आम्ही कोण?
ले 

गुणवत्तेचा लातूर पॅटर्न ते शिक्षणाचे बाजारीकरण

  • विवेक घोटाळे
  • 20.05.26
  • वाचनवेळ 6 मि.
latur pattern

मराठवाड्याच्या मागसलेपणात किंवा प्रादेशिक असमतोलामागे शिक्षण हा घटक महत्त्वाच्या कारणांपैकी एक आहे. निजामाच्या राजवटीखाली असलेल्या मराठवाड्यात ब्रिटिश कालखंडातलं आधुनिक शिक्षण त्यामानाने उशीराने पोहचलं. उर्वरित महाराष्ट्र ब्रिटिशांच्या राजकीय गुलामगिरीखाली असला तरी तिथे आधुनिकतेचे वारे लवकर आले. त्या तुलनेत निजामांनी मराठवाड्याला आधुनिकतेचा स्पर्श होऊ दिला नाही.

निजामकाळात खाजगी शिक्षणसंस्था काढण्यास परवानगी नव्हती आणि निजामशासित शाळांमधील शिक्षण ऊर्दू भाषेतून होतं. अशा वातावरणातही हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या कालखंडात काही स्वातंत्र्यसैनिकांनी, आर्यसमाजाच्या विचारातून तयार झालेल्यांनी शाळा सुरू करण्याचं धैर्य दाखवलं. जुन्या उस्मानाबाद जिल्ह्यात बाबासाहेब परांजपे, देवीसिंह चौहान गुरूजी आदींनी त्यात पुढाकार घेतलेला दिसतो.

परंतु लातूर (जुना उस्मानाबाद जिल्हा) किंवा एकूणच मराठवाड्यात शिक्षणाचा खरा प्रसार-विस्तार निजामी राजवट संपुष्टात आल्यानंतरच सुरू झाला. विशेषतः मारवाडी समाजातील नेतृत्व याकामी आघाडीवर होतं. त्यांच्या प्रयत्नांस स्थानिक मारवाडी, मराठा आणि लिंगायत समाजातील दानशूर व्यापारी आणि स्थानिक राजकीय नेतृत्वाने मदत केली. सर्व समाजघटकांना शिक्षण मिळालं पाहिजे, हा त्यांच्या समोरील ध्येयवाद होता. जिल्हानिर्मितीपर्यंत प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या चांगल्या सोयी अस्तित्वात होत्या. परंतु उच्चशिक्षणासाठी हैद्राबाद, औरंगाबादला जावं लागत असे. नंतर हा ओढा पुण्याकडे वळला. परभणी, राहुरी, अंबेजोगाई, परळी, उमरगा येथेही विद्यार्थी जात असत.

शिक्षणाचा 'लातूर पॅटर्न'

सुरुवातीस ध्येयवेड्या शिक्षणप्रेमींनी ज्या शिक्षणसंस्था सुरु केल्या त्यातच 'लातूर पॅटर्न' ची बीजं होती. त्यास जिल्हानिर्मितीनंतर बाळसं आलं. जिल्हानिर्मितीनंतर पाच वर्षांतच येथील विद्यार्थी दहावी-बारावी परीक्षेत राज्यात पहिले-दुसरे येऊ लागले. राज्याची अर्धी मेरिट लिस्ट जिल्ह्याने काबीज केली. १९८८ साली गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना तेव्हाचे शिक्षणमंत्री विलासराव देशमुख म्हणाले, 'आमचा प्रगतीचा हा लातूर पॅटर्न आहे.' तेव्हापासून 'लातूर पॅटर्न' हा शब्द प्रचलित झाला. गुणवत्तेची परंपरा दरवर्षी सातत्याने सुरू राहिली. लातूरसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पुणे-मुंबई-नाशिकची परंपरा मोडीत काढली. काही लोक या यशाकडे संशयाने पाहू लागले. शिक्षणमंत्री लातूरचे असल्याने लातूरचे विद्यार्थी सातत्याने मेरिटमध्ये येतात, असंही म्हटलं गेलं. पुढे विलासरावांचं खातं बदललं, १९९५ साली ते पराभूतही झाले. परंतु लातूरची मेरिटची परंपरा मात्र कायम राहिली. प्रा. जनार्दन वाघमारे म्हणाले होते त्याप्रमाणे, 'शिक्षणातील मागासलेपणाच्या मानसिकतेतून लातूर पॅटर्नचा जन्म झाला होता.'

