मासिक वाचकाच्या हातात पडतं तेव्हा त्याला पहिल्यांदा दिसतं ते त्याचं मुखपृष्ठ. तिथूनच वाचकाशी संवाद सुरू होतो. संवादाचं हे माध्यम पूर्ण क्षमतेने वापरलं जावं यासाठी आम्ही अगदी सुरुवातीपासून प्रयोग करत आलो आहोत. २००१च्या आधीच्या अंकांमध्ये चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केलेल्या प्रयोगांबद्दल मी आधी सांगितलंच आहे. पुढे २०११ पर्यंत म्हणजे तब्बल दहा वर्षं आमचा चित्रकार मित्र श्याम देशपांडे ‘अनुभव'ची मुखपृष्ठं सजवत होता. २०१२ पासून आम्ही आणखी एक गोष्ट करून पाहतोय. ती म्हणजे जानेवारी ते दिवाळी या काळातील अंकांच्या कव्हरस्टोरींची थीम पक्की करणे. उदाहरणार्थ, २०१२ मध्ये वर्षभर जगावेगळ्या अनुभवांची लड आम्ही लावली होती. त्यातून किती वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आणि मुखपृष्ठंही समोर आली! २०१३ साली वेगळीच कल्पना निघाली. संपर्क क्रांतीमुळे माणसांमध्ये होत असलेल्या बदलांचं प्रतिबिंब उमटेल असा पानभराचा मजकूर आम्ही वर्षभर छापला. ही कल्पना होती ताज्या दमाचा लेखक अवधूत डोंगरे याची. त्यानेच वर्षभर हा मजकूर लिहिला होता आणि त्यावर गिरीश सहस्रबुद्धे या आमच्या चित्रकार मित्राने वर्षभर मुखपृष्ठं केली होती. हा प्रयोग अभिनव ठरला. २०१४ साली डॉ. समीर कुलकर्णी यांची तत्त्वज्ञानाची डूब असलेल्या ललित लेखांची मालिका चालवली गेली. त्याआधी तीन-चार वर्षं त्यांनी ‘अनुभव'मध्ये वेळोवेळी सुंदर आणि खोल अनुभव देणाऱ्या दीर्घकथा लिहिल्या होत्या. त्या वाचकांना भलत्याच आवडल्या होत्या. त्यामुळे त्यांनी वर्षभर लिहावं असं ठरलं. आपण व्यवहारात जे शब्द सहजपणे वापरतो त्या शब्दांचे खोल अर्थ अनुभवांच्या मदतीने मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. याही वेळी त्यावर चित्रं काढण्याचं आव्हान गिरीश सहस्रबुद्धे यांनी स्वीकारलं आणि हाही प्रयोग वर्षभर चालला. २०१५ मध्ये महाराष्ट्रातील तरुण आणि चळवळ्या पत्रकारांचे एक से एक रिपोर्ताज-शोधलेख प्रसिद्ध केले गेले. वर्तमानपत्रं आणि वृत्तवाहिन्यांमध्ये सजगपणे काम करणाऱ्या मंडळींनी हे लेख लिहिले. ‘अनुभव'च्या वाचकांपलीकडे ‘फेसबुक' वगैरेंवरही हे लेख बरेच वाचले-चर्चिले गेले. आम्ही चालवलेल्या प्रयोगाची तरुण वाचकांकडून मिळणारी ती पावतीच म्हणायची!
‘अनुभव' चालवताना केलेला हा खटाटोप कुणा एक-दोघांच्या बळावर होणारा नाही, हे कुणालाही कळू शकतं. पहिली दहा-अकरा वर्षं मनोहर सोनवणे आणि अमृता वाळिंबे या दोन सहकाऱ्यांची साथ होती, तर नंतर गौरी कानेटकर आणि महेंद्र मुंजाळ या दोन नव्या सहकाऱ्यांनी अंकात बरंच भरीव काम केलं. अनेक तरुण मंडळी सोबतीला घेऊन ‘अनुभव' एकेक दमदार पाऊल टाकत पुढे निघाला आहे.
... तर ‘अनुभव'च्या गेल्या पंधरा वर्षांच्या प्रवासाची गोष्ट थोडक्यात अशी आहे. तीही अगदी ठळक ठळक गोष्टींमधून पुढे आलेली. ‘अनुभव' सुरू करताना आणि चालवताना त्यामागे भूमिका काय असते त्याचा निर्देश व्हावा एवढ्यासाठी लिहिलेली. ही गोष्ट यापलीकडे बरीच पसरलेली आहे, पण ती सांगण्याचा मोह आवरतो. फक्त मुद्याचं तेवढं सांगतो.
