‘अनुभव'च्या २००१ पासूनच्या संपादकीय प्रवासाबद्दल एका छोट्याशा प्रकरणात लिहिणं सोपं नाही, ही गोष्ट आधीच कबूल करून टाकतो. किती विषय, किती रिपोर्ताज, किती शोधलेख, किती सदरं, किती मालिका, किती नवनव्या कल्पना... हे सारं कसं लिहिणार एका लेखात? शिवाय ‘अनुभव' हा आम्ही ‘चालवलेला' अंक आहे. अनाहूत लेखांतून उभा राहणारा हा अंक नाही. आम्हाला जे विषय महत्त्वाचे वाटतात त्या विषयांवर कुणाकुणाकडून लिहून घेण्याची आमची पद्धत. शंभरातले ऐंशी लेख तरी याच पद्धतीने मिळवलेले. त्यामुळे प्रत्येक कल्पना, प्रत्येक विषय आमच्यासाठी महत्त्वाचाच. त्यामुळे त्यातलं काय सांगू नि काय नको अशी अवस्था झालीय! हे सर्वच सांगावंसं वाटतंय. जसं जमेल तसं सांगतो.
आपला भोवताल आणि त्यातली गुंतागुंत समजून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, म्हणजे नेमकं काय केलं? दोन-चार उदाहरणांमधून सांगतो. या प्रयत्नांचं एक खणखणीत रूप म्हणजे रिपोर्ताज. हा फॉर्म ‘युनिक फीचर्स'ची स्पेशालिटी. अनिल अवचट, निळू दामले यांच्याकडून एकलव्यासारखी शिकून घेतलेली आणि त्यात आमची आमची भर घालून विकसित केलेली ही खास युनिक शैली. ‘युनिक फीचर्स'मधील माझ्या सहकाऱ्यांनी ‘अनुभव'मध्ये एक ना अनेक विषयांवर रिपोर्ताज लिहिले. ज्या विषयांकडे वृत्तपत्रं-साप्ताहिकं किंवा वृत्तवाहिन्यांचं लक्ष नाही, ते विषय नेटाने वाचकांसमोर आणत राहण्याचं काम आम्ही करत आलो. प्रश्नांच्या मुळापर्यंत जाण्यावर आणि प्रश्नाच्या अनुषंगाने कार्यरत असणाऱ्या अदृश्य हितसंबंधांचं जाळं स्पष्ट करण्यावर आम्ही भर दिला. दुष्काळ आणि पाण्याचा प्रश्न, बेळगाव आणि मराठी माणसांचा प्रश्न, देवस्थानं आणि धार्मिकतेचा प्रश्न, मदरसे-वेदपाठशाळा आणि (धार्मिक) शिक्षणाचा प्रश्न, बाबा-बुवा-महाराज आणि आध्यात्मिकतेचा प्रश्न, उद्योगांसाठीची जमीन अधिग्रहणं आणि स्थलांतर-विस्थापनाचा प्रश्न, अशा किती तरी (म्हणजे किमान शंभर!) कळीच्या प्रश्नांचा वेध घेत आम्ही महाराष्ट्रभर फिरलो आणि त्यावर रिपोर्ताज आणि रिपोर्ताजच्या मालिका लिहिल्या. या लेखांच्या रूपाने वाचकांसमोर (आणि माध्यमांसमोरही) अनेक प्रश्न मांडण्याचं काम ‘अनुभव'ने केलं. हा सिलसिला आजही चालू आहे आणि पुढेही चालू राहणार आहे.
‘अनुभव'ने केलेली दुसरी गोष्ट म्हणजे समाजाच्या प्रश्नांना भिडणाऱ्या आणि प्रश्नांची उत्तरं शोधू पाहणाऱ्या मंडळींवर आस्थेने लिहिणं. जगण्यातली गुंतागुंत सांगतानाच ती सोडवण्यासाठी झटणाऱ्या लोकांचाही परिचय आपण करून द्यायला हवा, असं आम्ही मानत आलो आहोत. त्यामुळेच पाणी, शेती, उद्योग, पर्यावरण, शिक्षण, प्रशासन, आरोग्य, वंचितांचे विविध प्रश्न याबाबत काम करणाऱ्यांवर आम्ही भरपूर लिहिलं-छापलं. अगदी ढोबळमानाने मोजलं तरी अशा कर्तबगार दीड-दोनशे लोकांचं काम आम्ही समाजासमोर आणलं असेल. (त्यातूनच ‘खरेखुरे आयडॉल्स' आणि ‘टीम इंडिया' नावाची दोन पुस्तकं ‘समकालीन' प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली.) कार्यरत व्यक्तींची शोधाशोध करण्याचा हा वसा आम्ही अजूनही सोडलेला नाही; सोडणार नाही.