हेही वाचा - आता तरी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबतील?

शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्या कष्टातून-सहकार्यातून व संवादातून लातूर पॅटर्न विकसित झाला. शिक्षकांनी शिकवण्याचा वेळ वाढवला, तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा वेळ वाढवला. वैयक्तिक लक्ष, अधिक सराव, दर्जेदार नोट्स, टीम वर्क, खाजगी शिकवणीचा अभाव, राजकीय हस्तक्षेपाचा अभाव ही त्याची वैशिष्ट्यं. यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि गुणवत्ता वाढीस लागली. लातूर पॅटर्न उभारणीत प्राचार्य ना. य. डोळे, प्रा. जनार्दन वाघमारे, प्रा. के. एच. पुरोहित, प्रा. अनिरूद्ध जाधव, प्रा. शिवाजीराव पाटील, प्रा. व्ही. व्ही. ढोबळे, प्रा. शिवराज नाकाडे, प्रा. नागोराव कुंभार, प्रा. आर. एल. कावळे, प्रा. एम. एस. देशमुख, प्रा. मधुकर मुंडे, डॉ. एन. ए. मोटे इत्यादींचे विचार आणि संघटन-प्रशासन महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या प्रयत्नांस पुरणमलजी लाहोटी-बियाणी-बाजपेयी-राठी कुटुंब, केशवराव-माणिकराव-अरविंद सोनवणे कुटुंब, शिवप्पा पटणे गुरुजी, अॅड. नारायणराव पाटील, अॅड. किशनराव सावरीकर, अॅड. विष्णुपंत गोरे, अॅड. सांबप्पा गिरवलकर, अॅड. विजयकुमार शेटे, शिवशरणअप्पा चितकोटे, कापसेअप्पा, लोखंडेअप्पा, शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, डॉ. गोपाळराव पाटील, वसंतराव काळे, किशनराव देशमुख, दिलीपराव देशमुख ,विक्रम काळे इत्यादींनी हातभार लावला.

शिक्षणसंस्थांची साथ

राजर्षी शाहू, दयानंद, म. बसवेश्वर, म. गांधी, मा. दीनानाथ मंगेशकर, कुमारस्वामी, उदयगिरी, शिवाजी, म. फुले ही महाविद्यालयं आणि केशवराज, देशीकेंद्र, गोदावरी, राजस्थान, लालबहादूर शास्त्री, गुजराती, सदानंद, परिमल, बंकटलाल, जिजामाता, ज्ञानेश्वर, यशवंत, सरस्वती, व्यंकटेश ही विद्यालयं, या शिक्षणसंस्थांनी लातूर पॅटर्न घडवण्यात आणि टिकवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. लातूर शहराबरोबरच अहमदपूर, उदगीर आणि इतर तालुक्यातही शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. लातूर पॅटर्नमुळे ग्रामीण भागात शिक्षणाचं महत्त्व आणि शिक्षणाविषयी जागृती वाढली. खेड्यापाड्यातील पालकही आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी लातूर-अहमदपूरमध्ये ठेवू लागले. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतूनही असंख्य विद्यार्थी लातूर-अहमदपूरमध्ये प्रवेश घेऊ लागले. 'लातूर पॅटर्न'चं अनुकरण इतरत्र होऊ लागलं. महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर लातूरचं नाव अग्रक्रमाने येऊ लागलं. पुढे शालान्त परिक्षांची गुणवत्ता यादी प्रकाशित करणं बंद झालं, परंतु मेडिकल-इंजिनिअरिंगच्या सीईटीमध्ये लातूरचा दबदबा कायम राहिला. तो आजही तसाच कायम दिसतो.

