कोणतंही मासिक-साप्ताहिक हातात घेतल्यावर बहुतेक लोक काय करतात? मुखपृष्ठावर नजर टाकतात, पुढून-मागून अंक चाळतात, पानं फडफडवतात आणि एखाद्या मजकुराने लक्ष वेधून घेतलं तर त्यावरून नजर फिरवतात. बहुतेकांसाठी कोणताही अंक म्हणजे साठ-सत्तर पानांची एक चळत असते नुसती.
आणि कोणतंही बरं मासिक उभं करणाऱ्या संपादकासाठी त्याचा अंक कसा असतो? त्याच्या (आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या) बुद्धीची ती मासिक परीक्षा असते. त्याचं वाचन, अभ्यास, घडामोडींवरचं लक्ष, लेखकांशी असलेला संवाद यांची कसोटी प्रत्येक महिन्याला लागत असते. अंक वाचकांच्या हाती देत असताना समाधान आणि चुटपूट अशा दोन्ही भावनांचा अनुभव तो घेत असतो. महिन्यांमागून महिने आणि वर्षांमागून वर्षं हा अनुभव घेण्याचा त्रास आणि आनंद तो मिळवत असतो.
याचा अर्थ एखाद्या मासिकाकडे बघण्याच्या वाचकाच्या आणि संपादकाच्या दृष्टिकोनांत काहीच्या काही अंतर असतं. संपादक त्याच्या अंकात गुंतलेला असतो आणि वाचक बहुतेकदा सुटा असतो.
हे सगळं बोलायला ठीक आहे; पण आपल्या ‘अनुभव' मासिकाबद्दलही हीच परिस्थिती असेल का, असा प्रश्न स्वत:लाच विचारला तर श्वास थांबतो, मनात चलबिचल होते, अस्वस्थता येते. वाचक अन्य मासिकांशी जसा वागत असेल तसाच ‘अनुभव'सोबत वागत असेल, असं मानायला मन तयार होत नाही. वाचक ‘अनुभव'चा अंक पोस्टातून येण्याची वाट पाहत असेल, ताज्या अंकात काय काय वाचायला मिळेल याची उत्सुकता त्याला लागून राहिलेली असेल; अंक हाती पडल्यानंतर तो मुखपृष्ठावर नजर रोखून ठेवेल, अंकातल्या विषयांकडे कुतूहलाने बघेल, विषय आणि लेखक यांच्यानुसार तो अंक चाळेल आणि वेळ मिळेल तसा (किंवा वेळ काढून) एकेक लेख, एकेक पान तो वाचून काढेल, असं चित्र आम्ही मनात रंगवलेलं असतं. अंक वाचून झाल्यानंतर त्याच्या मनात आनंद, समाधान, अस्वस्थता, चीड, उद्वेग अशा भावना निर्माण होतील, असं आम्ही मानून असतो. अंक वाचण्यापूर्वीचा आणि अंक वाचून झाल्यानंतरचा वाचक यांच्यात कणभराने का होईना, फरक पडलेला असेल असं आम्हाला वाटत असतं. प्रत्येक अंक उभा करताना संपादक म्हणून हे सर्व आमच्यात झालेलं असतंच ना!
पण वाचकांच्या बाबतीत खरोखर असं काही घडतं का? माहीत नाही. ‘अनुभव'चे वाचक सजग आहेत आणि अंक वाचून ते समृद्ध होत असतील, असं मानून आम्ही पुढच्या अंकासाठी उत्साहाने कामाला लागत असतो, एवढं खरं!
आपल्याकडे स्वयंस्फूर्तीने मासिकं वगैरे काढण्याची जुनी परंपरा आहे. नवविचार रुजवण्यापासून चळवळीचं व्यासपीठ म्हणून वापर करण्यापर्यंत अनेक कारणांसाठी थोरामोठ्यांनी नियतकालिकं काढल्याचा इतिहास आहे. पण बहुतेकदा नियतकालिकाच्या प्रवर्तकाच्या शेवटासोबतच त्या नियतकालिकाचाही शेवट होतो किंवा त्याला उतरती कळा तरी येते. या नियमाला अपवाद फारच थोडे. महाराष्ट्रातलं ‘किर्लोस्कर' मासिकांचं उदाहरण घेतलं तर काय दिसतं? या मासिकांचं वैभव संपूनही आता बरीच वर्षं झालेली असली, तरी सुरुवातीची पन्नास-साठ वर्षं या मासिकांनी मराठी मनांची मशागत करण्याचा प्रयत्न केला. प्रबोधन आणि रंजन अशा दोन्ही गोष्टींच्या आधारे त्यांनी ही कामगिरी बजावली. ‘युनिक फीचर्स' सुरू करण्याच्या आधी मी स्वत: या मासिकांच्या संपादनात तीनेक वर्षं गुंतलेलो असल्याने आणि ‘किर्लोस्करी' पत्रकारितेच्या वाटेवरून चाललेलो असल्याने हा समतोल या मासिकांनी कसा साधला होता, हे मी बघू शकलो. माझ्यासाठी ‘किर्लोस्कर' ही बिनभिंतीची शाळा होती. साठ-पासष्ट वर्षांचे जुने अंक तिथे वाचनासाठी उपलब्ध असल्याने त्या परंपरेशी माझी ओळख झाली आणि आपोआप प्रभाव पडत गेला. पुढे २००१ साली ‘अनुभव' सुरू करताना त्या प्रभावाचा काही एक अंमल माझ्यावर असणारच.
