नागपूर जिल्ह्यात मोहगाव इथे दूर जंगलाजवळ दगडाच्या खाणी आहेत. त्या खाणींमध्ये आत भटक्यांची एक वस्ती आहे. हे मूळचे गुजराती असलेले भरवाड जमातीतले लोक. आपल्याकडे त्यांना लाल गाईवाले म्हणून ओळखलं जातं. पावसाळ्यात त्यांच्या वस्तीपर्यंत गाडी जाऊ शकत नाही. आम्ही गेलो तेव्हा उन्हाळा होता. तिथे एका उंचशा जागेवर आंब्याच्या झाडाखाली काही बाजा टाकल्या होत्या. तिथून पुढे लगेचच टेकडी आणि टेकडीवर जंगल होतं. खाली मैदानात पालासारख्या चार-पाच राहुट्या टाकलेल्या होत्या. दुपारच्या जेवणाची वेळ झालेली होती. त्यांचं जेवण म्हणजे मोठ्ठा गुळाचा खडा, पातेलं भरून ताक आणि रोटी. त्या दिवशी त्यांनी आमच्यासाठी थोडी हिरवी भाजी केली होती. तिथल्या स्त्रियांनी चेहऱ्यावर पदर ओढून घेतलेला होता.
महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांत हे भरवाड राहतात. गायी चरण्यासाठी पावसाळ्यात ते एका ठिकाणी वस्ती करतात. खूप पाऊस असेल तेव्हा बाजेवर पालं लावून त्यात झोपावं लागतं, असं त्यांच्याकडून कळलं. अशा वेळी चूलही पेटत नाही. कित्येक वेळा फक्त दूध पिऊन झोपावं लागतं. या लोकांकडे शेकड्याने गायी असतात. त्यामुळे दूधदुभतं विकून त्यांना चांगली कमाई होत असेल असं आपल्याला वाटतं; मात्र प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. त्या मंडळींकडूनच आम्हाला त्यांच्याकडच्या गायींच्या दुधाचा हिशोब कळला. ३०० गायींपैकी एका वेळी फक्त ५० गायी दूध देणाऱ्या असतात. भाकड गायी आणि गाभण गायींची संख्या बरीच जास्त असते. एक गाय पाच-सहा महिने रोज सुमारे दोन लिटर दूध देते. ‘हल्दीराम'चे लोक त्यांच्याकडे येऊन दूधसंकलन करतात. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून वस्तीतली १० कुटुंबं कशीबशी गुजराण करतात. त्यातही पैशांना सतत वाटा फुटत असतात. गायींना जंगलात चरायला नेलं की वन अधिकारी पैसे मागतात. कधी गावकऱ्यांसोबत कुरबूर होते आणि खिशाला गळती लागते. शिवाय गायी पाळणं हेदेखील खूप कष्टाचं काम असतं. दिवसभर गायींसोबत फिरावं लागतं. एका गायीला दिवसाला १०० लिटर पाणी लागतं. उन्हाळ्यात विहिरीचं पाणी काढावं लागतं. पाणी शेंदताना हाताला घट्टे पडतात. बोलता बोलता ही मंडळी हाताला पडलेले वळ आणि घट्टे आम्हाला दाखवत होती.
या अल्पसंख्य समाजाला गावकऱ्यांच्या त्रासालाही तोंड द्यावं लागतं. हा समाज राहत होता त्या गायरान जमिनीवर गावच्या सरपंचाचा डोळा होता. ती जमीन रिकामी करून घेण्यासाठी त्याने या लोकांना मारहाण करून बुलडोझरने वस्ती उद्ध्वस्त केली, वर गायींचा चारा जप्त केला. तो सोडवून घेण्यासाठी त्याने २५ हजार रुपये मागितल्याचं इथे समजलं. भरवाडांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे गाऱ्हाणं नेलं; पण काही उपयोग झाला नाही. उलट, बुलडोझरच्या पैशांची त्यांनी मागणी केली. एखाद्याला गोळी घालून त्याच्या कुटुंबीयांकडून बंदुकीची रक्कम मागण्याचाच तो प्रकार होता. हे लोक पैसे देईनात, तेव्हा सरपंचाने चारा पेटवून देण्याची धमकी दिली. चारा जळाला असता तर पावसाळ्यात भरवाडांच्या गायी उपाशी मेल्या असत्या. त्यामुळे शेवटी त्यांनी गयावया करून १० हजार रुपये भरून चारा सोडवून घेतला. आमच्यासोबतचे कार्यकर्ते दीनानाथ वाघमारे यांच्याकडून कळलं, की पुढे त्या जमिनीवर त्या सरपंचाने दगडांची खाण सुरू केली. वाघमारे या समाजाला मदत करण्यासाठी तिथे गेले असता त्यांनाही हुसकून लावण्यात आलं.
