कोणतंही वैचारिक व्यासपीठ उभं राहायचं तर त्याला जसे वाचक हवेत तसंच त्या व्यासपीठाचं भरणपोषण करणाऱ्यांचा संचही हवा. हा संच आम्ही दोन-तीन पद्धतीने उभा केला. आपल्याला एक मोकळ्या विचारांचं, पूर्वाग्रहांपासून दूर असलेलं आणि आपल्या जगण्याची गुंतागुंत समजून घेणारं जागतं मासिक काढायचं आहे, असं आमच्या मनात होतं. एक असं मासिक, ज्याला विषयांच्या सीमा नसतील, जगाच्या अंगणात जे जे घडत आहे ते हे मासिक समजून घेईल आणि जगात - देशात महाराष्ट्रात जे नवे - चांगले -विधायक -आश्वासक प्रयत्न -प्रयोग चालू आहेत तेही वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे मासिक करेल असं स्वरूप आमच्या डोक्यात होतं. टेलिव्हिजन आणि इंटरनेट या दोन माध्यमांमुळे जो माहितीचा धबधबा लोकांवर कोसळत होता, त्यापासून त्यांचा बचाव केला नाही तर पुढे काही धडगत नाही, असंही आम्हाला वाटत होतं. त्यामुळे माहितीवर प्रक्रिया करून देणाऱ्या म्हणजेच माहितीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या केंद्राची भूमिका बजावणं हे ‘अनुभव'चं काम आहे, असं आम्हाला मनापासून वाटत होतं. दुसरं असं, की टीव्ही या माध्यमाबद्दल आमचं एक निरीक्षण होतं. आमच्या मते या माध्यमाकडून हाताळल्या जाणाऱ्या विषयांना मर्यादा होती. आर्थिक-राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक सूत्रं ज्यांच्या हाती एकवटलेली आहेत, त्यांच्या हितसंबंधांना बाधा येणार नाही अशाच विषयांबाबत ही माध्यमं बोलतील, असं आम्हाला वाटत होतं. तसा अनुभवही येऊ लागला होता. या पार्श्वभूमीवर एक स्वतंत्र माध्यम उपलब्ध करून देणं ही आपली जबाबदारी आहे, असं आम्हाला वाटत होतं.
आमच्या या प्रयत्नात कोण कोण सामील होऊ शकतील याचा शोध आम्ही घेऊ लागलो आणि त्यांना लिहिण्याची विनंती करू लागलो. पहिल्या काही वर्षांतच विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, अनिल अवचट, रंगनाथ पठारे, अरुण साधू, भारत सासणे, लक्ष्मण माने, मधु मंगेश कर्णिक, ह. मो. मराठे, ग्रेस, निरंजन घाटे, श्याम मनोहर, संजीव लाटकर, सतीश काळसेकर, दीनानाथ मनोहर अशा लेखक मंडळींनी आमच्या आवाहनाला दाद देत ‘अनुभव'च्या घुसळणीत भाग घेतला. सदानंद देशमुख, लक्ष्मीकांत देशमुख, विश्वास पाटील, नरेंद्र चपळगावकर, मधु साबणे, अशोक राणे अशी लेखक मंडळीही पुढे त्यात सहभागी झाली. दुसरीकडे, अरुण टिकेकर, कुमार केतकर, निळू दामले, हेमंत देसाई, सुरेश भटेवरा, निशिकांत भालेराव, जयदेव डोळे, संजय संगवई, प्रकाश अकोलकर, अरुण खोरे, भालचंद्र दिवाडकर, अवधूत परळकर, मिलिंद चंपानेरकर, अभिजित ताह्मणे, मुकेश माचकर, आनंद आगाशे, सारंग दर्शने या पत्रकार मंडळींनीही ‘अनुभव'साठी वेळोवेळी लिहिलं. अलीकडच्या काळात दीप्ती राऊत, मयूरेश प्रभुणे, अलका धुपकर, प्राजक्ता धुळप, मुकुंद कुळे ही तुलनेने तरुण पत्रकार मंडळी लिहू लागली. तिसरीकडे, सुहास पळशीकर, मनीषा टिकेकर, सदानंद मोरे, माधव गोडबोले, माधव दातार, प्रतिभा रानडे, दीपक घारे, श्रीनिवास खांदेवाले, प्रदीप आपटे, विनय सहस्रबुद्धे, सुलक्षणा महाजन, राजेश्वरी देशपांडे यांच्यासारख्या वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यासकांकडून ‘अनुभव'ने लिहून घेतलं.