'लातूर पॅटर्न' ने घडवलेला बदल

'लातूर पॅटर्न' ने काय बदल घडवून आणला, काय साध्य केलं, याचा विचार केला तर-

१. ग्रामीण भागात शिक्षणाचं महत्त्व वाढलं

२. शिक्षण घेणाऱ्या मुलींचं प्रमाण वाढलं

३. ग्रामीण, शोषित-वंचित-बहुजन कुटुंबांतील मुलं डॉक्टर-इंजिनिअर-प्राध्यापक म्हणून पुढे आली

४. विविध स्पर्धापरीक्षांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला

५. मागास समाजघटक अधिक असलेल्या परिसरातील शाळा-महाविद्यालयं, न.पा., जि.प. शाळामधील गुणवत्ता वाढीस लागली. गुणवत्ता यादीत कमी विद्यार्थी आले तरी या शाळांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात शिक्षक यशस्वी झाले.

लातूर पॅटर्नचं खाजगीकरण

दोन दशकं सातत्याने टिकून असलेल्या लातूर पॅटर्नमध्ये हळूहळू दोष निर्माण झाले. काही वाईट प्रवृत्तींनी त्यात प्रवेश केला. नंतरच्या काळात काही महत्त्वाच्या शाळा-महाविद्यालयांत केवळ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळू लागला. सामान्य दर्जाच्या विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजेसची दारं बंद झाली. त्यात इतर जिल्ह्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढल्याने भूमिपुत्रांना प्रवेश मिळणं अवघड झाले. स्थानिक विरुद्ध बाहेरचे हा वाद वाढला. त्यातूनच केंद्रीय प्रवेशप्रक्रिया पुढे आली. काही महाविद्यालयांत केवळ गुणवंत विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळू लागला. गुणवंत विद्यार्थी गुणवत्ता यादीत येणारच, यात मोठं नवल नव्हतं. त्यामुळे अशा संस्थांविषयीचं अप्रूप कमी होऊ लागलं.

सुरुवातीला खाजगी शिकवण्या-ट्यूशनचं प्रमाण कमी होतं. परंतु लातूर पॅटर्नचं प्रस्थ वाढलं तसं खाजगी क्लासेसचं प्रमाणही वाढलं. ज्या संस्थांनी शिक्षकांच्या खाजगी शिकवण्यांवर बंदी घातली त्या संस्थेतील शिक्षक-प्राध्यापकांनी आपल्या नोकऱ्या सोडून खाजगी क्लासेस् सुरू केले. त्यामुळे विद्यार्थी शाळा-महाविद्यालयातल्या शिकवणीऐवजी बाहेरच्या शिकवणीला अधिक महत्त्व देऊ लागले. प्रवेश आणि परीक्षाकेंद्रांपुरताच शाळा-महाविद्यालयांचा वापर होऊ लागला. शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यातील समन्वय कमी होऊ लागला. टीमवर्कची जागा वैयक्तिक श्रेयाने घेतली आणि संस्थाचालकांचा हस्तक्षेपही वाढू लागला. शिवाय ओळख-डोनेशनद्वारे शिक्षक-प्राध्यापक भरती होऊ लागल्याने शिकवण्याचा दर्जा घसरू लागला. गुणवत्तेच्या स्पर्धेमुळे विद्यार्थी केवळ परीक्षाकेंद्री बनू लागले.