हेही वाचा - ‘अनुभव' नावाचा प्रयोग - भाग एक
मासिक म्हणजे चौसष्ट (किंवा आता ऐंशी) पानं भरून काढण्यासाठी आणि जाहिराती वगैरे मिळाव्यात म्हणून वाट्टेल त्या गोष्टी करण्यासाठी काढण्याचं प्रकरण नाही, अशी आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. मासिक काढणं ही एक गंभीर कृती आहे आणि ती गंभीरपणेच करायला पाहिजे, अशी आमची धारणा आहे. आपली पिढी जर मागील दोन-चार पिढ्यांच्या सर्जनावर पोसली गेली असेल, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी आपलीही काही जबाबदारी असणार, असा विचार करून आम्ही ‘अनुभव' काढतो. आपल्या आणि आपल्या मागच्या-पुढच्या पिढ्यांचे सर्जन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपण अंशत: तरी पार पाडायला हवी, अशी आमची भावना आहे. त्यामुळेच ‘अनुभव' हे विशिष्ट विचार, विशिष्ट शैली, विशिष्ट आग्रह यांपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतं. अर्थात, कोणत्याही व्यासपीठाचे काही संकेत असतात, तसे ‘अनुभव'चेही आहेत. उदाहरणार्थ, भावनेच्या आहारी न जाणं, तडक-भडकपणाला थारा न देणं, समतोल आणि संतुलित विचारांना प्राधान्य देणं, वैयक्तिक टीका-टिप्पणी आणि हेत्वारोपांपासून दूर राहणं, घटना-घडामोडींकडे तटस्थ-त्रयस्थपणे पाहण्याचा प्रयत्न करणं, कोणतेही जातीय-धार्मिक - भाषिक - वर्गीय पूर्वग्रह बाळगून न लिहिणं, वगैरे वगैरे. दुसरी गोष्ट म्हणजे ‘अनुभव'चा अंक सर्वसमावेशक असावा यासाठी सर्व सामाजिक - आर्थिक थरांतील विषयांचा आणि लेखकांचा समावेश असावा, असा आमचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो. आमच्या संपादकीय विभागातही या प्रयत्नांचं प्रतिबिंब पडलेलं असावं, असं आम्ही पाहतो. समकालीन वास्तवाच्या अधिकाधिक जवळ पोहोचण्यासाठी या प्रयत्नांची आम्हाला विशेष गरज वाटते. तीस-चाळीस वर्षांपूर्वी मराठीत बंडखोर ‘लिटिल मॅगेझिन'चे अनेक प्रयोग झाले होते. त्यांचा स्वत:चा असा विचार होताच; पण तेव्हाच्या प्रस्थापित आणि विचार - शैली - आशय या बाबतींत कवाडं बंद करून घेतलेल्या मासिकांविरोधातील ती प्रतिक्रिया होती. या अनुभवातून शिकायला हवं आणि दुरुस्ती करायला हवी, या भावनेतून सर्व नवविचारांचं आणि नवशैलींचं आम्ही स्वागत करत आलोय. ‘अनुभव'चं व्यासपीठ जागतं राहण्यासाठी त्याचा उपयोग झालाय.
परंतु एवढं सारं करून अंक अपेक्षित वाचकांपर्यंत पोहोचलाच नाही तर उपयोग काय? त्यामुळे आपला अंक महाराष्ट्रभर सर्व थरांत पोहोचला पाहिजे यासाठी आम्ही जिवापाड प्रयत्न करत आलोय. पण एकूणच वाचनाबद्दलच्या अनास्थेमुळे हे काम अधिकाधिक अवघड बनत आहे. चांगलंचुंगलं वाचणं ही माणसांची नैसर्गिक गरज उरलेली नाही का, असं वाटावं इतकी ही अनास्था चिंताजनक आहे. मासिक ही गोष्ट वाचक - लेखक - संपादक - प्रकाशक यांची सामायिक गरज असायला हवी. प्रत्यक्षात बाजारीकरणाच्या प्रभावामुळे बरेच लोक आमच्यासारख्या (व्यावसायिक) संस्थांकडे इतर चार धंदेवाईक कंपन्यांसारखी नफेच्छुक कंपनी आणि मासिकाला ‘प्रॉडक्ट' म्हणून पाहतात. (आणि गंमत म्हणजे आम्ही मात्र मासिकाला समाजसंस्कृतीविषयक व्यासपीठ मानतो आणि वाचकांना ‘ग्राहक' अजिबात समजत नाही.) दुर्दैवाने बरेच वाचक स्वतःला ‘ग्राहक' मानतात आणि मासिकाकडे आपली वैचारिक गरज म्हणून पाहायला तयार होत नाहीत.
