आम्ही कोण?
माणसं आणि कामं 

अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा : संभाजी ब्रिगेडचं रचनात्मक पाऊल

  • योगेश जगताप
  • 25.09.25
  • वाचनवेळ 9 मि.
ahad australia tahad canada

सांगोल्याचा विशाल हा एक उमदा तरुण. घरची परिस्थिती तशी बेताचीच. आई शेतमजूर, तर वडील बिगारी कामगार. घर साधं पत्र्याचं. विशाल शिकला खरा, पण त्याला मनासारखं काम मिळत नव्हतं. एका स्थानिक पुढाऱ्याच्या संस्थेत त्याने सहा वर्षं शिक्षक म्हणून काम केलं. शिवाय त्याची पडेल ती कामं विशाल करायचा. पगार किती...तर महिन्याला अवघे तीन हजार रुपये. केव्हाना केव्हा आपल्याला कामावर पर्मनंट करून घेतील, या आशेवर तो होता. पण एक दिवस संस्था मालकाने पैसे घेऊन दुसऱ्यालाच पर्मनंट केलं. वैतागलेल्या विशालने झटक्यात ती नोकरी सोडली.

त्याच दरम्यान त्याला परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या एका ग्रुपची माहिती मिळाली. त्या ग्रुपच्या माध्यमातून विशालने कागदपत्रांची पूर्तता केली, आणि आश्चर्य म्हणजे त्याला थेट आफ्रिकेतल्या कांगो देशात नोकरी मिळाली. एका खाणकाम साईटवर सुपरवायजर म्हणून त्याने दीड वर्षं काम केलं. त्यानंतर तो घरी परतला आणि त्याने स्वतःचं पक्कं घर बांधलं. आईसाठी दागिने केले, साड्या घेतल्या. वडिलांनाही चांगले कपडे घेतले. हे ज्यांच्यामुळे शक्य झालं, त्या प्रवीणदादांच्या गळ्यात पडून तो ओक्साबोक्शी रडला आणि पुन्हा दूरदेशी कामाला जाण्यासाठी सज्ज झाला.

ahad australia tahad canada

विशालसारखी महाराष्ट्रातील आठ हजारांहून अधिक मुलं आज जगभरातल्या साठहून अधिक देशांत स्वतःच्या हिमतीवर नोकरी करत आहेत. यामध्ये दहावी पास/नापास झालेल्यांपासून ते अगदी मास्टर्स डिग्री घेतलेल्या मुलांचाही समावेश आहे. परदेशात नोकरी मिळवण्याचा हा सिलसिला २०१८ मध्ये सुरू झाला आणि आता तो अधिक जोमाने पुढे जात आहे. या सगळ्यामागे आहेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि त्यांची बारा जणांची टीम.

उपक्रमाची सुरुवात कशी झाली?

प्रवीण गायकवाड यांचं मूळ गाव पुण्यातील मुंढवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सखवारबाई गायकवाड यांच्या घराण्यातील ते आहेत. पुढे ते एक यशस्वी व्यावसायिकही झाले. परंतु, कॉलेज जीवनापासून त्यांना सामाजिक चळवळीचं वेड होतं. पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाचं काम महाराष्ट्रभर वाढवलं होतं. संभाजी ब्रिगेड ही त्याचीच एक शाखा. ब्रिगेडमध्ये तरुणांचा भरणा मोठ्या प्रमाणात. याच उत्साही तरुणांपैकी प्रवीणदादा एक. त्यांनी स्वतः संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात मोठं संघटन उभं केलं. महामानवांचा विचार बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करायचे. मराठा समाजासमोरील प्रश्न घेऊन रस्त्यावरची लढाई करायलाही ते कायम तत्पर असायचे. हे काम करत असताना तरुणांच्या आर्थिक स्थैर्याचा प्रश्न फार मोठा आहे, असं त्यांच्या लक्षात आलं. पण 'फक्त आंदोलनं, मोर्चे आणि यात्रा काढून काही होणार नाही, तर यात सहभागी होणाऱ्या तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायला हवं,' असा विचार प्रवीणदादांच्या मनात घोळू लागला.

