आम्ही कोण?
लेखमालिका : 'अनुभव'ची पंचविशी

‘अनुभव' नावाचा प्रयोग - भाग दोन

  • सुहास कुलकर्णी
  • 17.05.26
  • वाचनवेळ 9 मि.
twenty five years of anubhav magazine

‘अनुभव'चा ‌‘युवा'कृत अंक सुरू झाला तेव्हा आम्ही २७-२८ वर्षांचे होतो. म्हणजे ज्या सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी हा अंक निघत होता, त्यांच्यापेक्षा वयाने बरेच लहान. त्यामुळे विषय ठरवणं, विषयाशी संबंधित तज्ज्ञांशी चर्चा करणं, पुस्तकं आणि संबंधित साहित्य वाचणं, विषयांचे कंगोरे शोधणं, ते लिहू शकणारे तज्ज्ञ व अभ्यासू लेखक मिळवणं, त्यांना त्यांच्या लेखाकडूनच्या अपेक्षा सांगणं आणि मिळालेल्या मजकुरावर संपादन करणं हे काम आमच्या आडवयामुळे बरंच आव्हानात्मक ठरत होतं. पण होती नव्हती ती सर्व शक्ती पणाला लावून आम्ही त्या मोडमध्ये गेलो. कॉलेजमध्ये असताना सामाजिक चळवळींमधील (काठावरचा का असेना) सहभाग आणि अभ्यास मंडळांमध्ये वगैरे झालेली तयारी यांचा त्यासाठी बराच उपयोग झाला. राजेंद्र साठे नि आनंद अवधानी ही फिरती माणसं; त्यामुळे संपादनाची जबाबदारी आपोआपच माझ्यावर आली. शिवाय मी तेव्हा आधुनिक महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक इतिहासाच्या अभ्यासात गुंतलेलो असल्याने माझी थोडी तयारी झालेली होती आणि त्यामुळे अंकाच्या संपादनाची जबाबदारी आपण पार पाडू शकतो, असा विश्वासही वाटू लागला होता.

तरीही ‌‘एका विषयावर एक अंक' हे अवघड प्रकरण होतं. प्रत्येक महिन्याला नव्या विषयात घुसावं लागे आणि स्वत:ला घुसळून घ्यावं लागे. दर महिन्याला नवा विषय असल्याने पुढील विषयांचा अभ्यास करण्याचा दाबही मोठा असे. हा दाब हलका व्हावा यासाठी चार-सहा महिन्यांच्या अंकांचं विस्तृत नियोजन करण्याची सवय आम्ही लावून घेतली. तरीही धावपळ व्हायचीच. कारण आम्ही तेव्हा ‌‘अनुभव एके अनुभव' करत नव्हतो. दोन डझन दैनिकांसोबतचं काम, ‘लोकसत्ता'सोबतचे अनेक प्रकल्प, मोठ्या दैनिकांसाठीचे शोधलेख, ‘साप्ताहिक सकाळ'च्या कव्हरस्टोरीज, दिवाळी अंकांतील लेख, टीव्हीसाठीचं संदर्भ-संशोधनाचं काम असं नाना प्रकारचं काम आम्ही करत होतो तेव्हा. पण तरीही ‌‘अनुभव'चं काम करण्यात आम्हाला मजा येत होती. महाखटपटींनंतर का होईना, अंक ‌‘जमत' असल्याने आपण एक महत्त्वाचं काम करत आहोत, याची सुप्त जाणीव मनाला सुखावत होती. या कामात वैशाली चिटणीस, महेश सरलष्कर, मेघराज पाटील, अतुल सुलाखे, रवींद्र कोल्हे, विलास पाटील, संगीता करंबेळकर, रमाकांत पाटील ही सर्व तरुण सहकारी मंडळी उत्साहाने उतरली होती. अशी समूहबुद्धी एकत्र आल्याने हे अंक इतके ताकदीचे बनत, की ‌‘अनुभव'चे वाचक आम्हाला आवर्जून सांगत : ‌‘हे अंक फार उपयोगाचेआहेत. एकेका अंकाचं एकेक पुस्तक करायचं मनावर घ्या राव!' (मात्र, अशी पुस्तकं आम्ही करू शकलो नाही. हे अंक आमच्याकडे बाइंडिंग फॉर्ममध्ये तेवढे उपलब्ध आहेत.)

