
इंग्रजी भाषा हा एक मजेशीर प्रकार आहे. विशेषत: वेगवेगळ्या शब्दांचं स्पेलिंग हा एक विनोदाचा आणि वादाचा नेहमीचाच विषय ठरला आहे. इंग्लिशमधले शब्द जाणून घ्यायचे तर ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी पर्याय नाही, असं म्हटलं जातं. इंग्रजी भाषेचा परिपूर्ण शब्दकोश तयार करायला हवा असं १८५८ साली ठरलं आणि त्यानंतर तब्बल २५ वर्षांनी ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी प्रकाशित झाली. या डिक्शनरीच्या निर्मितीचा रंजक इतिहास.
इंग्रजी भाषा हा एक मजेशीर प्रकार आहे. विशेषत: वेगवेगळ्या शब्दांचं स्पेलिंग हा एक विनोदाचा आणि वादाचा नेहमीचाच विषय ठरला आहे. इंग्लंडची अधिकृत भाषा इंग्रजी असली तरी त्या देशात वेल्श, स्कॉटिश आणि आयरिश तसंच गेलिक या भाषा अजूनही बोलल्या जातात आणि जिवापाड जतन केल्या जातात.
मुळात इंग्रज कोण हाही एक प्रश्न आहे.
पूर्वी या बेटावर ड्रुईडपंथी जमाती वास्तव्यास होत्या. पुढे सेल्टिकवंशी जमाती इथे आल्या. त्यामुळे ड्रुईड आणि सेल्ट यांची सरमिसळ झाली. सीझरच्या काळात रोमनांनी आक्रमण केल्यामुळे त्यात लॅटिन भाषेची भर पडली. यानंतर इसवी सनाच्या दहाव्या शतकापर्यंत ख्रिश्चन धर्मप्रसारक तसंच उत्तर युरोपातल्या टोळ्यांनी (विशेषत: सॅक्सन आणि नॉर्मन) आक्रमण करून मिळेल तेवढ्या भूमीवर कब्जा मिळवला. या सर्व काळात व्हायकिंग्ज इथे येऊन लुटालूट करत होतोच. विल्यम द काँकररने इंग्लंडवर एकछत्री अंमल सुरू केला. अकराव्या शतकात तो फ्रान्सच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या ब्रिटनी या प्रांतातून इंग्लंडमध्ये पोहोचला. त्यामुळे अकराव्या शतकापासून इंग्रजी भाषेत फ्रेंच शब्दांची भर पडू लागली.
बाराव्या शतकापासून इंग्लंडमध्ये शब्दकोशांची गरज भासू लागली
कारण त्या काळात राजदरबाराची आणि जनसामान्यांची भाषा वेगवेगळी, अशी परिस्थिती होती. पुढे सॅम्युएल जॉन्सनने खेड्यापाड्यात जाऊन शब्द गोळा करून इंग्रजी भाषेचा शब्दकोश तयार केला. शास्त्रीय पायावर तयार केला गेलेला हा पहिला शब्दकोश होता. किंबहुना, शब्दकोशशास्त्राचा पाया जॉन्सनने घातला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. समाजाच्या तळागाळातल्या माणसांना परिचित असलेले आणि सातत्याने त्यांच्या वापरात असलेले शब्द, अर्थच्छटांची उदाहरणं, लिखित स्वरूपात उपलब्ध असणाऱ्या शब्दांचं मूळ आणि इतिहास, अशी बरीच माहिती जॉन्सनच्या शब्दकोशात होती. मात्र हा शब्दकोश सर्वसमावेशक नव्हता.
ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी हा शब्दकोश तयार करण्याचा प्रकल्प कसा सुरू झाला?
इंग्रजी भाषेसाठीचा असा पहिला सर्वसमावेशक कोश म्हणजे ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी (ओ.ई.डी.). क्वीन्स (किंवा किंग्ज) इंग्लिशमधले शब्द जाणून घ्यायचे तर ओ.ई.डी.ला पर्याय नाही, असं म्हटलं जातं. हा शब्दकोश तयार करावा ही कल्पना प्रथम १८५७ मध्ये मांडली गेली. सुरुवातीला या शब्दकोशाला फक्त ‘बिग डिक्शनरी’ असं संबोधण्यात येत होतं.
