापसे पैठणी' हा ब्रँड कमी काळात मोठा झाला. ते कशामुळे?
मार्केटिंगसोबतच मी जाहिराती करण्यावर भर दिला. येवला आणि आसपासच्या बस स्टँडवर होर्डिंग लावले. गावात होर्डिंग लावले. टीव्हीवर जाहिराती दिल्या. ‘होम मिनिस्टर'सारख्या महिलांमध्ये लोकप्रिय असलेल्या मालिका प्रायोजित केल्या. त्यामुळे ‘कापसे पैठणी' हे नाव पुण्या-मुंबईत परिचित झालं. लग्न आणि इतर समारंभासाठी अनेक गावांमधून लोक येवल्याला आमच्या दुकानात येऊ लागले. इतक्या दुरून आलेल्या लोकांची पार्किंगची, चहा-पाण्याची, जेवण-खाण्याची आणि राहण्याची सोय आम्ही करू लागलो. त्यामुळे लोक आवर्जून दोन दिवस काढून येऊ लागले.
पैठण्यांच्या किमती खूप असल्याने त्याचा ग्राहकही चोखंदळ असतो. सतत नवनवीन डिझाईन्स तयार करण्याचं आव्हान तुम्ही कसं पेलता?
महिलांना आपल्या पैठणीच्या ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा' हवाच असतो. पण मोराबरोबरच अनेक ग्राहकांना बदक, हंस, कमळ, पंखा, उडते पक्षी किंवा राघू-मैना यासारखी नक्षी हवी असते. पिवळा, काळा, राखाडी, निळा, जांभळा, हिरवा किंवा गुलाबी अशा रंगांना खूप मागणी असते. शिवाय दरवर्षी बाजारात एखादी नवी फॅशन येत असते. हे सगळं लक्षात घेऊन नवनवीन डिझाईन्स तयार करणारी आमची टीम सतत कार्यरत असते.
पहिलं मोठं यश कधी मिळालं?
२०१२ मध्ये मला पहिलं मोठं यश मिळालं. इतकं की आमच्या बँक खात्यामध्ये पाच कोटी रुपये शिल्लक राहिले. माझ्यापुढे दोन मार्ग होते. पहिला म्हणजे ते पैसे गुंतवून नाशिक-पुणे अशा ठिकाणी पैठण्यांची मोठी शोरुम्स सुरू करायची. तसं केल्याने आणखी पैसे मिळाले असते. ‘माझे आणि माझ्या भावांचे मोठे बंगले झाले असते. दुसरा मार्ग म्हणजे मी ज्या ग्रामीण भागातला आहे, तिथे रोजगाराची गरज आहे. तिथे काम करत राहणं. मी दुसरा मार्ग निवडला. आज आमचे एक हजार हातमाग आहेत. त्यातून कितीतरी लोकांच्या हाताला काम मिळालं. शिवाय आमच्याकडे दोनशे-अडीचशे मूकबधिर तरुण-तरुणी आहेत. त्यांना हातमागावर पैठणी विणण्याचं प्रशिक्षण आम्ही दिलं आहे. नंतर त्यांना रोजगार तर दिलाच पण त्यांची राहण्याचीही सोय केली आहे.
आपण कमी काळात खूप मोठं यश संपादन केलं आहे. असं यश मिळवण्यासाठी उद्योजकांकडे कोणता गुण असायला हवा असं तुम्ही सांगाल?
मला वाटतं उद्योजकांनी शांत राहायला शिकणं गरजेचं आहे. माणूस रागीट असला की लोक त्याला आवडेल तेवढंच बोलतात. पण खरं बोलतातच असं नाही. कितीही संताप आला तरी मी ४८ तास त्यावर व्यक्त होत नाही. जेव्हा व्यक्त होतो तेव्हा आपोआपच त्यामागे समतोल विचार असतो. त्यामुळे सहसा नुकसान होत नाही. मला वाटतं प्रत्येक उद्योजकांनी हा गुण आत्मसात केला तर त्याचं खूप मोठं व्यावसायिक नुकसान टळेल.
आनंद अवधानी
आनंद अवधानी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आहेत. उद्योग आणि उद्योजकता विकास, प्रशासकीय अधिकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती, तसंच स्वयंसेवी संस्था आणि स्वयंप्रेरित व्यक्ती यांच्या कामाबद्दल त्यांना विशेष आस्था आहे.