भटक्या विमुक्तांना गावात राहू द्यायचं नाही, त्यांना कायमचे रहिवासी होऊ द्यायचं नाही अशी गावकऱ्यांची सर्वसाधारण मानसिकता दिसते. मुख्यमंत्र्यांचा जिल्हादेखील त्याला कसा अपवाद असणार? अशा प्रकरणांमध्ये कुठलीही कारवाई केली जात नाही. हे भटके उपेक्षित ते उपेक्षितच राहतात.
आपलं राज्य सोडून आलेले हे लोक कष्ट करून जगतात. कुठे तरी दूर, गावाच्या बाहेर राहतात. बाहेरगावचे म्हणून स्थानिक प्रशासनही यांच्या मदतीला येत नाही. एकीकडे परप्रांतीयांना मुंबईतून हाकलायचं म्हटलं तर देशपातळीवर गदारोळ होतो आणि इथे विदर्भात दुर्गम भागातल्या परप्रांतीयांच्या विरोधातली दादागिरी ही लहानशा बातमीचाही विषय होत नाही. एकीकडे यांना गोपाळ, म्हणजे श्रीकृष्णाचे वंशज समजायचं आणि दुसरीकडे त्यांना अशी वागणूक द्यायची, ही आपली सांस्कृतिक दांभिकता नाही का?
हेही वाचा - गडचिरोली : विकासाच्या गदारोळात स्थानिकांचा आवाजच हरवतोय
भंडारा जिल्ह्यात चोरखमारी इथल्या गोपाळ वस्तीत गेलो. वस्ती गावाबाहेर खूप आडबाजूला आहे. वस्तीत फार तर पंधरा पालं आहेत. वस्तीतले काहीजण जवळच्या शेतात मजुरीला जातात, तर काहीजण शिंदीचे झाडू बनवतात. आम्ही गेलो तेव्हा झाडू तयार करण्याचं काम सुरूच होतं. कामातली सुबकता लक्ष वेधून घेणारी होती. त्यांच्यापैकी एकाशी बोललो. झाडूसाठीची पानं आणायला त्यांना दूर जंगलात जावं लागतं. काठीला विळा बांधून पानं तोडली जातात. पानं काढताना त्याचे काटे खूप टोचतात. पानं तोडण्याचं काम साधारणपणे दोन-अडीच तास चालतं. तिथून पानं डोक्यावरून नाही तर सायकलवर बांधून वस्तीवर आणली जातात. नंतर पानं आधी थोडी वाळवली जातात आणि मग झोडपली जातात. त्यामुळे पानांचे काटे गळून जातात. नंतर पानांवर पाणी मारून ती कोरडी पडेपर्यंत वाळवली जातात. खिळ्याच्या ब्रशने पानं पुन्हा सुटी सुटी केली जातात. त्यानंतर झाडूसाठी पानांची मूठ बनवली जाते. ते खूप कौशल्याचं काम असतं. झाडू तयार झाले की घरातला पुरुष सायकलवर फिरून ते झाडू विकतो. सकाळी चहा पिऊन बाहेर पडायचं आणि विक्रीसाठी फिरायचं. एका दिवसात जास्तीत जास्त १० ते १५ झाडू विकले जातात. त्यासाठी जवळपास १५-२० किलोमीटर प्रवास करावा लागतो; दिवसभरात नाश्ता करण्याचीही उसंत मिळत नाही, असं त्यांच्यापैकी एकाने सांगितलं. एका महिन्याला एक कुटुंब १०० झाडू बनवतं. एका भागात एकदा पानं तोडली की पुन्हा तिथे जाता येत नाही. कधी सायकल पंक्चर होते, कधी पानं आणायला ४-६ किलोमीटर जावं लागतं. पावसाळ्यात शिंदीची पानं वाळत नाहीत तेव्हा ही माणसं इतर कामांना जातात.
