आम्ही कोण?
ले 

महाराष्ट्राची स्वओळख एकारलेली राहू नये

  • सुहास कुलकर्णी
  • 01.05.26
  • वाचनवेळ 23 मि.
maharashtra darshan

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. एका प्रदीर्घ आणि चिबट लढ्यातून मराठी भाषकांचं हे राज्य निर्माण झालं. डांग आणि बेळगाव वगैरे भाग संयुक्त महाराष्ट्रात सामील होऊ शकले नाहीत, पण उर्वरित मराठी भाषिक प्रांत महाराष्ट्रात समाविष्ट झाले. उराशी एक स्वप्न बाळगून महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली. सहा दशकांच्या वाटचालीनंतर त्या स्वप्नाचं काय झालं, हा सर्वंकष चर्चेचा विषय आहे आणि सुजाण मंडळी त्यावर चर्चा- विचारविनिमय करत असतात. गेल्या सहा दशकांत महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती झाली आहे आणि आर्थिक-सामाजिक औद्योगिक शैक्षणिक तांत्रिक अशा सर्वच क्षेत्रांत पावलं पुढे पडली आहेत हे खरंच आहे. पण विकासाची फळं कुणाला चाखायला मिळाली, विकासाचा असमतोल कुणाच्या नशिबी आला, विषमतेच्या खाईत कोण ढकललं गेलं हेही सर्वविदित आहे. याचा अर्थ, राज्य म्हणून महाराष्ट्राची प्रगती झाली; पण समाज म्हणून तिची फळं सर्व घटकांपर्यंत पोहोचली नाहीत, असा होतो.

महाराष्ट्राच्या या प्रवासाला अनेक कंगोरे आहेत. या सर्व काळात राज्यामध्ये काही प्रक्रिया उलगडल्या आहेत. उदाहरणार्थ, सुरुवातीच्या काळात ग्रामीण महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सहकारी कारखानदारी उभारली गेली. त्यानंतर मोठ्या शहरांच्या आसपास औद्योगिक विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या दोन्ही प्रयत्नांमुळे खेड्यांमध्ये व शहरांमध्ये काही घटकांच्या हाती पैसा आला; परंतु शेतीचा विकास-विस्तार करण्यात आणि शेतीला फायदेशीर व्यवसाय म्हणून उभं करण्यात अपयश आल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली. परिणामी, तरुणांचे लोंढे शहरांमध्ये येऊ लागले. त्यातून शहरीकरण वाढलं. शहरं वाढत गेली; त्यांची बकाली वाढली. शहरांमध्ये आलेल्यांना जगण्यापुरता आधार मिळाला, परंतु किमान प्रतिष्ठेचं आयुष्य मिळू शकलं नाही. दुसरीकडे, टीव्ही, सिनेमा, नवी माध्यमं यांनी जग जवळ आणलं, नव्या जगण्याचं दर्शन घडवलं, नवी स्वप्नं दाखवली; पण ही स्वप्नं प्रत्यक्षात आणण्याची आणि आपापली आयुष्यं बदलून टाकण्याची संधी सर्वांना मिळाली नाही. त्यातून मनाची हतबलता, विषण्णता, आभासी जगात वावरण्याची मनोवृत्ती, व्यसनाधीनता असे अनेक परिणाम घडत गेले. ज्यांना संधी साधता आली ते पुढे गेले, पण ज्यांची गाडी सुटली ते मागेच राहिले. सर्वस्वी निरुपयोगी शिक्षण मिळूनही ज्यांनी स्वतःच्या जोरावर परिस्थितीवर मात केली, त्यांचं नशीब फळफळलं. पण जे कुचकामी डिग्ग्र्यांवर विसंबले त्यांच्या नशिबी भ्रमनिरास आला. जे शिकूच शकले नाही, त्यांना मेहनत मजुरीचा आसरा घ्यावा लागला.

अशा एक ना अनेक प्रक्रिया गेल्या पन्नास-साठ वर्षांमध्ये उलगडत गेल्या आहेत आणि त्यातून आजचा महाराष्ट्र निर्माण झाला आहे. अर्थातच हे चित्रं गुंतागुंतीचं आहे.पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आपल्या समाजाची ही गुंतागुंत फार कमी लोकांना कळलेली आहे. बहुतेक लोक सरधोपटपणे विचार करत असतात (किंवा नसतात), एकाच रंगात चित्रं रंगवत असतात किंवा कोणत्या तरी कारणाने गुंतागुंत नाकारत असतात. त्यांना संपूर्ण चित्र दिसत नाही किंवा त्यांना ते बघायचंही नसतं. अनेकदा चित्राचा जो भाग आपल्याला दिसतो तेच संपूर्ण चित्र आहे, असा त्यांचा समज असतो. का होत असावं असं ?

आपल्या समाजात आर्थिकदृष्ट्या अनेक स्तर आहेत. कनिष्ठ मध्यमवर्गीय-मध्यमवर्गीय-उच्च मध्यमवर्गीय असा एक मोठा गट गेल्या पंचवीस वर्षांत आकारत गेला आहे. त्याशिवाय अतिगरीब-गरीब हा सर्वांत तळचा स्तर आणि श्रीमंत-अतिश्रीमंत-गर्भश्रीमंत-जागतिक स्तरावरील श्रीमंत हा सर्वांत वरचा स्तर, अशी आपल्या समाजाची साधारण रचना आहे. गरीब आणि अतिगरीब हा वर्ग रोजच्या जगण्याची लढाई लढत असतो. रोजची भाकरी मिळवून पोरंबाळं जगवता जगवता त्यातील बहुतेकांची जिंदगी आटोपते. श्रीमंत आणि त्यावरील वर्ग आपल्या मस्तीत मश्गुल असतो आणि त्यांनी आपलं स्वतंत्र विश्व निर्माण केलेलं असतं. त्यातल्या काही संवेदनशील लोकांना समाजाप्रति आपली जबाबदारी माहीत असते व ते त्या दृष्टीने धडपडही करत असतात. पण समाजातला सर्वात बोलका आणि चळवळ्या वर्ग अर्थातच मध्यमवर्ग असतो. समाजाचं भलं कशात आहे हे आपल्याला कळतं, असा या वर्गाचा समज असतो. समाजाच्या एकूण स्थितीत या वर्गाचे हितसंबंधही गुंतलेले असल्याने प्रगती, विकास, साहित्य-कला-संस्कृतीचं पोषण, भविष्यातली वाटचाल याबद्दल या वर्गात बरंच बोललं जात असतं. बिचारे गरीब-अतिगरीब या व्यवहारांपासून दूर कष्टत असतात. आणि अतिश्रीमंत बेफिकीर असतात. त्यामुळे साऱ्या समाजाचा भार आपणच वाहतो, असा मध्यमवर्गीयांचा समज होतो.

