
३५ वर्षांपूर्वी म्हणजे १४ फेब्रुवारी १९८९ या दिवशी एक फतवा निघाला. भारतीय वंशाच्या परंतु इंग्लंडचे नागरिक असलेल्या लेखक सलमान रश्दी यांना जीवे मारण्याचा तो फतवा होता. तो काढला इराणचे तत्कालीन धार्मिक प्रमुख अयातुल्ला खोमेनी यांनी. 'सॅटनिक व्हर्सेस' या सलमान रश्दी यांच्या पुस्तकातल्या लिखाणामुळे मुहम्मद पैगंबरांचा अपमान झाला, निंदा झाली, असं त्यांचं मत होतं. आज तो फतवा निघून ३५ वर्षं झाली. सलमान रश्दी आज जिवंत आहेत. पण या ३५ वर्षांत त्यांनी आणि त्यांच्या या पुस्तकानेही अनेक बरे वाईट प्रसंग अनुभवले आहेत.
'सॅटनिक व्हर्सेस'च्या आधी सलमान रश्दी यांची तीन पुस्तकं आली होती. ग्रिमस, मिडनाईट चिल्ड्रन आणि शेम. 'सॅटनिक व्हर्सेस' प्रमाणेच या सर्वच पुस्तकांनी कमी अधिक प्रमाणात वादंग निर्माण केले होते. त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकाही भारत, पाकिस्तान, इराण इत्यादी देशांच्या सत्ताधाऱ्यांना आवडणाऱ्या नव्हत्या.
या पार्श्वभूमीवर १९८८ मध्ये 'सॅटनिक व्हर्सेस' प्रकाशित झालं. प्रसिद्ध झालं आणि त्यावरून त्यांना जीवे मारण्याचा फतवा निघाला. रश्दी यांनी माफी मागावी अशी मागणी जोर धरू लागली. त्यावर ‘खरं म्हणजे मी याहून अधिक टीकात्मक लिहायला हवं होतं, असं आता मला वाटतंय’ असं विधान रश्दींनी तेव्हा केलं होतं. ‘माझी कादंबरी धर्मविरोधी नाही तर विस्थापितांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणारी आहे’, असंही ते म्हणाले होते.
फतवा निघल्यानंतर रश्दी यांनी माफी मागितली नाही; पण त्यानंतर त्यांना नऊएक वर्ष लंडनमध्ये लपून राहावं लागलं. जवळजवळ वीस देशांनी या पुस्तकावर बंदी घातली. भारतही यात सामील होता. त्याबद्दल पुढे खुलासा येईलच. पण तेव्हाच एकवीस देशांच्या २८ लेखकांनी न्यू यॉर्क टाइम्समध्ये सलमान रश्दींच्या बाजूने लिहिलंही आणि स्वतःच्या लिखाणाच्या बाबतीत आलेले असे अनुभव जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जगभरातले १०० मुस्लिम लेखक रश्दींच्या बाजूने उघडपणे उभे राहिले. या दरम्यान 'सॅटनिक व्हर्सेस'ची विक्री होणाऱ्या पुस्तकांच्या दुकानांना आगी लावण्यात आल्या. अनेक देशांमध्ये रस्त्यावर उतरून या पुस्तकाविरोधात निदर्शनं केली गेली. देशोदेशी 'सॅटनिक व्हर्सेस'च्या प्रती जाळल्या गेल्या.
फतवा निघाल्यानंतर दहा महिन्यांनी म्हणजे ऑगस्ट १९८९ मध्ये मुस्तफा माझेह याने आरडीएक्स बॉम्बने रश्दी यांना जिवे मारण्याचा कट केला. परंतु लंडनच्या एका हॉटेलमध्ये बॉम्ब बनवत असतानाच तो फुटला आणि त्यात मुस्तफाचा मृत्यू झाला. दरम्यान पुस्तकाच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या माणसांवरही जीवघेणे हल्ले होत राहिले. या पुस्तकाचा जपानी भाषेत अनुवाद करणाऱ्या हितोशी इगारशी यांचाही खून झाला. पण रश्दी कुणाच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे पुढे १९९७ मध्ये त्यांना मारण्यासाठी जाहीर झालेलं बक्षीस २० लाखांवरून ३३ लाख करण्यात आलं.
