तन्वीर इनामदार हा पुण्यातील २९ वर्षांचा तरुण. त्याचं शालेय शिक्षण सरकारी शाळेत झालं आणि २०१७ मध्ये त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करून पाहण्याची त्याला आवड होती. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असतानाच त्याने प्लास्टिक कचऱ्यापासून काँक्रिट बनवण्याची एक भन्नाट शक्कल लढवली. त्याच्या या प्रयोगाची महाराष्ट्रभर दखल घेतली गेली आणि आज राज्यात पाच ठिकाणी तन्वीरचे प्लास्टिकपासून काँक्रिट बनवण्याचे कारखाने सुरू आहेत. शिक्षण संपल्यावर त्याने इतरांप्रमाणे नोकरी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं मन तिथे रमेना. आपण जे काही संशोधन करू, त्याचा उपयोग सामान्यातल्या सामान्य माणसाला व्हायला हवा, हा विचार त्याच्या मनात पक्का होता. हा विचार रुजवण्यात त्याची आई तमन्ना इनामदार यांचा मोठा वाटा आहे. तमन्ना या स्वतः सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका आहेत.
२०१८ मध्ये तन्वीरने ‘ट्रीआय’ (Treei - Technology, Recycle, environment, empowerment and Innovation) फाउंडेशनची स्थापना केली. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून समाजाचा रचनात्मक विकास करणं, हाच यामागचा मुख्य उद्देश. कुणालाही याचक न बनवता त्यांना त्यांच्या विकासात भागीदार करून घ्यायचं, ही तन्वीरची कामाची पद्धत. पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यांतील दुर्गम भागांत फिरताना त्याला जाणवलं की, रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत गरजांअभावी लोकांचं जगणं किती कठीण आहे. पिण्याचं पाणी आणण्यासाठी महिलांना आणि लहान मुलींना रोज ५-७ किलोमीटरची पायपीट करावी लागते, हे पाहून तन्वीर अस्वस्थ झाला. त्यातूनच त्याने ‘नीरचक्र’ नावाचं एक यंत्र तयार केलं. एका फेरीत चक्क १०० लिटर पाणी वाहून नेता येईल, अशी या नीरचक्राची सुटसुटीत रचना आहे. अगदी माफक दरात मिळणारं हे नीरचक्र आज पुणे, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांतील जवळपास ५० हजारांहून अधिक महिलांपर्यंत पोहोचलं आहे. यामुळे महिलांचे शारीरिक कष्ट तर कमी झालेच, पण त्यांचा वेळही वाचू लागला.
हेही वाचा - पाणीटंचाई बाया-बापड्यांच्या आरोग्यावर बेतते आहे
पुढे तन्वीरने आपला मोर्चा शालेय मुलांच्या शिक्षणाकडे वळवला. या उपक्रमाला त्याने 'ध्रुव प्रकल्प' असं नाव दिलं. पुणे, पुरंदर, बारामती, भोर, मावळ यांसारख्या भागांतील वस्त्या, झोपडपट्ट्या, शेतमजूर, ऊसतोड कामगार आणि वीटभट्टीवर काम करणाऱ्यांची मुलं ज्या शाळांमध्ये शिकतात, तिथे जाऊन तन्वीर आणि त्याच्या टीमने कामाला सुरुवात केली. पाचवी ते बारावीच्या मुलांना इंग्रजी आणि गणित हे अवघड वाटणारे विषय सोप्या भाषेत शिकवणं, त्यांना गोष्टी सांगणं आणि रोजच्या जगण्यात उपयोगी पडणारं व्यावसायिक शिक्षण देणं, असे उपक्रम इथे राबवले जातात. नुसतं पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यासाठी मुलांना कंपन्यांच्या भेटी घडवून आणल्या जातात, स्टेम लॅबमध्ये शिकवलं जातं आणि रोबोटिक्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाते. महिन्यातून एकदा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी मानसोपचार तज्ज्ञांमार्फत समुपदेशनही केलं जातं. गेल्या सहा वर्षांत पुणे जिल्ह्यातील ८० शाळांमधील जवळपास ५० हजार मुलांनी या ध्रुव प्रकल्पातून कौशल्य विकासाचे धडे गिरवले आहेत.
‘ट्रीआय’ फाउंडेशनमार्फत महिला सक्षमीकरणासाठी ‘एकलव्य’ हा प्रकल्प चालवला जातो. याअंतर्गत पुणे जिल्ह्यात महिलांचे ४०० बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. हे गट पाकीटबंद खाद्यपदार्थ आणि कॉर्पोरेट कंपन्यांसाठी लागणारी गिफ्ट्स तयार करतात. या महिलांना व्यवसायासाठी भांडवल मिळवून देणं, त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणं आणि मार्केटिंगचं प्रशिक्षण देणं, ही जबाबदारी तन्वीर आणि त्याचे सहकारी बजावतात. यातील बहुतांश महिला फारशा शिकलेल्या नाहीत, पण सातत्याने काम केल्यामुळे आता त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दलही त्या आता जागरूक झाल्या आहेत. या पूर्ण प्रकल्पाचं नेतृत्व तन्वीरच्या आई तमन्ना इनामदार करत आहेत.