थोडक्यात, इतर कुणाच्या फंदात न पडता कष्ट करून जगणारी ही वस्ती, पण जवळच्या गावाकडून वस्तीला खूप त्रास दिला जातो. वस्तीतल्या एका मुलीने एकदा भाजीला काही नव्हतं म्हणून एका शेतकऱ्याच्या शेतातून वांगी तोडली. त्यावर चिडून गावातला मोठा जमाव वस्तीवर चालून आला. त्यांनी वस्तीतल्या लोकांना बेदम मारहाण केली. त्यांची पाण्याची भांडी तोडली. दोघांना दवाखान्यात दाखल करावं लागलं. एका तरुण मुलीला अत्याचाराच्या भीतीने लपवून ठेवावं लागलं. इतकी मारहाण करून वर पोलिसात गेल्यास जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या गेल्या. पोलिस मध्ये पडले नाहीत. स्थानिक आमदाराने यांनाच गप्प राहायला सांगितलं. त्या मुलीने शेतातली वांगी न विचारता घेतली होती हे मान्य; पण तिच्या चुकीच्या मानाने हा उद्रेक खूपच होता. तक्रार आणखी वर नेण्याची त्यांच्यापैकी कुणाचीच मानसिक तयारी दिसली नाही. कारण तक्रारीनंतर परत हल्ला झाला तर काय करणार, असा त्यांचा सवाल होता. आणखी नुकसान नको म्हणून मागचं नुकसान विसरायचं, असा व्यावहारिक विचार करणारी ही माणसं आपली वेदना खोल मनात गाडून टाकतात आणि जगत राहतात. गावकरी अजूनही आक्रमक आहेत. त्यांनी ही वस्ती उठवावी असा ग्रामसभेत ठराव केला आहे.
या वस्तीला पाणी नव्हतं. पाण्यासाठी अनेकदा मागणी केल्यावर गावाने पाइपलाइनचा खर्च वस्तीला करायला लावला. शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्याच नाहीत, वर गावकऱ्यांकडून वरच्यावर पाणी बंद करण्याची धमकी दिली जाते.
दुर्लक्षित माणसांवरचे अन्यायही दुर्लक्षितच राहतात.
अन्यायाचं आणखी एक असंच प्रकरण. भंडारा शहरात भिलेवाडा भागातली एक वस्ती. दूर गावाबाहेर हे लोक एका माळरानावर उतरले आहेत. त्यांनी तिथे कपाटं बनवून विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. आम्ही गेलो तेव्हा वस्तीत एक-दोन पुरुष होते. बाकीचे सारे कपाटं विकायला गेले होते. वस्तीतल्या लोकांशी बोललो. कुणाच्याच झोपड्यांमध्ये फारसं सामानसुमान नव्हतं. त्याबद्दल विचारलं तेव्हा कळलं की ते सर्वजण एका छोट्या गावातून जीव वाचवून इथे आले होते. तिथे त्यांची वस्ती पेटवली गेली होती. आगीत त्यांची सारी पालं जळून खाक झाली होती.
हे लोक बहुरूपी जमातीचे. त्या गावात ते अनेक वर्षं राहिले. त्यांनी शासनाकडून घरं मिळावीत म्हणून खूप प्रयत्न केले. अखेर त्यांना एका योजनेतून घरकुलं मंजूर झाली; पण गावच्या लोकांना ते पसंत पडलं नाही. गावातल्या लोकांनी त्यांना धमक्या दिल्या. वस्तीने तहसीलदार, पोलिस यांच्याकडे संरक्षणाची मागणी केली; पण पोलिसांनी त्यांना वाटेला लावलं. त्याच रात्री त्यांची वस्ती पेटवली गेली. त्यानंतर त्यांना स्मशानात राहायला सांगण्यात आलं. गावच्या सरपंचाने गावात राहू द्यायला दोन लाख मागितले. इतकी रक्कम नसल्याने व दहशतीला कंटाळून शेवटी सगळे ते गाव सोडून इकडे निघून आले होते.
या नवीन ठिकाणी त्यांच्या कुणाशीही ओळखी नाहीत, पण मुळं उपटून काढण्याचे हे प्रकार नेहमीचेच. वस्तीवर एक गरोदर महिला भेटली. तिला सहावा महिना सुरू होता. सोबतच्या दीनानाथ वाघमारे यांनी तिची वैद्यकीय कागदपत्रं बघितली. तिच्यात रक्ताची कमतरता असल्याचं लिहिलेलं होतं. रक्त भरण्यासाठी डॉक्टर उत्पन्नाचा दाखला मागतात, त्यामुळे अजून ते जमलेलं नाही, असं ती म्हणाली. दारिद्य्ररेषेखाली समजून तिला उपचार मिळाले असते; पण त्यासाठी रहिवासाचा दाखला हवा. इथे तिला तो दाखला तरी कोण देणार? आम्ही तलाठ्यांकडे विचारणा केली, तर त्यांनी ‘ती वस्ती माझ्या हद्दीत येत नाही' असं सांगून विषय संपवला. अशा स्थितीत या लोकांनी काय करावं? त्या गरोदर बाईला पुरेसा पोषक आहार मिळत नसणार हे उघड होतं. एकीकडे पेटवलेल्या घरांचा भूतकाळ आणि दुसरीकडे हा असा कुपोषित भविष्यकाळ. सर्वांसाठी आरोग्य, सामाजिक न्याय हे शब्द इथे पोहोचत नसतात...