‘अनुभव'चा पहिला अवतार २००० सालापर्यंत चालला. पुढे ‌‘युवा'ने त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय केला, तेव्हा हा अंक आपण पुढे चालवायचा असं आम्ही ठरवलं. आपण सहा वर्षं एवढी मेहनत केली ती वाया जाता कामा नये असं तर वाटत होतंच, शिवाय आजच्या काळातल्या घडामोडींचा अर्थ लावण्यासाठी असं व्यासपीठ असायलाच हवं, अशी गरजही प्रकर्षाने जाणवत होती. आपल्याला जे व्हावं असं वाटतं ते आणखी कुणी करेल, अशी अपेक्षा न ठेवता स्वतःच मैदानात उतरायचं, असा आमचा एकूण खाक्या. त्यानुसार याही वेळी आम्ही मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. खरं पाहता ६४ पानी मासिक काढणं ही काही खायची गोष्ट नव्हती. आसपास जुनी-दर्जेदार मासिकं बंद पडत असताना आणि आमच्या पाठीशी कोणतंही भक्कम आर्थिक पाठबळ नसताना असा (अ)विचार आम्ही केला बुवा! आमच्याजवळ तेव्हा काय होतं? याचं एकमेव उत्तर ‌‘इच्छाशक्ती' हेच असावं. वर्तमानपत्रांसाठी लेख लिहिणाऱ्यांकडे मासिक काढण्याएवढे (आणि चालवण्याएवढे) पैसे असण्याची शक्यताच नव्हती. ‌‘अनुभव'सारख्या निमगंभीर स्वरूपाच्या मासिकांना वाचक-वर्गणीदार मिळतील का, जाहिरातदारांची साथ मिळेल का, वगैरे प्रश्न मात्र आमच्यासमोर आ वासून होते. टीव्हीच्या ‌‘मॅड बॉक्स'मध्ये अवघा वाचकवर्ग खेचला जात असताना आपला अंक कोण वाचेल, हा प्रश्न तर खास भेडसावणारा. पण आमच्यामध्ये कुठून तरी शक्ती संचारली होती! ‌‘युनिक फीचर्स'च्या दहा वर्षांच्या कामातून आत्मविश्वास मिळालेला होता. महाराष्ट्रातील लेखक, पत्रकार, संपादक, अभ्यासक, कवी, चळवळे लोक यांच्यासोबत आमचा उत्तम संपर्क होता. सोबतीला मुकुंद ठोंबरे, मनोहर सोनवणे, अमृता वाळिंबे, राजा कांदळकर, शुभदा चंद्रचूड, दीपा कदम, हारिस शेख यांच्यासारखे संपादकीय सोबती होते. या सर्वांच्या जोरावर आपण एक खणखणीत मासिक काढू शकतो, असा आत्मविश्वास होता.

पण प्रश्न पैशापाण्याचा होता. मासिक चालवण्यासाठी पैसे कुठून आणणार? एकीकडे असं वाटत होतं, की वर्गणीदार-वाचकांच्या बळावर आपण अंक चालवू शकू. ‌‘साप्ताहिक सकाळ'सोबत सलग दहा वर्षं काम केल्याने पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात ‌‘युनिक'ची चांगली ओळख झाली होती. दुसरीकडे मोठी दैनिकं आणि नामवंत दिवाळी अंकांसोबत दीर्घकाळ काम केल्याने वाचकांचं ‌‘युनिक'सोबत नातं तयार झालं होतं. त्यामुळे ‌‘युनिक' मासिक काढतंय म्हटलं, तर वाचक गोळा होतील आणि अंक आपल्या पायावर उभा राहील, असं वाटत होतं. पण हे घडायचं तर स्वबळावर किमान वर्षभर अंक काढावा लागणार. ही कळ कशी सोसायची? मग आम्ही ‌‘युवा'च्या मिनार पिंपळे यांनाच गळ घातली. मिनार आमचा मित्र झाला होता. ‌‘एक वर्षभर मदत केलीस तर गेल्या सहा वर्षांची आपली मेहनत वाया जाणार नाही' असं आम्ही त्याला कळकळीने सांगितलं. तो ‌‘युनायटेड नेशन्स'मध्ये एका मोठ्या जबाबदारीच्या मोहिमेवर निघाला होता. ‌‘आता काही होऊ शकत नाही,' असाच एकूण त्याचा सूर होता; पण तरीही त्याने मार्ग काढला. कसा ते त्याचं त्याला माहीत; पण ‌‘अनुभव'च्या कागद-छपाईच्या वर्षभराच्या खर्चाची जबाबदारी त्याने घेतली. केवढा दिलासा होता तो!