हेही वाचा - दिल्लीचे तख्त मराठीजनांसाठी दूर का?

गोची इथेच आहे. मध्यमवर्गाची स्वतःविषयीची समज काहीही असली, तरी आपल्या समाजाविषयीची या वर्गाची समज बरीच संकुचित, त्रोटक आणि आत्मकेंद्री आहे. आपण म्हणजेच समाज, असा अजब समज या वर्गात रुजलेला असल्याने अन्य वर्गांच्या सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक जगण्याविषयी त्यांना बरंच कमी माहीत असतं. पण त्यांना तसं कुणी लक्षात आणून दिलं, तर त्यांना ते अजिबात मान्य नसतं. आपल्या समाजात गरिबी का आहे आणि गरीब माणसं गरीबच का राहतात, याविषयी त्यांची मतं ठाम असतात. ही माणसं शिकायला तयार नाहीत, मेहनत करायला तयार नाहीत, बचत करायला तयार नाहीत, व्यसनाधीनता सोडायला तयार नाहीत, अशी 'स्टॉक' कारणं त्यांच्याकडे तयार असतात. श्रीमंतांबद्दलही त्यांच्या ठराविक कल्पना असतात. त्या कवटाळून आणि 'आपलंच खरं' असं मानून हा वर्ग बोलत-लिहीत वावरत असतो. समाजातल्या शिकल्या-सवरलेल्या या वर्गाबद्दलची ही निरीक्षणं (थोडं थांबून विचार केला तर) अनेक वाचकांना पटतील. कारण आपल्या भोवताली अशी माणसं सतत वावरत असताना ते पाहत असतील.एवढंच काय, आपणही अनेकदा असे समज बाळगून असतो, हेही त्यांच्या लक्षात येईल.

पण विषय इथे संपत नाही. खरी गंमत पुढेच आहे. असं बघा की, अति गरीब आणि अति श्रीमंत या दोन गटांशी मध्यमवर्गीयांचा अगदीच त्रोटक संबंध असल्याने त्यांच्या बद्दलच्या आकलनात दोष राहू शकतो. पण जो मध्यमवर्ग आर्थिकदृष्ट्या साधारणपणे एका गटात मोडतो त्याच्या स्वतःबद्दलच्या आकलनातही मोठेच घोळ असतात. उदाहरणार्थ, एखादा माणूस जर पुण्यातल्या सदाशिव पेठेत जन्मला वाढला असेल तर त्याला आपला सगळा समाज साधारणपणे आपल्यासारखाच आहे, असं वाटत असतं. पुण्याच्या जुन्या पेठेतल्या मध्यमवर्गीय जगण्यात आणि बुलढाणा-अकोल्यातल्या मध्यमवर्गीय जगण्यात फरक असतो, याची पुरेशी जाणीव त्याला नसते. पूर्वीचा मध्यमवर्ग बऱ्याच अंशाने एकजातीय होता. त्यामुळे त्याचं हे मर्यादित आकलन फार अडचणीचं नव्हतं. मात्र, गेल्या वीस-पंचवीस वर्षांत अनेक जातींतून मध्यमवर्गामध्ये भर पडली आहे. शेतीत, विशेषतः नगदी पिकाच्या व्यवहारात पैसा मिळवलेल्या किंवा नव्या नोकरी-व्यवसायांमध्ये उतरून नशीब बदललेल्या ग्रामीण व शहरी बहुजनवर्गाने मध्यमवर्गात मुसंडी मारलेली आहे. काही प्रमाणात दलित आणि अल्प-अत्यल्प प्रमाणात आदिवासी-मुस्लिम समाजातूनही मध्यमवर्गात भरती झालेली आहे. याचा अर्थ पूर्वीच्या बऱ्याचशा एकसाची (ब्राह्मण) मध्यमवर्गाची रचना आणि स्वरूप आता बदललेलं आहे. माणसं आपापल्या संस्कृती, परंपरा, सण-उत्सव, सवयी, आवडी, संस्कार, भाषा, पेहराव, खाद्यपदार्थ यांच्यासह मध्यमवर्गात वसतीला आली आहेत. त्यामुळे मराठी मध्यमवर्गाचं स्वरूप आमूलाग्र बदलून गेलं आहे. ही सर्व घडामोड सुरू होऊन बरीच वर्षं झालेली असली, तरी त्याबद्दल 'कर्त्या' मध्यमवर्गातील लोक अनभिज्ञ आहेत.

अनभिज्ञतेमागे काय कारण असू शकतं? लोक बहुतेकदा आपापल्या जातींच्या चौकटीत स्वतःला सुरक्षित मानतात, त्यामुळे त्यांचा वावर विशेषतः जातिबांधवांमध्येच जास्त असतो. लग्न वगैरे खासगी बाबींमध्ये तर जात असतेच असते. आपण, आपलं कुटुंब, आपले नातेवाईक, आपले व्यावसायिक सोबती, आपले मित्र, आपले ओळखीचे लोक यात आपोआपच आपल्याच जातीची माणसं जास्त असतात. (यात अर्थातच विरळा अपवाद असतातच.) त्यामुळे अन्य जातीयांशी संबंध, घसट, येणं-जाणं, त्यातून जान-पेहचान, जन्माची नाती वगैरे अपवादानेच तयार होतात. परिणामी, व्यापक अर्थाने लोक एका वर्गात वावरत असले, तरी त्यांच्या जातींच्या सीमारेषा पुसल्या जातात असं फारसं घडत नाही. त्यांचं अनुभवविश्व आणि विचारविश्व विस्तारण्यात त्यामुळे अडचण येत असणार. परिणामी लोक प्रायः आपापल्या जातींच्या नजरेनेच जगाकडे पाहतात. या अडचणीमुळे एकूण समाजाविषयी समग्र समज तयार होण्यात मर्यादा येणं स्वाभाविक आहे.