हा विचार डोक्यात असतानाच त्यांनी २०१४ साली काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन दुबईचा अभ्यासदौरा केला. पाण्याची प्रचंड कमतरता असतानाही दुबईने केलेली प्रगती त्यांनी प्रत्यक्ष जाऊन बघितली. दुबईत टॅक्सी, हाऊसकीपिंग, हॉटेल सर्व्हिस अशा वेगवेगळ्या सेवा देणारे लोक हे भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका या देशांतून आल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. 'शिक्षण आपल्या देशात आणि नोकरी मात्र परदेशात' हा पॅटर्न त्यांना या लोकांमध्ये दिसला. दुबईतल्या स्थानिक वर्तमानपत्रात त्यांना केरळबद्दलची एक वेगळीच बातमी वाचायला मिळाली. परदेशात, विशेषतः आखातात कामाला असणाऱ्या केरळी बांधवांकडून दरवर्षी काही लाख कोटी रुपये केरळला पाठवले जातात, अशी ती बातमी होती.

या बातमीने प्रवीणदादांच्या डोक्यातलं चक्र फिरू लागलं. त्यांनी शोधाशोध सुरु केली तेव्हा भारतातील पंजाब, हरयाणा, गुजरात या राज्यांतील अनेक लोक नोकरीच्या शोधात ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासारख्या देशांत जाऊन स्थिरावल्याचं त्यांच्या लक्षात आलं. सुरुवातीला एक जण तिथे जातो, स्वतःचा जम बसवतो आणि नंतर आपल्या इतर सहकाऱ्यांसाठी तिथे संधी तयार करतो, असा पॅटर्न त्यांच्या लक्षात आला. यामुळे काही वर्षांतच भारतीयांचे त्या त्या देशात मोठे समूह तयार होतात, हे त्यांना त्यांच्या व्यावसायिक मित्रमंडळींकडून समजलं. गुजरातमधील मधापूर गावात परदेशातील भारतीयांनी पाठवलेला पैसा काहीशे कोटींच्या घरात असल्याची बातमीही त्यांच्या वाचनात आली. तुलनेत, महाराष्ट्रातून कामासाठी परदेशात जाणाऱ्या लोकांचं प्रमाण खूपच कमी दिसत होतं. माहितीचा अभाव हे त्यामागचं एक प्रमुख कारण असल्याचं त्यांनी ओळखलं.

यानंतर त्यांनी २०१५ ते २०१८ या काळात वेगवेगळ्या देशांतील नोकरीच्या संधींचा बारकाईने अभ्यास केला. आपल्याकडे आयटीआयमध्ये मिळणारं कौशल्य वापरूनही परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते, हे या अभ्यासातून प्रवीणदादांच्या लक्षात आलं.

'अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा'चा जन्म

केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत देशभरात कन्सल्टंट नेमले जातात आणि त्यांच्या माध्यमातून परदेशातील नोकऱ्यांची माहिती मिळते, हे प्रवीणदादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना समजलं. महाराष्ट्रात मुंबईत त्यांचं ऑफिस असून तिथे दर महिन्याला परदेशातील शेकडो रोजगार संधींचे अपडेट येतात, हे कळताच प्रवीणदादांनी तात्काळ कामाला सुरुवात केली.

'अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा... अवघा मुलुख आपला' हे नाव त्यांनी आपल्या परदेशी नोकरीच्या उपक्रमाला दिलं. आपल्या सर्वात पूर्वेला असलेल्या ऑस्ट्रेलियापासून ते सर्वात पश्चिमेला असलेल्या कॅनडापर्यंत मराठी तरुणांना नोकऱ्या मिळवून द्यायच्या, असा निर्धार त्यांनी केला. या नोकऱ्या प्रत्येक जात-धर्माच्या तरुणांसाठी असतील हे त्यांनी पक्कं केलं.

२०१८ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईपर्यंत प्रवीणदादा वीसहून अधिक देशांत जाऊन आले होते. आजवर त्यांनी जगभरातील ६३ देशांचा प्रवास केला आहे. आर्टस्, कॉमर्स, आयटीआय करून जी मुलं महाराष्ट्रात १०-१२ हजारांवर काम करतात, त्यांनाच परदेशात सहज ५० हजारांची नोकरी मिळू शकते, असा विश्वास प्रवीणदादा इतक्या वर्षांच्या अनुभवातून देतात. "आपल्या मुलांना गाव सोडून बाहेर जायचं नसतं, नव्या संधी शोधायच्या नसतात, इथंच सगळं घोडं अडतं," असं ते खेदाने म्हणतात. महाराष्ट्रातील ज्या भागांत दुष्काळ, नापिकी आणि बेरोजगारीचं संकट आहे, तिथल्या होतकरू तरुणांनी स्वतःला एक संधी देत परदेशी नोकरीचा विचार करायलाच हवा, असं प्रवीणदादांना वाटतं.