हेही वाचा - ‘अनुभव' नावाचा प्रयोग - भाग एक
गेल्या काही वर्षांत ‘विकास पत्रकारिता' (डेव्हलपमेंट जर्नालिझम) नावाचा शब्द ऐकू येतोय. माणसं आणि त्यांचं काम पुढे आणण्यासंदर्भातील आमच्या प्रयत्नांनाही कुणी कुणी हा शब्द जोडतं. पण ‘विकास पत्रकारिता' ही काय भानगड आहे हे आम्हाला माहीत नाही. समाजाचे प्रश्न मांडणं, त्यांची सांगोपांग चर्चा करणं, प्रश्नांचे कंगोरे तपासण्यासाठी शोधाशोध करणं ही ‘निगेटिव्ह पत्रकारिता' आणि लोकांवर कौतुकपर गोड गोड लेख छापणं ही ‘विकास पत्रकारिता' हा भेदाभेद आम्ही मानत नाही. प्रश्न मांडणं आणि त्यावरील उत्तरं शोधणाऱ्यांना समोर आणणं या दोन्ही गोष्टी हातात हात घालून एकाच वेळी करण्याच्या आहेत, असं आम्हाला वाटतं. शिवाय कोणतंही उत्तर हे अंतिम नसतं. त्यामुळे प्रश्नांचा पुन्हा पुन्हा शोध घेत राहावं लागतं. प्रश्नांची व्याप्ती आणि खोली तपासत राहावी लागते. स्वत:ला, सरकारला, प्रशासनाला, समाजाला अडचणीचे वाटतील असे प्रश्न विचारत राहावे लागतात. आम्ही हे काम दीर्घकाळ करत आलेलो आहोत. त्यामुळे ‘तुम्ही प्रश्न फार मांडता, त्यापेक्षा उपाय का सांगत नाही?' असं आम्हाला नेहमीच कुणी कुणी विचारत असतं. थोडक्यात, ‘उगाच का त्रास देता, झटपट उत्तरं सांगून मोकळे व्हा ना' असा त्यांचा रोख असतो. पण उत्तरं माहीत असती तर प्रश्न मांडावे लागले असते का, या मुद्याचा अशा मंडळींना विसर पडलेला असतो. शिवाय नेमके प्रश्न कळल्याशिवाय उत्तरांच्या दिशेने प्रवास सुरू होऊ शकत नाही, हे सांगणे न लगे.
‘अनुभव'च्या सामाजिक पत्रकारितेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आम्ही चालवलेल्या लेखमालिका आणि सदरं. दोन-तीन अपवाद वगळता आम्ही ‘अनुभव'मध्ये फार ललित सदरं चालवली नाहीत. (हे अपवाद म्हणजे कृष्णात खोत, नरेंद्र चपळगावकर आणि डॉ. समीर कुलकर्णी यांचं लेखन.) बाकी सर्व सदरं माहितीपर, वैचारिक किंवा तत्कालीन वास्तवाचा शोध घेणारी होती. या लेखमालेच्या विषयांची यादी पाहिली तर आम्ही काय करू बघत होतो ते जास्त चांगलं समजेल. ‘अनुभव'च्या सुरुवातीच्या वर्षांत पत्रकार हेमंत देसाई यांचं ‘नव्या विश्वव्यवस्थेत भारत' नावाचं एक सदर प्रकाशित होत असे. जागतिकीकरणाच्या दशकपूर्तीनिमित्त हे सदर आम्ही त्यांच्याकडून लिहवून घेतलं होतं. या सदरात प्रत्येक महिन्याला भारतीय अर्थव्यवस्थेत निर्माण होत असलेला एकेक विषय चर्चिला जाईल असं नियोजन केलं गेलं होतं. त्याच काळात अनिल शिदोरे यांच्या ‘हातात हात घेऊन' या सदरातून जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या ख्यातनाम संस्था-संघटनांच्या कामाचा परिचय करून