इराणने ब्रिटिश नागरिक असलेल्या रश्दी यांच्या नावे फतवा काढल्यामुळे ब्रिटनने इराणशी असलेले परराष्ट्रीय संबंध स्थगित केले होते. बहुदा हे संबंध पुर्नप्रस्थापित करावेत यासाठी १९९८ मध्ये इराणच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी फतव्याचा पाठिंबा काढून घेतला. एव्हाना सलमान रश्दी न्यूयॉर्कमध्ये राहायला लागले होते आणि तब्बल नऊ वर्षानंतर खुलेआम लोकांमध्ये जाऊ शकत होते.
तरीही रश्दी यांना प्रत्येक ‘व्हॅलेंटाईन डे’ला इराणवरून प्रेमपत्रं येत राहिली. ‘आमचा देश तुला मारण्याची शपथ विसरलेला नाहीय’ अशा आशयाची ती पत्रं असायची. २०१० मध्ये ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेने जाहीर केलेल्या त्यांच्या हिट लिस्टमध्येही रश्दी यांचं नाव सामील केलं होतं.
सलमान रश्दी आता सुरक्षित आहेत असं वाटत असतानाच फतवा निघाल्यानंतर ३३ वर्षांनी, १२ ऑगस्ट २०२२ला न्यूयॉर्कमधल्या एका ऑडिटोरीअममध्ये भाषण देत असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. हेडी मातार नावाच्या २४ वर्षाच्या मुलाने रश्दी यांच्यावर चाकूने १५ पेक्षा जास्त वार केले. त्यांच्या हातावर आणि पोटात अनेक जखमा झाल्या. एक डोळा संपूर्ण निकामी झाला. त्यांच्यावर केले गेलेले घाव इतके गंभीर होते की यातून रश्दी वाचतील का अशी शंका व्यक्त होत होती. पण रश्दी बरे तर झालेच; शिवाय त्यांनी आपल्या तीन आठवड्याच्या हॉस्पिटल वास्तव्यात केलेल्या चिंतनावर ‘नाईफ’ नावाचं पुस्तकही लिहिलं.
दरम्यान भारतामध्ये ‘सॅटनिक व्हर्सेस’ वर बंदी घालण्याविरुद्ध कोर्ट केस दाखल करण्यात आली होती. अलीकडेच म्हणजे नोव्हेंबर २०२४मध्ये, दिल्ली उच्च न्यायालयासमोर ती केस आली. त्यामध्ये ‘सॅटनिक व्हर्सेस’ वर बंदी घालणारा १९८८ सालातला सरकारी आदेश आताचे सरकारी अधिकारी कोर्टात दाखल करू शकले नाहीत. त्यामुळे कोर्टाने ‘असा कोणता आदेश निघालाच नव्हता’, असा निष्कर्ष काढत ‘सॅटनिक व्हर्सेस’वर भारतात बंदीच नाहीय, असा निर्णय दिला.
गेल्या आठवड्यात रश्दींवर हल्ला करणाऱ्या हेडी मातार विरुद्धची केस न्यू यॉर्क कोर्टात उभी राहिली आहे. दोनच दिवसांपूर्वी रश्दी त्या केसमध्ये साक्ष देण्यासाठी आले होते. फतवा निघाल्यापासून ३५ वर्षांनी सलमान रश्दी कोर्टात उभं राहून आपली बाजू मांडताना, आपल्या एका पुस्तकाचे आफ्टर इफेक्ट झेलताना दिसले.
मृदगंधा दीक्षित | mrudgandha.uniqueportal@gmail.com
मृदगंधा दीक्षित युनिक फीचर्समध्ये संपादकीय विभागात कार्यरत असून त्यांना कथा-कादंबरी-कविता लिहिण्यातही रस आहे.