गावकऱ्यांच्या अशा वागण्याच्या मुळाशी ‘आमच्या गावात भटके नको' ही प्रवृत्ती आहे. त्यांच्याविषयी संशय आहे, गैरसमज आहेत. पूर्वी या गरीब भटक्यांबाबत गावात सहानुभूतीची भावना असायची. पण ग्रामीण भागातल्या जमिनींच्या किमती वाढायला लागल्या तसे हे भटके म्हणजे गावातल्या पुढाऱ्यांना वैताग वाटू लागला. त्यांना हाकलून त्यांच्या जमिनी रिकाम्या करून घेण्याचा सपाटा सुरू झाला. ते जिथे राहायचा प्रयत्न करतील तिथे त्यांच्यावर असे हल्ले होतात व त्यांना हाकलून लावलं जातं. तेव्हा आधी भटक्यांच्या राहण्याच्या जागेचा प्रश्न सोडवायला हवा. त्यासाठी शासनाने त्यांना जमिनी द्यायला हव्यात.
अशा निराशाजनक स्थितीतही काही आशेची बेटं दिसतात. त्याने उमेद नक्कीच उंचावते. नरसिंग झरे हे असंच एक उदाहरण.
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात अन्सरवाडा हे एक छोटंसं गाव आहे. नरसिंग झरे हा गावातला एक प्रमुख कार्यकर्ता आहे. लातूर जिल्ह्यात भटक्या विमुक्तांची वस्ती मोठी आहे. नरसिंग त्याच्या गावात ‘भटके विमुक्त परिषदे'चं काम करतो. तिथल्या वस्ती शाळेत तो प्राथमिक शिक्षक आहे. वस्तीशाळा म्हणजे शासनाने वस्ती-वस्तीवर उघडलेल्या शाळा. या शाळा नंतर नियमित करण्यात आल्या.
नरसिंगची शाळा गावापासून दूर असलेल्या भटक्या विमुक्तांच्या गोपाळ वस्तीतच आहे तिथे गेलो. भटक्या विमुक्तांची वस्ती म्हटल्यावर आपली जी समजूत होईल ती तिथे पार पुसली गेली. तिथे चांगली बांधलेली घरं होती. तिथल्या लोकांचं राहणीमानही नीटनेटकं होतं. वस्तीच्या मधोमध एक सिमेंटची बांधलेली इमारत दिसली. इमारतीत यंत्रमागावर चादरी, गोधड्या आणि इतर अनेक वस्तू तयार करण्याचं काम सुरू होतं. दुसरीकडे लग्नात वाजवल्या जाणाऱ्या बँडचं साहित्य होतं. वस्तीच्या मधोमध शाळा होती. या वस्तीचं रुपडं नरसिंगमुळे बदललेलं आहे. ही वस्ती सुधारण्यासाठी जे जे करणं शक्य होतं ते सर्व प्रयत्न त्याने केले आहेत.
त्या गोपाळ जमातीचा मूळ व्यवसाय डोंबारी खेळ करण्याचा होता. त्यासाठी लहान मुलं लागतात. मुलं खेळ करायची आणि भीक मागायची. भीक जास्त मिळावी म्हणून या मुलांना हेतुत: गबाळं ठेवलं जाई. त्यांना अनेक दिवस अंघोळ नसे. त्यांचे केस कापले जात नसत. एकदा नरसिंगने या मुलांना नीटनेटकं राहायला शिकवावं म्हणून त्यांना अंघोळ घातली आणि त्यांचे केस कापले. हे त्या मुलांच्या पालकांना अजिबात आवडलं नाही. त्यांनी नरसिंगला बेदम मारलं; पण तो मागे हटला नाही. त्याने हळूहळू वस्तीत प्रवेश मिळवला. महिलांना रोजगार मिळावा म्हणून गोधड्या शिवण्याचा व्यवसाय सुरू करून दिला. तरुणांना बँड पथक उभारून दिलं. परिणामी, तिथले डोंबारी खेळ आणि स्थलांतर, दोन्ही कमी झालं. वस्तीत दारूचं व्यसन खूप मोठ्या प्रमाणात होतं. ते कमी करण्यासाठीही नरसिंगने सतत प्रयत्न केले.