अशा परिस्थितीत देखील दहावी-बारावीची गुणवत्ता टिकून आहे. पण त्यात वाटा शाळा-कॉलेजचा, विद्यार्थी-पालकांचा की खाजगी शिकवणी, हा प्रश्नच आहे. ‘नीट’ आणि ‘जेईई’च्या क्लासेसनी कोट्यवधीचं मार्केट उभं केलं. क्लास संस्कृती वाढली आणि कॉलेज ओस पडली. शिक्षणाच्या बाजारीकरणातून शहराचं अर्थकारण बदललं. बाहेरगावहून विद्यार्थी वाढल्याने वसतीगृहं, खानावळी वाढल्या. कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले. तरूणाईत व्यसनांचं, ड्रग्जचं प्रमाण वाढलं. शेवटी क्लासेसच्या स्पर्धेतून पेपर लीक करण्याचं प्रमाण वाढलं. श्रीमंत पालक आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी या रॅकेटचे लाभार्थी बनले.

आज काही क्लासचालक आणि पालकांमुळे लातूरची शैक्षणिक वर्तुळातील प्रतिमा डागाळली आहे. यातून बाहेर येण्याचा मार्ग म्हणजे जुना लातूर पॅटर्न पुनरुज्जीवित करणं होय.

विवेक घोटाळे | 9822578737

डॉ विवेक घोटाळे हे राजकीय विश्लेषक, संशोधक आणि लेखक आहेत. पुण्यातील 'द युनिक फाउंडेशन' या संशोधन संस्थेचे ते कार्यकारी संचालक आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 20