maharashtra darshan

समग्र समज तयार होण्यात दुसरी अडचण आहे प्रादेशिक तुटलेपणाची. महाराष्ट्राचे भौगोलिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्याही किमान पाच-सात भाग पडतात. मुंबई, कोकण, पश्चिम-दक्षिण महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, वऱ्हाड आणि झाडीपट्टी. या विभागांच्या पोटात इतर उपविभाग आहेतच. आता असा विचार करून पाहा की, या भागांचं एकमेकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष किती आदानप्रदान होतं? उदाहरणार्थ, सोलापूरचे लोक पुण्याशी आणि कोल्हापूरशी भौगोलिक जवळिकीमुळे थोडे जोडलेले असू शकतात; पण ते यवतमाळ-अमरावती किंवा चंद्रपूर-गोंदियाशी किती जोडलेले असतात ? कोणी तरी दूरचा नातेवाईक नोकरीमुळे वगैरे तिकडे असेल, तर त्या भागाशी त्यांचेच जुजबी संबंध असतात एवढंच. दुसरीकडे, बुलढाणा- परभणी हे विदर्भ-मराठवाड्यातले शेजारी जिल्हे, त्यांच्यात भौगोलिक जवळिकीमुळे संबंध असतात, पण त्यांचा सांगली-कराडशी संबंध येण्याचं कारण काय? त्यांच्या सोयरिकी आपापल्या परिसरात होत असणार, किंवा जास्तीत जास्त त्यांची नोकरी करणारी मुलं-मुली पुण्या-मुंबईत असतील तर ते या भागाशी जोडलेले असणार. पण सांगली-कराडशी त्यांचा जैव संबंध निर्माण होण्याचं अन्यथा काही कारण नसतं. तळ- कोकणच्या सिंधुदुर्गातल्या माणसांना राज्याच्या दूर पूर्वेकडच्या गडचिरोलीतले आदिवासी कोणती भाषा बोलतात आणि ते काय खातात-पितात हे कळण्याचा काही मार्गच नाही, इतकं त्यांच्यात अंतर असतं. महाराष्ट्रात धुळे-नंदुरबार नाशिक-पालघर या पट्ट्याशिवाय मेळघाट (अमरावती) आणि गडचिरोली गोंदिया भागात आदिवासींची वस्ती आहे. पण त्यातल्या नंदुरबारच्या आदिवासींचा गडचिरोलीतल्या आदिवासींशी किती संबंध येतो, हा संशोधनाचा विषय आहे. गोंड, माडिया, कोलाम या विदर्भातील आणि वारली, भिल्ल, पावरा, कोकणा या उत्तर महाष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती आहेत. पण त्यांना आपसातल्या चालीरीती, परंपरा कितपत माहीत असतील, कोण जाणे! एक वेळ विदर्भातल्या जमातींना आसपासच्या अन्य जमातींबद्दल काही माहिती असेल. तेच धुळे-नंदुरबार नि नाशिक- ठाण्याबाबत लागू असेल. पण दंडकारण्यातील मंडळींना सातपुड्यातील भाईबंदांबद्दल नीट माहिती असण्याची शक्यता अगदीच कमी. आदिवासींनाच आपापसाची माहिती नसेल तर कोल्हापूरच्या ऊसवाल्याला किंवा सांगलीतल्या मध्यमवर्गीय नोकरदाराला ती असण्याची अपेक्षा कुणी का धरावी? शिवाय लोकांना माहिती असतात ती त्या त्या जिल्ह्याचं केंद्र असलेली शहरं. त्या जिल्ह्यातल्या तालुक्यांमधली विविधता, त्यामधला विरोधाभास कुणाला माहिती असतो? उदा. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पीक पाण्याने समृद्ध भाग असं उर्वरित महाराष्ट्राला वाटतं. पण याच पश्चिम महाराष्ट्रातले आटपाडी, जत, माण, खटाव असे कित्येक तालुके वर्षानुवर्षं पर्जन्यछायेखाली अभावग्रस्त जगणं जगताहेत, याची त्यांना कुठे कल्पना असते?

थोडक्यात, भौगोलिक अंतरांमुळे आणि लोक आपापल्या भागांतील सांस्कृतिक वातावरणात रममाण असल्यामुळे बहुतेकांची समज मर्यादित राहते. या पार्श्वभूमीवर एका प्रक्रियेकडे पाहिलं पाहिजे. गेल्या दहा-वीस वर्षांमध्ये स्थलांतर नावाची प्रक्रिया देशभर जोरात चालू आहे. महाराष्ट्रातही. माणसं पोटापाण्यासाठी किंवा शिक्षण-करियर-नोकरी-धंद्यासाठी आपापल्या भागांतून उठून दुसरीकडे जात आहेत. ही प्रक्रिया दोन प्रकारची आहे. एक, शरीरश्रम करणारी, मेहनत-मजुरी करणारी माणसं तुलनेने जवळच्या शहरांमध्ये स्थलांतरित होतात. त्यातली काही माणसं पोटापाण्याच्या शोधात कायमची स्थलांतरित होतात; तर काही जण वर्षातले चार-सहा महिने कामासाठी बाहेर काढून उरलेल्या काळात आपापल्या गावी परततात. दुसरीकडे, शिक्षण-नोकरीसाठी आपापली गावं सोडणारी तरुण पिढी प्रामुख्याने मोठ्या शहरांमध्ये येते आहे. त्यातही दूरदूरच्या भागातील मुलं-मुली प्रामुख्याने पुण्या-मुंबईत येताना आणि नशीब आजमावताना दिसतात. या आवक-जावकीमुळे महाराष्ट्र आतून बांधला जाण्याची शक्यता आहे. त्यातून सर्वच प्रकारचं आदानप्रदान वाढू शकतं.