या प्रकल्पाची सुरुवात एका धर्मगुरुंनी दिलेल्या एका भाषणामुळे झाली. ५ नोव्हेंबर १८५७ या दिवशी, म्हणजे ‘गाय फॉक्स डे’च्या दिवशी लंडनच्या सेंट जेम्स स्क्वेअरमधल्या लंडन लायब्ररीत ६० लब्धप्रतिष्ठित आमंत्रितांची सभा भरली होती. रिचर्ड शेनेविक्स ट्रेंच, डीन ऑफ वेस्टमिन्स्टर हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. ट्रेंच हे इंग्रजी भाषाप्रेमीही होते. त्यांनी आपल्या भाषणात तोपर्यंतच्या इंग्रजी शब्दकोशांमधील त्रुटींवर मर्मभेदी टीका केली. ‘ऑन सम डेफिशियन्सीज इन अवर इंग्लिश डिक्शनरीज’ हाच त्यांच्या भाषणाचा विषय होता. हे भाषण खूप गाजलं.
‘ऑन सम डेफिशियन्सीज इन अवर इंग्लिश डिक्शनरीज’
ट्रेंचनी आपल्या भाषणात त्या काळातल्या शब्दकोशांमधले सात महत्त्वाचे दोष दाखवले होते. ते इतके तांत्रिक होते की जनसामान्यांना ते सहज कळणं अशक्य होतं; पण त्यातला महत्त्वाचा मुद्दा मात्र अशिक्षितांनाही पटेल असा होता. ट्रेंचच्या मते शब्दकोश ही त्या भाषेतल्या शब्दांची सर्वसमावेशक सूची असणं आवश्यक होतं. फक्त शिष्टसंमत शब्दांची सूची असलेला शब्दकोश हा परिपूर्ण शब्दकोश असूच शकत नाही. त्याआधीच्या शब्दकोशकारांचे- त्यात त्या काळापर्यंत ज्याचा उदो उदो होत होता तो सॅम्युएल जॉन्सनही आलाच- शब्दकोश यामुळेच अपूर्ण होते आणि शब्दकोशकार हे पूर्वग्रहदूषित या संज्ञेस पात्र ठरत होते.
ट्रेंच यांनी आपल्या भाषणात मांडलेली मतं अशी- शब्दकोशकार हा शब्दांचा सूचीकार असतो, टीकाकार नव्हे. तो शब्दांचा इतिहासकार असतो. त्याला शब्द निवडायचं स्वातंत्र्य नसतं, तर जो शब्द समोर येईल त्याचं मूळ शोधून त्याचं कालानुरूप बदलणारं स्वरूप, शुद्धलेखन (स्पेलिंग), अर्थ आदींची नोंद करणं हे त्याचं काम असतं. काही प्राचीन शब्द वर्तमानातसुद्धा वापरात असतात, तर काही येतात आणि वापरातून नाहीसे होतात. असे सर्व शब्द हे भाषेचा भागच असतात. समजा, एखाद्या व्यक्तीला कुठल्याही एका शब्दाची माहिती हवी असेल तर तो शब्द त्याला शब्दकोशात सापडायलाच हवा; नाही तर तो शब्दकोश शब्दकोश म्हणवून घेण्यासाठी अयोग्य समजायला हवा.
ट्रेंच यांनी शब्दकोशात काय हवं हेही सविस्तरपणे विशद केलं आहे.
ते आजमितीस बदलायचं धाडस कुणी केलेलं नाही इतक्या त्या सूचना सुस्पष्ट आहेत. तो शब्द केव्हा अस्तित्वात आला, कसा अस्तित्वात आला, पहिल्यांदा लिखित स्वरूपात केव्हा वापरला गेला, याबरोबरच त्याचा वापर कसा करायचा, याचं उदाहरण असलेला एखादा छोटा परिच्छेदही आदर्श शब्दकोशात समाविष्ट असावा. त्यानंतर त्या शब्दवापराच्या वेगवेगळ्या छटा दाखवणारी वाक्यंही उदाहरणं म्हणून असावीत. तसंच तो शब्द चुकीने कसा वापरला जातो हेही स्पष्ट केलेलं असावं. हे सगळं करण्यासाठी नि:स्वार्थ बुद्धीने काम करणाऱ्या स्वयंसेवकांची गरज आहे, असंही ट्रेंच यांनी बोलून दाखवलं होतं.