इथे एक किस्सा सांगायलाच हवा. १९८८ साली ‘किर्लोस्कर' मासिकाच्या संपादनाची जबाबदारी माझ्यावर आली, तेव्हा मुकुंदराव व शांताबाई किर्लोस्कर मासिकांतून निवृत्त झाले होते. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी त्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यात ‘किर्लोस्करची परंपरा पुढे नेण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन' असं काहीसं लिहिलं होतं. ते पत्र वाचून मुकुंदराव मला भेटायला आले आणि त्यांनी प्रेमाने पाठीवरून हात फिरवला. पण शांताबाईंचं व्यक्तिमत्त्व करारी. त्यांचं मला पत्र आलं. ‘परंपरा पुढे नेण्याचं मनोगत व्यक्त केलंत ते बरं झालं, पण तुम्ही ज्या काळात काम करत आहात तो काळ समजून घ्या आणि त्याला अनुसरून काम करा. किर्लोस्करच्या परंपरेची चाकोरी सांभाळण्याचा दाब घेण्याची आवश्यकता नाही', असं त्यांनी लिहिलं होतं. तेव्हा माझं वय होतं २२. वयाच्या बाविसाव्या वर्षी असा कानमंत्र मिळाल्याने आपल्या भवतालाकडे स्वतंत्रपणे पाहण्याची दृष्टी तयार व्हायला मदत झाली असणार. कदाचित त्यामुळे ‘अनुभव' सुरू करताना आणि चालवताना स्वतंत्र बाणा ही गोष्ट आम्ही महत्त्वाची मानली. पुढे पुढे ‘स्वतंत्र'पणाला ‘मोकळे'पणाची जोड देण्याचाही प्रयत्न करत गेलो. त्यातूनच जगाला मोकळेपणाने सामोरं जाणारं मासिक अशी टॅगलाईन ‘अनुभव'ला प्राप्त झाली.
आपल्याकडे वैचारिक भूमिका रेटत राहण्यासाठी नियतकालिकांचा उपयोग होत असतो. कम्युनिस्ट, समाजवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी, विद्रोही, हिंदुत्ववादी, पर्यावरणवादी, स्त्रीवादी अशा नाना विचारांचा आग्रह धरून मासिकं चालवली जातात. अशा मासिकांची समाजाला गरज असतेच, कारण त्यातून समाजाचा सामूहिक विचार पुढे जात असतो. ‘मेनस्ट्रीम' साप्ताहिकांमधूनही जे (थोडंफार) गंभीर लेखन होतं, त्याचाही या प्रक्रियेला हातभार लागत असतो. परंतु ‘युनिक फीचर्स' आणि ‘अनुभव' मासिकाने कधीही कुठल्या एका विचारावर विसंबून वाटचाल केली नाही. कारण कोणत्याही एका विचारसरणीमार्फत आजच्या काळातील सर्व आव्हानांचं पुरतं आकलन होऊ शकत नाही, असं आम्हाला वाटत आलं आहे. प्रत्येक विचारसरणीची एक वैचारिक चौकट असते आणि ती काही बाबतींत प्रश्नांची उत्तरं सांगतही असते; पण कोणतीही एक विचारसरणी समाजातील सर्व प्रश्नांना पुरी पडू शकत नाही. त्यामुळे विचारसरणीच्या हट्टापायी हेवेदावे करण्याऐवजी स्वतंत्र वाट चोखाळता येईल का, असा विचार आम्ही सुरुवातीपासून करत आलो.
२००१ साली‘अनुभव' सुरू करताना ही भावना बरीच बाल्यावस्थेत आणि क्षीण होती. पण दर महिन्याला अंक निघू लागले, तसतशी अधिकाधिक स्पष्टता येऊ लागली. कोणत्याही प्रस्थापित वैचारिक चौकटीत अडकवून न घेता समकालीन वास्तवाला भिडता येऊ शकतं का, असा प्रयत्न आम्ही करू लागलो. भारतातील वैचारिक लढाईच्या तराजूची दांडी कोणत्याही एका बाजूला झुकणार नाही अशा बेताने प्रयत्न करायचा, अशी आमची सुरुवातीपासूनची भूमिका होती. या प्रयत्नात आम्ही भोंगळ किंवा बोथट बनण्याचा धोका होता. आमची भूमिका सबगोलंकारी असण्याचा आरोपही आमच्यावर होऊ शकला असता. पण खुल्या नजरेने जग बघता यावं या इच्छेपोटी आम्ही हा धोका पत्करला होता.