हेही वाचा - गावाकडच्या मुलांना मिळेनात लग्नासाठी मुली

पण या शक्यतेलाही काही मर्यादा आहेत. पोटापाण्यासाठी स्थलांतर करणाऱ्या माणसांचं पहिलं प्राधान्य असतं चार पैसे गाठीला बांधण्याचं. आसपासच्या जगण्यात वाकून पाहण्याएवढा त्यांच्याकडे वेळ नसतो आणि संधीही नसते. उदाहरणार्थ, बीड-उस्मानाबादचे ऊसतोड कामगार पोटापाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या उसपट्ट्यात येऊन रात्रंदिवस राबतात, तेव्हा त्यांना कुठे तिथल्या जगण्यात डोकायवायला वेळ असतो ? ते आपले उघड्यावरचे संसार सावरत आधीची उचल भागवण्याच्या विवंचनेत असतात. दुसरीकडे, तरुण पोरांबद्दल बोलायचं, तर त्यांचं महाराष्ट्रभरातून स्थलांतर होतंय ते प्रामुख्याने पुणे आणि मुंबईत. वर्ध्याचा मुलगा औरंगाबादला किंवा कोल्हापूरला शिक्षणासाठी वा नोकरीसाठी जाण्याची शक्यता जितकी कमी, तितकीच इचलकरंजीतली मुलगी नाशिक-जळगावला जाण्याची शक्यता कमी. याचा अर्थ त्यांना कळून कळणार पुण्या-मुंबईबद्दल. त्यामुळे संभाव्य आदानप्रदानाची खोली आणि व्याप्ती असून असून किती असणार ?

थोडक्यात, मर्यादित सांस्कृतिक आदानप्रदान हे आपल्या समाजाबद्दलची समग्र समज तयार न होण्यातलं एक प्रमुख कारण आहे. पूर्वीच्या काळी अप्रत्यक्षपणे का होईना, सांस्कृतिक आदानप्रदानाचं काम राज्यपातळीवरची दैनिकं करत. ही गोष्ट साधारण २००० साला-पूर्वीची. जिल्ह्याजिल्ह्यांतील महत्त्वाच्या बातम्या, महत्त्वाची माणसं, महत्त्वाचे प्रयोग दैनिकांतून निगुतीने सांगितले जात. त्यातून अखिल महाराष्ट्राचं किमान भान असलेला एक वाचकवर्ग तयार होण्यास मदत झाली असेल. पण ही प्रक्रिया पुढे थंडावली. गंमत अशी आहे की, या काळात राज्यपातळीवरची दैनिकं वाढली, फोफावली, पण ती पूर्वीसारखं काम करू शकली नाहीत. याचं कारण दैनिकांचं आवृत्तीकरण. विभागीय आवृत्त्या, जिल्हा आवृत्त्या, शहर आवृत्त्या, त्यातही उपनगरीय आवृत्त्या यांचं पेव फुटल्यामुळे इकडच्या जिल्ह्याची खबरबात तिकडच्या जिल्ह्यात पोहोचणं अवघड झालं. एखाद्या दैनिकाची कोल्हापूरची आवृत्ती बघितली तर असं वाटतं की उर्वरित महाराष्ट्र अस्तित्वात आहे की नाही? अजिंठा महोत्सवाबद्दल कोकणात छापून येणार नाही आणि सवाई गंधर्व महोत्सवाबद्दल अमरावतीत कळणार नाही. नागपूरच्या ताजुद्दिन बाबाच्या दर्ग्याबद्दल पुण्यात छापून येणार नाही आणि झाडीपट्टीतल्या नाट्य महोत्सवाबद्दल खानदेशात वाचायला मिळणार नाही. कोकणातली होळी कोकणात रंगणार नि सातपुड्यातली होळी धुळे-नंदुरबारपुरती मर्यादित राहणार, त्याचा पत्ता ना अकोल्यातल्या लोकांना असणार ना नांदेडच्या. पूर्वी महाराष्ट्र जोडण्याचं काम आपली दैनिकं आपापल्या मर्यादित शक्तिनिशी करत असत. पण आता साधनांची मुबलकता असतानाही या उपक्रमातून बड्या दैनिकांनी माघार घेतली आहे. यशाचं प्रतिबिंब खपात पाहण्याच्या नादात आवृत्त्यांचं अतिस्थानिकीकरण झालं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचा समग्र आवाका वाचकांना कळेनासा झाला आहे.

यावर कुणी म्हणेल, वृत्तवाहिन्या आहेत की महाराष्ट्रभर सर्वदूर एकच एक गोष्ट दाखवणाऱ्या ? हे खरंय की, मराठी वृत्तवाहिन्या खरोखरच विभागा-विभागांतल्या, जिल्ह्याजिल्ह्यांतल्या आणि अगदी गावाखेड्यांतल्या बातम्या दाखवतात. यात्रा-जत्रा- परंपरा-पायंडे-नवेजुने प्रयोग असं बरंच काही दाखवतात. पण दृकश्राव्य माध्यमाची अडचण अशी आहे, की ही दृश्यं म्हणजे वाऱ्यावरची वरात असते. अळवावरचं पाणी जसं ! तो क्षण पाहायला जो उपस्थित असेल त्याला तो दिसणार. बाकीचे म्हणणार, "हो का? मी बघितलंच नाही!" यातील किती लोक त्या वृत्तवाहिनीच्या यू ट्यूब चॅनेलवर किंवा फेसबुकवर जाऊन ती बातमी पाहत असतील ? अगदीच कमी ! दुसरीकडे, टीव्हीवरील कथात्मक मालिकांमध्ये वगैरे कधी कोकणी पात्रं आणली जातात किंवा वऱ्हाडी कुटुंब दाखवलं जातं. पण अशा मालिकांतील वऱ्हाडी कुणा अमरावती-यवतमाळच्या अस्सल वऱ्हाडी माणसाने ऐकली तर तो म्हणेल, 'ही कोणती भाषा आहे ?' सगळा कचकड्याचा खेळ असतो तो. उर्वरित महाराष्ट्राला कळेल अशी कानेकंगोरे घासून गुळगुळीत केलेली भाषा असते ती. अशाने कसं काय भाषिक आदानप्रदान वाढेल आणि त्यातून सांस्कृतिक देवाणघेवाण होईल ?