या भाषणाच्या सहा महिने आधीच एक समिती नेमली होती
त्या सभेला हजर असणाऱ्या भाषाशास्त्रज्ञांनी या भाषणाचं जोरदार स्वागत केलं. अशा प्रकारचा शब्दकोश तयार करण्याबद्दल नक्की काय करावं लागेल याबद्दल तिथे काथ्याकूट सुरू झाला. माणसं जमत होती, चर्चा झडत होत्या; पण त्यातून कुठलंही ठोस पाऊल उचललं जात नव्हतं. याचं कारण म्हणजे विद्वानांची वाढती संख्या, असंही विनोदाने म्हटलं गेलं. रॉयल फिलॉलॉजिकल सोसायटीने ट्रेंच यांच्या या भाषणाच्या सहा महिने आधीच एक समिती नेमली होती. इतर शब्दकोशांमध्ये नसलेले शब्द गोळा करून त्या शब्दकोशांना पूरक असा शब्दकोश निर्माण करण्याचं काम या समितीवर सोपवलं गेलं होतं. या समितीने सुरुवातीला मोठ्या उत्साहाने काम केलं. पुढे तो उत्साह हळूहळू कमी होत गेला. ट्रेंच या समितीचे सदस्य होते. पण ते पुढे आयर्लंडला गेले. या समितीचे सदस्य अधूनमधून काम करत आणि नव्या शब्दांची यादी फिलॉलॉजिकल सोसायटीकडे देत. त्या यादीवरून अशाप्रकारे शब्दकोश पुरवणी काढण्याऐवजी नवाच शब्दकोश रचावा असं संस्थेच्या नियामक मंडळाला वाटू लागलं. 7 जानेवारी १८५८ रोजी तसा ठराव करण्यात आला. हाच ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीचा शुभारंभ.
यानंतर या समितीच्या फ्रेडरिक फर्निवल या सदस्याने एक परिपत्रक प्रसिद्ध केलं. ‘वेगवेगळ्या काळांतली सर्व प्रकारची पुस्तकं धुंडाळून त्यातून कुठला शब्द त्या ऐतिहासिक काळात प्रथम वापरला गेला आहे याचं टिपण ठेवण्याच्या कामासाठी स्वयंसेवक हवेत,’ असं त्या परिपत्रकात म्हटलं होतं.
१२५० ते १५२६ हा पहिला कालखंड होता.
१५२६ मध्ये प्रथम इंग्रजीमध्ये न्यू टेस्टामेंट लिहिलं गेलं. १५२६ ते १६७४ हा दुसरा कालखंड होता.
१६७४ मध्ये ‘पॅराडाइज लॉस्ट’ लिहिणाऱ्या महाकवी मिल्टनचं निधन झालं. तिसरा कालखंड १६७४ ते तोपर्यंतचा वर्तमानकाळ.
असे हे तीन कालखंड होते.
आधीची ग्रंथसंपदा वाचून त्याचा अर्थ, लावणारे दुर्मिळ होते आणि इंग्रजीमधले असे ग्रंथ मिळवणं हे कामही तसं कष्टाचं होतं.
६” बाय ६”ची चिठ्ठी
इच्छुक स्वयंसेवकांनी संस्थेला पत्र पाठवून ते कुठल्या काळातल्या, कुठल्या पुस्तकांमधले शब्द वेचायला तयार आहेत ते कळवायचं होतं. त्याशिवाय संस्था त्यांना त्या काळातली आणखी काही पुस्तकं देणार होती. स्वयंसेवकांनी ती पुस्तकं वाचून सूची तयार करायची होती. मग संस्थेतल्या तज्ज्ञांकडून त्यांतले काही अतिवैशिष्ट्यपूर्ण शब्द निवडले जाणार होते. त्या शब्दांबद्दलचे स्वयंसेवकांनी दिलेले संदर्भ वापरून एकेका ६” बाय ६” चिठ्ठीवर त्या-त्या शब्दांबद्दलची माहिती लिहायची होती. चिठ्ठीच्या डाव्या कोपऱ्यात तो शब्द लिहून खालच्या डाव्या कोपऱ्यात ती चिठ्ठी कोणत्या दिवशी लिहिली ती तारीख टाकायची होती. मग इतर माहिती मध्यभागी लिहायची होती. तो शब्द कुठल्या पुस्तकामध्ये किंवा वृत्तपत्रात वाचला त्याचं नाव, पुस्तक/वृत्तपत्राची छपाईची तारीख, पृष्ठक्रमांक, त्याखाली तो शब्द ज्या वाक्यात वापरला गेलाय ते पूर्ण वाक्य आणि त्या शब्दाचा माहीत असलेला अर्थ, असं त्या चिठ्ठीचं स्वरूप होतं.