Vijay Hibare22.05.26
अतिशय व्यवस्थित, खरा लातूर पॅटर्न काय व केंव्हा पासून आहे हे आपण दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मी काही माझ्या आठवणीची भर घालू इच्छितो. सर्व प्रथम ना.य. डोळे सरांनी पुण्यासारख्या ठिकाणावरून उदगीर येथे येऊन येथील अतिशय गरीब मुलांना, ज्यांना शिक्षण म्हणजे काय आहे हे कदाचित माहिती हि नसेल अशा मुलांना वैयक्तिक लक्ष देऊन त्यांना प्रोत्साहित केलं. त्यामुळे त्याकाळात ज्यांच्या अंगावर एक ड्रेस शिवाय इतर कपडे नव्हते ती औरंगाबाद आत्ताचे छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील एकमेव असलेल्या इंजिनीरिंग कॉलेज ला लागली. हि मुलं अक्षरशः पिशवी मध्ये एखादी ड्रेस व भाकरी घेऊन इंजिनीरिंग कॉलेज ला लागली. त्यांच्या आईवडिलांना तर मुलगा शिकून काय होणार आहे हे पण माहिती नव्हते. हुशार आहे म्हणून शिक्षकांनीच हेरले व या शिक्षक लोकांनीच त्यांना हि वाट दाखवली. त्यानंतर पुरणमलजी लाहोटी, बाबासाहेब परांजपे आदी साधारणतः 1965 ते 67 दरम्यान एकत्र येऊन लातूरला पॉलीटेकनिक कॉलेज काढले. पुढे ते शासनाला हस्तान्तरीत करताना किती तरी मोठी जागा शासनाला पुरणमलजी लाहोटी यांनी दिली त्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाहीत. त्याच जागेत आज पॉलीटेकनिक सहित engineering कॉलेज झाले आहे. व सध्या लातूरला जे स्टेडियम आहे ती जागा सुद्धा कॉलेज चीच होती., पुढे हॉस्टेल ची एवढी मोठी जागा. व या खऱ्या शिक्षण महर्षी नी हे पॉलीटेकनिक काढल्यामुळे माझ्या सारखे कित्येक जण त्या कॉलेज मधून अभियंता म्हणून बाहेर पडले. कारण त्याकाळात पूर्ण मराठवाड्या मध्ये तीन पॉलीटेकनिक होते. एक छत्रपती संभाजी नगर दुसरे नांदेड व तिसरे दूरदृष्टी असलेली हि माणसे लातूर मध्ये असल्यामुळे व त्यांनी जागा व पूर्ण उभी केलेली यंत्रणा शासनाला दिल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी झालेले लातूरचे पॉलीटेकनिक. डॉ. ना.य. डोळे सरांनी उदगीर मध्ये राबविलेला पॅटर्न नंतर डॉ.गोपाळरावजी पाटील, डॉ.पी आर. देशमुख आदी जणांनी एकत्र येऊन शाहु कॉलेज सारखी संस्था उभी करून शिक्षणाची दूरदृष्टी असलेले व गरिबांची, गरिबीची जाणीव असलेले डॉ.जनार्धनजी वाघमारे यांना प्राचार्य म्हणून नेमणूक देऊन सुरुवात केली. प्रथम हे कॉलेज नांदेड रोडला अगदी गावाच्या बाहेर असल्यासारखे होते. तिथे दिवसा सुद्धा मुली कॉलेज ला जाणे शक्य नव्हते. नंतर ते बस स्टॅन्ड जवळ अगदी गोडाऊन मध्ये स्थलांतरित झाले. तेथे सर्व स्टाफ नी मेहनत घेऊन मुलं घडवली. त्यानंतर बाहेर गावच्या मुलांनी लातूरला येणे सुरु झाले.त्यानंतर हुशार मुलंच घेतात व त्यातून मेरिट आले तर त्यात काय मोठे असा कांही अंशी अपप्रचार सुरु झाला. या सर्व गोष्टीमुळे दयानंद, बसवेश्वर कॉलेज नी सुद्धा त्यांची मुले सुद्धा पुढे यावीत म्हणून प्रयत्न सुरु केले. लातूरचे नाव होऊ लागले.व येथेच अपप्रवृत्ती येण्यास सुरुवात झाली.एखाद्या - दुसऱ्या प्लॉट वर कॉलेज काढून बाहेरच्या मुलांची किंवा लातूर मध्ये या तीन कॉलेज ला न लागलेल्या मुलांना मोठी स्वप्न दाखवून फसविण्यास सुरुवात झाली. काही जण तर फक्त ऍडमिशन देऊन मुलं कोट्या ला classes करत होती व ती मेरिट मध्ये आल्यानंतर मोठी मोठी flex लावण्यास सुरुवात झाली. कोठेच ट्युशन ला न जाणारी मुले मेरिट मध्ये आल्यानंतर त्यांना पैशाचे आमिष दाखवून ट्युशन classes वाल्यांनी आपली मुले आहेत म्हणून flex लावण्यास सुरुवात झाली. शाहु कॉलेज प्रामाणिक पणे इतर राज्यातून गलेलठ्ठ पॅकेज देऊन प्रोफेसर आणून त्यांचे reputation टिकविण्याचा, वाढविण्याचा प्रयत्न करत होते. पण वर्षाच्या मध्यामध्येच काही प्रोफेसर एकत्र येऊन शाहु कॉलेजला सोडून बाहेर ट्युशन काढायला सुरुवात केले. कॉलेज मध्ये असलेल्या हुशार मुलांना त्यांच्याकडे येण्यास प्रवृत्त करत गेले. 6 महिने ते दिड वर्ष त्या प्रोफेसर कडे कॉलेज मध्ये शिकल्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून मुळात हुशार असलेली मुले अशा ट्युशन ला गेली व मेरिट मध्ये आली. classes वाल्यांनी त्याची जाहिरात करत गेले. पुढे पुढे हे इतके वाढले की खून होण्यापर्यंत व आत्ता जे पेपर फोडणे झाले तिथपर्यंत या बांडगुळांची मजल गेली. पण हा खरा लातूर पॅटर्न नाही. लातूर पॅटर्न म्हणजे वर नमूद केलेल्या महान लोकांनी घालून दिलेल्या मार्गांवर, असंख्य पालकांनी त्यांची परिस्थिती नसताना, शिक्षणाशिवाय पर्याय नाही हि जाण घेऊन वाटेल ते काबाडकष्ट करायला लागले तरी त्याची तयारी ठेऊन मुलांना शिकवायला पाठविणारा लातूर जिल्ह्यातील पालक व हे शिक्षण पूर्ण केल्याशिवाय आपले काही खरे नाही याची जाण ठेवणारा व त्यानुसार मेहनत घेणारा विद्यार्थी आहे.