मग मात्र आम्ही सुटलोच! या वर्षभरात भरपूर वर्गणीदार करायचे, उत्तम अंक काढायचा आणि त्याच्या बळावर अंक ‌‘सेट' करून टाकायचा, असं आम्ही ठरवलं. (हे गणित इतकं सोपं नाही हे आम्हाला पुढे कळलंच.)‌‘अनुभव'च्या पहिल्या अवतारात वर्गणीदार मिळवण्याचं कौशल्य शिकलेल्या रवी जोगळेकरने वर्गणीदारांच्या जोरावर अंक उभा करण्याचं मनावर घेतलं. रवी जोगळेकर (ज्याने स्वत:चं नाव ‌‘आर्टी' असं करून घेतलं होतं) हे ‌‘अनुभव'च्या आयुष्यात आलेलं एक अफाट प्रकरण. याची-आमची आधीची ओळख नव्हती. कसलंसं व्यसन असल्याने तो ‌‘मुक्तांगण'मध्ये उपचार घेण्यासाठी आला होता. त्याच्यावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर ‌‘निर्व्यसनी लोकांसोबत त्याने काम केलं तर तो व्यसनापासून दूर राहू शकेल', असं ‌‘मुक्तांगण'चे संचालक असलेल्या अनिल अवचट यांना वाटत होतं. त्यांचं आमच्याकडे येणं-जाणं होतं. त्यांनी रवीला आमच्याकडे पाठवलं. आमच्यावर आलेली ही भलतीच जबाबदारी होती! पण सांगता कुणाला? आम्ही त्याला ‌‘अनुभव'च्या उभारणीत गुंतवलं. तुम्हाला सांगतो, या संधीचं रवीने अक्षरश: सोनं केलं. तो दीर्घकाळ व्यसनांपासून दूर राहिलाच, शिवाय त्याने ‌‘अनुभव'ची जबरदस्त पायाभरणीही केली. रोज पाच या नियमाने त्याने एकेका महिन्यात शंभर-सव्वाशे वर्गण्या गोळा केल्या. पाहता पाहता वर्षभरात दीड-पावणेदोन हजार वर्गणीदार ‌‘अनुभव'शी जोडले. पुढचं एक वर्ष अंक चालवायला लागणारे पैसे या पठ्ठ्याने एकट्याने गोळा केले.

रवीने वर्गणीदार मिळवण्याचं मिशनच हाती घेतलं होतं जणू! पण त्यापलीकडे त्याने वर्गणीदार मिळवण्याचं एक तंत्रही तयार केलं. ओळखपाळख नसताना घरोघरी जाऊन तो दहा-पंधरा मिनिटांत माणसाचा ‌‘वाचक' बनवत असे. वाचक बनू इच्छिणाऱ्यांना तो वर्गणीदार करत असेच, पण वाचनाबाबतीत निरुत्साही असणाऱ्यांनाही तो वाचनासाठी प्रेरित करत असे. रोज घरोघरी जाणं, वर्गणीदार मिळवणं, नोंदींचं रजिस्टर अजबगजब कोडवर्ड्‌‍सह मेंटेन करणं, पैसेपाण्याचे हिशोब सांभाळणं, वाचकांशी संवाद ठेवणं या आणि अशा अनेक गोष्टींचं एक तंत्रच त्याने तयार केलं. ‌‘अनुभव'मधील त्याची ‌‘इन्व्हॉल्वमेंट' आम्हालाही लाजवणारी होती. त्याची विचार करण्याची आणि काम करण्याची पद्धत राक्षसी होती. व्हायला पाहिजे म्हणजे व्हायला पाहिजे, असा त्याचा हट्ट असे. हा हट्ट इतका टोकाचा असे, की त्यामुळे तो सतत आनंदाच्या आणि निराशेच्या दोन टोकांवर उभा असे. व्यसनाची पार्श्वभूमी असणाऱ्यांना मनाची ही आंदोलनं खड्ड्यात घेऊन जाणारी असतात. त्यामुळे त्याला सांभाळणं आणि मनाच्या संतुलित अवस्थेत ठेवणं, हे आमच्यासमोरचं मोठंच आव्हान असे. पण ‌‘अनुभव'वरील त्याच्या प्रेमामुळे आणि ‌‘अनुभव'च्या त्याच्यावरील अवलंबित्वामुळे आम्ही हेही करायला शिकलो. दुसऱ्या बाजूने, आपण ‌‘अनुभव'मुळेच व्यसनापासून दूर राहून मानाने जगू शकतो, याची त्यालाही जाणीव होती. त्यामुळे तोही आमच्यावर पूर्ण विसंबून होता. पण त्याचं व्यसन त्याची मानगूट सोडत नव्हतं. त्यामुळे ‌‘मुक्तांगण' आणि ‌‘अनुभव' अशा दोन संस्थांमध्ये आळीपाळीने राहून त्याला काम करावं लागे. असं साताठ वर्षं त्याने काम केलं. या काळात त्याने हजारो वर्गणीदारांना ‌‘अनुभव'शी जोडलं. त्याच्या या अफाट कामगिरीमुळेच ‌‘अनुभव' आपल्या पायावर उभा राहिला.