देण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. रेडक्रॉसपासून ॲम्नेस्टीपर्यंतच्या दहा-बारा उपक्रमांबद्दल शिदोरे यांनी त्यात लिहीलं होतं. ‘अल्याड-पल्याड' नावाचं एक सदरही वैशिष्ट्यपूर्ण होतं. एकाच प्रश्नावर लंडनहून चंद्रशेखर पुरंदरे आणि पुण्यातून मकरंद साठे असे दोघं दोन स्वतंत्र लेख लिहीत असत. जगातील दोन संस्कृती, दोन स्वतंत्र अर्थव्यवस्था-समाजव्यवस्था एकाच प्रश्नाकडे कसं पाहतात, हे समजून घेण्याचा हा अभिनव प्रयोग होता. निळू दामले हे आमचे जुने मित्र. त्यांनी ‘अनुभव'मधून रिपोर्ताज शैलीचं बरंच लिखाण केलं. जगाला दहशतवादाने ग्रासायला सुरुवात केल्यानंतर निळूभाऊंनी हा विषय खोदायला सुरुवात केली. त्या शोधाशोधीचा एक भाग म्हणजे ‘धर्म आणि हिंसा' यांचा संबंध शोधणारं सदर. या सदरावर आधारित (पण नव्याने लेखन केलेलं) ‘धर्मवादळ' नावाचं पुस्तक पुढे प्रसिद्ध झालं. त्यांनीच ‘नवं युग, नवा विचार' हे तंत्रज्ञान आणि आजचा काळ यांच्या संबंधांविषयीच्या पुस्तकांची ओळख करून देणारं एक सदर आणि पाकिस्तान विषयीचं आकलन विस्तारण्याचा प्रयत्न करणारं ‘पाकिस्तान नावाचं कोडं' नावाचं सदरही लिहिलं. संगीताचे अभ्यासक केशव परांजपे यांनी भारतीय संगीतातील दिग्गजांच्या अभ्यासपूर्ण मुलाखतींचं एक सदर मेहनतीने चालवलं होतं. किशोरी अमोणकर, धोंडूबाई कुलकर्णी, हरिप्रसाद चौरसिया, पं. रामनारायण, उस्ताद अमजद अली खाँ, पं. विश्वमोहन भट, शोभा गुर्टू, पं. शिवकुमार शर्मा अशा कलावंताचा सांगीतिक विचार त्या सदरातून पुढे आणला गेला होता. त्याशिवाय समकालीन लेखकांच्या लेखनाचा परिचय करून देणारं संजय जोशी यांचं ‘लिहिते लेखक' हे सदर, गाजणाऱ्या इंग्रजी पुस्तकांचा परिचय करून देणारं यशोदा वाकणकर हिचं ‘इंग्लिश विंग्लिश' हे सदर, भारतातील महत्त्वाच्या इनोव्हेशन्सचा परिचय करून देणारे (आधी) गौरी कानेटकर आणि (नंतर) आनंद अवधानी यांनी लिहिलेले लेख वगैरे सदरंही नोंदण्यासारखी आहेत.
हेही वाचा - ‘अनुभव' नावाचा प्रयोग - भाग दोन
या सर्व सदरांनी वाचकांच्या पुढ्यात एकेका विषयाचं दालन खुलं करण्याचं काम केलं. आपल्याकडे एकेका लेखकाला सदर लिहिण्यासाठी जागा राखून ठेवण्याची जुनी पद्धत आहे; परंतु एकदा सदराचा ढाचा ठरला की मग बऱ्याचदा लेखक-वाचक यांच्यामध्ये संपादक थांबत नाहीत. मात्र लेखकाला आवश्यक जागा दिल्यानंतर त्याच्याकडून ‘बेस्ट' मिळायला पाहिजे, यावर आमचा सर्वकाळ कटाक्ष राहिला. त्यामुळे ‘अनुभव'साठी सदरलेखन करणं ही लेखकांसाठीही डोकेदुखीच ठरत असणार. पण आमच्या (सु) हेतूंविषयी खात्री असल्याने लेखकांनी आम्हाला सहकार्य केलं असणार. या झटापटीत फायदा वाचकांचा झाला हे उघड आहे.