हेही वाचा - विकासाच्या स्वप्नासाठी पुन्हा आदिवासींचाच बळी
संघपरिवारातल्या भटके विमुक्त परिषदेचा राज्यस्तरावरचा कार्यकर्ता म्हणून नरसिंग आज काम करतो आहे. परिषदेच्या माध्यमातून ‘पालावरची शाळा' हा उपक्रम त्याने सुरू केला आहे. या उपक्रमात भटक्यांच्या वस्तीवर शाळा काढली जाते. परिषद त्या वस्तीतला किंवा बाहेरचा १२ वी पास शिक्षक देते. शाळेत मुलांना रोज खाऊ दिला जातो. नरसिंगने सुरू केलेल्या शाळेला वस्तीशाळा म्हणून व पुढे जिल्हा परिषद शाळा म्हणून मान्यता मिळाली. तिथेच तो शिक्षक म्हणून रुजू झाला.
अशा वस्तीशाळेमागची भूमिका महत्त्वाची आहे. भटक्यांची मुलं थेट शाळेत जायला बुजतात. अनेकदा मोठ्या वयाची मुलं शाळेत जायला तयार नसतात. अशा सर्व मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून पालावरची शाळा सुरू केली जाते. नरसिंगच्या शाळेची मुलांना नक्कीच गोडी लागली आहे. वस्ती आणि शाळा यात सेतू म्हणून ही शाळा काम करते आहे. शाळेची पटसंख्या सतत वाढते आहे. नरसिंग एकदा शाळेच्या मुलांना घेऊन दिल्लीला राष्ट्रपती भवनात कार्यक्रमाला गेला होता. तिथला एक किस्सा त्याने सांगितला. तिथला कार्यक्रम खुल्या जागेवर आयोजित केला गेला होता. तेव्हा दिल्लीत थंडी होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी उबदारपणासाठी कोळशाच्या शेगड्या ठेवलेल्या होत्या. या मुलांचं कार्यक्रमातलं लक्ष थोड्या वेळाने उडालं. त्यांनी हळूच तिथून काढता पाय घेतला, जवळपासच्या झाडांवरच्या चिमण्या मारल्या आणि त्या शेगडीत भाजायला सुरुवात केली. त्या धारदार प्रसंगाने नरसिंगला जाणवलं, की मुलांचं पालावरचं मन बाहेर काढण्याचं काम त्याला आधी करावं लागणार आहे. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न चालू आहेत.
नरसिंगने पुढाकार घेऊन निलंग्यातल्या मरीआईवाले वस्तीतही एक व्यवसाय केंद्र सुरू करून दिलं आहे. तिथे उश्यांचे अभ्रे, उश्या, कुशनच्या विविध सुबक वस्तू बनवल्या जातात. वस्तीतल्या अनेकांना त्यामुळे मदत झाली आहे.
बालविवाहाच्या समस्येलाही नरसिंग सामोरा गेला. गोपाळांमध्ये बालविवाह केला जाई. त्यामुळे मुली शिकत नव्हत्या. ते बालविवाह त्याने थांबवले. पण मुली शिकल्यावर त्यांची लग्नं जमायला जड जात असे, कारण मुलगेही शिकत नसतच. त्यामुळे मुलींना न शिकवण्याकडेच पालकांचा कल असे. नरसिंगने श्रीदेवी बंडीधनगर या मुलीला दहावीपर्यंत शिकवलं. पुढे जवळपास तीन वर्षं तिचं लग्न जुळायला प्रयास पडले. नरसिंगला तिच्या पालकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं; पण तो मागे हटला नाही. त्याने कमी शिकलेला नवरा बघून तिचं लग्न लावून दिलं.
आज त्या वस्तीत शिक्षणाचं प्रमाण वाढलं आहे. व्यसनाधीनता कमी झाली आहे. गोधडी इत्यादी व्यवसायांमुळे अनेक महिलांना रोजगार मिळतो आहे. वस्तीतले तरुण बँडपथकामार्फत लग्नसराईत चांगली कमाई करतात. सतत २० वर्षं समर्पित वृत्तीने झटून नरसिंग झरेने हे बदल करून दाखवले आहेत.
भटक्या विमुक्तांच्या आयुष्याला स्थिरता मिळवून देण्यासाठी असे आणखी नरसिंग तयार होऊ शकणार नाहीत का?
(अनुभव, ऑगस्ट २०१८ च्या अंकातून साभार.)
हेरंब कुलकर्णी | 8208589195 | herambkulkarni1971@gmail.com
हेरंब कुलकर्णी हे निवृत्त प्रयोगशील शिक्षक, तसंच वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी झगडणारे कार्यकर्ते आहेत.
