सुनील: विजय भावा, मागच्या आठवड्यात एका कामाचे सव्वा लाख रुपये मिळालेत बघ. कुठे तरी गुंतवावे म्हणतो. काय ऑप्शन असेल चांगला तर सांग की..!
विजय: वाह, लॉटरी लागली की तुला! आता बघ तुला कसा मालामाल करतो ते..!
सुनील: तू ते शेअर मार्केटचं बघतोस ना काय तरी? माझे पैसे पण त्यातच लावतो का मग? कमी वेळात जास्त फायदा..! मुलाला कॉलेजला जायला गाडी घ्यायचीय, मुलीला नवीन मोबाइल घेऊन द्यायचाय, बायकोला दीड तोळ्यांचे गंठण करायचंय. हे सगळं करायचं तर आणखी ६० हजार कमी पडतायत. ते कुठून मिळाले तर बरं होईल.
विजय: ओक्के ना मंग, विजूभाऊ करेगा तेरा काम! किती पैशे लावणार बोल! आपलं डोकं आता सुपरफास्ट झालंय या कामात!
सुनील: सध्या ५० हजार लावूयात का? जरा फायदा झाला की मग त्याच पैशांनी पुन्हा खेळू.
विजय: ओके, नो प्रॉब्लेम..
सुनील: पण विज्या भावा, काही लफडं होणार नाही ना? अडचण यायची नाही ना काही?
विजयः तू बिनधास्त रहा रे. हवं तर आपण सुरुवातीला २० हजारच लावू. त्यात फायदा झाला की मग पुढचं बघू..
सुनील: हा, हे बेस्ट आहे..! करून टाक मग पुढची प्रोसेस..
(विजय सुनीलला एका टेलिग्राम ग्रुपला ॲड करतो. शंभरएक जणांच्या त्या ग्रुपवर शेअर मार्केटचे अपडेट येत असतात. ग्रुपमधले लोक ‘मला एवढे पैसे मिळाले, मी त्या पैशांतून गाडी घेतली, घर घेतलं' असे मेसेज रोजच्या रोज टाकत असतात. सुनील हे सगळं पाहून भारावून जातो. ग्रुपवर आलेल्या अकाउंट डिटेल्सवर २० हजार रुपये पाठवून देतो. त्या पैशांतून कुठले शेअर्स घ्यायचे ते ग्रुपचा ॲडमिन ठरवेल, असं सुनीलला सांगितलं जातं. दुसऱ्याच दिवशी ग्रुप ॲडमिनचा मेसेज येतो. सुनीलच्या खात्यात ३५ हजार रुपये जमा झाल्याचं तो सांगतो. कंपनी डिपॉझिट म्हणून ५ हजार रुपये ठेवून घेते, अकाउंट बंद करताना ते परत मिळतात, अशी माहिती त्याला ग्रुप मेम्बर्सकडून मिळते. त्याला ३० हजार रुपये मात्र मिळतात. एका दिवसांत १० हजार रुपयांचा फायदा झाला हे बघून सुनील खूष होतो. दुसऱ्या दिवशी तो एकदम एक लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवायचं ठरवतो, पण तो हे विजयला सांगत नाही. ग्रुप ॲडमिनशी बोलून पैसे पाठवण्यासाठी लिंक मागून घेतो. त्यावर एक लाख रुपये ट्रान्सफर करतो. ॲडमिन पैसे मिळाल्याचं त्याला कळवतो.)
खरी अडचण यानंतर येते. दोन-तीन दिवस झाले तरी ग्रुप ॲडमिनकडून काहीच रिप्लाय येत नाही. रोज ग्रुपवर पडणारे मेसेजसुद्धा कमी झालेले असतात. जास्त रकमेची गुंतवणूक केलीय म्हणून पैसे मिळायला वेळ लागत असेल असं समजून सुनील आणखी चार दिवस शांत राहतो. त्यानंतर मात्र त्याची अस्वस्थता वाढते. तो विजयला ही गोष्ट सांगतो. परस्पर एवढी मोठी रक्कम सुनीलने गुंतवलीच कशी याचं विजयला आश्चर्य वाटतं. ग्रुपवरच्या चार-पाच दिवसांतील घडामोडी पाहून त्यालाही काही तरी गडबड आहे असं वाटतं. दोघंजण तिथून सरळ पोलिस स्टेशनला जातात.
नेमकं काय घडलं?
व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून शेकडो लोकांना शेअर मार्केटमध्ये फायदा मिळवून देण्याच्या नावाखाली फसवलं जातं. लोकांचा विश्वास बसावा यासाठी सुरुवातीच्या दोन-तीन वेळेस जादाचे पैसे खात्यावर टाकले जातात. कमी गुंतवणूक करणाऱ्या लोकांना अगदी पाच- सहा वेळा थोडा का होईना फायदा दिला जातो. मात्र, एकदा का मोठी रक्कम गुंतवली की समोरून प्रतिसाद येणं बंद होतं. एका ग्रुपला अशा एक-दोन फसवणूकीच्या केसेस झाल्या की तो ग्रुप बंद होतो. मग त्यावर काहीच घडत नाही. सुनीलच्या बाबतीत हे असंच घडलं. विजय दोन-दोन हजार गुंतवून चार-पाच हजार रुपये मिळवत होता. मोठ्या रकमेची उडी त्याने घेतली नव्हती. मात्र काही दिवसांनी तोसुद्धा अशाच जाळ्यात ओढला गेला असता.
या फसवणुकीवर सायबर क्राइम विभागाचे प्रसाद पोतदार म्हणतात, ‘झटपट पैसे मिळवून देण्याच्या कुठल्याही स्कीमवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. समोरच्या व्यक्तीचा यात काय स्वार्थ असेल याचा विचार करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा फेक आयडी, फेक नंबर वापरून ग्रुपवर आर्थिक फायदा झाल्याचे खोटे मेसेज केले जातात. पैसे खात्यावर जमा झाल्याचे स्क्रीनशॉटही शेअर केले जातात. हे सगळं खरं मानलं की आपण अडकलोच म्हणून समजायचं’.
या प्रकारच्या फसवणुकीत अशिक्षित आणि सुशिक्षित असे सगळेच अडकले आहेत. शिक्षक, डॉक्टर, अधिकारी यांची पाच हजार ते एक करोड रुपयांपर्यंतची फसवणूक यामध्ये झाली आहे. त्यामुळे शेअर मार्केटसंबंधी कुठलीही गुंतवणूक करताना फसव्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी होणं टाळलं पाहिजे. गुंतवणूकच करायची असेल तर या क्षेत्रातील अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तींशी संपर्क करायला हवा’.