टीमचं काम आणि फसवणुकीला आळा

नोकरीसाठी परदेशात जायचं म्हणजे कागदपत्रांची जमवाजमव हा महत्त्वाचा भाग आला. यामध्ये शैक्षणिक कागदपत्रं, पासपोर्ट, व्हिसा, कौशल्य आणि अनुभव प्रमाणपत्र यांचा प्रामुख्याने समावेश होतो. या कागदपत्रांची पडताळणी करून तरुणाला योग्य त्या कन्सल्टंटपर्यंत पोहोचवण्याचं काम 'अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा'ची टीम करते. या टीमचं प्रमुख म्हणून अजयसिंह सावंत हे काम पाहतात.

ahad australia tahad canada

काही नोकऱ्यांसाठी कन्सल्टंटकडे प्रोसेसिंग फी भरावी लागते. त्याची माहितीही टीममार्फत दिली जाते. नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारे अनेक लोक बाजारात आहेत. अशी फसवणूक होऊ नये, यासाठी टीम सांगेल त्या प्रक्रियेतूनच आणि योग्य कन्सल्टंटच्या माध्यमातूनच पुढे जायला हवं, असं अजयसिंह सावंत सांगतात. परदेशात काम करण्यासाठी फाडफाड इंग्रजी यायलाच हवं असं काही नाही. बरीचशी कामं ही सेवा क्षेत्रातील असल्याने तिथे इंग्रजी अगदीच नाही जमलं किंवा कामचलाऊ पद्धतीचं जमलं तरी पुरतं. शिवाय, कामाची लाज न बाळगता 'काहीतरी शिकायला मिळेल आणि चार पैसेही मिळतील' या भावनेतून काम करणाऱ्या प्रत्येक तरुणाने या उपक्रमाच्या माध्यमातून स्वतःची प्रगती केल्याचं सावंत मागील सात वर्षांच्या अनुभवावरून सांगतात.

काम मिळण्याची प्रोसेस कशी असते?

'अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा'च्या फेसबुक पेजला १५ हजारांहून अधिक, तर व्हॉट्सॲप ग्रुपला ४ हजारांहून अधिक तरुण जोडले गेले आहेत. सोशल मीडियावर कोणत्याही देशातील नोकरीची जाहिरात आल्यानंतर, तरुणाने आपल्याला यापैकी कुठल्या कामात जाता येईल हे ठरवायचं असतं. अनेकदा नोकरीसाठी आवश्यक असलेलं संदर्भ साहित्य व्हॉट्सॲप ग्रुपवर उपलब्ध करून दिलं जातं. यानंतर तरुणांनी नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये स्वतःकडे आहेत का, हे तपासून पाहायचं.

त्यानंतर नोकरीची जाहिरात आणि स्वतःचा सीव्ही (CV) टीमकडे पाठवायचा. टीममार्फत त्याची पडताळणी होऊन तो कन्सल्टंटकडे पाठवला जातो. त्यानंतर तरुणाची मुलाखत घेतली जाते. उपलब्ध काम आणि अर्ज केलेला तरुण यांचा मेळ बसल्यानंतर व्हिसासाठी अर्ज केला जातो. संबंधित कंपनीला कामगार मिळाल्याचं अधिकृतपणे कळवलं जातं. पुढे सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर तरुणाची नोकरी पक्की होते. जाहिरात निघाल्यापासून ते प्रत्यक्ष कामावर हजर होईपर्यंत साधारणतः १ ते ३ महिन्यांचा कालावधी लागतो.

कोणत्या प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध असतात?