थोडक्यात काय, गेल्या वीस वर्षांत जग बरंच जवळ आलेलं असलं, तरी आपल्याकडे ती प्रक्रिया तेवढीशी वेगवान झालेली नाही. पुण्या-मुंबईच्या लोकांना लंडन-न्यूयॉर्क जवळचं वाटतं, पण ही माणसं अख्ख्या जन्मात धारणी-भामरागड तर सोडाच, हिंगोली आणि बीडपर्यंतही पोहोचू शकत नाहीत. या लोकांना पॅरिस नि बर्लिनमधील गल्ल्या माहीत असतात, पण त्यांना अक्कलकुव्याला सोडलं तर ते स्वतःच्या घरी पोहोचण्याची खात्री कुणी देऊ शकत नाही. जग जवळ येण्याची आपली कथा ही अशी आहे !

हेही वाचा - मराठवाड्याच्या विकासाचा रुतलेला गाडा- कुणामुळे, कशामुळे?

हा झाला मुद्दा क्रमांक एक : महाराष्ट्रातील लोक एकमेकांपासून सुटे आणि एकमेकांना अनभिज्ञ का आहेत याबद्दलचा. आता मुद्दा क्रमांक दोन : मराठी माणसांच्या मनात रुजलेल्या स्वप्रतिमेविषयीचा. हा मुद्दा फक्त सांस्कृतिक ओळखीच्या अनुषंगाने पाहिला तरी पुरेसा ठरू शकतो. कोणत्याही समाजाचा स्वतःच्या सांस्कृतिक ओळखीचा स्रोत त्याचा भूतकाळ, म्हणजे इतिहास असतो. महाराष्ट्राच्या इतिहासातल्या कोणत्या व्यक्ती- घटना-परंपरा-दैवतं आणि वैशिष्ट्यांतून महाराष्ट्राची ओळख तयार झालीय ? आपल्या रक्तात भिनलेल्या गोष्टी कोणत्या आहेत बघा.

महाराष्ट्राचा गौरवाचा काळ म्हणजे शिवकाळ. छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल महाराष्ट्राचे ऑल-टाइम हीरो आहेत. असा राजा चांद्यापासून बांद्यापर्यंत झाला नाही, असं म्हटलं जातं. खरंतर शिवराय हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्याही इतिहासातले महत्त्वाचे आणि एकमेवाद्वितीय राजे आहेत. अर्थातच महाराष्ट्राचा इतिहास त्यांच्या काळातले गड-किल्ले, सह्याद्रीचे कडे, तोफांचे गडगडाट नि तलवारींचे खणखणाट, तुताऱ्या नि चौघडे, भवानी तलवार, तुळजापूरची आई भवानी आणि शिवकालातील वीरकथांनी भारलेला आहे.

महाराष्ट्रावर दुसरा प्रभाव आहे भागवत परंपरेचा, वारकरी संतांचा. या संतपरंपरेमुळे देहू- आळंदीहून निघणारी पंढरपूरची वारी, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव आणि अन्य महान संत, त्यांचे अभंग; या परंपरेशी नातं जोडलेल्या भीमा, इंद्रायणी वगैरे नद्या; वारकरी संतांनी घडवलेली मराठमोळी वाणी, अशा बाबी मराठी मनामध्ये कायम वस्तीला असतात. त्यामुळेच वारकऱ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा महाराष्ट्र सतत उंचावत असतो.

पण आपलं दुर्दैव असं की ज्या भूमीत शिवाजी महाराजांसारख्या थोर राजाने एक मोठा आदर्श घालून दिला, त्या भूमीत इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या जीवनाचा संदेश काय याबद्दल मतैक्य नाही. याबाबतीत दोन टोकांच्या मांडणींमध्ये महाराष्ट्र विभागला गेलेला आहे. वारकरी परंपरेतील संतांच्या संदेशाच्या वाचनाबाबतही अशीच गोची होऊन बसली आहे. या परंपरेने आपल्याला सामाजिक विषमता, अंधश्रद्धा आणि रूढीदास्य यांपासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग सांगितला. पण त्याचं आपण काय केलं? सामाजिक संदेशांचं सोडा, आध्यात्मिक संदेशही आपण पुरेसा पचवू शकलेलो नाही. पण हा विषय या मनोगताच्या चौकटीबाहेरचा असल्याने त्याची चर्चा इथे नको.

