
एक असं गाव आहे जे दर तीन वर्षांनी तीन दिवसांसाठी पूर्णपणे बंद असतं. गावातले सगळे लोक सहकुटुंब आपल्या गुराढोरांसह गावाबाहेर जाऊन राहतात. यामागचं कारण मात्र भन्नाट आहे.
'आचरा' हे कोकणातलं समुद्रकिनाऱ्यावरचं गाव. इथं श्री रामेश्वराचं प्राचीन मंदिर आहे. या रामेश्वराचाच दर तीन किंवा चार वर्षांनी कौल निघतो. तेव्हा प्रत्येक गावकऱ्याने घरातल्या पशुधनासह तीन दिवसांसाठी गाव सोडायचं. गावाबाहेर जाऊन राहायचं. या काळात गावात कुणीही प्रवेश करायचा नाही. गावातलं हवा, पाणी, माती, झाडं अशा सगळ्या निसर्गाला तीन दिवस विश्रांती द्यायची. गावातली हवा शुद्ध करायची, पाण्याचे स्रोत पुन्हा नितळ करायचे, रोगजंतूंची साखळी तोडायची हा यामागचा खरा हेतू. लोकांनी हा नियम पाळावा म्हणून गावात या काळात असुरी शक्तींचा वावर असतो असं सांगितलं जातं. या परंपरेला स्थानिक लोक 'गावपळण' म्हणतात. पूर्वी ही 'गावपळण' महिनाभर असायची. पुढे याचे दिवस कमी-कमी होत गेले.
या काळात घराभोवती राखेचं रिंगण घातलं जातं. तीन दिवस पुरेल एवढा शिधा, गरजेपुरतं साहित्य, औषधं बरोबर घेऊन ग्रामस्थ घराबाहेर पडतात. गावातली दुकानं, व्यवसाय, मंदिरं, शाळा एवढंच नाही तर बँका आणि सरकारी कार्यालयंही या काळात बंद असतात. राहण्यासाठी गावाबाहेर मोकळ्या माळावर, बंदरावर किंवा जंगलात तात्पुरते निवारे तयार केले जातात. छोट्या राहुट्या, माडाच्या झावळ्यांपासून बनवलेल्या झोपड्या, मांडव लागलेले असतात. या तात्पुरत्या उभारलेल्या राहुट्यांनादेखील सुर्वे हाऊस, परब होम, कदम भवन, घागरे कुटी, शिर्के सदन, आजोबांची वाडी अशी नावं दिलेली असतात. इथं वेगवेगळ्या विषयांवर चर्चा घडतात. सामाजिक प्रश्नांवर मंथन होतं, मैदानी आणि सांस्कृतिक खेळ रंगतात. तीन-चार दिवसांसाठी ग्रामस्थांचं इथं वेगळं जग तयार होतं.
मयूर पटारे | 9970355105 | mayur355105@gmail.com
युनिक फीचर्स मध्ये पत्रकार. कष्टकरी समूहात फिरून त्यातील माणसांचं जगणं समजून घ्यायला आवडतं.