हेही वाचा - 'ललित'चा जन्म, नेमका कसा आणि कुठे?
१९९० च्या दशकात जग आमच्यासमोर बदललं होतं. एकीकडे जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण या प्रक्रिया भारतात उलगडत गेल्या. दुसरीकडे, मंडल आयोग शिफारशीच्या स्वीकारामुळे आणि रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादामुळे जातीच्या आणि धर्माच्या अस्मिता टोकदार बनत गेल्या. तिसरीकडे प्रादेशिक पक्षांचा जोर वाढल्याने देशाचं राजकारणही बदललं. वाढत्या शहरीकरणामुळे अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेलाही नवे आयाम प्राप्त झाले. मध्यमवर्गाचा आकार वाढत गेला. पुढे फोन-मोबाइल-कॉम्प्युटर-टीव्ही-इंटरनेट यामार्फत आलेल्या संपर्कक्रांतीतून बदलाचा वेग किती तरी पट वाढला. तंत्रज्ञानातील क्रांतीने १९९० पूर्वीचं जग जणू पुसलंच गेलं. पण हेही खरं, की निम्मा देश या बदलांपासून वंचित राहिला होता. या आणि अशा अनेक गोष्टी अभूतपूर्व वेगाने आपल्या आसपास घडत असताना त्या जाणून घेणं, त्यांचे परिणाम समजून घेणं, त्यावरील उपायांची दिशा हुडकणं हे विचारांनी मोकळं असल्याशिवाय शक्य नाही, असं वेळोवेळी वाटत होतं. पण ही गोष्ट कुणा दोन-चार लोकांकडून होणारी नव्हती. त्यामुळे बुद्धीने स्वतंत्र आणि विचारांनी मोकळ्या असणाऱ्या लेखक-वाचकांसाठी ‘अनुभव'ने व्यासपीठ म्हणून काम करावं, असं वाटत गेलं. त्यातून आजचा ‘अनुभव' आकारत गेला.
‘अनुभव'ची ही भूमिका आकाराला येण्यामागे आणखीही एक कारण होतं. ‘अनुभव' मासिकाच्या जन्माची गोष्ट सांगताना त्याचं थोडक्यात सूचन मी मागील प्रकरणात केलं होतं. सध्या जो ‘अनुभव' प्रकाशित होतो तो २००१ सालापासून निघत असला, तरी या अंकाचा पहिला अवतार सप्टेंबर १९९४ मध्ये वाचकांसमोर आला होता. हा अंक १९९४ ते २००० असा सहा वर्षं दर महिन्याला प्रकाशित होत असे. हे मासिक मुंबईच्या ‘युवा' नावाच्या स्वयंसेवी संस्थेतर्फे प्रकाशित होत असे आणि संपादनाची जबाबदारी ‘युनिक फीचर्स' पार पाडत असे.
याआधी म्हटल्याप्रमाणे १९९० च्या दशकात खूप बदल व्हायला लागले. एकामागून एक आदळणाऱ्या या बदलांमुळे भिरभिरल्यासारखं होत होतं. आपण आजवर जे घट्ट धरून बसलो होतो ते हातातून सुटत असल्याची भावना निर्माण होत होती. अर्थव्यवस्था, राजकारण, विचारसरण्या, चळवळी-आंदोलनं, लैंगिकता, कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध अशा अनेक बाबतींत ही भावना पसरत जाणारी होती. त्यामुळे नव्या-जुन्याचा मेळ घालत नव्याने मांडामांड करण्याची गरज भासत होती. अस्वस्थ करून सोडणारं हे वास्तव समजून घेतल्याशिवाय ही मांडामांड करता येऊ शकणार नाही, याचीही जाणीव होत होती. आपल्याला हे समजून घ्यावंसं वाटतंय, तर समाजातल्या अनेकांनाही असंच वाटत असणार, अशी आमची अटकळ होती. त्यातूनच मासिक काढायचा निर्णय झाला. ही गोष्ट १९९४ ची. भोवताल खोलात समजून घेण्याची इच्छा असल्याने एका विषयावर एक अंक, असं ‘अनुभव'चं स्वरूप ठरलं. इंग्रजीमध्ये ‘सेमिनार' नावाचं एक मासिक निघतं. त्या मासिकाचा आदर्श आमच्यासमोर होता. परंतु ‘सेमिनार'पेक्षा सोपे आणि जास्त जवळचे विषय घ्यावेत, असं आम्हाला वाटत होतं.