तुमचं शिक्षण आणि कौशल्य यांनुसार कामाच्या संधी उपलब्ध असतात. जेमतेम शिक्षणाच्या आधारावर हाऊसकीपिंग, हॉस्पिटल सर्व्हिस, जिम ट्रेनर, योगा ट्रेनर, टेक्निकल फिल्डमधील अनेक जॉब्स (उदा. फिटर, वेल्डर, प्लंबर, सेफ्टी ऑफिसर, सुपरवायजर, वायरमन इत्यादी), शिक्षक, पेंटर, बागकाम करणारा, ड्रायव्हर, सुरक्षारक्षक ही कामं उपलब्ध असतात. तर चांगल्या शिक्षणाच्या आणि कौशल्याच्या आधारावर इंजिनिअर, डॉक्टर, प्राध्यापक, मॅनेजमेंटमधील संधीही तरुणांसाठी उपलब्ध असतात. काही जणांनी तर परदेशातच लेबर सप्लाय चेन सुरू केली असून, ते वेगवेगळ्या उद्योगांसाठी लागणारं कुशल मनुष्यबळ पुरवण्याचं काम करतात. अशा कामातून ते आपल्या देशातील इतर बांधवांसाठी स्वतःहून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात नोकरीसाठी गेलेले तरुण काही वर्षं काम करून चांगले पैसे कमावतात आणि परत भारतात येऊन आपल्या गाव, तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याचीही काही उत्तम उदाहरणं आहेत.

आखाती देशांमध्ये तुलनेने नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध असतात. मात्र युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि अमेरिका खंडात कामासाठी जाणाऱ्या तरुणांचं प्रमाणही मोठं असल्याचं मागील सात वर्षांतील आकडेवारीवरून दिसतं. २०२२ साली संभाजी ब्रिगेडच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त एक अधिवेशन घेण्यात आलं होतं. तेव्हा परदेशात नोकरी मिळालेल्या हजारो तरुणांनी व्हिडीओ संदेशांच्या माध्यमातून 'अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा' उपक्रमाविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती.

हजारो यशस्वी कथा

"आम्ही आंदोलन करणाऱ्या तरुणांच्या हातात तलवारी आणि काठ्या दिल्या नाहीत, आम्ही त्यांच्या हाती व्हिसा दिला आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलं," हे प्रवीणदादा आज अभिमानाने सांगतात, कारण त्यामागे हजारो सक्सेस स्टोरीज आहेत. नोकरीच्या निमित्ताने आधी गावगाड्यातला एक तरुण परदेशात गेला, मग त्याच्यामुळे त्या गावातले दोन-पाच-दहा लोक परदेशात स्थिरावले, पैसे कमवू लागले आणि स्वतःचं कुटुंब सावरू लागले. ही साखळी दिवसेंदिवस वाढतच आहे. ज्या तरुणांच्या लग्नाची अडचण होती, त्यांची लग्नं झाली. ज्या कुटुंबाने अठराविश्व दारिद्र्य अनुभवलं, ते कुटुंब आता सुखी-मध्यमवर्गीय आयुष्य जगतंय. जो तरुण रोजगार नसल्याने आत्महत्येच्या विचारात होता, तो आता पाच आकडी पगार मिळवू लागलाय. ज्यांची घरं नव्हती, त्यांची पक्की घरं झाली. या आणि अशा अनेक कहाण्या तुम्हाला 'अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा'च्या सोशल मीडियावर वाचायला आणि पाहायला मिळतील. योग्य वेळी मिळालेली एक संधी तुमचं आयुष्य कसं बदलू शकते, हे या उपक्रमाने दाखवून दिलं आहे.

चळवळींशी जोडलेला तरुण सामाजिक दृष्ट्या संवेदनशील होत जातो पण त्याचबरोबर तो आर्थिकदृष्ट्याही सक्षम व्हायला हवा यासाठी प्रवीण गायकवाड आणि सहकाऱ्यांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडासारखा रचनात्मक प्रयोग सुरु केला. या माध्यमातून बहुजन समाजातील हजारो तरुणांना चांगली नोकरी मिळाली. ते मोठी स्वप्नं बघू लागले. हा प्रयोग अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवा.

अधिक माहितीसाठी संपर्क - अजयसिंह सावंत - 9881254345

योगेश जगताप | 9561190500 | yogeshjagtap8819@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 16

Ujwala Mehendale17.10.25
अप्रतिम उपक्रम! खूप चांगलं काम.