हेही वाचा - 'ललित'चा जन्म, नेमका कसा आणि कुठे?

रवीचा पुण्या-मुंबईत तर संचार असेच, पण दक्षिणेत पार गोवा-बेळगावपर्यंत आणि सोलापूर-नगर-औरंगाबादपर्यंत सर्वत्र तो फिरत असे. अगदी वाई-भोर-महाड-फलटण-बारामती-लोणावळा अशा छोट्या शहरांतही त्याने शंभर-शंभर वर्गणीदार मिळवले होते. महाराष्ट्राबाहेर पडून देशातील अन्य शहरांतील मराठी भाषकांना जोडून घेण्याचाही त्याचा इरादा होता. पण अनेक कारणांमुळे ते शक्य होऊ शकलं नाही.

पुढे आपल्या व्यक्तिगत कारणांमुळे रवी काम करेनासा झाला, पण ‌‘अनुभव'वरील ‌‘आर्टी इफेक्ट' कायम राहिला. तो काम करत होता तेव्हाच त्याने एक-दोनदा कार्यशाळा घेऊन आपल्यासारखे काम करणारे लोक तयार करण्याचा प्रयत्न केला होता. औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई अशा ठिकाणी त्यामुळेच ‌‘अनुभव'चे वर्गणीदार होऊ शकले. पण ‌‘आर्टी' च्या प्रशिक्षणातून खरे दोन वीर घडले. मंगेश दखने आणि सागर जगधनी. ‌‘अनुभव'च्या प्रेमापोटी नवे वर्गणीदार शोधणं, त्यासाठी वाट्टेल ते कष्ट करणं, वर्गणीदारांशी व्यक्तिगत संपर्क प्रस्थापित करणं, अंक मिळणं-न मिळणं याबाबतच्या त्यांच्या अडीअडचणी स्वत: लक्ष घालून दूर करणं, ‘अनुभव'च्या कार्यक्रमांची निमंत्रणं पोहोचवणं असं काय काय ही मुलं ‌‘आर्टी' शैलीत करत असतात. खरं तर मंगेश आणि सागर हे दोघंही ‌‘ऑफिस असिस्टंट' म्हणून काम करणारे होते; पण दोघांनीही झपाट्याने प्रगती केली. ‌‘आर्टी मेथड' शिकून घेतल्याने त्यांनी ‌‘अनुभव'चे वर्गणीदार वाढवण्यात मोठा वाटा उचलला. नंतरच्या काळात धनश्री बेडेकर, दीप्ती अंतुरकर, भास्कर गोखले यांनीही ‌‘अनुभव'चे वर्गणीदार वाढावेत यासाठी बरेच प्रयत्न केले. मुंबई-ठाणे परिसरात ‌‘अनुभव'चा झेंडा खांद्यावर मिरवणारे विवेक संत हे तर ‌‘आर्टी'चेच दुसरे अवतार. त्यांचीही कामाची पद्धत अचाट. चार माणसं मिळून जेवढं काम करणार नाहीत, तेवढं काम हा एकटा माणूस लीलया करणार. कशासाठी? ‘अनुभव'च्या प्रेमापोटी! त्यांच्या दृष्टीने ‌‘अनुभव'ही सर्वोच्च गोष्ट. का? खरंतर कोणत्याही तर्कामध्ये बसणारं उत्तर त्याला नाही. ‌‘अनुभव' सुरू करण्याचा आमचा निर्णय व्यवहाराच्या कसोटीवर जेवढा अतार्किक होता, तेवढीच ‌‘अनुभव'साठी काम करणाऱ्यांच्या उत्साहामागची कारणंही अतार्किकच आहेत.‌‘अनुभव' हे रुढार्थाने कमर्शियल मासिक नसल्याने त्याला जाहिराती मिळणं अवघडच. पण आमची सहकारी पौर्णिमा सोमण हिने याबाबत हार मानलेली नाही. ‌‘अनुभव'च्या वितरणादि यंत्रणा निर्दोषपणे चालाव्यात यासाठी प्रिती काटे, भाविका कोल्हटकर, अपूर्वा कदम, सारिका काळस्कर आणि अजय कसबे या सहकाऱ्यांनीही बरंच रक्त आटवलं आहे. या आणि अशा सोबत्यांमुळेच ‌‘अनुभव' आज उभं आहे आणि महाराष्ट्रातील ‌‘विचारी' वाचकांपर्यंत पोहचू शकलं आहे.

(क्रमशः)

(सुहास कुलकर्णी लिखित 'आमचा पत्रकारी खटाटोप' या समकालीन प्रकाशनच्या पुस्तकातून साभार)

सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com

सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results