सदरं ही एकेका लेखकाची असतात. लेखकाची ताकद जोखून निर्णय घेण्यापलीकडे संपादक फार काही (लुडबूड?) करू शकत नाही. पण लेखमालिकांचं तसं नसतं. मालिका ही संपादकाची ‘प्रॉपर्टी' असते. त्यात कल्पना महत्त्वाची असते. कल्पनेचं कागदावर किती भक्कम नियोजन होतं त्यावर ती मालिका किती ‘प्रॉडक्टिव्ह' बनणार हे ठरत असतं. त्यामुळे संपादकाच्या समजेचा, त्याच्या अभ्यासाचा आणि ‘फोकस' ठरवण्यातील क्षमतेचा कस लागत असतो. हा खेळ खेळायला ‘युनिक फीचर्स'ला नेहमीच आवडत आलेलं आहे. लेखमालिकांचं नियोजन करताना आणि त्यांची अंमलबजावणी करताना तुमचं तुम्हाला जोखता येतं, त्या निमित्ताने वाचन-अभ्यास करता येतो आणि नव्या विषयात शिरता येतं. एवढं सारं एकेका लेखमालिकेत करायला मिळणार असेल तर बहारच ना!
या प्रकारचं काम करण्याचा आमचा सराव ‘अनुभव'च्या पहिल्या अवतारात १९९४ ते २००० या काळात झाला होता. एकेका विषयावर एकेक अंक करताना तुम्हाला ‘प्लॅनिंग'वर हुकुमत मिळवावी लागते. त्या अनुभवाचा लेखमालिका योजताना उपयोग झाला असणार. शिवाय याच काळात आम्ही ‘साप्ताहिक सकाळ'च्या दिवाळी अंकात एक वार्षिक लेखमाला चालवली होती (ज्या लेखमालेतून ‘अर्धी मुंबई' हे पुस्तक तयार झालं). महाराष्ट्रातील देवस्थानांवरही अशीच एक लेखमालिका आम्ही प्रत्यक्षात आणली होती (ज्यातून ‘देवाच्या नावाने' नावाचं पुस्तक तयार झालं). ‘अनुभव'मध्येही सुरुवातीच्या साताठ वर्षांत काही मालिका आम्ही चालवल्या होत्या, पण साधारण २०१० पासून ‘अनुभव'मध्ये मालिकांचा धडाकाच सुरू झाला. महाराष्ट्र राज्यनिर्मितीला पन्नास वर्षं पूर्ण होण्याच्या निमित्ताने आम्ही अनेक कल्पनांचा विचार (आणि विलासही!) केला होता. त्यातील तीन कल्पना ‘अनुभव'मध्ये प्रत्यक्षात आल्या. त्यातील एक महत्त्वाची आणि गंभीर आढावा घेणारी ‘मुलाखत मालिका' होती ‘महाराष्ट्र मंथन' नावाची. त्यात सुहास पळशीकर, अरुण टिकेकर, माधव गोडबोले, सुलक्षणा महाजन, राम ताकवले, रत्नाकर महाजन अशा विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या विस्तृत मुलाखती आम्ही घेतल्या होत्या. गंमत म्हणजे यातील बहुतेक मुलाखती ‘लेखी' होत्या. म्हणजे आम्ही प्रश्न काढून संबंधितांना दिले होते आणि त्यावरील उत्तरं लिहून मिळवली होती; जेणेकरून बोली प्रश्नोत्तरांतून आशयाचा क्षय होऊ नये. या मुलाखतींमधून वेगवेगळ्या क्षेत्रांतले अभ्यासक-विचारवंत आजच्या महाराष्ट्राचं विश्लेषण कसं करतात, हे वाचकांसमोर यायला मदत झाली. या मुलाखती हे बऱ्याच वाचकांच्या दृष्टीने ‘जड' प्रकरण ठरलं, पण आमच्या बुद्धीला तो चांगलाच खुराक होता. याचा अर्थ ‘अनुभव' मासिकाने केवळ वाचकांचंच भरण-पोषण केलं असं नव्हे, तर संपादकही त्यातून समृद्ध झाले म्हणायचे! दीर्घ मुलाखतींचा हा फॉर्म आम्ही त्याआधी आणि नंतरही पुष्कळ वापरला. एकेक विषय खोलात उतरून समजून घेण्यासाठी तो आम्हाला अतिशय उपयोगी वाटत आला आहे. या मुलाखतींमधली किती नावं सांगावीत! विजय तेंडुलकर, श्याम बेनेगल, जसराज, सुधीर पटवर्धन, माधव चितळे, माधव गाडगीळ, विजय केळकर, डॉ. अभय बंग अशा अनेक अभ्यासक-विचारी मंडळींचं म्हणणं वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केलाय.
