
मोबाइलमधल्या फोटोमध्ये एखाद्या व्यक्तीचा चेहरा बदलून त्या जागी दुसऱ्याच एखाद्या व्यक्तीचा चेहरा लावता येतो हे तुम्हाला माहिती आहे का? तसं करण्यासाठीचे विविध ॲप्लिकेशन इंटरनेटवर सहज उपलब्ध झाले आहेत. या पद्धतीने फोटो, व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल आणि फसवणूक करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. त्याविषयी जागरूक करणारा हा लेख..
संतोष- हॅलो, प्रिया!
प्रिया- हाय, संतोष!
संतोष- काय प्रिया, सेलिब्रिटी झालीस आता! आपल्या वस्तीत सगळे बघतात तुझी टीव्हीवरची मालिका. मंडळाच्या पोरांनी तर वस्तीत तुझे फ्लेक्ससुद्धा लावले होते.
प्रिया- हो. खूप बढावा दिला मला सगळ्यांनी.
संतोष- चालेल. बोलू पुन्हा.
प्रिया- येस. चल, बाय!
संतोष- हो, बाय..!
(दोनच दिवसांनी प्रियाचा संतोषला कॉल येतो. ती एकदम रागात बोलत होती.)
प्रिया- संतोष.. अरे कुणी तरी मला फसवतंय.
संतोष- म्हणजे?
प्रिया- मला आज अनोळखी नंबरवरून व्हाट्सॲपला एक व्हिडिओ आलाय, काही फोटोसुद्धा आहेत. खूप अश्लील व्हिडिओ आणि फोटो आहेत रे ते. आणि त्यातला तो मुलीचा चेहरा माझा आहे.
संतोष- काय?
प्रिया- हो ना! त्या फोटो आणि व्हिडिओतला चेहरा माझा आहे. पण खरं सांगते, ती मी नाहीय अरेे. ते व्हिडिओ बघूनच मला इतकं घाण वाटलं ना.. प्रचंड राग आलाय मला. हे कुणी केलं असेल? आणि कसं केलं असेल? चांगली अद्दल घडवली पाहिजे अशा लोकांना!
संतोष- पाठवणाऱ्या व्यक्तीचा डीपी वगैरे आहे का व्हाट्सॲपला? आणि तो काय म्हणतोय नेमका? काय मेसेज केलेत का त्याने?
प्रिया- अरे, डीपीला फोटो मुलीचा आहे, पण मेसेजवर बोलणारा पुरुष आहे कुणी तरी. पैसे मागतोय तो माझ्याकडून. आजच वीस हजार रुपये पाठवले नाहीत तर सोशल मीडियावर हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी दिलीय त्याने मला. मागे तू सायबर क्राइमच्या एका केसमध्ये दिनेशला मदत केलीयस म्हणून तुला कॉल केला. मी काय त्या माणसाला पैसे देणार नाही. मला त्याची पोलिसात तक्रार करायची आहे.
संतोष- ओके. हा प्रकार मला डीप फेकचा वाटतोय. अशा प्रकारात शरीर एका व्यक्तीचं आणि चेहरा दुसऱ्या व्यक्तीचा अशी छेडखानी करून कंटेंट बनवला जातो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर ॲप्लिकेशन वापरून हे सहज करता येऊ शकतं. या व्हिडिओला तुमचा आवाजही ते देऊ शकतात. आपल्याच सोशल मीडियावरील फोटो, व्हिडिओजचा वापर करून या गोष्टी करणं शक्य आहे. मागे साऊथमधील एका अभिनेत्रीचाही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता.
प्रिया- हो, आठवलं. पण ते माझ्या बाबतीत होईल असा विचारच केला नव्हता. आता कुठे माझ्या करियरची सुरुवात झालीय. हे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले तर मला त्याचा किती त्रास होईल! हां, पण मी त्याच्या धमकीला बळी पडणार नाहीय. पैसे वगैरे तर बिल्कूल पाठवणार नाहीय.
संतोष- हो. तू धाडसी आहेस ते माहितीच आहे मला. आता एक कर, त्या माणसाला सांग, पैशांची जुळणी करतेय म्हणून आणि तेवढ्या वेळात जवळच्या सायबर क्राइम विभागात तक्रार देऊन ये.
प्रिया- हो. त्यांच्याकडे तक्रार दिली की तो नंबर ब्लॉक करून टाकते.
संतोष- आणखी एक कर. तुझ्या नातेवाइकांना आणि अगदी जवळच्या लोकांना कल्पना देऊन ठेव, की अशा कुठल्याही प्रकारचे फोटो, व्हिडिओ आले तर त्यावर विश्वास ठेवू नका. पोलिस स्टेशनमधून तू दिलेल्या तक्रारीची जी कॉपी मिळेल ती हवी तर त्यांना पाठवून ठेव.
प्रिया- ओके. थँक यू.
पुढे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर संबंधित नंबरचा शोध घेतला जातो. त्या पत्त्यावर जवळपास चार तरुण वेगवेगळ्या सिमकार्डच्या माध्यमातून अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग करत असल्याचा प्रकार उघडकीस येतो. त्यांच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये अनेक मुलींचे फोटो आणि व्हिडिओ डीप फेक केलेले दिसतात. हे सर्व फोटो, व्हिडिओ तंत्रज्ञाच्या मदतीने नष्ट केले जातात.
काय सावधगिरी बाळगाल?
डीप फेकचा आधार घेऊन कुणी तुम्हाला किंवा तुमच्या परिचयातील व्यक्तीला त्रास देत असेल तर घाबरून जाऊ नका. ते फोटो किंवा व्हिडिओ स्वतःहून कुठेही शेअर करू नका. समोरून पैशांची मागणी झाली तरी त्या दबावाला बळी पडू नका. सायबर क्राइम विभागाची मदत घ्या. अशी तक्रार ऑनलाइनही करता येते. जवळच्या सायबर क्राइम विभागातील महत्त्वाचे संपर्क तुमच्या मोबाइलमध्ये सेव्ह असू द्या.
फसवणूक होऊ नये म्हणून काय कराल?
घाबरू नका, पोलिस तुमच्या सोबतीला आहेत.
पुणे शहरात सायबर गुन्ह्यांविषयी तक्रार नोंदवण्यासाठी संपर्क - ०२० २९७१००९७, ७०५८७१९३७१, ७०५८७१९३७५
ई-मेलद्वारे तक्रार नोंदवण्यासाठी – crimecyber.pune@nic.in
(ई-मेलद्वारे तक्रार दिल्यानंतर पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदाराने आपला संपर्क क्रमांक द्यावा.)