Dr. Shaikh Mohmmad_Hanif21.05.26
अभिनंदन ! विवेक घोटाळे सर आपण लिहिलेला लेख हा प्रासंगिक असून लातूर पॅटर्नचा वास्तव रूप त्यात मांडला आहे. तसेच एखाद्या व्यक्तीच्या कुकृत्यामुळे या पॅटर्नला नक्कीच धक्का बसला आहे मात्र हा लातूर पॅटर्न जनमानसात किती खोलवर रुजला याची प्रचिती लेख वाचताना वारंवार होते. वर्तमान परिस्थितीमुळे लातूर पॅटर्नवर चिखल फेक करणाऱ्यांनी नक्कीच हा लेख वाचला पाहिजे

सौ.माया मिलिंद माने 21.05.26
शिक्षणाचं खाजगीकरण व त्यातून निर्माण झालेले दुष्परिणाम परिणाम ... ज्या नितीमत्ता गहाण ठेवून सुरू आहेत.जेव्हा शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत सहज शक्य होतं ,तेव्हा ते वाईट विचारांना बाजूला सारून नैतिक मार्गाने , मूल्यांची जपणूक करत चालू राहते. लातूर पॅटर्न इतका कमकुवत नाही.इतिहास ज्यांना माहीत असतो तेच चांगला इतिहास निर्माण करू शकतात.अन्यत: शिक्षणाचं व्यापारीकरण करणारे त्यांना काय माहित कष्ट,गरीबी, प्रामाणिकपणा, नितीमत्ता, भावनिकता, संवेदनशीलता, जेव्हा कुंपणच शेत खात तेव्हा अपेक्षा तर काय करणार????? *चार-दोन लोकांमुळे लातूर पॅटर्न बदनाम होऊ शकत नाही.समाजात घडणाऱ्या या घटना इतिहास मिटवू शकत नाहीत*

Vilas k Bhopi 21.05.26
डॉ घोटाळे सर आपण लातूर पॅटर्न आणि एकंदरीत इतिहासाला उजाळा दिलेला आहे .जी क्षमता लातूरच्या मातीत आहे त्यातून पुढील काळात बावनकशी सोनं निर्माण करण्यासाठी आम्ही शिक्षक म्हणून कायम कटिबद्ध आहोत ... धन्यवाद सर

sanjay kamble21.05.26
खूपच छाण वीष्लेशन

Suresh N. Kamble21.05.26
खरोखर लातूरचे नाव जे शिक्षण क्षेत्रात आघाडीवर होत ते या पेपर फुटीमुळे लेस गेले आहे. पण लातूरचे विद्यार्थी कष्टाने,मेहनतीने पुन्हा लातूरचे गतवैभव प्राप्त करून देतील असा मला विश्वास आहे.

डॉ हंसराज भोसले20.05.26
विवेक सर खुप महत्वाचे विश्लेषण केले आहे.बऱ्याच लोकांना आपण यात उल्लेख केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील लोकांची नावे ही माहित नाहीत.आपल्या या वस्तुनिष्ठ नोंदीमुळे लातूर च्या शैक्षणिक पॅटर्न चा नुसता परिचय झाला नाही तर व्यापक पणे परिचय होण्यास मदत झाली.मात्र गोपाळराव पाटील आज हयात नाहीत त्यांचे समर्पण,त्याग आणि त्यांनी आयुष्य भर जोपसलेले मूल्ययुक्त तत्व याचा अधिक उल्लेख होणं गरजेचं होत.कारण अनिरुद्ध जाधव सरांच्या आधी वाघमारे सरांना गोपाळराव पाटील यांनी लातूरला बोलावून प्राचार्य केले ते असे पर्यँत त्यांच्या वर अध्यक्ष म्हणून कधीच हस्तक्षेप केला नाही..

