
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला अख्ख्या शहरानं जिलब्या खाऊन राष्ट्रीय सण साजरा करण्याची कोल्हापूरची पद्धत संपूर्ण भारतात युनिक आहे.
या दिवशी कोल्हापूरच्या सर्व रस्त्यांवर वेगळंच वातावरण असतं. ठिकठिकाणी जिलब्यांचे स्टॉल लागलेले असतात. स्टॉल सजवण्यासाठी तिरंगी झेंडे आणि सुंदर रंगसंगतीचा उपयोग केलेला असतो .स्पीकरवर देशभक्तीपर गाणी लागलेली असतात. मोठाल्या रांगोळ्या काढल्या जातात. कोल्हापूरच्या खवय्येगिरीचा हा नाद खुळाच म्हणायचा !
पनीर जिलेबी , इम्रुती, डॉलर जिलेबी, केशर जिलेबी ,वेलची जिलेबी ,रसभरी जिलेबी, मावा जिलेबी असे कितीतरी प्रकार उपलब्ध असतात. किलो किलो भर जिलब्या विकत घेऊन जाणारे लोक हजारोंनी असतात. जिलब्यांची मागणी एवढी प्रचंड वाढते की काही स्टॉलवर काम करण्यासाठी पंढरपूरहुन कारागीर आणले जातात. पलीकडच्या सांगली जिल्ह्यातलं कुंडल जिलब्यांसाठी प्रसिद्ध असल्यामुळे तिथून टेम्पो भरभरून जिलब्या आणल्या जातात आणि त्या कोल्हापुरात विकल्या जातात. एका अंदाजाप्रमाणे हजार ते पंधराशे स्टॉल त्यादिवशी कोल्हापुरात लागतात. कोल्हापुरात एरवीही दररोज सहा ते सात हजार किलो जिलब्या विकल्या जातात. राष्ट्रीय सणाच्या दिवशी तर हा आकडा लाखो किलोवर जातो. त्यामुळे एकट्या कोल्हापुरात जिलेबी व्यवसायाची उलाढाल कोट्यावधींच्या घरात आहे.
तसं कोल्हापूरचं आणि जिलब्यांचं नातं फार जुनं आहे. पंचम जॉर्ज येणार म्हणून शाहू महाराजांनी हत्तीवरून जिलब्या वाटल्या होत्या. पुढे राजाराम महाराजांना मुलगी झाल्यावर त्यांनीही संपूर्ण कोल्हापुराला जिलबी खाऊ घातली होती. नंतर ती प्रथाच पडली. कोणाच्याही घरी मुलगी किंवा मुलगा जन्माला आल्यावर बँड वाजवत आसपासच्या घरांमध्ये जिलब्या वाटण्याची पद्धत बरीच वर्ष होती.
माळकर तिकटी या भागाची ओळख ही खास जिलब्यांसाठी आहे. हे माळकर शाहू महाराजांच्या काळात राजवाड्यावर जिलेबी घेऊन जायचे. खासबाग, मोतीबाग, गंगावेस, काळा इमाम या तालमींमधल्या मल्लांना जिलेबी वाटायची पद्धतही या माळकरांनी सुरू केली आणि पुढे ती प्रथाच पडली. आजघडीला १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी एका माळकरांच्या स्टॉलवरून ८ ते १० टन जिलेबी विकली जाते.
याशिवाय कसबा बावडा, रमणमळा, टाऊन हॉल, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, महाद्वार रोड, गुजरी, पापाची तिकटी, गंगावेस, रंकाळावेस, रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, नागाळा पार्क, ताराबाई पार्क असं कुठेही पाहिलं तरी जिलब्यांचे स्टॉल ओळीने लागलेले दिसतात. यावरून ही केवढी उलाढाल आहे याचा अंदाज यावा. कोल्हापूर बरोबरीने आता सांगली आणि परिसरातही राष्ट्रीय सणांना जिलबी मस्ट बनली आहे.
आनंद अवधानी
आनंद अवधानी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आहेत. उद्योग आणि उद्योजकता विकास, प्रशासकीय अधिकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती, तसंच स्वयंसेवी संस्था आणि स्वयंप्रेरित व्यक्ती यांच्या कामाबद्दल त्यांना विशेष आस्था आहे.