
विजया पोहल्या वसावे. आदिवासी पाड्यावरची पारलिंगी (तृतीयपंथी) महिला. समाजकार्याची पदवी (एम. एस. डब्ल्यू.) घेतलेली विजया ही महाराष्ट्रातील पहिली 'पारलिंगी वनरक्षक' बनली आहे. परंतु विजयाचा हा प्रवास फारच खडतर होता.
पुरुष म्हणून जन्म झालेला विजय (आताची विजया) लहानपणापासून मनाने मात्र मुलगीच होता. वयात येताना होणाऱ्या शारीरिक-मानसिक बदलांना स्वीकारणं विजयला कठीण जात होतं. समाजात असलेली तिरस्कारची भावना आणि छेडछाडीमुळे तो मुलग्याच्या चौकटीत बसण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असे. पण ते त्याला जमत नसे. असं जगणं त्याला अगदी बंदिस्त पिंजर्यात असल्याची भावना देई.
विजयचं बालपण नंदुरबार जिल्ह्यातल्या दहेल या आदिवासी पाड्यावर गेलं. वडील पोहल्या, सावत्र आई दमयंती, भाऊ जयसिंग व कालूसिंग, बहिण बायदी आणि विजया असं त्यांचं एकत्र कुटुंब. त्याची सख्खी आई खारकीबाई त्याच्या लहानपणीच वारलेली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची. मुख्य व्यवसाय शेतीच.
सर्व भावंडांमध्ये विजयच जास्त शिकला. त्याचं प्राथमिक शिक्षण बिजरीपाटीच्या जिल्हा परिषद शाळेतून झालं. तर माध्यमिक शिक्षण नंदुरबारच्या एकलव्य विद्यालयातून झालं. पाड्यावर शिक्षणाचं वातावरण नसूनही विजयने शिक्षण चालू ठेवलं. शिक्षणातूनच आपल्याला वाट सापडेल असं त्याला वाटत होतं. नाशिकच्या कॉलेजातून त्याने विज्ञान शाखेची पदवी घेतली. शाळेत-कॉलेजात इतरांहून वेगळं असण्याचा त्याला मानसिक त्रास होई. समवयस्क मुलं सतत चिडवत असत. निराश होऊन त्याने अनेकदा आत्महत्येचाही प्रयत्न केला. पण यातून तो सावरला आणि त्याने पुण्याला जाऊन समाजकार्याचं शिक्षण घ्यायचं ठरवलं.
हाच विजयच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. तिथेच विजयला स्वतःत दडलेली विजया गवसली. पुण्यातील कर्वे महाविद्यालयात शिकत असताना तिथे 'बिंदु क्वियर राईट फाऊंडेशन'चे बिंदूमाधव खिरे यांची लैंगिकतेवरची कार्यशाळा झाली. स्वतःच्या मनातील भावनेला शास्त्रशुद्ध भाषेत नेमकं काय म्हणतात, हे विजयला तेव्हा पहिल्यांदा समजलं. सोबतच स्वतःबद्दल पडलेल्या इतरही अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली. त्यानंतर विजयने बिंदूमाधव खिरे यांचं नियमित मार्गदर्शन घेतलं, मानसोपचारतज्ज्ञांचा सल्लाही घेतला आणि यापुढे विजया म्हणून जगण्याचा निर्णय घेतला.
विजयाच्या प्रत्येक निर्णयात बिंदूमाधव तिच्या सोबत होते. त्यांनी तिला आर्थिक मदतही केली. विजयाच्या कुटुंबीयांसाठी विजयचं विजया होणं फार धक्कादायक होतं. विजया ज्या आदिवासी समुदायातली आहे तिथे उघडपणे पारलिंगी किंवा लैंगिक अल्पसंख्याक म्हणून कुणीही समोर आलेलं नाही. सुरुवातीला तिचं म्हणणं कुणी ऐकूनही घेतलं नाही. उलट तिला काही मानसिक आजार आहे असं ठरवून डॉक्टरकडे नेण्यात आलं. तिथे फरक पडत नाही म्हणून बुवा-बाबाकडे नेऊन अघोरी उपायही केले गेले.
मग विजयाने त्यांना 'सत्यमेव जयते' या आमीर खानच्या शोमधल्या 'गझल धारीवाल' या पारलिंगी महिलेची मुलाखत दाखवली. सोबतच बिंदूमाधव नंदुरबारच्या दौऱ्यावर असताना विजयाने त्यांची कुटुंबीयांशी भेट घालून दिली. त्यांच्याशी झालेल्या संवादामुळे घरातील विरोध बराच कमी झाला.
२०१९ साली समाजकार्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावर विजयाने लिंगबदलाची प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया बराच काळ चालणारी असते. अखेर २०२२ साली तिची लिंगबदल शस्त्रक्रिया झाली आणि खऱ्या अर्थाने विजय मागे पडून विजयाच्या नवीन जीवनाला सुरुवात झाली. आता ती शरीरासह स्वतःला पारलिंगी महिला म्हणवून घेऊ शकत होती.
तिची पुढची लढाई होती समाजात स्वाभिमानाने जगण्याची. त्यासाठी स्वतःचं करियर घडवणं गरजेचं होतं.