हेही वाचा - ‘अनुभव' नावाचा प्रयोग - भाग तीन
महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आखलेली दुसरी लेखमालिका शोधलेखांवर आधारित होती. पन्नास वर्षांत महाराष्ट्राची बरीच प्रगती झाली, पण ही प्रगती समाजाच्या सर्व थरांमध्ये पोहोचली का, याची शोधाशोध करावी असं आम्हाला वाटत होतं. या शोधलेखमालेत भटके-विमुक्त, भूमिहीन, मच्छीमार, असंघटित कष्टकरी, ऊसतोड कामगार, दुष्काळग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकरी, आदिवासी, गरीब मुसलमान अशा घटकांमध्ये जाऊन, त्यांच्याशी बोलून त्यांच्या जगण्याचा शोध घेतला गेला. हे लेख वंचित घटकांच्या भिरकावलेपणाचा उभा-आडवा छेद होते. ‘आपला महाराष्ट्र' असं आपण म्हणतो तेव्हा किती प्रकारचे लोक त्याचा भाग असतात (किंवा नसतात) हे आपल्याला माहीत असावं, यासाठी ही शोधाशोध आम्ही केली होती. या शोधाशोधीत मुख्य भूमिका पार पाडली आशय आणि शैली यांचं उत्तम संतुलन लाभलेल्या प्रशांत खुंटे या मित्राने. त्याच्यासोबत सविता अमर, प्रतीक पुरी, मनोहर सोनवणे असे सहकारीही होते. या लेखमालेचं पुस्तक तेव्हाच व्हायला हवं होतं, पण ते राहिलं.
महाराष्ट्राबद्दलचं भान वाढावं यासाठी आखलेली तिसरी लेखमालिका संपादक आणि लेखक या दोघांसाठीही कष्टाची आणि वाचकांसाठी मात्र आनंददायी होती. विविध ऐतिहासिक, भौगोलिक आणि सामाजिक प्रतीकांतून महाराष्ट्राच्या ऐक्याचे गोडवे गायले जात असले, तरी महाराष्ट्रातील मराठी माणसांना महाराष्ट्राची ‘बेसिक' ओळख नाही, असं आमचं निरीक्षण आहे. म्हणजे सांगलीच्या माणसाला गोंदिया कुठे आहे असं विचारलं, आणि धुळ्याच्या माणसाला मिरज कुठे आहे असं विचारलं तर नकाशावर योग्य ठिकाणी बोट जाईल असं नाही. आपल्याला सगळंच माहीत असतं असं पुण्या-मुंबईच्या लोकांना वाटतं. प्रत्यक्षात महाराष्ट्राविषयी सर्वाधिक अनभिज्ञ तेच असतील! आपल्याला नकाशावर ठिकाणं सापडत नसतील तर महाराष्ट्रातील विविध विभागांतील विविध जिल्ह्यांच्या जगण्याविषयी किती माहीत असणार? म्हणून मग आम्ही महाराष्ट्रातील लोकांच्या जगण्याचा जिल्हावार शोध घ्यायचं ठरवलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रत्येक जिल्ह्यावरील लेखातून आम्हाला काय अपेक्षित आहे यावर आम्ही जे टिपण तयार केलं ते साधारण लेखी दहा पानी होतं. म्हणजे जवळपास एका लेखाच्या ऐवजाचं. हे टिपण तयार झालं तेव्हाच कळलं होतं, की ही लेखमाला पूर्ण झाली तर तो महाराष्ट्राविषयीचा उत्तम दस्तावेज असेल. झालंही तसंच. त्या त्या जिल्ह्यातील अनुभवी पत्रकार-लेखक-अभ्यासकांकडून आम्ही हे लेख लिहून घेतले आणि ही लेखमालिका वाचकांचं समाधान करून गेली. या लेखमालेच्या नियोजनात माझ्यासोबत मनोहर सोनवणे होते आणि त्यानंतर मालिकेच्या संयोजनात महेंद्र मुंजाळ आणि गौरी कानेटकर हे दोघं होते. या यशस्वी लेखमालेचं श्रेय जसं सखोल नियोजनाला जातं, तेवढंच लेखमालिकेत सहभागी झालेल्या लेखकांकडेही जातं. आनंदाची बातमी म्हणजे संपादकीय संस्कार करून ही लेखमालिका लवकरच एका ग्रंथराजाच्या रूपात उपलब्ध होत आहे.