वाटणं आणि करणं यातील अंतर तोडत आम्ही तीनेक महिन्यांत स्वत:ची तयारी केली. ‘अनुभव'चा पहिला अंक कशावर करावा यावर बराच काथ्याकूट केला. या ढवळाढवळीत राजेंद्र साठे, आनंद अवधानी, राजेश्वरी देशपांडे आणि मी असे चौघं प्रामुख्याने होतो. (पुढील पाच-सहा वर्षं ही टीम कायम राहिली.) त्या काळी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची चर्चा खूपच गरम होती. शिवाय त्या अनुषंगाने व्यवस्थात्मक बदलांविषयीही बरंच बोललं जात होतं. त्यामुळेच ‘अनुभव'चा पहिला अंक ‘भ्रष्टाचार' या विषयावर करण्याचं आम्ही ठरवलं. हा अंक कसा करावा, त्याचा फोकस कसा असावा वगैरेंबाबत आम्ही अनेकांशी बोललो. विजय तेंडुलकर हे त्यातले प्रमुख. त्यांनी या पहिल्या अंकात (आणि तेव्हापासून पुढे सर्वकाळ) खूप रस घेतला. त्यांच्याशी चर्चा करूनच हा पहिला अंक तयार झाला म्हणा ना! अंकाचं प्रकाशनही मुंबईत त्यांच्या हस्तेच एका जाहीर कार्यक्रमात झालं. या अंकाचं मुखपृष्ठ आणि अंकाची मांडणी आमचे मित्र चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केली होती. विषारी फळं लागलेलं नि जमिनीत घट्ट मुळं पसरवलेलं भीतिदायक झाड, हिंस्र दात विचकणारं झाड, गिधाडं-साप-खेकडा-मगर अशा प्रतीकात्मक चित्रांमधून या विषयाला त्यांनी धार आणली होती. पुढे सलग सहा वर्षं सर्व अंकांची मुखपृष्ठं चंद्रमोहन यांनीच केली. हे काम काहीच्या काही ‘ओरिजिनल' होतं. ‘अनुभव'च्या मुखपृष्ठाबाबतीत त्याने केलेल्या या कामाला खरोखरच तोड नाही. मराठी मासिकांच्या इतिहासात चंद्रमोहन यांचं हे काम उजळून दिसणारं आहे. एका विचारी चित्रकाराची विचारप्रक्रिया समजून घ्यायची तर त्या सहा वर्षांतील सत्तरेक अंकांची मुखपृष्ठं मुळातून पाहण्यासारखी नि आस्वाद घेण्यासारखी आहेत.
‘अनुभव'च्या अंकांचे विषयही वेधक असत. एन्रॉन प्रकल्पाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या विकासाच्या मुद्द्यापासून शहरीकरणापर्यंत, राजकीय पक्षांच्या विश्वासार्हतेपासून बुद्धिवंतांच्या ताळेबंदापर्यंत, अनौपचारिक शिक्षणाच्या प्रयोगापासून पत्रकारितेच्या तत्कालीन स्वरूपापर्यंत, दलितांच्या प्रश्नापासून अल्पसंख्याकांच्या प्रश्नापर्यंत आणि सांस्कृतिक महाराष्ट्राच्या समीक्षेपासून परिघावरच्या माणसांच्या जगण्यापर्यंत अनेक विषय एकेका अंकामार्फत हाताळले जात. महाराष्ट्रातील सर्व विचारांचे अभ्यासक त्यात लिहीत असल्याने तो अंक वाचकांना सर्वसमावेशक वाटत असे. एकेका विषयावर अंक असल्याने वाचक ते अंक जपून ठेवत. ‘तुमचे अंक संग्रहणीय आहेत' असं आवर्जून सांगत. असं काही ऐकलं की आम्ही खूष होऊन जात असू. पण गंमत म्हणजे आम्ही कुणाला हे कौतुकाने सांगायला गेलो, तर ‘संग्रहणीय म्हणजे ठेवून देण्यासारखे, वाचण्यासारखे नव्हे' असं सांगून आम्हाला जमिनीवर आणणारे मित्र आमच्या आसपास होतेच. अर्थात, वाचकांनी अंकांचं काय केलं ते त्यांचं त्यांना माहीत; पण आम्हा मित्रांची समज वाढण्यात, विस्तारण्यात आणि सखोल होण्यात ‘अनुभव'च्या या पहिल्या अवताराचा वाटा मोठा आहे, हे नि:संशय.
(क्रमशः)
(सुहास कुलकर्णी लिखित 'आमचा पत्रकारी खटाटोप' या समकालीन प्रकाशनच्या पुस्तकातून साभार)
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.