हेही वाचा - महिलांना ‘उद्योजिका' बनवणाऱ्या ‘स्वयंसिद्धा'च्या कांचनताई परुळेकर
कोविडकाळात जेव्हा दाट वस्त्यांमध्ये निर्जंतुकीकरण करणं गरजेचं होतं, तेव्हा तन्वीरने पुढाकार घेतला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या क्षेत्रावर आणि दूरवर फवारणी करता येईल असा एक विशेष पंप त्याने विकसित केला. ‘दूत’ नावाच्या या प्रकल्पांतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक वस्त्यांमध्ये या पंपांच्या मदतीने स्वच्छता करण्यात आली.
तन्वीरने LGBTQI+ समुदायासाठीही काम सुरू केलं आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर, कामाठीपुरा, पनवेल आणि ठाणे या भागांत ‘थर्ड व्हील’ नावाचा प्रकल्प राबवला जातो. या समुदायातील लोकांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका पारलिंगी व्यक्तीला फूड ट्रक सुरू करून देण्यात आला आहे. त्यासोबतच काही नामांकित कंपन्यांमध्ये रिसेप्शन, मॅनेजमेंट किंवा ऑफिस कामासाठी या व्यक्तींची शिफारस केली जाते, जेणेकरून त्यांना सन्मानाचं आयुष्य जगता येईल.
हेही वाचा - उंबऱ्याबाहेरची दिवाळी
तन्वीरचं पुढचं पाऊल होतं ते म्हणजे वीज समस्येवर तोडगा काढणं. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अशी अनेक गावं आहेत, जिथे आजही वीज पोहोचलेली नाही. तन्वीरने २०२२ मध्ये ‘मिशन ऊर्जा’ सुरू केलं. मुळशी, भोर, मावळ तालुक्यातील अनेक आदिवासी बांधवांकडे कागदपत्रांची कमतरता असल्याने त्यांना सरकारी योजनांचे लाभ मिळत नव्हते. तन्वीरने प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
सुरुवातीला काशिंग, डावजे, वातुंडे आणि जोवन या गावांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले. केवळ घरांतच नाही, तर सार्वजनिक ठिकाणी सेन्सरवर चालणारे पथदिवे आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले. प्रत्येक कुटुंबाला एक किलोवॅट वीज मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली. पण इथेही तन्वीरने आपली ‘भागीदारी’ची पद्धत सोडली नाही. प्रत्येक कुटुंबाकडून २० तासांचं श्रमदान करून घेण्यात आलं. तसंच प्रकल्पाच्या भविष्यातील देखभाल-दुरुस्तीसाठी दरमहा १०० रुपये प्रत्येक कुटुंबाकडून जमा केले जातात. आज या गावांच्या बँक खात्यात देखभाल निधी म्हणून लाखो रुपये जमा आहेत. याचं व्यवस्थापन करण्यासाठी गावातीलच पाच व्यक्तींची (३ पुरुष आणि २ महिला) समिती नेमली आहे, ज्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो. २०२५ पर्यंत ४० गावांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला असून, या कामासाठी गावातीलच ९० हून अधिक तरुणांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. हाच सौरऊर्जेचा प्रकल्प तन्वीरने तिकोना, कोरीगड आणि घनगड या किल्ल्यांवरही राबवला असून, येत्या तीन वर्षांत महाराष्ट्रातील ५० किल्ले अशा प्रकारे उजळून टाकण्याचं त्याचं स्वप्न आहे.
हेही वाचा - वीज आली, वीज आली!
नद्यांच्या स्वच्छतेसाठी तन्वीरने ‘धारा’ नावाचा प्रकल्प हाती घेतला आहे. मुळा-मुठा नदीच्या शुद्धीकरणासाठी त्याला पुणे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेकडून परवानगी मिळाली आहे.
त्याच्या कामाची पद्धत पाहून इंजिनिअरिंग, बँकिंग, मॅनेजमेंट आणि सोशल वर्क अशा विविध क्षेत्रांतील अनेक तरुण आता त्याच्याशी ‘व्हॉलेंटियर’ म्हणून जोडले गेले आहेत. प्रिया जोशी, अंजुम इनामदार, नागेश गायकवाड आणि अभिजीत पाटील ही त्याची टीम ‘ट्रीआय’चा हा डोलारा समर्थपणे सांभाळत आहे. रवींद्र धारिया यांच्या मार्गदर्शनाचाही त्याला मोठा लाभ होतो. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीएसआर योजनेतून ‘ट्रीआय’च्या कामाला आर्थिक मदत होते आहे.
‘मिशन ऊर्जा’च्या माध्यमातून १०० गावं सौरऊर्जेने उजळणं, ‘एकलव्य’मधून ५०० बचत गट कायमस्वरूपी सक्रिय करणं आणि 'ध्रुव' प्रकल्पातून एक लाख विद्यार्थ्यांना कौशल्यवान बनवणं, ही तन्वीरची आगामी उद्दिष्टं आहेत. ज्यांच्यासाठी काम करायचं, त्यांनाच त्या कामाचा मालक बनवणं, हेच त्याचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे तन्वीर इनामदार हा खऱ्या अर्थाने ‘सोशल इंजिनिअर’ आहे, असंच म्हणावं लागेल.