दुसऱ्या बाजूने आम्ही आणखी एक गोष्ट केली. ‘युनिक फीचर्स'मधील आम्ही सर्वांनीही ‘अनुभव'मध्ये भरपूर लिहिलं. ज्या ज्या विषयांचा फिरून शोध घेण्याची गरज वाटत होती, त्या त्या विषयांमध्ये आमच्या टीममधील कुणी तरी उतरे. पहिल्या आठ-दहा वर्षांत आनंद अवधानी, मुकुंद ठोंबरे, मनोहर सोनवणे, राजा कांदळकर, मुकुंद कुलकर्णी, सविता अमर, शिल्पा दातार, अमृता वाळिंबे, शब्दगंधा कुलकर्णी या सहकाऱ्यांनी अनेक विषय शोधले-लिहिले. या सहकाऱ्यांच्या जोडीला सतीश तांबे, नरेंद्र लांजेवार, मुग्धा देशपांडे, चित्रा बेडेकर, सीमा भानू असे लिहिते-शोधते लेखकही ‘अनुभव'च्या व्यासपीठावर लिहीत होते. नंतर त्यात माधवी ठाकूरदेसाई, वंदना अत्रे, प्रीती छत्रे, शर्मिला फडके, अभिजित रणदिवे, साधना बहुळकर, आनंद विंगकर, हेरंब कुलकर्णी, जयप्रकाश प्रधान या मंडळींची जोड लाभली. या सर्व लेखकांमुळे ‘अनुभव'चा अंक जिवंत आणि समकालीन राहू शकला.
‘अनुभव'ने सुरुवातीपासून आणखी एक गोष्ट केली. लेखन, संशोधन, पत्रकारिता या क्षेत्रांत दमदारपणे लिहू पाहणाऱ्यांना जोडून घेतलंच, पण ‘अनुभव'चा लेखकवर्ग केवळ पुण्या-मुंबईपुरता किंवा साहित्यिक वर्तुळापुरता मर्यादित नसावा याचीही कायम खबरदारी घेतली. ग्रामीण-बंडखोर-नवोदित-विद्रोही अशा सर्व प्रकारच्या अस्सल अभिव्यक्तीसाठी आपल्या अंकात जागा असेल, असं आम्ही पाहिलं. त्यामुळेच ‘अनुभव'मध्ये जसं मिलिंद बोकील, सानिया, राजन खान यांच्यासारख्या लेखकांनी लिहिलं, तसंच प्रवीण बांदेकर, राजन गवस, जी. के. ऐनापुरे, कृष्णात खोत, सु. म. तडकोड यांच्यासारख्या निमशहरी-ग्रामीण भागातल्या ललित लेखकांनीही लिहिलं. दासू वैद्य, अशोक कोतवाल, अशोक कौतिक कोळी, संतोष पवार, बालाजी इंगळे, मोहन बारहाते, मनोज गोपछेडे, लक्ष्मण बारहाते, तुकाराम धांडे, ऐश्वर्य पाटेकर, श्रीधर नांदेडकर, नीलम माणगावे, मनोज बोरगावकर, कैलास सलादे, प्रशांत असनारे अशा किती तरी दमदार कवींना आम्ही ‘अनुभव'मध्ये लिहितं केलं. तसंच खेड्यापाड्यांतील लिहिती तरुण मंडळी हुडकून त्यांच्यामार्फत नवं साहित्य, नवं अनुभवविश्व पुढे आणण्याचा आमचा प्रयत्न राहिला. ‘अनुभव' हे रूढार्थाने वाङ्मयीन मासिक नसलं तरी कवितांबाबत बरंच काम झाल्याचं दिसतंय. ‘अनुभव'मधील माझे दहा वर्षांचे सहकारी मनोहर सोनवणे हे स्वत: कवी. त्यामुळे त्यांच्यामार्फत पुण्या-मुंबईबाहेरील कवींना हुडकून काढण्याचं काम आम्ही करू शकलो. नाशिकमधील विनायकराव पाटील हा कवितेतील दर्दी माणूस आणि आमचे ज्येष्ठ स्नेही. खानदेशातील कुठले कुठले तरुण कवी त्यांना घरी येऊन कविता ऐकवत असतात. एकदा ते म्हणाले, “या पोरांच्या कविता अस्सल आहेत. त्या ‘अनुभव'मध्ये घ्या.” कल्पना उत्तम होती. मग त्यातील बारा-पंधरा कवींच्या कविता निवडून आम्ही त्या ‘अनुभव'मध्ये वर्षभर प्रसिद्ध केल्या. या कवींच्या कविता ‘अनुभव'मध्ये छापून येईपर्यंत बहुतेकांची नावंही महाराष्ट्राला माहीत नव्हती. पण त्यांच्या कवितांतील ‘ओरिजिनॅलिटी' वाचकांना एवढी भावली, की पुढे काही कवींचे कवितासंग्रहही प्रतिष्ठित प्रकाशकांमार्फत प्रकाशित झाले. आम्हाला कोण कोण सांगत असतं, की नाना पाटेकर वगैरे सेलेब्रिटी लोक आपल्या भाषणांमध्ये ‘अनुभव'मध्ये छापून आलेल्या या नवोदित कवींच्या ओळी म्हणून दाद देत असतात. नाना पाटेकरांचं सोडा; पण मराठी साहित्याला दोन-चार चांगले कवी ‘अनुभव'मुळे मिळाले असतील, तर बिगरवाङ्मयीन मासिकाला आणखी काय हवं?
