मुकेश - काय जाधव साहेब, मुलाला चांगले मार्क्स पडले यंदा बारावीला. ॲडमिशन कुठे घ्यायचं ठरलं मग - मेडिकल की इंजिनिअरिंग?
दिलीप - शैलेश म्हणतोय नीटचा स्कोअर चांगला आलाय तर मेडिकललाच घ्यायचं ॲडमिशन. त्याला दिल्ली किंवा चेन्नईलाच घ्यायचंय ॲडमिशन, बघू कसं जुळतय ते.
मुकेश - हे भारीय त्याचं. बरं ॲडमिशनला कुठे काही अडचण आली तर सांगशील मला. आपले काही पंटर आहेत ओळखीचे. गरज लागलीच तर देतील जुगाड करून.
दिलीप - हो मुकेशराव, सांगणार ना..! (तेवढ्यात शैलेश तिथे येतो.)
शैलेश - पप्पा, अहो घोळ झालाय एक
दिलीप - काय रे, काय झालं आता..
शैलेश - दिल्ली आणि चेन्नई दोन्ही ठिकाणी नाव वेटिंगला पडलंय. दिल्लीला तिसरा आणि चेन्नईला चौथा नंबर आहे वेटिंगला. आता ॲडमिशन मिळेल असं वाटत नाही तिथे.
दिलीप - होतील की काही ॲडमिशन कॅन्सल. वेटिंग लिस्ट खाली यायची वाट बघू. नाही झालं तर मग दुसरा पर्याय बघू काहीतरी.
शैलेश - नाही ना पप्पा. मला तिथच घ्यायचय ॲडमिशन. तिथे नाही मिळालं तर मी गॅप घेईन एक वर्षाचा आणि पुन्हा देईन परीक्षा.
मुकेश - ऐक शैलेश, माझ्या मित्राचा एक मित्र आहे. तो करेल काहीतरी जुगाड. मेरीट लिस्टला नाही मिळालं तर मॅनेजमेंट कोट्यातून मिळवून देईल तो ॲडमिशन. नको टेन्शन घेऊस.
दिलीप - हा, बघ मुकेश काहीतरी. उगाच पोराचं वर्ष नको वाया जायला. पुन्हा अभ्यास करूनही यश नाही मिळालं तर आणखी निराश व्हायचा तो.
मुकेश - नको टेन्शन घेऊस दिलीप. बघतो.
(मुकेश कॉलवर एका एजंटशी बोलून घेतो. शैलेशला हव्या असलेल्या कॉलेजची नावं एजंटला कळवतो. एजंटकडून मुकेशला १२ लाख रुपयांची जुळणी करायला सांगितली जाते. सोबतच जिथे हवं तिथे ॲडमिशन मिळून जाईल अशी खात्री दिली जाते. मुकेश हे दिलीपला सांगतो.)
दिलीप - मुकेश, १२ लाख म्हणजे जास्तच होतायत रे. कॉलेजची फी ६ लाख आहे. डबल भरायचे म्हटल्यावर कुठून आणायचे एवढे पैसे.
मुकेश - अरे हे फक्त सुरुवातीच्या वर्षालाच भरायचे आहेत. मॅनेजमेंट कोट्याचा रेट १५ लाखांच्या पुढेच आहे. हा आपल्या ओळखीचा आहे म्हणून १२ मध्ये करून देतो काम म्हणाला. तरी मी एकदा बोलून बघतो पुन्हा.
(मुकेश पुन्हा फोनवर बोलतो तेव्हा एजंटकडून ११ लाख रुपये फायनल रक्कम सांगितली जाते.)
दिलीप - ठीक आहे. करतो आता पैशांची जुळणी. शैलेशच्या मामाकडून आणि माझ्या काही मित्राकडून घ्यावे लागतील पैसे. २ दिवसांत करतो हे काम.
मुकेश - हो, जेवढ्या लवकर जमेल तेवढ कर. त्याचे अकाऊंट डिटेल्स पाठवतो मी तुला.
दिलीप - पण होईल न रे काम? काही झोल व्हायचा नाही ना? बघ, कष्टाची कमाई आहे.
मुकेश - बिनधास्त रहा रे. होऊन जाईल काम. जबान आहे आपली.
(दिलीप २ दिवसांत पैशांची जुळणी करतो आणि मुकेशने दिलेल्या अकाऊंटला पाठवतो. त्यानंतर दोघेही एजंटकडून कॉल यायची वाट बघत असतात. ४ दिवस झाले तरी एजंटचा कॉल येत नाही. दिलीप आणि मुकेश मिळून एजंटच्या फोनवर जवळपास ५० हून अधिक वेळा फोन लावतात, पण त्याचा फोन बंद येतो. टेन्शनमध्ये आलेला दिलीप मुकेशवर आरडाओरडा करतो. त्यानंतर ते दोघेही एजंटच्या ऑफिसला जातात. त्या पत्त्यावर गेल्यानंतर त्यांना धक्का बसतो. कारण तिथे त्या एजंटचं किंवा त्याच्या ऑफिसचं काहीच नामोनिशाण नसतं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर ते जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवतात. )
मागील महिनाभरात ॲडमिशन प्रक्रिया सुरू असताना अशा फसवणूकीच्या काही घटना समोर आलेल्या आहेत. हुबेहूब एखाद्या शिक्षणसंस्थेसारखी दिसणारी वेबसाईट तयार करून तिथे स्वतःचा नंबर देऊन समोरच्या व्यक्तीला विश्वासात घेतलं जातं. मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन मिळवून देण्याची बतावणी केली जाते. समोरचा विद्यार्थी किंवा पालक हतबल असल्याचं समजताच जाळं टाकून त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. या पध्दतीच्या फसवणूकीला बळी न पडण्यासाठी सावधानता बाळगण्याची गरज आहे. यामध्ये कॉलेजची वेबसाईट नीट तपासून पाहणे, कॉलेजच्या अधिकृत बँक खात्याशिवाय कुणालाही पैसे ट्रान्सफर न करणे, पैसे घेणारी व्यक्ती संशयास्पद वाटल्यास त्याची चौकशी करणे आणि ॲडमिशन प्रक्रिया व्यवस्थित समजावून घेऊनच पैसे भरणे या गोष्टी करणं गरजेचं आहे. तुमच्या कष्टाचे पैसे योग्य ठिकाणी खर्च व्हावेत आणि पुढील मनस्ताप कमी व्हावा असं वाटत असेल ते ही सावधगिरी बाळगायला हवी.
सायबर गुन्हेगारीचे वेगवेगळे प्रकार मागील काही वर्षांत समोर आलेले आहेत. ऑनलाईन ॲडमिशन किंवा इतर प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना तुमच्या आजूबाजूला घडत असतील तर जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही तक्रार देऊ शकता. ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी crimecyber.pune@nic.in या वेबसाईटची मदत घेऊ शकता. पुण्यातील नागरिकांनी 20 - 297710097, 7058719371 या नंबरवर नागरिकांना आपली तक्रार नोंदवावी असं आवाहन पुणे सायबर पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