दीपक गोटके, कामगार अधिकारी20.05.26
दुष्काळ व मागासलेपण वाट्याला आलेल्या लातूरकरांनी चिकाटी व मेहनतीच्या जीवावर शिक्षणाचा विडा उचलला व त्यातूनच एका अभियानाला सुरुवात झाली आणि तोच शिक्षणाचा लातूर पॅटर्न बनला.... खूप छान लेख लिहिला आहे विवेक 1995 चा काळ आठवला.

पालक20.05.26
खूपच भारी लेख. ईशानला दोनदा नीट क्लिअर करता नाही आली म्हणून आम्ही सुद्धा वैतागलेलो होतोच. तुम्ही म्हणाले इतर पर्यायही वाईट नसतात त्यात तथ्य आहेच. पण या सरांचा लेख वाचल्यावर असं वाटतं की आपण जाहिराती यशस्वी विद्यार्थी यांना बघून वहावत जातो आणि लाखो रुपये खर्च करतो पडद्यामागे आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या अनेक गोष्टी घडत असतात. यात या लेखकांनी लातूर पॅटर्नची पार्श्वभूमी आणि मराठवाड्याची जी पार्श्वभूमी लिहिली आहे ती खरंच माहित नव्हती आणि आश्चर्यजनक वाटली मला आपल्या मुलांच्या शैक्षणिक भविष्याचे काय हा प्रश्न दिवसेंदिवस फार सतावणार आहे.

अनुराधा चव्हाण (गायकवाड) - संशोधन अधिकारी20.05.26
अतिशय वास्तववादी लेखन.....लातूर पॅटर्न ... मुलींच्या शिक्षणातील वाढलेला टक्का आणि गुणवत्तेसाठी अमूल्य योगदान देणारे शिक्षणतज्ज्ञ या लेखातून प्रभावीपणे मांडण्यात आलेले आहे. खरंतरं नीट आणि jee सारख्या परीक्षांबाबत विचार होणे खूप गरजेचे आहे. म्हणजे या परीक्षा मुलांची गुणवत्ता खरंच सिद्ध करतात का असा प्रश्न नेहमी समोर येतो. यावरही लिहायला हवं. या विषयाला जोडूनच. शिक्षण म्हणजे व्यवसाय असा स्वरूप झालेलं आहे...👍🏻

शिवाजी मोटेगावकर20.05.26
लातूर पॅटर्नचे स्वरूप बदलत गेले. जनार्दन वाघमारे सर आणि त्याकाळातील लातूर पॅटर्न वेगळा होता. अभ्यास करण्याचाही एक शिस्तबद्ध पद्धत म्हणजे लातूर पॅटर्न. मग ती परीक्षा १० असो किंवा बारावी. बोर्डात लातूरचे मुले झळकायची. पुढे विद्यार्थ्यांचा कल बदलत गेला. कोचिंग आले. पूर्वीही कोचिंग होते. शिक्षक हेच कोचिंग घ्यायचे. भोगले सर इंग्रजीसाठी प्रसिद्ध होते. राजपूत सरांचे क्लासेस होते. आत्ता अभ्यास नाही निव्वळ स्पर्धा. या सर्व प्रक्रियेत कॉलेजचे महत्त्व कमी झाले. फक्त क्लासेस करा. कॉलेजला फक्त admissiom घ्या.

दीपक गोटके 20.05.26
दुष्काळ व मागासलेपण वाट्याला आलेल्या लातूरकरांनी चिकाटी व मेहनतीच्या जीवावर शिक्षणाचा विडा उचलला व त्यातूनच एका अभियानाला सुरुवात झाली आणि तोच शिक्षणाचा लातूर पॅटर्न बनला.... खूप छान लेख लिहिला आहे विवेक 1995 चा काळ आठवला.