बिगरवाङ्मयीन मासिक असलं तरी ललित साहित्याबद्दल सुरुवातीपासून आमचं काही एक म्हणणं आहे. समकालीन, तसंच परिघाबाहेरच्या विषयांना भिडणारं लेखन आम्हाला जास्त जवळचं वाटत आलं आहे. त्यामुळे साहजिकच आम्ही अशा लेखकांच्या शोधात असतो. त्याचं उदाहरण म्हणून संजीव लाटकर यांच्या कथांबद्दल सांगता येईल. त्या कथा केवळ एक कथानक सांगत नाहीत, तर त्या आजच्या काळातले विषय हाताळतात; त्यातल्या गुंतागुंतीबद्दल बोलतात. तीच गोष्ट गणेश मतकरी यांनी केलेल्या प्रयोगाची. गणेशने ‘अनुभव'मधून सलग वर्षभर कथामालिका लिहिली. यातील कथा स्वतंत्र असल्या तरी त्या एकमेकांशी जोडलेल्याही होत्या. प्रत्येक कथा एकाच कथानकातल्या वेगवेगळ्या पात्राच्या भूमिकेतून, प्रथम पुरुषात लिहिलेली. या कथांमधून गेल्या काही वर्षांत बदललेल्या महत्त्वाकांक्षी मध्यमवर्गीयांच्या जगण्याचा पोत समोर आला. म्हटलं तर कथा, म्हटलं तर कादंबरी अशा स्वरूपाच्या या प्रयोगाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. (संजीव लाटकर आणि गणेश मतकरी या दोघांच्याही कथांची पुढे ‘समकालीन'तर्फे पुस्तकं झाली.) असाच प्रयोग विज्ञानकथा, तरुण लेखकांच्या कथा, समकालीन अनुवादित कथांमध्येही सुरू असतात.
एरवी विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या पण लिहिण्याच्या भानगडीत न पडणाऱ्या मंडळींचे अनुभव आपल्याकडे अनेकदा अज्ञात राहतात. अशा मंडळींना लिहितं केलं पाहिजे, ते लिहू शकत नसतील तर त्यांचे अनुभव शब्दबद्ध केले पाहिजेत, या हेतूने आम्ही लोकांचा सतत पिच्छा पुरवला. कॉर्पोरेट क्षेत्रातील किशोर चौकर, मिलिंद सरवटे, विलास ढवळे, दिलीप शेवडे, सुनील आपटे, सचिन अधिकारी ही मंडळी त्याचं उत्तम उदाहरण ठरावीत. कलाक्षेत्रातील मंंडळींनीही लिहावं, असा आमचा प्रयत्न राहिला. त्यातल्या फक्त चित्रकारांपुरतंच उदाहरण घेतलं, तरी ‘अनुभव'मध्ये रवी परांजपे, सुभाष अवचट, चंद्रमोहन कुलकर्णी, भ. मा. परसवाळे, दिलीप भंडारे, रविमुकुल वगैरे वगैरे मंडळींनी लिहिलंय बघा. सामाजिक, सांस्कृतिक, प्रशासन अशा विविध क्षेत्रांबाबतही हाच प्रयोग आम्ही करत आलो आहोत.
‘या नावांच्या याद्या वाचून काय करायचं', असा प्रश्न कुणाला पडू शकतो. पण ही नावं सांगण्याला एक प्रमुख कारण आहे. आपल्याकडे बहुतेक मासिकं ही कुणा एकाच्या इच्छेतून निघालेली असतात किंवा कुणा एकाच्या इच्छेवर चालत असतात. ‘अनुभव'ने ही चाकोरी मोडण्याचा यथाशक्ती प्रयत्न चालवला आहे. ‘अनुभव' कुणा एका व्यक्तीने चालवलेलं मासिक नाही. तरुण पत्रकारांच्या सामूहिक प्रयत्नांतून उभं राहिलेलं हे मासिक आहे. शिवाय कोणतंही मासिक अनेक लेखक, कवी, अभ्यासक यांच्या सहभागानेच समृद्ध व्यासपीठ होऊ शकतं. अशी माणसं जोडत जोडतच ‘अनुभव' पुढे सरकत आहे. त्यामुळेच एक मासिक चालवायचं तर त्याला किती लोकांच्या सहकार्याचे हात लागतात, हे कळावं यासाठी हे ‘यादीपुराण'! असो.
(क्रमशः)
(सुहास कुलकर्णी लिखित 'आमचा पत्रकारी खटाटोप' या समकालीन प्रकाशनच्या पुस्तकातून साभार)
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.
