‘यंदा उकाडा फारच आहे, नाही!’ असं आपण दरवर्षी म्हणतो. यातला अतिशयोक्तीचा भाग जाऊ दे, पण गेली काही वर्षं उन्हाळ्याच्या दिवसांत सातत्याने चढं तापमान असतं, उन्ह अधिक भाजताना दिसतं, हे नाकारता येत नाही.
हवामानखात्याच्या नोंदींनुसार १९०१ ते २०२४ या काळात भारताचं सरासरी तापमान ०.९ अंश सेल्सियसने वाढलं. त्यातही १९९० सालानंतर ही वाढ अधिक झपाट्याने झाली. २०१५ ते २०२५ हे दशक सर्वाधिक उष्ण म्हणून नोंदवलं गेलं. तर २०२४ हे शतकभरातलं सर्वात उष्ण वर्ष ठरलं. पर्यावरण अभ्यासक सांगतात, की दर ०.१ अंश सरासरी तापमानवाढीमुळे उष्णतेच्या अधिक लाटा येऊ शकतात, अधिक प्रखरतेने येऊ शकताते; पावसाचा लहरीपणा वाढू शकतो, दुष्काळाचं प्रमाणही वाढू शकतं.
अर्बन हीट आयलंड इफेक्ट
गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः मोठ्या शहरांमध्ये उन्हाळ्यात दिसून येणारी तापमानाची उसळी गंभीर आहे. युरोप-अमेरिकेतही अनेक ठिकाणी उन्हाळ्यात ‘हीट वेव्ह’ आल्याच्या बातम्या आजकाल कायम वाचायला मिळतात. कशामुळे होतं हे? भारतातली, जगभरातली शहरं इतकी का तापतात?
शहरं तापतात, त्याला ‘अर्बन हीट आयलंड इफेक्ट’ म्हटलं जातं. शहरात जिथे जिथे सिमेंट-काँक्रीटच्या इमारतींची दाटीवाटी अधिक असते तिथे दिवसा तापमान जास्त असतं. इमारती जिथे तुलनेने विरळ असतात, जिथे रस्त्याकडेला थोडीफार झाडं असतात तिथे तुलनेने तापमान कमी असतं. शहरांच्या परिघावर तापमान आणखी कमी असल्याचं दिसून येतं. एकाच शहरातल्या वेगवेगळ्या भागांतल्या तापमानात सरासरी तब्बल १० अंश सेल्सियसचा फरक पडतो, असं पर्यावरणसंस्थांच्या अभ्यासातून पुढे आलं आहे.
हेही वाचा - उष्णतेच्या लाटा : आपत्ती व्यवस्थापन का होत नाही?
डेरेदार झाडं हवीत
तापमान सुसह्य राहण्यासाठी झाडी, हिरवाई हवी, ही बाब आपसूक पुढे येते. मात्र सरसकट कोणतीही हिरवाई याकामी मदत करत नाही. समजा, एखादी मोठी मोकळी जागा किंवा मैदान आहे, तिथे आसपास इमारतींची दाटीवाटी फारशी नाही, झाडं नाहीत, पण भरपूर हिरवळ आहे, तर अशा जागी कमी तापमान आढळत असेल का? तर प्रत्यक्षात असं होत नाही. हिरवळ डोळ्यांना सुखावणारी वाटली तरी शेवटी ते जमिनीलगत उगवलेलं गवत असतं. हिरवळीमुळे जमिनीला सावली मिळत नाही. तापमान कमी-जास्त होण्यात गर्द सावलीचा मुख्य हातभार असतो. गर्द सावली हवी असेल तर त्यासाठी मोठी, उंच डेरेदार झाडंच हवीत.
शहरांमध्ये इमारती काँक्रीटच्या असतात. इमारतींच्या सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर काच वापरली जाते. लहान-मोठे रस्ते तयार करताना खडी-डांबर नाहीतर काँक्रीट वापरलं जातं. हे सर्व पदार्थ दिवसा सूर्याची उष्णता शोषून घेतात आणि रात्रीच्या वेळेत ती बाहेर टाकतात. त्यामुळे वरती म्हटलेला तापमानातला फरक रात्री अधिक असतो, असंही अभ्यासांद्वारे दिसून आलेलं आहे. सुरुवातीला उल्लेख केलेल्या हवामानखात्याच्या सव्वा शतकाच्या नोंदींमधूनही ही बाब समोर आली आहे.