पुन्हा मुद्याकडे येऊयात. शिवकाळानंतर पेशवाई, देशाच्या स्वातंत्र्याचा लढा आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हे महाराष्ट्राच्या इतिहासातले पुढचे तीन महत्त्वाचे टप्पे. गेल्या सात- आठशे वर्षांच्या या काळावरून ओझरती नजर टाकली, तर आपला इतिहास कमी-अधिक फरकाने सह्याद्रीच्या कुशीत आणि विशेषतः पुण्याच्या आसपास फिरताना दिसतो. किमान तसं सांगितलं तरी जातं. मराठ्यांच्या इतिहासात पेशवाईच्या काळात पुणे हे महत्त्वाचं केंद्र बनलं. पुढे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही लोकमान्य टिळकांमुळे पुणे अग्रभागी राहिलं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यालाही मुंबई पाठोपाठ पुण्याचंच नेतृत्व लाभलं होतं. प्रबोधनात्मक चळवळीतही लोकहितवादी, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, साने गुरुजी यांच्यामुळे पुण्याचा बोलबाला राहिला. हा सर्व इतिहास पाहता महाराष्ट्राच्या अलीकडच्या इतिहासावर छाप दिसते ती एकाच भूभागाची. पुण्याच्या अवतीभोवतीच्या प्रदेशाची. म्हणूनच कदाचित मराठी कवींनी लिहिलेली महाराष्ट्राची गौरवगीतं पाहिली तर महाराष्ट्राच्या इतिहास-भूगोलावर सह्याद्रीची उत्तुंग छाया पडलेली दिसते. सह्याद्रीचे कडे- कपारी, त्याच्या अंगाखांद्यावर बागडणाऱ्या मर्द मराठ्यांची पोलादी मनगटं आणि उभ्या कातळांची काळी छाती यांच्या वर्णनांनी ही गीतं फुलून गेलेली दिसतात. अगदी एखाद- दुसरा अपवाद सोडला तर गौरव-गीतांमधून महाराष्ट्राचं वर्णन असंच दिसतं. सह्याद्रीच्या पलीकडे सातमाळाचे, अजिंठ्याचे, हरिश्चंद्र बालाघाटचे आणि महादेवाचे डोंगर आहेत याचा पत्ताच जणू आपल्या कवींना नाही. सह्याद्रीच्या आसपास उगम पावणाऱ्या नद्यांपलीकडील तापी, पूर्णा, वैनगंगा, पैनगंगा, वर्धा या नद्यांबद्दल कुणी अभिमानाने सांगायला तयार नाही. अजिंठा-वेरूळ-लोणार या जगप्रसिद्ध आश्चर्यांबद्दल चकार शब्द नाही. जैन, बौद्ध, शीख, मुसलमान, लिंगायत, कबीरपंथी, महानुभाव आदी संप्रदायांच्या मानचिन्हांचा उल्लेखही नाही. माडिया, गोंड, भिल्ल अशा महाराष्ट्राच्या आद्य रहिवाशांचा आणि गडचिरोली, मेळघाट, नंदुरबार वगैरे त्यांच्या वसतिस्थानांचा स्पर्शही महाराष्ट्राच्या गौरवशाली ओळखीला झालेला नाही. महाराष्ट्राच्या इतिहासातील सातवाहन, वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट या दीर्घकाळ नांदलेल्या राजवटींबद्दल कुणी बोलायला तयार नाही. लांबच्या इतिहासाबद्दल सोडा, ओरिसापर्यंत जाऊन स्वतःच्या राज्यकारभाराचा अमीट ठसा उमटवणाऱ्या रघुजी भोसलेंसारख्या नागपूरकर राजाबद्दलही कुणी सांगत नाही. आपले वारकरी संत थोरच; पण त्यांच्याआधी किंवा त्यांच्यानंतर होऊन गेलेल्या चक्रधरस्वामी, गाडगेमहाराज, तुकडोजी महाराज, अंबरसिंग महाराज, ताजुद्दिन बाबा वगैरे अन्य परंपरांतील महात्म्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याबाबत आपली अनास्था का असते ? जाता जाता आणखी एक गोष्ट बघा. आपल्या गौरवगीतांमध्ये देशावरच्या धनधान्यांचा उल्लेख सापडतो; पण विदर्भ-खानदेशात पिकणाऱ्या पांढऱ्या सोन्याचा-कापसाचा आणि गरिबांचं अन्न असलेल्या केळ्याचा उल्लेख करायला कुणी तयार नाही. याचा अर्थ, विदर्भ-मराठवाडा- खानदेश-कोकण या महाराष्ट्राच्या प्रचंड विस्तार असलेल्या भूभागाला आणि तिथे तिथे विकसित झालेल्या संस्कृतीला महाराष्ट्राच्या ओळखीत स्थान नाही की काय?

हेही वाचा - महाराष्ट्रातील पहिली ‘पारलिंगी वनरक्षक’ विजया वसावे

असं असेल तर महाराष्ट्राची स्वओळख एकारलेली आहे आणि ती सर्वसमावेशक आणि प्रातिनिधिक नाही, असं म्हणावं लागेल. महाराष्ट्रीय संस्कृतीचा विकास फक्त सह्याद्रीच्या छायेतच झाला आणि दूर पूर्वेकडील सपाट, मैदानी प्रदेशातील मराठी माणसं फक्त आला दिवस घालवत होती, असं कुणाचं म्हणणं आहे की काय? महाराष्ट्राची गौरवगीतं वाचल्यानंतर यापेक्षा वेगळं मत झालं तर ते आश्चर्य ठरावं.

खरं पाहता युरोपातल्या एखाद्या देशाला पोटात सामावून घेईल एवढं आकारमान महाराष्ट्राला लाभलं आहे. एवढ्या मोठ्या भूभागात एकच एक सह्याद्रीछायेतील संस्कृती नांदते आहे, असं मानणं लघुदृष्टीचं आहे. महाराष्ट्रगीतात पडणाऱ्या प्रतिबिंबाचं सोडा, पण महाराष्ट्रात किती प्रकारच्या संस्कृती-उपसंस्कृती नांदतात, किती बोली-किती लोकबोली बोलल्या जातात, बोलींची मिश्रणं-त्यांचे लहेजे त्यांचे हेल किती मोहक असतात, म्हणी- वाक्प्रचार-शिव्या यांना स्थानिक मातीचा कसा सुगंध लाभलेला असतो, खाण्यापिण्यात किती लज्जतदार वैविध्य असतं, खाद्यपदार्थांचा आणि स्थानिक उपजांचा कसा घनिष्ठ संबंध असतो, सण-उत्सव-प्रथा-परंपरा-रूढी-देव देवस्की यांचे किती वेगवेगळे आविष्कार दिसतात हे पाहिलं तर चक्रावून जायला होतं. चित्रकला, नाटककला, मूर्तिकला, शिल्पकला यांनी महाराष्ट्राचे विविध टापू कसे नटलेले आहेत हे थोडे इतिहासात डोकावून पाहिलं, तर आपण किती कमी भूभागाला डोळ्यासमोर ठेवून आपली ओळख सांगू पाहतो आहोत, याची जाणीव होते. इतिहासातील विविधधर्मीय (राजकीय आणि आध्यात्मिक) सहअस्तित्वामुळे महाराष्ट्रात जी अद्भुत सरमिसळ झालेली आहे, ती डोळेझाक करता येण्याजोगी नाही. त्यापलीकडे स्वातंत्र्यानंतर आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर ज्या विविध आर्थिक- सामाजिक प्रक्रिया उलगडत गेल्या, त्याचाही महाराष्ट्राच्या आजच्या ओळखीशी संबंध आहे. आपल्या संकुचित विचारविश्वातून बाहेर पडून हे सारं बघायला हवं. तसं झालं तरच महाराष्ट्राची खरी ओळख पुढे येणार आहे आणि त्यातून महाराष्ट्रीय माणसं खऱ्या अर्थाने जोडली जाणार आहेत. आपण एका राज्यात राहतो, त्याची एक विधानसभा आणि एक मुख्यमंत्री आहे म्हणून एकत्र वावरणं वेगळं, आणि राज्यातल्या सर्व प्रकारच्या लोकांना या राज्यात आपलं प्रतिबिंब पडतंय, असं वाटून त्याविषयी आत्मीयता असणं वेगळं. असं होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र, त्यातले कानाकोपरे, त्यातले बारकावे, त्यातली मजा सगळ्यांसमोर यायला हवी. हाच या पुस्तक प्रकल्पाचा उद्देश आहे.