आणखी दोन महत्त्वाच्या लेखमालांबद्दल थोडक्यात सांगतो आणि थांबतो. या दोन्ही मालिका लेखन-वाचनाशी संबंधित आहेत. आपल्याकडे वाचनसंस्कृतीबद्दल सार्वजनिक व्यासपीठांवरून बरंच काही बोललं जातं. वाचनसंस्कृतीच्या अनुषंगाने जेव्हा गौरवास्पद बोललं जातं, तेव्हा मात्र ते बेदम विनोदी वाटतं. आपल्याकडचे सांस्कृतिक व्यवहार इतके किरटे आहेत आणि वाचनसंस्कृती इतकी दुबळी आहे, की खरं तर या विषयावर बोलण्याऐवजी प्रत्यक्ष काम करण्याची गरज अधिक आहे. ही गोष्ट अधोरेखित व्हावी आणि आपल्याकडची विदारक परिस्थिती पुढे यावी, यासाठी आम्ही ‘झाडाझडती वाचनसंस्कृतीची' नावाची मालिका अनेक पत्रकार-लेखक यांच्या साहाय्याने चालवली होती. नियतकालिकं, प्रकाशनसंस्था, साहित्यसंस्था, शासकीय संस्था, साहित्य संमेलनं, पुस्तकविक्रेते आणि प्रदर्शनं भरवणारे असे जे जे वाचनसंस्कृतीशी संबंधित घटक आहेत, त्या सर्वांचा झाडा या मालिकेत कठोरपणे (पण सभ्यपणे) घेतला गेला होता. वसुंधरा पेंडसे- नाईकांपासून सतीश काळसेकरांपर्यंत ज्येष्ठ मंडळींनी आणि राजीव काळेपासून राम जगतापपर्यंतच्या तरुण मंडळींनी या लेखमालेत लिहिलं होतं. या लेखमालेच्या संयोजनाची जबाबदारी माझा सहकारी महेंद्र मुंजाळने पार पाडली होती.
हेही वाचा - 'ललित'चा जन्म, नेमका कसा आणि कुठे?
दुसरी मालिका ‘गोष्ट खास पुस्तकाची'. ही मालिका ‘अनुभव'च्या वाचकांमध्ये भलतीच लोकप्रिय झाली. आपल्याकडे गाजणाऱ्या पुस्तकाच्या लेखकाबद्दल भरभरून लिहिलं जातं; पुस्तकाबद्दल उलटसुलटही लिहिलं जातं. पण त्या पुस्तकाचा जन्मदाता लेखक त्याबद्दल क्वचितच बोलतो-लिहितो. पुस्तकाच्या कल्पनेचं बीज कसं पडलं, त्याची मशागत कशी केली गेली, साहित्यकृतीत तत्कालीन काळाचं प्रतिबिंब कसं पडलं, पुस्तकाला मिळालेल्या प्रतिसादातून काय हाती लागलं अशा अनेक मुद्द्यांच्या अनुषंगाने लेखकाने अनुभवपर लिहावं, असं आम्हाला वाटत होतं. या कल्पनेला मधु मंगेश कर्णिक, ना. धों. महानोर, अरुण साधू, वसंत आबाजी डहाके, यशवंत मनोहर, अनिल अवचट, रंगनाथ पठारे, आशा बगे, विश्वास पाटील, भारत सासणे, सानिया, लक्ष्मण माने अशा नामवंत लेखकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि ही लेखमाला प्रत्यक्षात आली. नंतर या लेखमालेत भालचंद्र नेमाडे, रत्नाकर मतकरी आणि ह. मो. मराठे यांच्या लेखांची भर घालून त्याचं पुस्तक आता प्रकाशित झालं आहे.
