
महाराष्ट्रातील पहिले ज्ञात सुधारक आणि महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी याचा जन्म ११९४च्या सुमारास झाला. गुजरातमधील भडोच हे त्यांचं जन्मगाव. त्यांचं मूळ नाव हरीपाळदेव होतं. त्यांचे वडील भडोच संस्थानाचे प्रधान होते. असं म्हणतात, की हरीपाळदेव यांना तरुणपणीच जुगाराचं व्यसन जडलं होतं. एकदा जुगारात ते खूप पैसे हरले. ते फेडण्यासाठी त्यांनी पत्नीकडे दागिने मागितले. पण तिने नकार दिला. मग त्यांच्या वडिलांनी त्या पैशांची परतफेड केली. या घटनेचा त्यांच्या मनावर गंभीर परिणाम झाला. संसारातील त्यांचं लक्षच उडालं. रामाच्या दर्शनाला रामटेकला जातो म्हणून ते घराबाहेर पडले. पुढे अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर इथे गोविंदप्रभू या सिद्ध पुरुषाचं शिष्यत्व त्यांनी पत्करलं. गोविंद प्रभूंनीच त्यांना चक्रधर हे नाव दिलं. त्यानंतर चक्रधरांनी सालबर्डीच्या डोंगरावर १२ वर्षं तपश्चर्या केली. श्री दत्तात्रेयांच्या सांगण्यावरून त्यांनी संन्यास घेतला. साधारण १२६६ नंतर चक्रधर ७-८ वर्षे महाराष्ट्रभर फिरले. समाज आणि लोकरुढींचं त्यांनी जवळून अवलोकन केले. यातूनच त्यांनी महानुभाव पंथांची विचारधारा साकार केली.
चक्रधर स्वामी यांनी निवेदन केलेल्या आणि शिष्य म्हाइंभट याने लिहिलेल्या ‘लिळा चरित्रा'तून त्यांच्या विचारांचा पैस पुढे आला. परमेश्वर, देवता, प्रपंच आणि जीव असे चार नित्य पदार्थ मानून त्यांनी द्वैतवादाचा पुरस्कार केला. देवदेवतांचा सुळसुळाट आणि कर्मकांड यांचा निषेध करून एकेश्वरवादाचा त्यांनी पुरस्कार केला. चक्रधर स्वामींनी मराठी भाषेचा हिरीरीने पुरस्कार करत मराठीतूनच ग्रंथरचनेचा आग्रह धरला. १२७४मध्ये चक्रधर स्वामींनी इहलोक सोडला. आज सुमारे साडेसातशे वर्षानंतरही त्यांनी सुरू केलेला महानुभाव पंथ जनसामान्यांना सामाजिक सद्भावनेचा मार्ग दाखवत आहे.
मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com
मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.