एम. एस. डब्ल्यू. पूर्ण झाल्यावर विजयाने 'आय.सी.एम.आर.- नारी' संस्थेत दोन वर्षं एका संशोधन प्रकल्पावर काम केलं. तिथल्या कर्मचाऱ्यांकडून तिला चांगली वागणूक व प्रोत्साहन मिळत राहिलं. त्यांनीच विजयाला सरकारी नोकरी मिळवण्याचा सल्ला दिला. याआधी सरकारी नोकरीत कर्मचार्यांसाठी फक्त स्त्री आणि पुरुष असे दोनच प्रकार होते. मात्र २०२३ साली पारलिंगी समुदायातील आर्या पुजारी आणि निकिता यांनी पारलिंगी व्यक्तींनाही सरकारी नोकर्या मिळाव्यात म्हणून लढा दिला. त्यानंतर पारलिंगी व्यक्तींसाठी सरकारी नोकरीचा मार्ग खुला झाला.
विजयाने २०२३ मध्ये पोलिस भरतीसाठी सहज अर्ज केला. परीक्षा तर देऊन बघू असा तिचा विचार होता. नोकरी करत करतच तिने पोलिस भरतीची तयारी सुरू केली. खरं तर पोलिस भरतीची शारीरिक तयारी योग्य वयातच सुरू करायला हवी. मात्र पारलिंगी व्यक्तींच्या बाबतीत लिंगबदलाची प्रक्रिया बराच काळ चालत असल्याने अनेकांचं सरकारी नोकरीचं वय निघून जातं.
विजयाला नोकरीमुळे पोलीस परीक्षेच्या अभ्यासासाठी वेळ मिळेना. तिने नोकरी सोडली. जळगावच्या 'दीपस्तंभ फाऊंडेशन'मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. या ट्रेनिंगच्या काळातील विजयाचा संपूर्ण खर्च 'दीपस्तंभ फाऊंडेशन'ने उचलला होता.
विजयाला पोलिस भरतीच्या पहिल्या प्रयत्नात यश मिळालं नाही. पण ती खचून गेली नाही. त्याच काळात वन विभागाची वनरक्षक पदाची भरती निघाली. विजयाने नव्या जोमाने त्याची तयारी सुरू केली. परीक्षेसाठी दोनच महिने उरले होते. वनरक्षक पदासाठी सुरुवातीला लेखी परीक्षा आणि नंतर मैदानी चाचणी असते. मैदानी चाचणी पुरुषांसाठी वेगळी, तर महिलांसाठी वेगळी असते. मात्र या पूर्वी कुठलीही पारलिंगी व्यक्ती सरकारी नोकरीत नसल्यामुळे पारलिंगी व्यक्तींची परीक्षा कशी घ्यायची हे तेथील अधिकाऱ्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे तिथे बराच गोंधळ उडाला. विजयाला बराच वेळ थांबून रहावं लागलं. आपल्याला ही परीक्षा देता येईल की नाही या विचाराने काही वेळासाठी तिचा धीर खचला. परंतु ती हिम्मत करून तिथेच थांबून राहिली. अखेर बिंदुमाधव व इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांच्या शंकांचं निरसन केलं आणि मग त्यांनी विजयाची परीक्षा घेतली. दोन्ही परीक्षांत उत्तीर्ण होऊन विजयाने वनरक्षक पदाची नोकरी मिळवली. विजया महाराष्ट्रातील पहिली पारलिंगी वनरक्षक बनली.
विजया जिथे लहानाची मोठी झाली त्या सातपुड्यातील आदिवासी भागात साध्यासाध्या सुविधाही अजून पोहोचलेल्या नाहीत. तिथे फोनकॉल करण्यासाठीही माणसांना पंधरा-पंधरा किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते. अशा ठिकाणी आदिवासी समाजातल्या पारलिंगी व्यक्तींच्या समस्या बाहेरील जगाहून फारच वेगळ्या असतात. त्याला एकाच दृष्टीकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही.
फॉरेस्ट गार्ड होण्याआधी विजया घरी जायची, तेव्हा पाड्यातील लोकांना तिच्याबद्दल कुतूहल असायचं. तिच्याभोवती गर्दी करून ते तिला बघत राहायचे. विजयाबद्दल कुणी ना कुणी इतर कुजबूजही करायचे. असंच तिच्याबद्दल बोलणाऱ्या एका व्यक्तीला खडसावताना विजयाची काकू एकदा म्हणाली, ‘‘ती जन्मापासून मुलगीच होती. आम्ही तिला समजून घ्यायला उशीर झाला. ती आमची मुलगी आहे. तिला इतर कुणी काही बोलण्याचा बिलकुल अधिकार नाही.’’
पारलिंगी महिला म्हणून समाजात सन्मानाने जगणं खूप आव्हानात्मक आहे. पारलिंगी व्यक्तीला रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. सोबतच स्वसंरक्षणाचा प्रश्नही असतो. अशावेळी पारलिंगी म्हणून स्वतंत्रपणे जगण्यापेक्षा स्वतःच्या इच्छेने किंवा नाईलाजाने का होईना पण पारंपरिक रोजगाराचे मार्ग स्वीकारले जातात. ‘‘पारलिंगी व्यक्तीला ‘तुम्ही काही काम का करत नाही?’ असा प्रश्न विचारला जातो. पण संधी मात्र दिली जात नाही. संधी मिळाल्यास तेही आत्मसन्मानाने जगण्याचा पर्यायच स्वीकारतील,’’ असं विजया म्हणते.
मयूर पटारे | 9970355105 | mayur355105@gmail.com
युनिक फीचर्स मध्ये पत्रकार. कष्टकरी समूहात फिरून त्यातील माणसांचं जगणं समजून घ्यायला आवडतं.