रमा सावरगावे 20.05.26
आदरणीय सर, लेख खूपच छान.. जे जे ई आणि आरसीसी मुळे अनेकांच्या अडाणी आई सुद्धा मुलांना आपलं पोरगं पोरगी इंजिनिअर डॉक्टर व्हावे म्हणून बळजबरी करून फास्ट स्टेशन मध्ये घातल्या. स्वतः शेत विकायला लागले.. या नव्या लातूर पॅटर्नमुळे खेड्यातले सगळे उदगीर, लातूर ,अहमदपूर राहायला लागले खेड्यातल्या शाळा जुनिअर कॉलेज बंद पडले.

Adv.Narendra Navarkale20.05.26
खूप छान...खूप कमी शब्दात खूप काही सांगितले आहे...

gangadhar dudhale20.05.26
शिक्षणाचे बाजरीकरण आणि वितुष्टीकरण (विशिष्ट समाजाला शिक्षण न देणे ) खुप पूर्वीपासून चालत आलेली परंपरा होती. शिक्षण सार्वजनिक होऊन ती मोडीत निघाली. क्रांतिकारी सामाजिक विचारांनी शाळा काढल्या.... आणि आज त्या गरजेचे रूपांतर बाजरीकरणात झालेले पाहून वाईट वाटते.लातूरचे बावन्नकशी सोने डागळलेले पाहून मनाला यातना होतात. विलासराव अभिमानाने वारंवार भाषणातून या बावन्नकशी सोन्याबाबत भरभरून बोलायचे. उर अभिमानाने भरून यायचा की मी लातूरचा आहे. पण या बांडगुळी वृत्तीने कष्टाने उभारलेला लातूर पॅटर्न कलंकित केलाय. लाखो पालक आणि विध्यार्थी यांचा विश्वासघात केलाय.जमेल तेवढी कठोर शिक्षा यांना झालीच पाहिजे. विवेक सर आपण या बांडगुळाच्या निमित्ताने लातूरच्या शैक्षणिक जडणघडणीवर जो प्रकाशझोत टाकलात त्यासाठी आपले कौतुक करावे तेवढे कमीच. शिक्षणात राजकारण पैसा येऊ नये असे वाटते. सर्व शिक्षण मोफत व सरकारी व्हावे ही गरज आहे.

ओंकार 20.05.26
खूप छान मांडणी सर . खाजगीकरण, सीमा नसलेली आर्थिक लूट आणि या अर्थकारणामुळे गोरगरिबांना आणि सर्वसामान्यांना न परवडणारे शिक्षण हे वास्तव फारच भयंकर आहे.

Sushmita Harne20.05.26
हा लेख वाचल्यानंतर असं वाटतं की, लातूर पॅटर्नने एकेकाळी विद्यार्थ्यांना दिशा दिली होती, पण आता शिक्षणाचं जास्त व्यापारीकरण झाल्यामुळे त्याची मूळ ओळख हरवत चालली आहे. नीट पेपरफुटीसारख्या घटनांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, ही गोष्ट खूप गंभीर आहे. लेखात मांडलेले मुद्दे वास्तववादी वाटले आणि शिक्षण व्यवस्थेबद्दल विचार करायला भाग पाडणारे आहेत.

MALEGAONKAR MD ALISAB NIZAMODDIN20.05.26
अतिशय उत्तम लेख

जाधव राजकुमार पंडितराव 20.05.26
"लातूर पॅटर्न "मांडणी आणि विश्लेषण अप्रतिम

Rajdhar Jaywantrao Temkar 20.05.26
खूपच अप्रतिम वास्तववादी मांडणी केलेली आहे. आपल्या या सकारात्मक आणि प्रेरणादर्शक विचारातून पुन्हा नव्याने लातूर चा सुसंस्कारी पॅटर्न नव्या जोमाणे प्रगतीकडे वाटचाल करील असा विश्वास आहे. सद्य स्थितीत आपले विचार शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांना उभारी देणारा, आत्मविश्वास वाढविणारा आहे. आपले मनापासून अभिनंदन 💐

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results