
यूट्युब किंवा इन्स्टाग्रामचे व्हिडिओ लाइक करण्याचं काम देऊन पैसे कमावण्याचं आमिष दाखवलं जातं. व्हॉट्सॅपवर किंवा इतर माध्यमांत तसा मेसेज येतो. या प्रकारातून लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे. कशी ते पहा..
राज : दिन्या, भावा.. लॉटरी लागली मला लॉटरी!
दिनेश : काय झालं?
राज : इतके दिवस जॉब शोधत होतो. एक जॉब धड मिळत नव्हता. मिळाला तरी कोणी १० हजारांवर पगार देत नव्हतं. आता बघ, पैसेच कमावणार नुसते, ते पण घरबसल्या!
दिनेश : काय सांगतोस! कसलं काम आहे?
राज : अरे, मागच्या महिन्यात मला व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला. मेसेजमध्ये लिहिलं होतं, ‘घरबसल्या पैसे कमावण्यासाठी खालच्या लिंकवर क्लिक करा’. मी पहिल्यांदा दुर्लक्ष केलं; पण त्यांचा तीन-चीर-वेळा मेसेज आला.
दिनेश : पुढे काय झालं?
राज : शेवटी एकदा मी त्या लिंकवर क्लिक केलं. त्यांच्या सांगण्यानुसार यूट्युब आणि इन्स्टाग्रामचे काही चॅनेल्स सबस्क्राइब आणि व्हिडिओ लाइक केले. असं काम रोज करायचंय. डोक्याला शॉट नाही. साधं-सोपं काम.
दिनेश : ती काय किरकोळ गोष्ट आहे! मी पण रोज ४-५ यूट्युब चॅनेल बघतो आणि आवडलं तर लाइक करतो.
राज : अरे हो, पण मी भरपूर चॅनेल्सला लाइक आणि सबस्क्राइब केलं. त्याचे मला पैसे मिळाले. एका दिवसात ४०० रुपये.
दिनेश : कसं काय?
राज : अरे, हेच तर काम आहे. एक अकाउंट सबस्क्राइब करून त्याच्यावरचे सगळे व्हिडिओ लाइक करायला १०० रुपये मिळतात. मागच्या महिन्यात मी १८ हजार रुपये कमावले.
दिनेश : अरे, भारीच की! मलाही कामाची गरज आहे. मला पण त्यांचा नंबर पाठव.
राज पुढचे १५ दिवस या कामात गुंतलेला होता. त्यानंतर राज आणि दिनेश पुन्हा भेटले. तेव्हा एक अजबच गोष्ट समोर आली.
राज : दिनेश, गंडलो राव बेक्कार! अरे, मी त्या कंपनीच्या स्कीममध्ये ६० हजार रुपये गुंतवले आणि लुबाडला गेलो.
दिनेश : अरे, हे काय नवीन? आणि तू पैसे गुंतवले तरी कशाला?
राज : यूट्युब व्हिडिओ लाइक करणाऱ्यांच्या एका ग्रुपमध्ये मला घेतलं होतं. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने फोन करून ग्रुपच्या कामाची माहिती दिली. पैसे गुंतवले की चार दिवसांत डबल होतील असं सांगितलं. ग्रुपवरच्या बाकी मेम्बर्सनी तर त्यांनी कमावलेल्या लाखो रुपयांचे स्क्रीनशॉटही ग्रुपवर शेअर केले होते.
दिनेश : मग पुढे?
राज : मीही सुरुवातीला ८ हजार रुपये त्यात घातले. त्यातले ५ हजार रुपये रजिस्ट्रेशन फी होती. मला ४ दिवसांनी बाकीच्या ३ हजारांचे डबल, म्हणजे ६ हजार रुपये मिळाले. पैसे डबल होतात, म्हणून मी मित्रांकडून ६० हजार रुपये उसने घेऊन त्यात लावले. आता १५ दिवस झाले. ज्या माणसाने अधिकारी म्हणून फोन केला त्याचा नंबरही लागत नाही. काय करावं काहीच समजेना. मित्रांची उधारी कशी फेडू राव?
दिनेश : एक काम करू. आधी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देऊ. बघू पोलीस आपल्याला काही मदत करू शकतात का ते.
दोघंही जवळच्या पोलिस स्टेशनला गेले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर राजची ऑनलाइन फसवणूक झाल्याचं लक्षात आलं
सायबर पोलिस : सायबर गुन्हेगारीतला हा ट्रेंडिंग प्रकार आहे. दिसायला चांगली, पण खोटी वेबसाइट बनवून लोकांना पैसे दुप्पट होतात असं भासवलं जातं. तुमच्या खात्यावर पैसे पाठवू, असं सांगून तुमच्या बँक खात्याचे तपशील घेतले जातात. यूपीआय आयडीसुद्धा मिळवतात. ही सगळी कामं ऑनलाइन पद्धतीने चालतात. ना यांचं कुठं ऑफिस असतं, ना कोणी कर्मचारी असतात. सुरुवातीला तीन ते चार हजार रुपये घेऊन त्यांचा तोटा होणार नाही, या हिशोबाने काही रक्कम ते परतही पाठवतात. असं एक-दोनदा केल्यानंतर मोठी रक्कम तुमच्याकडून घेतात. तेव्हा मात्र परत पैसे पाठवले जात नाहीत. असे हजारो ग्रुप तुम्हाला टेलिग्रामवर पाहायला मिळतील.
कमी वेळात जास्त पैसे मिळवण्याच्या नादात राजने स्वतःचं नुकसान करून घेतलं. तुमच्या मोबाइल नंबरवर किंवा इ-मेल आयडीवर अशाप्रकारे झटपट पैसे मिळवून देण्याच्या ऑफर येत असतील तर सावध रहा.
एखादी लिंक तयार करून त्याला ‘झटपट पैसे कमवा, घरबसल्या पैसे कमवा' असा मेसेज जोडून फसवणूक चालते. अशा मेसेजेला आपण रिप्लाय देणंच टाळलं पाहिजे. ज्या नंबरवरून हा मेसेज आला आहे त्याची अधिक माहिती मिळवा. काहीही संशयास्पद वाटलं तर तत्काळ तो नंबर ब्लॉक करा. नव्याने मोबाइल हाताळणी करणारे आपले आई-वडील, शाळा-कॉलेजमधील मुलं यांना ऑनलाइन फसवणुकीबाबत जागरूक करा. जोपर्यंत तुम्ही पैसे भरत नाही, तुमच्या फोनचा ॲक्सेस आणि तुमच्या फोनवर आलेला ओटीपी समोरच्या व्यक्तीला देत नाही तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात.
- प्रसाद पोतदार, सायबर विभाग,
पर्वती पोलिस स्टेशन, पुणे.
फसवणूक होऊ नये म्हणून काय कराल?
घाबरू नका, पोलिस तुमच्या सोबतीला आहेत.
पुणे शहरात सायबर गुन्ह्यांविषयी तक्रार नोंदवण्यासाठी संपर्क - ०२० २९७१००९७, ७०५८७१९३७१, ७०५८७१९३७५
ई-मेलद्वारे तक्रार नोंदवण्यासाठी – crimecyber.pune@nic.in
(ई-मेलद्वारे तक्रार दिल्यानंतर पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदाराने आपला संपर्क क्रमांक द्यावा.)