कागदपत्रांचं वजन दोन टन
एखादा प्रचंड मोठा प्रकल्प हाती घेतला जातो त्या वेळी त्याची भव्यताच त्याला मारक ठरू शकते. या शब्दकोशाच्या बाबतीत अशीच वेळ आली. पुढच्या वीस-एक वर्षांत या प्रकल्पासाठी शब्दसहायकांनी पाठवलेल्या कागदपत्रांचं वजन दोन टन भरलं. या प्रकल्पाचं प्रमुखपद फर्निव्हल यांच्याकडेच होतं. त्यांना हा गाडा ओढणं अवघड वाटू लागलं. हा प्रकल्प बंद पडणार अशी कुजबूज लंडनमध्ये सुरू झाली. ‘अथेनिअम’ या नियतकालिकाने या कुजबुजीला शब्दरूप दिलं. फर्निव्हल मनापासून हे कार्य पुढे रेटण्याचा प्रयत्न करत हेोते, मात्र त्यांच्याकडे अशा कार्यासाठी आवश्यक नेतृत्वगुण नव्हते. त्यामुळे त्यांनी या कार्यासाठी जेम्स मरे हा नवा नेता निवडला आणि स्वतः त्याला मदत करण्याचं ठरवलं.
ट्रेंच यांच्या भाषणानंतर २५ वर्षांनी..
फर्निव्हल आणि आता त्यांच्या साथीला मरे या दोघांवर आणखी एक जबाबदारी येऊन पडली होती. मॅक्मिलन या प्रकाशन संस्थेच्या संचालकांनी फर्निव्हल यांच्याबरोबर वाद झाल्यामुळे या प्रकल्पाशी असलेले संबंध तोडले. ऑक्सफर्ड विद्यापीठाला जेम्स मरे यांच्या कार्याबद्दल साशंकता वाटत असल्याचं तिथल्या विद्वानांनी जाहीर केलं. (प्रत्यक्षात त्या काळात ऑक्सफर्ड विद्यापीठ स्वत:चाच एक इंग्रजी भाषेचा व्युत्पत्तिकोश निर्माण करत होतं.) केंब्रिज विद्यापीठानेही या शब्दकोशकारांना त्यांचा शब्दही ऐकून न घेता नकार दिला. त्यामुळे प्रकल्पासाठी निधी गोळा करण्याची पुन्हा खटपट करावी लागणार होती.
मात्र, काही काळाने फर्निव्हल आणि मरे यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाचं नव्याने बोलावणं आलं. दोघं भीतभीतच विद्यापीठाच्या संचालक मंडळाला भेटायला गेले. २६ एप्रिल १८७८ला घडलेल्या या भेटीत त्या प्रकल्पावर एकमत झालं. करारमदार पार पाडण्यास आणखी एक वर्ष जावं लागलं. अखेरीस १ मार्च १८७९ या दिवशी (म्हणजे ट्रेंच यांच्या भाषणानंतर २५ वर्षांनी) लेखी करार झाला.
मरे यांनी काही दिवसांतच दोन निर्णय घेतले.
एक, या प्रकल्पासाठी एक स्वतंत्र इमारत बांधून तिथून सर्व कारभार चालवायचा आणि
दुसरं, शब्दशोधक स्वयंसेवकांना आवाहन करणारं परिपत्रक सर्व ब्रिटिश वसाहतींना आणि अमेरिकेलाही (म्हणजे तिथली सर्व वृत्तपत्रं, नियतकालिकं, सार्वजनिक संस्था आणि विद्यापीठांकडे) पाठवायचं. करारानुसार या कामाचा आर्थिक भार ऑक्सफर्ड विद्यापीठाने उचलला.
