
'ललित' हे मराठीतील एक दर्जेदार मासिक. मराठी नियतकालिकांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या मासिकाची दखल न घेता ते काम पूर्ण होणारच नाही. ६२ व्या वर्षात पदार्पण केलेल्या या मासिकाच्या शीर्षस्थानी मथळा असतो : 'ग्रंथप्रेमी मंडळाच्या सहकार्याने ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार आणि ग्रंथसंग्रह या विषयांना वाहिलेले मासिक'
या मासिकाचं जन्मस्थान कोणतं? मुंबईतील पवईजवळचं विहार लेक? की मुंबईतीलच माहीम येथील टायकलवाडी?
हा प्रश्न पडण्याचं कारण, म्हणजे माझ्या वाचनात आलेली दोन पुस्तकं- एक आहे सुधीर रसाळ व वसंत पाटणकर यांनी संपादित केलेलं 'वाङ्मयीन युगांतर आणि श्री. पु. भागवत'. दुसरं आहे सुप्रसिद्ध प्रकाशक रामदास भटकळ यांचं 'जिव्हाळा'.
या दोन्ही पुस्तकांत 'ललित'च्या जन्माबद्दल आणि जन्मस्थळाबद्दल वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली आहे.
'अंतर्नाद' या आता अंतर्धान पावलेल्या दर्जेदार मासिकाच्या २००५च्या दिवाळी अंकात मधु मंगेश कर्णिक यांनी एक लेख लिहिला होता. तो लेख 'वाङ्मयीन युगांतर आणि श्री. पु. भागवत' या पुस्तकात वाचायला मिळतो. या लेखातील माहितीप्रमाणे 'ललित'चा जन्म पवईजवळील विहार तलाव इथे झाला.
याबाबत अधिक माहितीसाठी वि. शं. चौघुले यांनी संपादित केलेलं 'मॅजेस्टिक कोठावळे' हे पुस्तक वाचलं. त्यातून काही गोष्टी कळल्या. केशवराव कोठावळ्यांना माणसांचा छंद होता. त्यांच्या कार्यालयाला अनेक लेखक भेट देत असत. त्यापैकी काही लेखक व कोठावळे यांची पुढे दाट मैत्री झाली. मग दर महिन्याला हे लेखक ठरवून एकत्र भेटायला लागले. पुढे पुढे दर दोन महिन्यांनी या लेखकांच्या मुंबई किंवा मुंबईबाहेर सहली होऊ लागल्या. १९६३ साली अशीच एक सहल पवई येथील विहार लेकला गेली होती. या सहलीत केशवरावांशिवाय जयवंत दळवी, वसंत सरवटे, शं. ना. नवरे, पंढरीनाथ रेगे, पुरुषोत्तम धाक्रस, ज्ञानेश्वर नाडकर्णी, रमेश मंत्री, उमाकांत ठोमरे, चंद्रकांत काकोडकर आणि नोकरीतील बदलीमुळे मुंबईत आलेले पुणेकर श्री. ज. जोशी हे होते. शं. ना. नवरेंच्या मते ‘या सहलीत एकत्र भोजनात कितीतरी गप्पा व्हायच्या. ठरवून वाङ्मयीन चर्चा झाल्या नाहीत तरी अनेक योजना आखल्या जायच्या.’
अशाच एका पावसाळी सहलीत 'ग्रंथप्रेमी मंडळ' स्थापन करून 'ललित' हे वाङ्मयीन मासिक सुरू करण्याचं ठरवलं गेलं. वसंत सरवटे, शं. ना. नवरे यांनीही आपल्या आठवणींत अशीच माहिती सांगितली आहे. या बैठकीस हजर नसलेल्या पण 'ललित'बद्दल लेख लिहिणाऱ्या राजा राजवाडे, माधव गडकरी, वि. शं. चौघुले यांनीही पुढे आपल्या लेखांत हीच माहिती दिली आहे.
मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्या 'करूळचा मुलगा' या आत्मचरित्रात या गोष्टीस दुजोरा दिलेला आढळतो. त्यांनी या पुस्तकात 'ललित'ची जन्मकथा विस्तृतपणे सांगितली आहे. त्यांच्या आठवणीप्रमाणे विहार लेकला अशीच एक पावसाळी सहल गेली होती. त्यावेळी कर्णिक सांताक्रूझ येथे राहायचे. तेथील त्यांच्या एका नगरसेवक मित्राच्या ओळखीने मुंबई महापालिकेचा बंगला सहलीसाठी मिळाला होता. कर्णिकांचे मित्र डॉ. अवसरे यांच्या गाडीने व दुसऱ्या एका गाडीने सारे साहित्यिक मित्र तिथे गेले. कर्णिक लिहितात, की 'या सहलीमध्ये आम्हा सर्व साहित्यिकांचं एक वाङ्मयीन मासिक असावं असं ठरलं. या बैठकीचा कार्यवृत्तांत माझ्या हस्ताक्षरात लिहिलेला होता. मला वाटतं, उपस्थित सर्वांनी त्यावर सहमतीदर्शक सह्या केल्या होत्या. 'ललित' या नावाचं मासिक १९६४च्या प्रारंभापासून काढायचा निर्णय त्या सहलीमध्ये झाला. त्यावेळी जमलेल्या सर्वांच्या मते त्या मंडळाला ‘ललित ग्रंथप्रेमी मंडळ' असं नाव देण्याचं ठरलं. संस्था, घटना, रजिस्ट्रेशन वगैरे काही नाही. या ग्रंथप्रेमी मंडळाचं तहहयात अध्यक्षपद ज्ञानेश्वर नाडकर्णीकडे असावं असं ठरलं. तसंच मासिकाची आर्थिक जबाबदारी केशवराव कोठावळ्यांनी 'मॅजेस्टिक'तर्फे उचलावी, संपादकीय जबाबदारी पुरुषोत्तम धाक्रस यांनी सांभाळावी व आम्ही सर्व लेखकांनी साहित्याची बाजू पाहावी, असं ठरलं. चित्रं अर्थातच वसंत सरवट्यांची - त्यांना पर्याय नव्हता! अशा रीतीने ललित मासिकाचा जन्म झाला. हा इतिहास आज फारच थोड्यांना माहीत असेल. त्यावेळच्या 'ललित ग्रंथप्रेमी मंडळा'पैकी आज सरवटे व मी एवढेच हयात आहोत. त्यापैकी वसंत सरवटे सोडले तर कुणाचा 'ललित'शी लेखक वा सहकारी म्हणून संबंध राहिल्याचं दिसत नाही.' ( करूळचा मुलगा: मधु मंगेश कर्णिक: मौज प्रकाशन: प.आ.२५ सप्टेंबर २०१२)
(या दोघांपैकी आता फक्त मधु मंगेश कर्णिक हयात आहेत. २४ सप्टेंबर २०१६ रोजी वसंत सरवटे यांचं निधन झालं.)
ठरल्याप्रमाणे जानेवारी १९६४ मध्ये 'ललित'चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. प्रथम पुरुषोत्तम धाक्रस यांनी 'ललित'चं संपादन केलं. त्यानंतर दर दोन महिने एकेका सदस्याने संपादन करावं असं ठरलं होतं. त्याप्रमाणे जयवंत दळवींनी दोन महिने संपादन केलं. नंतरची पाळी ज्ञानेश्वर नाडकर्णींची होती. पण ते न आल्यामुळे ती जबाबदारी केशवराव कोठावळ्यांवर येऊन पडली ती कायमचीच. 'ग्रंथप्रेमी मंडळा'चे सदस्य त्यांना संपादनात साहाय्य करू लागले. लक्षात घेण्यासारखी बाब, म्हणजे पहिल्या दोन-तीन वर्षांत मंडळाच्या सदस्यांनी आणि सर्वच लेखकांनी अंकासाठी विनामूल्य लेखन केलं. खुद्द कोठावळेंनी असं म्हटलं आहे.
म्हणजे या साऱ्यांच्या म्हणण्यानुसार 'ललित'चा जन्म विहार लेक येथील मुंबई महापालिकेच्या बंगल्यात झाला आहे.