हेही वाचा - ‘अनुभव' नावाचा प्रयोग - भाग दोन
त्यामुळे चांगले वाचक धुंडाळत फिरणं आणि त्यांना आपल्या दिंडीत सामील करून घेणं यासाठी आम्हाला संपादकीय मेहनतीइतकेच कष्ट करावे लागतात. त्यापायीच महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा या तीन राज्यांत गावोगावी जाऊन, कँपेनिंग करून, घरोघरी पोहोचून वर्गणीदार करून घेण्याचा घाट आम्ही गेली पंधरा वर्षं घालत आहोत. हा उपद्व्याप आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसतो; पण काय करणार? जिकडचा तिकडचा वाचक जोडला जाणं ही आमची सांस्कृतिक गरज आहे. त्यामुळेच पुणे-मुंबई-नाशिकसारख्या शहरांप्रमाणेच औरंगाबाद (बाळासाहेब बोरसे, सुहास सहस्रबुद्धे), उस्मानाबाद (भारत गजेंद्रगडकर) बेळगाव (अशोक याळगी, मनीषा सुभेदार), नांदेड (संजीव कुलकर्णी-राम शेवडीकर-रवींद्र तांबोळी), कोल्हापूर (मिलिंद पाटील), सांगली (संजय पोमजे, अलका पाठक), वाई (स्वाती हेरकर आणि डॉ. शंतनू अभ्यंकर), महाड (संजय परांजपे), भोर ( डॉ. विरेश बिरादर, डॉ. अरुण बुरांडे, डॉ. डी. बी. क्षीरसागर) अशा किती तरी छोट्या-मोठ्या गावांमध्ये आमच्या हितचिंतकांमुळे ‘अनुभव'चे भरपूर वर्गणीदार होऊ शकले. या वाचकांपर्यंत पेोहोचण्यासाठी कुठे कार्यक्रम कर, कुठे भाषणं ठेव, कुठे वाचक मेळावा भरव असं काही ना काही आम्ही करत राहिलोयत. ‘अनुभव'च्या वर्गणीदारांकडून आणखी संपर्क मिळवून त्यांनाही वर्गणीदार बनवणं, ‘समकालीन' प्रकाशनाच्या कार्यक्रमांत ‘अनुभव' विषयी आवाहन करणं, असले उद्योग तर सतत चालतच असतात.
एका वर्षी तर ‘पाहिजेत चांगले वाचक' अशा शीर्षकाची एक पानभर जाहिरात आम्ही तयार केली होती आणि ती मराठीतील अनेक मासिक-साप्ताहिकांमध्ये छापली होती. वाचकांना जाहिरातीमार्फत आवाहन करण्याची वेळ आली आहे, असं त्या जाहिरातीतून आम्ही सुचवलं होतं. न वाचणाऱ्यांना डिवचलंही होतं. (बुलढाण्याचे नरेंद्र लांजेवार यांनी तर या जाहिरातीवर एक लेख लिहून कुठे तरी प्रसिद्ध केला होता.) या जाहिरातीला जोडून आम्ही आणखी एक उपक्रम राबवला होता. हा एक खर्चिक आणि उटपटांग प्रयोग होता. लोक स्वत:हून ‘अनुभव'कडे येत नाहीत तर आपण त्यांच्यापर्यंत जाऊ यात, या आमच्या बाण्याला धरून आम्ही हा प्रयोग आखला होता. पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या ‘अंतर्नाद' या मासिकात आम्ही एक जाहिरात प्रकाशित केली आणि ‘स्वत:चा पत्ता कळवणारं एक पोस्टकार्ड आम्हाला पाठवा, आम्ही अनुभवचा अंक मोफत पाठवू' असं आवाहन त्यात केलं होतं. अंक आवडून इच्छुक मंडळी वर्गणीदार होतील, असा आमचा होरा होता. ही जाहिरात बघून जवळपास नऊशे लोकांनी आमच्याकडे मागणी नोंदवली. आम्ही स्वखर्चाने अंकही पाठवले; पण अंक वाचून वर्गणीदार मात्र किरकोळ झाले. प्रयोग पुरता फसला.