आता या पुस्तक प्रकल्पाबद्दल.

महाराष्ट्राच्या नावाने मराठी माणसांची छाती फुलत असली तरी आपल्याला महाराष्ट्राच्या संस्कृतीची, इतिहास-भूगोलाची आणि वर्तमानाचीही पुरेशी ओळख नाही, हा आतापर्यंतच्या विवेचनाचा थोडक्यात अर्थ. 'युनिक फीचर्स' या माध्यमसंस्थेमार्फत तीसेक वर्षं महाराष्ट्रभर काम केल्यानंतर आणि कानाकोपऱ्यात वावरल्यानंतर हे मत तयार झालं आहे. हे मत सरधोपट आहे असं कुणाला वाटू शकतं. पण महाराष्ट्राबद्दलची आपली जुजबी समज आणि त्याआधारे निर्माण झालेला अभिमान याकडे त्रयस्थपणे पाहिलं, तर आपण महाराष्ट्राबद्दल बरेच अनभिज्ञ आहोत असं आपल्या लक्षात येईल. मी आणि माझे सहकारी विविध कारणांनी महाराष्ट्रात फिरत असतो, तेव्हा आपण महाराष्ट्राच्या विविधांगी जगण्यापासून किती लांब असतो हे कळत असतं. महाराष्ट्रात दूर खेड्यापाड्यांत राहणाऱ्या लोकांचा 'आपल्याला महाराष्ट्र कळलेला आहे' असा काही दावा नसतो. ते बिचारे आपापल्या जगण्यात बुडून गेलेले असतात. पण स्वतःला सर्वज्ञ समजणारे पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांतील लोक महाराष्ट्राबद्दल विशेष अज्ञानी आहेत, असं लक्षात येतं. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक सत्तेची सूत्रं हळूहळू पुण्या-मुंबईपासून दूर सरकू लागलेली असली, तरी 'आपल्याला सर्व काही माहीत आहे' असा गंड इथल्या धुरीणांमध्ये अजूनही कायम आहे. ही परिस्थिती फारशी चांगली नव्हे, कारण अपुरी माहिती असण्यापेक्षा जेवढी माहिती आहे ती संपूर्ण आहे असं मानणं घातक ! दुसरीकडे, महाराष्ट्राच्या बहुरंगी, बहुढंगी जीवनाचे वाहक असलेल्या दूरदूरच्या लोकांना महाराष्ट्राच्या सामूहिक ओळखीत स्थान नसणंही अन्यायकारकच म्हणायचं. त्यामुळे स्वतःची आणि त्यासोबत इतरांचीही महाराष्ट्राबद्दलची समज व्यापक व्हावी, यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत आलो आहोत. त्यातूनच या पुस्तक प्रकल्पाची कल्पना पुढे आली, आणि बऱ्याच वर्षांच्या मेहनतीनंतर हे पुस्तक आज मराठी वाचकांसमोर येत आहे.

थोडक्यात, महाराष्ट्राची खरी ओळख करून देण्याची इच्छा ही या पुस्तकामागील प्रेरणा आहे. पण अशी ओळख पुढे यायची तर ते एक-दोघांचं काम नव्हतं. अगदी ठरवलं असतं तरी आम्ही युनिक फीचर्समधील सहकारी अशी ओळख करून देण्यास पुरे पडू शकलो नसतो. आम्ही महाराष्ट्रातील विविध भागांतील असलो आणि कामानिमित्त विविध भागांत फिरलो- वावरलेलो असलो, तरी त्या त्या भागांतील बारकावे आम्हाला माहीत असण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे महाराष्ट्रातील अभ्यासू पत्रकार, लेखक, संशोधक, चळवळे कार्यकर्ते यांच्या मदतीने आपण हे आव्हान पेलावं, असं आम्ही ठरवलं. 'युनिक फीचर्स'चा गेली पंचवीस वर्षं महाराष्ट्रभर भरपूर आणि खोलवर वावर असल्यामुळे ओळखीपाळखीची माणसं खूप. या सर्वांची मोट बांधावी आणि त्यांच्याकडून लिहून घ्यावं असं आम्ही ठरवलं. हे लेखन जिल्हा हे एकक मानून करवून घ्यावं असंही ठरलं. पण ज्या जिल्ह्यांमध्ये सांस्कृतिक जवळीक जास्त आहे किंवा ज्यांचं नंतरच्या काळात विभाजन झालं आहे अशा जिल्ह्यांवर एकत्रित लेख लिहून घ्यावा, असं आम्ही ठरवलं. त्यानुसार जिल्ह्यातील अभ्यासू लेखकांची निवड केली आणि लेखक मंडळींना लिहिण्याची विनंती केली.

हेही वाचा - महाराष्ट्रातले पहिले सुधारक: चक्रधर स्वामी

आपापल्या जिल्ह्यांवर लिहिण्यास सर्वच मंडळी उत्सुक दिसली. त्यांच्याकडील माहितीचा, जिल्ह्यातील वावराचा आणि अनुभवाचा उपयोग होणार असल्यामुळे आमच्या या पुस्तक प्रकल्पाला सर्वांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला. हे पुस्तक किमान संशोधकीय शिस्त बाळगून लिहिलं जावं, असं आम्हाला वाटत होतं. त्यासाठी आम्ही एक विस्तृत आराखडा बनवला. हा आराखडाच जवळपास अडीच-तीन हजार शब्दांचा होता. लेखकांनी आपापले लेख या आराखड्याच्या मर्यादेत लिहावेत, असं आमचं म्हणणं होतं. हा आराखडा बनवणं हेही आमच्यासाठी एक आव्हानच होतं. एखाद्या लेखासाठीचा आराखडा बनवणं आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना लागू पडणारा आराखडा बनवणं यात बरंच अंतर असतं. परंतु बऱ्याच मगजमारीतून एक आराखडा बनला. हा आराखडा लेखकांकडे पोहोचल्यानंतर लेखकांकडून ज्या प्रतिक्रिया मिळाल्या, त्यावरून हा प्रकल्प फत्ते होणार याची जाणीव होऊ लागली. आम्हाला आमच्या जिल्ह्याकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली, असं जेव्हा कुणी कुणी आम्हाला म्हणू लागलं, तेव्हा हे पुस्तक किमान उंची गाठेल याबद्दल विश्वास वाटू लागला.