Rushikesh Ramchandra Patil28.09.25
khup chan mahiti milali tumchya kadun uplanbh honarya opportunities mazya sathi new direction milvun denarya tharu shaktat

Datta Wable 26.09.25
खूप खूप अप्रतिम प्रकल्प आहे हा, मी पण याचा भाग होऊ इच्छित आहे. मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे मी पण परदेशात जॉब शोधत आहे, गायकवाड दादां नी सावंत दादांचा खूप खूप अभिमान वाटत आहे, एक प्रकारचे खूप खूप पुण्याचे काम आहे, यामुळे खूप खूप पुण्य मिळत आहे. माझाही या उपक्रमाला लवकरात लवकर हातभार लागेल हीच इच्छा करतो. आपल्या या उपक्रमाला खूप खूप प्रगती येऊ आणि खूप खूप शुभेच्छा

Shahanavaj Shaikh26.09.25
The best favour to the people who lost guidance/and the true efforts to make the future of maharashtrian society ... Salute to your dedication and efforts 🫡🚩🚩🚩

Akshay Suresh gangan26.09.25
खूप छान

SUNIL KONDIBA26.09.25
अतिशय सुंदर उपक्रम आहे ..सर्व टीम चे व प्रवीणदादा चे मनापासून अभिनंदन व आभार

मोहनराव25.09.25
खूप स्तूत्य उपक्रम आहे. प्रविणदादा आणि टिमचे कौतुक .

Ganesh Jagtap25.09.25
जय जिजाऊ जय शिवराय खूप छान योगेशजी मस्त लिखाण केले तुम्ही. खिशात गांधी आणि डोक्यात शिवाजी हा लाख मोलाचा संदेश दादांनी आम्हा कार्यकर्त्यांना दिला.. आपण आज देशातील जि परिस्थीती पाहाता.. आम्हाला प्रवीण दादांचा खुप अभिमान वाटतो.. मितर अस म्हणतो की दादांनी आमच्या हातात पुस्तक देऊन आमच्या सारख्या हाजारो कार्यकर्तेनवर खुप उपकार केलेत... असो आपण खूप छान आणि माहीती पुर्ण लेख लिहिलात.. खुप छान आणी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला असच छान छान लिहीत राहा

Rajesh25.09.25
Good Please arrange your guidance camp at NAGPUR —- RAJESH NIMBALKAR

डॉक्टर दत्तात्रय हरिदास जाधव25.09.25
dattabhau99@gmail.com

Vikas25.09.25
खुपच छान उपक्रम आहे सर, मी 'अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा' च्या मार्फत कतार ला आलो आहे.

Ravindra Sakhalkar25.09.25
धन्यवाद साहेब. कोणीतरी आहे मार्गदर्शन, मदत करण्यासाठी यामुळे खूप बरं वाटलं. या उपक्रमामुळं सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिक सक्षम होण्यासाठी मदत होईल.

Azim Shaikh25.09.25
आ. प्रवीण दादाना मी गेली २००२ पासून ओळखत आहे. मी स्वतः २० वर्षे परदेशात काम केले असून आपला मराठी टक्का नसल्याचे शल्य नेहमी बोचत असायचे. कारण प्रामुख्याने त्यांच्या म्हणजे केरळी, पंजाबी वगैरे लोकांच्या मजबूत संघटना असतात व त्यांच्या ग्रुप मध्ये मराठी लोकांना सहजासहजी शिरकाव नसे, एखाद्या कंपनीत काही वैकन्सी निघाली तर ते आपलीच लोक घेण्यासाठी उत्सुक असतात. अशा वेळी आपलीपण एखादी संघटना असावी व त्या द्वारे आपल्या मराठी लोकांना पण अशा संधी मिळाल्या पाहिजेत असे नेहमीच वाटायचे. ही निकड आ. प्रवीण दादांनी भरून काढली आहे. खरेतर ही काळाची गरज आहे असे मला प्रामाणिक पणे वाटते. मी ह्या उपक्रमात सक्रिय सहभागी नेहमीच राहिलो आहे. त्यांचा हा उपक्रम स्तुत्य असून माझ्यातर्फे “अहद ऑस्ट्रेलिया- तहद कॅनडा, अवघा मुलुखची आपुला” ह्या संघटनेला व आ. प्रवीण दादाना हार्दिक शुभेच्छ्या..!!!

Rajgude Tanaji25.09.25
अतिशय सुंदर उपक्रम आहे

Sunil Pandit 25.09.25
खुप छान उपक्रम आहे साहेब, मी आहे आपल्या ग्रुप मध्ये

Unknown 25.09.25
महाराष्ट्रातील तरुणांसाठी महत्त्वपूर्ण माहिती एकत्रित या जमवण्यासाठी लेखकाने केलेले कष्ट नक्कीच कौतुकास्पद आहेत....

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results