झाडांमुळे कसा फरक पडतो?
डेरेदार झाडांमुळे बरोबर याच्या उलट प्रक्रिया घडते. झाडांची पानं सूर्यप्रकाश शोषून घेतात. फांद्या आणि पानांच्या दाट आच्छादनामुळे कडक उन्ह रोखलं जातं. खालच्या मातीतला ओलावा बाष्पाच्या स्वरूपात हळूहळू वातावरणात सोडला जातो. तसंच पानांमधल्या सूक्ष्म छिद्रांवाटे झाडंही सावकाश बाष्प बाहेर टाकत असतात. तेवढ्याच प्रमाणात झाडांची मुळं जमिनीतून अधिक ओलावा शोषून घेतात. झाडांचा पर्णसंभार, उंची, मुळांची खोली, खोडाचा दणकटपणा या घटकांवर ही सर्व प्रक्रिया अवलंबून असते. झाडं जितकी उंच, जितकी मोठी, त्यांच्या फांद्यांचा पसारा जितका अधिक तितकी ही प्रक्रिया प्रभावीपणे सुरू राहते. हवेत बाष्प सोडलं जातं त्याने वातावरणातला उष्मा, रखरखीतपणा कमी होतो. साहजिकच आसपासच्या परिसरातलं तापमान खाली येतं.
कडक उन्हाला कोणताच अटकाव नाही
गेल्या काही वर्षांमध्ये शहरं विस्तारत चालली आहेत. शहरांचा विस्तार जितका अधिक तितकी माणसांच्या सोयीसुविधांसाठी बांधकामं अधिक. बांधकामांना जागा मिळावी यासाठी जुनी झाडं तोडली जातात. त्या बदल्यात अन्य ठिकाणी वृक्षारोपण करण्याचं आश्वासन प्रशासनातर्फे दिलं जातं. काही ठिकाणी असं वृक्षारोपण प्रत्यक्षात उतरतं. पण नव्याने लावलेली झाडं लहान असतात. त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत, फांद्याचा पसारा वाढेपर्यंत त्यांची काळजी घ्यावी लागते. पण त्याकडे फारसं लक्ष पुरवलं जात नाही. दरम्यान तोडलेल्या झाडांच्या परिसरातली गर्द सावली नष्ट झालेली असते. कडक उन्हाला कोणताच अटकाव राहत नाही.
मानवनिर्मित बांधकामं वाढत जातात तसं पावसाचं पाणी जमिनीत मुरण्याचं प्रमाण कमी कमी होत जातं. जमिनीत बाष्पही नाही, आहे त्या बाष्पाचा नेमका वापर होण्यासाठी झाडंही नाहीत, अशा परिस्थितीत साहजिक तिथलं तापमान चढं दिसायला लागतं.
शहरं राखण्यासाठीचं नियोजन हवं
निव्वळ इथे-तिथे काही झाडं लावणंही पुरेसं नसतं. त्यासाठी मोठी उद्यानं हवीत. झाडांची भरपूर संख्या हवी. वातावरण फार तापू न देण्यासाठी त्यांची एकत्रित सामूहिक प्रक्रिया घडायला हवी.
उष्णतेच्या लाटांमागे झाडांची संख्या घटत जाणं हे प्रमुख कारण आहेच. जोडीला उंच उंच होत जाणार्या इमारतींमुळे त्या-त्या परिसरातलं वायूविजन कमी होतं. जास्त इमारती असतात तिथे वातानूकूलन यंत्रांचा अधिक वापर होतो. त्यांतूनही उष्णता बाहेर टाकली जाते. आणि तीव्र तापमानाचं दुष्टचक्र सुरू राहतं.
शहरांमधील प्रत्येक छोट्या-छोट्या कॉलनी-नगरापासून ते एक-एक मोठा परिसर, असं करत करत प्रत्येक टप्प्यावर यथोचित बदल करून, शहरं ‘राखण्यासाठीचं’ नियोजन करून यावर मात करणं शक्य असतं, असं पर्यावरण अभ्यासक सांगतात.
अखेर शहरंही आपली, निसर्गही आपलाच.
प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com
प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.