हेही वाचा - ‘अनुभव' नावाचा प्रयोग - भाग तीन
पण प्रयोग फसला म्हणून वाचकांपर्यंत पोहोचण्याचे आमचे प्रयत्न आम्ही थांबवले नाहीत. ‘अनुभव' सुरू केल्याच्या वर्षी आम्ही असाच एक आडदांड प्रयोग केला होता. तेव्हा आम्ही ‘लोकसत्ता'सोबत बऱ्याच उपक्रमांत गुंतलेले होतो. अरुण टिकेकर - जॉर्ज वर्गीस - संजय पवार ही मंडळी ‘लोकसत्ता'त विविध स्तरांतील ‘डिसिजन मेकर' होते. आम्ही त्यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला : ‘लोकसत्ता'च्या दिवाळी अंकासोबत वाचकांना ‘अनुभव'चा दिवाळी अंक भेट द्यायचा! कल्पना झटकन स्वीकारली गेली. ‘अनुभव'चा अंक मोफत मिळणार असल्याने ‘लोकसत्ता'चा फायदाच होणार होता, आणि ‘लोकसत्ता'मुळे ‘अनुभव'ला खूप मोठ्या वाचकांपर्यंत अलगद पोहोचता येणार होतं. विन विन सिच्युएशन! त्या वर्षी आम्ही तब्बल ४० हजार अंक एक्स्ट्रा छापले आणि ‘लोकसत्ता'मार्फत पोहोचवले. या प्रयोगातूनही खूप वर्गणीदार मिळाले असं नाही, पण मुंबई-पुण्यात ‘अनुभव'ला चांगली ओळख मिळाली.
असाच एक अजब प्रयोग सांगण्यासारखा आहे. म्हटला तर तो द्राविडी प्राणायाम आहे, म्हटलं तर ‘विन विन सिच्युएशन' तयार करण्याचा आणखी एक प्रयत्न. ‘अनुभव'च्या नेहमीच्या अंकात काही पानं वाढवायची आणि ती कुणाकुणाला (म्हणजे कॉर्पोरेट कंपन्या, सरकारी कंपन्या, स्वयंसेवी संस्था वगैरेंना) जाहिरातसदृश वापरासाठी द्यायची. पैसे मिळवून देणारा असा उपक्रम फ्रंटलाइन, इंडिया टुडे, आऊटलुक, वीक वगैरे साप्ताहिकं सर्रास राबवतात. आम्ही म्हटलं, ‘हेही करून बघूयात.' पण आम्हाला रस होता वाचक मिळवण्यात. प्रश्न असा होता, की जाहिरातीसाठी जागा देऊन वाचक कसे मिळणार? आम्ही एक आयडिया काढली आणि टाटा इंडिकॉम या फोन कंपनीशी चर्चा केली. कल्पना अशी होती- ‘टाटा इंडिकॉम'ने त्यांच्या ग्राहकांसाठी ‘अनुभव'ची वर्षभराची वर्गणी भरायची आणि त्या बदल्यात ‘अनुभव'ने ‘कंपनी-ग्राहक' यांच्या संवादासाठी अंकात आठ वाढीव पानं द्यायची. ही आयडिया फिट्ट बसली! त्या वर्षी तब्बल १० हजार जादा वाचकांपर्यंत अंक पोहोचला. हा द्राविडी प्राणायाम यशस्वी व्हावा यासाठी आनंद अवधानीसोबत संजय जोशींनी बरीच मेहनत केली.
हेही वाचा - ‘अनुभव' नावाचा प्रयोग - भाग चार
‘टाटा इंडिकॉम'प्रमाणेच हा प्रयोग आणखी दोघांसोबत केला गेला. एक प्रयोग ‘एमकेसीएल' या सरकारी कंपनीसोबत. विवेक सावंतांच्या नेतृत्वाखाली कल्पकतेने चालवली जाणारी ही कंपनी. आमच्या प्रयोगाचा उपयोग ‘एमकेसीएल'च्या राज्यभर पसलेल्या पाच हजार सेंटर्ससोबत संवाद साधण्यासाठी होऊ शकतो, ही गोष्ट विवेक सावंतांनी बरोबर ओळखली. त्यामुळे तेही या प्रयोगात सहभागी झाले. पुढे ‘प्रथम' या स्वयंसेवी संस्थेच्या खेडोपाडी पसरलेल्या पाच हजार कार्यकर्ते, शिक्षक वगैरेंसाठीही हा प्रयोग राबवला गेला. या प्रयोगामुळे ‘अनुभव' जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचायला बराच उपयोग झाला.