मनोरुग्णालयात आजन्म कारावासाची शिक्षा भोगणारे डॉ. विल्यम मायनर
१८८०नंतरच्या काळात कधी तरी परिपत्रकाची एक प्रत डॉ. विल्यम मायनर या पुस्तकप्रेमीच्या हाती पडली. त्या वेळी ते इंग्लंडमधल्या ब्रॉडमूर मॅनॉर या मनोरुग्णालयात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होते. क्रॉथॉर्न इथल्या या मनोरुग्णालयाच्या दुसऱ्या भागात सर्वांत वरच्या मजल्यावरच्या दोन मोठ्या कोठड्यांमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. डॉ. मायनर म्हणजे पुस्तकांतला किडा होता. त्यांच्यासोबत त्यांचा प्रचंड मोठा ग्रंथसंग्रह होता. ते त्यांच्या कारावासाचं आठवं वर्ष होतं. मुळात तो अतिशय बुद्धिमान आणि संवेदनशील माणूस होता. येल विद्यापीठातून त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली होती. त्यांना नवनव्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता होती. आपण काही तरी चांगलं करायला हवं, म्हणजे आपला हा कारावास सुसह्य होईल, ही त्यांची मनोधारणा होती. त्यांनी मागवलेल्या एका पुस्तकात ते परिपत्रक त्यांना सापडलं, तेव्हा देवाने आपली प्रार्थना ऐकली असं त्यांना वाटलं आणि त्यांनी डॉ. जेम्स मरे यांना बिग डिक्शनरीसाठी स्वयंसेवक म्हणून काम करायला तयार असल्याचं कळवलं. पुढे २० वर्षे ऑक्सफर्ड शब्दकोशाच्या निर्मितीसाठी डॉ. मायनरचा सहभाग फारच महत्त्वाचा ठरला.
‘मूर्खपणाचं साहस’
या डिक्शनरीची कल्पना राबवायचं ठरलं तेव्हा त्याची संभावना ‘मूर्खपणाचं साहस’ अशी करण्यात आली होती. पण व्हिक्टोरिया राणीच्या काळात असे साहसी लोक होते. ते या प्रकल्पासाठी तन, मन आणि धनसुद्धा वेचायला तयार होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा प्रकल्प मार्गी लागू शकला होता. या शब्दकोशाच्या निर्मितीत अनेक विघ्नं आली. काही वेळा हा प्रकल्प बंद पडतो की काय अशी शक्यताही निर्माण झाली. या प्रकल्पाचे आधारस्तंभ हळूहळू काळाच्या पडद्याआड गेले. मात्र अखेरीस हा प्रकल्प पूर्णत्वास गेला.
या नव्या शब्दकोशामध्ये काय होतं?
शब्दाची कूळकथा, त्यापासून निर्माण होणारे इतर शब्द, त्याचबरोबर प्राचीन इंग्रजी शब्दांप्रमाणेच सॅक्सन, नॉर्मन, डॅनिश, आधुनिक आणि प्राचीन फ्रेंच, ट्युटॉनिक, डच, स्पॅनिश, इटालियन, लॅटिन, ग्रीक आणि हिब्रू भाषांमधून आलेले आणि इंग्रजीत सातत्याने वापरले जाणारे शब्द, त्यांचं मूळ स्पेलिंग, अर्थ, इतर संबंधित स्पष्टीकरणं हे सारं होतं. त्याचबरोबर निसर्गशास्त्र, कला, कायद्याची कलमं, माणसांच्या नावांच्या उत्पत्ती अशी माहितीही या शब्दकोशात होती. यापूर्वीच्या कुठल्याही शब्दकोशापेक्षा हा शब्दकोश अधिक परिपूर्ण असावा यासाठी झटून प्रयत्न केले गेले. त्यासाठी भाषाशास्त्रज्ञांबरोबर इतर शाखांतल्या तज्ज्ञांची मदत घेतली गेली.
ओ.इ.डी.ची पहिली आवृत्ती १९२८ मध्ये प्रसिद्ध झाली.
पहिल्या आवृत्तीचे डबल डेमी आकाराचे बारा खंड झाले. यानंतर दर पाच-सहा वर्षांनी या शब्दकोशाचे पुरवणी खंड निर्माण होत गेले. त्यामुळे अर्ध्या शतकानंतर या शब्दकोशाची नवी सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली. त्यानंतर आता वापरात नसलेले शब्द काढून किंवा त्यांचे बदललेले अर्थ समाविष्ट करून पुरवणी खंड काढण्यात येऊ लागले. पूर्वी भारतात आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी बरेच भारतीय शब्द इंग्रजीत नेले. यथावकाश ते सर्व शब्द ओ.ई.डी.मध्ये समाविष्ट केले गेले. आजही इंग्रजी बोलणारे सर्वांत जास्त लोक भारतीय असल्यामुळे अनेक भारतीय शब्दांचा ओ.इ.डीत. समावेश होतो. एवढंच नव्हे तर क्वीन्स इंग्लिश म्हणजे व्याकरणशुद्ध इंग्रजी बोलणाऱ्यांतही भारताचा समावेश होतो. आता संगणकी भाषेतले बरेच शब्दही ओ.इ.डी.त घेतले जातात.
(निरंजन घाटे यांच्या ‘शब्द आणि शब्दकोश’ या पुस्तकातील संपादित भाग)