या आठवणींत कुठेही रामदास भटकळांचं नाव नाही. पण भटकळांनी त्यांच्या 'जिव्हाळा' या आठवणीपर पुस्तकात निराळीच माहिती सांगितली आहे. ते लिहितात, ‘ललित मासिकाच्या जन्माची कथा सांगण्यासारखी आहे. केशवराव कोठावळे यांचा लोकसंग्रह फार मोठा. मॅजेस्टिक बुक डेपोचं कार्यालय हा एक गप्पांचा अड्डाच त्यांनी बनवला होता. मौज कार्यालय काहीशा गंभीर चर्चांसाठी, तर मॅजेस्टिक मनमोकळ्या गप्पांसाठी सोयीचं झालं होतं. मॅजेस्टिकमधल्या कंपूला ग्रंथप्रेमी मंडळ म्हणत. केशवरावांच्या घरी बरेचदा पार्टी होत असे. काही वेळा मंडळी सातपाटीसारख्या ठिकाणी सहलीला जात. मी त्यात फार नसायचो. माझ्या इतर व्यापांमुळे एक महत्त्वाची गोष्ट माझ्या घरी सुरू झाली. ग्रंथप्रेमी मंडळाचं एक मुखपत्र असावं अशी कल्पना निघाली. त्यासाठी माझ्या टायकल वाडीतल्या घरात मित्रमंडळी जमली. मुखपत्र निघावं याबद्दल एकमत होतं. ते कोणी काढावं, त्यासाठी वेगळी संस्था काढावी का, अशी चर्चा चालली होती. विष्णुपंत भागवत हे आमच्यात सर्वात अनुभवी. यापूर्वी पुण्यात एक ग्रंथप्रकाशक सभा निघाली होती, त्याचा अनुभव वाईट होता. विष्णुपंतांनी सुचवलं, की मालकी कोणा एकाकडे असावी, बाकी सर्वांनी त्याला मदत करावी. जबाबदारी घ्यायला केशवराव कोठावळे तयार झाले आणि सर्वांना ते मान्यच होतं. विष्णुपंत म्हणाले की मौज प्रेस वर्षभर बिलाची काळजी न करता छपाई करून देईल. आम्ही दोन-चार प्रकाशक होतो, त्यांनी वर्षभर प्रतिसाद येवो न येवो जाहिरात द्यायचं कबूल केलं. वसंत सरवटे सजावटीला सज्ज झाले. जयवंत दळवी, ज्ञानेश्वर नाडकर्णी, मधु मंगेश कर्णिक, उमाकांत ठोमरे इत्यादिकांनी लेखनाची जबाबदारी उचलली. 'ललित'चा जन्म झाला आणि कोठावळ्यांनी त्याचं सोनं केलं.'
'ललित'चं हे ६२ वं वर्ष आहे. पुढे-मागे कोणाला या मासिकाबद्दल लिहायचं असेल, अभ्यास करायचा असेल तर त्याची निर्मिती कशी झाली आणि कुठे झाली ही माहिती असणं आवश्यक आहे. कर्णिक व भटकळ यांच्या पुस्तकांपैकी एकच पुस्तक जर कोणी वाचलं तर तो त्या लेखकाने सांगितलेली माहिती खरी समजून चालेल.
कदाचित असंही असू शकेल, की विहार लेकला 'ललित' काढायचं असं ठरल्यावर दुसरी बैठक टायकलवाडी येथे झाली असावी. 'मॅजेस्टिक कोठावळे' या पुस्तकात सध्याचे 'ललित'चे मालक अशोक कोठावळे यांची मुकुंद टाकसाळे यांनी घेतलेली मुलाखत आहे. त्यात कोठावळे म्हणतात, की '१९६४साली ललितचा जन्म झाला. पहिल्यांदा दोघा-तिघा प्रकाशकांनी मिळून ते मासिक चालवावं असा एक विचार पुढे आला. पण वि. पु. भागवत वगैरे प्रकाशक मंडळींचं मत पडलं, की बाबा एकटे हे मासिक चालवायला समर्थ आहेत.'
भटकळ यांनीही आपल्या आठवणीत त्यांच्या घरच्या बैठकीला विष्णुपंत भागवत हजर असल्याचं व त्यांनी पुण्यातील एक जुनी आठवण सांगितल्याचं म्हटलं आहे. परंतु ना विहार लेकला जमलेल्या कोणा साहित्यिकाने या दुसऱ्या बैठकीचा उल्लेख केला आहे, ना मधु मंगेश कर्णिकांनी!
मग एकच मार्ग दिसतो. तो, म्हणजे एवढे तर्कवितर्क करण्याऐवजी या दोघा महान साहित्यिकांनाच विचारलं तर.. दोघंही नव्वदीत आहेत, पण आजही सामाजिक क्षेत्रात क्रियाशील आहेत आणि दोघांचीही स्मरणशक्ती शाबूत आहे. कमीत कमी शंकेचं निरसन तरी होईल!
संदर्भ:
वाङ्मयीन युगांतर आणि श्री. पु. भागवत: संपादन- सुधीर रसाळ, वसंत पाटणकर
मॅजेस्टिक कोठावळे: संपादन वि. शं. चौघुले
कुरूळचा मुलगा: मधु मंगेश कर्णिक
जिव्हाळा: रामदास भटकळ
प्रदीप राऊत
प्रदीप राऊत हे विविध विषयांवर लिखाण करणारे हौशी लेखक असून सध्या एकोणीसाव्या शतकातील घडामोडींचा अभ्यास करत आहेत.