‘अनुभव'चा अंक चालवताना संपादकीय पातळीवर आपण जसे कठोर परिश्रम घेतो, तसेच अंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, या भूमिकेतून आम्ही असले ‘बेभान' प्रयोग केले आहेत. अंक वाचकांपर्यंत पोहोचवण्याबाबत आपल्या बाजूने प्रयत्नच झाले नाहीत असं होता कामा नये, यासाठीच्या या साऱ्या उठाठेवी! वाचकांपर्यंत पोहोचण्याचे रूढ मार्गही अवलंबायचे आणि सुचतील त्या नव्या मार्गावरूनही चालून बघायचं, अशी पद्धत आम्ही स्वीकारली. याऊपर वाचकांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न! पण लोकांनी वाचावं यासाठी आपण आपल्या हयातीत चिक्कार प्रयत्न केले याचं समाधान आम्ही केलेल्या या प्रयोगांमुळे आमच्यापासून कुणी हिरावून घेऊ शकत नाही.
हेही वाचा - 'ललित'चा जन्म, नेमका कसा आणि कुठे?
गेल्या काही वर्षांपासून नव्या वाचकवर्गापर्यंत पोहोचण्यासाठी नवे मार्ग अवलंबायला सुरुवात झाली. २००६ सालापासूनच ‘अनुभव'ची वेबसाइट सुरू झाली होती. त्यावर ‘अनुभव'चे अंक, निवडक लेख वगैरेही दिसू लागले होते. पुढे २०११ मध्ये ‘अनुभव' आणि ‘समकालीन'सह सर्व अंगांना सामावून घेणारी ‘युनिक फीचर्स'ची नवी वेबसाइट तयार झाली. पहिल्याच वर्षी त्या वेबसाइटवर ‘ई-संमेलन' भरू लागलं. ते बघायला-वाचायला पंचवीसेक देशांतील हजारो मराठी वाचक साइटवर येऊ लागले. आता अनुभव ‘फेसबुक'वरही आहे आणि हजारो ‘व्हिजिट्स' अनुभवत आहे. ‘ट्विटर'वरची टिवटिव आमच्या स्वभावात बसणारी नाही, पण ‘हा मार्ग अवलंबायचा राहिला' असं व्हायला नको, म्हणून ‘ट्विटर'वरही हालचाल सुरू केली आहे. शिवाय ‘अनुभव'च्या छापील आवृत्तीप्रमाणेच ‘पीडीएफ' आवृत्तीही तयार होऊ लागली असून देशा-परदेशांतील ‘टेक्नोसॅव्ही' वाचक ‘अनुभव' कॉम्प्युटरवर वाचू लागले आहेत. या सर्व कामाची जबाबदारी आमचा तरुण सहकारी चिराग देशपांडे पार पाडतो. स्वतःच्या ‘ॲप'ची शक्याशक्यता तपासण्यासारख्या अनेक नव्या गोष्टींचा भुंगा त्याच्या मागे आहेच. आमचा तरुण मित्र समीर धामणगावकर याने ‘अनुभव'मधील निवडक लेखांचा समावेश असलेला ऑडिओ अंकही प्रकाशित केला आहे. असं बरंच काही. याही पुढे आम्ही आणि आमचे मित्र ‘अनुभव' घरोघरी पोहोचण्यासाठी काय काय करू याचा नेम नाही!
अर्थात, आम्ही हा सगळा खटाटोप करतोय तो मराठी वाचकाला एक मोकळ्या विचारांचं चांगलं व्यासपीठ उपलब्ध असावं यासाठी. पण प्रश्न असा आहे, की मराठी समाज या प्रयत्नांचं काय करणार? लाखो वाचक या व्यासपीठाशी जोडले जाणार की नेहमीच्या फुकाच्या वाचनसंस्कृतीच्या गप्पा मारत (आणि ऐकत) बसणार!
(समाप्त.)
(सुहास कुलकर्णी लिखित 'आमचा पत्रकारी खटाटोप' या समकालीन प्रकाशनच्या पुस्तकातून साभार)
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.