ही उदाहरणं रीतसर नियोजन करून प्रत्यक्षात आणलेल्या लेखमालांची. पण ‘अनुभव'च्या आजवरच्या प्रवासात असंही घडलंय, की एखादा लेख किंवा कल्पना ‘क्लिक' झाल्यामुळे आम्ही त्याच्या पाठी लागलो आणि त्यातून लेखमालेसारखी थीम आकारत गेली. त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रीय समाजाच्या संस्कृतीच्या खुजेपणाबद्दल लिहिले गेलेले सुहास पळशीकर, विनय हर्डीकर, निळू दामले, अवधूत परळकर, जयदेव डोळे, अरुण साधू, राजेश्वरी देशपांडे आणि स्वत: माझे काही लेख. खेड्यापाड्यांत विपरीत परिस्थितीत काम करणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवपर लेखांमधूनही अशाच प्रकारे न ठरवता लेखमाला आकाराला आली. केशव वाघमारे, भाऊसाहेब चासकर, राम सुरासे, वैशाली गेडाम यांच्या वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या लेखांनी वाचकांना अस्वस्थ करून सोडलं.
‘आता शेवटचं, आता शेवटचं', असं म्हणत मारुतीचं शेपूट कितीही वाढू शकतं! त्यामुळे लेख-मालिकांबद्दल सांगणं इथे थांबवतो, पण ‘अनुभव'ने जाणीवपूर्वक राबवलेल्या इतर दोन-तीन गोष्टींबद्दल मात्र सांगितलंच पाहिजे म्हणून सांगतो. एक गोष्ट म्हणजे मराठी लेखक-अभ्यासक-पत्रकार जे विषय हाताळत नाहीत, किंवा जे विषय त्यांच्या अनुभवविश्वातच नसतात, असे विषय इंग्रजीतून, अन्य भारतीय भाषांमधून किंवा जगातील अन्य देशांमधून मिळवून अनुवादित करून वाचकांपर्यंत पोहोचण्याची रीत आम्ही स्वीकारली आहे. त्यामुळेच रामचंद्र गुहा, योगेंद्र यादव, योगिंदर सिकंद, पी. साईनाथ अशा अभ्यासक-पत्रकारांचे लेख आम्ही आवर्जून प्रसिद्ध केले आहेत. हे लेख मिळवून देण्यासाठी आमचे काही मित्र खास प्रयत्नशील असतात. ‘न्यूयॉर्क टाइम्स'सारख्या वृत्तपत्रांसोबत ‘टायअप' करूनही आम्ही काही लेख प्रकाशित केलेले आहेत. त्याचबरोबर देशभरात (आणि परदेशातही) काही महत्वाची माणसं भाषणं-व्याख्यानांच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडत असतात. त्यांचे विचार अनेकदा समाजाला अंतर्मुख करणारे असतात. वर्तमानपत्रांमध्ये त्या म्हणण्याला जागा मिळतेच असं नाही. अनुभवमध्ये मात्र आम्ही अशा भाषणांना नेहमीच जागा देत आलो आहोत. त्यात उल्लेख करण्याजोगी काही नावं म्हणजे वॉक्लाव्ह हॅवेल, एम. एस. स्वामीनाथन, नारायणमूर्ती, मार्क टुली, भालचंद्र नेमाडे, वसंत आबाजी डहाके, डॉ. अभय बंग. आपल्या माहितीत जे जे चांगलं लिहिलं-बोललं जातंय ते शक्य तेवढं वाचकांपर्यंत पोहोचवायचं, एवढाच त्यामागचा हेतू. हिंदीतून ललित साहित्य अनुवादित करण्याचीही परंपराच ‘अनुभव'मध्ये तयार झाली आहे. त्या कामी चंद्रकांत भोंजाळ, मंदाकिनी भारद्वाज, जयप्रकाश सावंत ही मंडळी मदत करत असतात. मधल्या काळात भोपाळस्थित सुशील शुक्ल-शशी सबलोक या दोन हिंदी भाषक संपादकांच्या मदतीने ‘अनुभव'मध्ये समकालीन हिंदी साहित्याचं दालनच उघडलं गेलं. अन्य भारतीय भाषांतील दर्जेदार समकालीन साहित्य ‘अनुभव'मध्ये प्रकाशित करण्याचाही आम्ही प्रयत्न करत असतो.
(क्रमशः)
(सुहास कुलकर्णी लिखित 'आमचा पत्रकारी खटाटोप' या समकालीन प्रकाशनच्या पुस्तकातून साभार)
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.