अर्थात, महाराष्ट्राच्या संस्कृतीचं, सामाजिक-आर्थिक जगण्याचं लोककेंद्री वर्णन करणं ही सोपी गोष्ट नव्हती. या प्रकारची कामंही अलीकडच्या काळात झालेली नसल्यामुळे रेफरन्स पॉइंट उपलब्ध नव्हता. तरीही लेखक मंडळींनी आपापली शक्ती आणि अनुभव पणाला लावून हे काम फत्ते केलं आहे. त्यामुळेच या साऱ्या लेखकांच्या मेहनतीमुळे हा पुस्तक प्रकल्प साकारला आहे व आपण जो प्रकल्प कल्पिला तो या मंडळींमुळेच प्रत्यक्षात येत आहे, याची नम्र जाणीव 'युनिक फीचर्स'मधील आम्हा सर्वांना आहे. नमूद करण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे, हा पुस्तक प्रकल्प या प्रकारच्या कामाची पायाभरणी आहे, असं आमचं मत आहे. हे पुस्तक परिपूर्ण आहे असा आमचा अर्थातच दावा नाही. मात्र हे पुस्तक महाराष्ट्राची खरी ओळख करून देण्याच्या संदर्भातील पायाचा दगड नक्की असेल, असं आम्ही मानून आहोत. लोककेंद्री इतिहास, लोककेंद्री अस्मिता, लोककेंद्री ओळख ठळक करण्याचं काम हे पुस्तक करेल, असा विश्वास वाटतो.

आपल्याकडे जिल्हावार माहिती लिहिण्याची जुनी पद्धत आहे. विश्वकोशातील नोंदी असोत किंवा गॅझेटियर असोत, जिल्हानिहाय नोंदी आपल्याला नव्या नाहीत. परंतु या नोंदींचं स्वरूप बरचसं 'सरकारी' असतं; ते बरंच विस्तृत असतं आणि त्यामुळे सामान्य वाचकांच्या आवाक्याबाहेरचं असतं. त्या त्या जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासावर त्याचा भर असतो. तिथली माणसं, त्यांचं वागणं-बोलणं, त्यांचे पिंड, त्यांचे स्वभाव, त्यांच्या जीवनविषयक वैशिष्ट्यपूर्ण कल्पना, सण - उत्सव - प्रथा – परंपरा यांतून त्यांचं पडणारं प्रतिबिंब या अनुषंगाने त्यात फारसं वाचायला मिळत नाही. थोडक्यात, अशा पुस्तकांतून माहिती मिळते, पण जगण्यातला 'फील' मिळत नाही. दुसरीकडे, आपापल्या भागाबद्दल मोकळेढाकळेपणाने लिहिण्याची पद्धत सुरू व्हायला हवी, असंही आम्हाला वाटत आलं आहे. हे काम सरकारी यंत्रणेवर अथवा सरकारी तज्ज्ञांवर न सोपवता लोकांनीच आपापल्या भागाबद्दल, तिथल्या संस्कृतीबद्दल, आपापल्या जगण्या वागण्याबद्दल लिहायला हवं.

थोडक्यात, स्थानिक मंडळींनीच आपापल्या गावा जिल्ह्यांचे इतिहास (ज्याला स्थानीय इतिहास असं म्हटलं जातं) लिहायला हवेत. असं काम प्रगत देशांमध्ये सुस्थापित आहे आणि आपल्याकडेही काही चळवळी मंडळी हे काम करताना दिसत आहेत. हे पुस्तक पाहून, वाचून (आणि त्यातील मर्यादा जाणवून) गावोगावचे लोक लिहू लागतील आणि आपापल्या भागाबद्दल लिहिण्याची रीत निर्माण करतील, अशी आशा आहे.

या पुस्तकामुळे महाराष्ट्राच्या खऱ्या संस्कृतीबद्दल उत्सुकता निर्माण होईल, लोकांची महाराष्ट्राविषयीची समज विस्तारेल; महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल, संस्कृतीबद्दल आणि जगण्याबद्दल जो ठोकळेबाज विचार केला जातो, त्यात मोकळेपणा येईल; महाराष्ट्र हा. राजकीयदृष्ट्या एक प्रांत असला तरी तो एकसारखा नाही, एकसाची नाही, तो विविधरंगी आहे हे वाचकांना कळेल; हा प्रांत विविधधर्मीय आणि जाती-जमाती-भाषांच्या सरमिसळीतून, देवाणघेवाणींतून उभारलेला आहे हे उमजेल; आणि महाराष्ट्र हा बहुविध, बहुपेडी संस्कृतींचा कोलाज आहे याचं भान येईल असं वाटतं.

'प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा' हे गौरवगीत म्हणताना या पुस्तकातील विविधरंगी माहितीचे रंग त्यात मिसळतील आणि एक नवं महाराष्ट्रगीत वाचकांच्या मनामनांत आकारेल, अशी खात्री हे पुस्तक वाचकांसमोर आणताना आमच्या मनात आहे.

या पुस्तकाची उभारणी जवळपास गेली दहा वर्षं चालली होती. त्यामुळे त्या त्या टप्प्यांवर माझ्या अनेक सोबत्यांचा या पुस्तकाला हातभार लागला आहे. शिवाय आनंद अवधानी आणि मुकुंद कुलकर्णी या दोन सहकाऱ्यांची सर्वच आघाड्यांवर मदत झाली. पुस्तक कल्पनेच्या पातळीवर असताना विविध जिल्ह्यांवर कोण चांगलं लिहू शकेल यासाठी आम्ही जणू शोधमोहीमच काढली होती. त्यात या पुस्तकातील लेखकांनीही मोलाची मदत केली. हे पुस्तक दृश्यरूपात नीटनेटकं होण्यासाठी समरस होऊन मांडणी करण्याचं काम संदीप साळुंके यांनी केलं, तर पुस्तक निर्दोष व्हावं यासाठी अशोक देव यांनी मेहनत घेतली. या साऱ्यांशिवाय हा जगन्नाथाचा रथ न हलता!

(समकालीन प्रकाशनाच्या 'महाराष्ट्र दर्शन'या पुस्तकातून साभार.)

सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com

सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results