कॉकरोच जनता पार्टीच्या निमित्ताने देशातील वातावरण ढवळून निघालेलं आहे. देशातील तरुणांच्या बाबतीत सरन्यायाधीशांनी केलेल्या टिप्पणीचा उपहासाच्या पद्धतीने निषेध करण्याची एक मोहीम अभिजीत दिपके या तरुणाने सुरू केली आणि अल्पावधीतच त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स मिळाल्यानंतर या मोहिमेने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रश्नावर व्यापक आंदोलन सुरू केलं. देशातील मोठ्या शहरांमध्ये अभिजीत दिपके आणि सहकाऱ्यांनी मिळून जवळपास १० कार्यक्रम घेतले. या आंदोलनातून देशातील शिक्षणव्यवस्था आणि परीक्षा पद्धतीच्या दुरवस्थेला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरण्यात आलं. नीट पेपरफुटीमुळे झालेल्या देशातील वीसहून अधिक तरुणांच्या आत्महत्येची वेदनादायी किनार या आंदोलनाला होती. २० जून पासून कॉकरोच जनता पार्टीने जंतरमंतरवर धरणं आंदोलन सुरू केलं.
तरुणांच्या या लढ्याला शिक्षण आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचा सुरुवातीपासूनच पाठिंबा होता. सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यानंतर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचूक यांनी २८ जूनपासून अन्नत्याग उपोषण सुरू केलं. लेख लिहीत असताना दिल्ली पोलिसांनी वांगचूक यांना उपोषण ठिकाणाहून जबरदस्तीने उचलून रुग्णालयात नेलं. त्याआधी देशभरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, विरोधी पक्षातील लोक, विद्यार्थी, सेलिब्रिटी आणि सामान्य नागरिक यांचा पाठिंबा सोनंम वांगचूक यांना मिळू लागला होता. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २० जुलै रोजी जंतरमंतर ते संसद असा शांततापूर्ण मोर्चा काढण्याचं आवाहन सोनम वांगचूक यांनी केलं होतं. त्याला लोकांचा प्रत्यक्ष आणि सोशल मीडियातून चांगला प्रतिसाद मिळत होता. या मोर्चाआधीच सरकारने वांगचूक यांना उचलून नेलं. अभिजीत दिपकेने या घटनेनंतर स्वतः उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा - आधी स्वामी सानंद.. आता सोनम वांगचुक?
मागील दोन महिन्यांपासून या सगळ्या घडामोडी घडत असताना कॉकरोच जनता पार्टीला धरून लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न होते. संभ्रम होता. या पार्श्वभूमीवर तरुणांच्या मनात नेमकं काय चाललय, हे समजून घेण्यासाठी आम्ही एक प्रश्नावली तयार केली. पुणे शहरात शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने येणारे लाखों तरुण-तरुणी आहेत. त्यापैकी निवडक तरुण-तरुणींच्या मनावर कॉकरोच जनता पार्टीचा नेमका काय परिणाम होतोय हे आम्ही या प्रश्नावलीतून समजून घेतलं. कॉलेज कट्टा, चहाचे स्टॉल, मैदानं आणि इतर सार्वजनिक ठिकाणांवर भेटलेले तरुण-तरुणी आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया ग्रुपवर असणारी तरुण मंडळी अशा सुमारे शंभर जणांकडून ही प्रश्नावली भरुन घेण्यात आली. १५ ते ४० वर्षं वयोगटातील तरुणांच्या मनाचा कल या प्रश्नावलीच्या उत्तरांमधून समजून घेतला गेला.
या चाचपणीमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला ८९% तरुण पाठिंबा देत आहेत, असं लक्षात आलं. आंदोलन जरी कॉक्रोच जनता पार्टीतर्फे चालू असलं, तरी सोनम वांगचूक हे या आंदोलनाचा चेहरा असल्यामुळे आंदोलनाला मोठा पाठिंबा दिसत असल्याचं तरुणांशी बोलल्यानंतर लक्षात येतंय.
शिक्षणव्यवस्थेतील अनागोंदी या मुद्द्यावर हे आंदोलन चालू आहे. परीक्षा वेळेत होत नाहीत, झाल्या तर निकाल लागायला आणि नियुक्ती मिळायला वर्षं निघून जातात, अनेकदा महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर फुटतात. यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्षं वाया जातंच, शिवाय मानसिक ताणामुळे विद्यार्थी आत्महत्याही करतात. याच मुद्द्याला अनुसरून विचारलेल्या 'देशातील शिक्षणव्यवस्थेचा दर्जा घसरला आहे का', या प्रश्नावर ९५% तरुणांनी 'हो' असं उत्तर दिलं आहे. पहिल्या प्रश्नाच्या उत्तरापेक्षा ही आकडेवारी ६ टक्क्यांनी जास्त आहे. म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा न देणाऱ्या लोकांपैकी काहींचं या देशातील शिक्षणव्यवस्थेचा दर्जा घसरला आहे यावर एकमत आहे.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलक तीव्रतेने करताहेत. सर्व्हेत सहभागी असलेल्या ९४% तरुणांचंही प्रधानांनी राजीनामा द्यायला हवा, असंच मत आहे.
हेही वाचा - ‘कॉक्रोच जनता पार्टी’ – जेन झी म्हणतेय ग्राऊंडवर उतरा
प्रधानांच्या राजीनाम्याने शिक्षण व्यवस्थेत असा काय फरक पडणार, असा प्रश्नही अनेकांना पडलेला आहे. प्रधान गेले की त्या जागेवर दुसरं कुणीतरी येईल, त्यामुळे व्यवस्था कशी बदलेल, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. हाच प्रश्न तरुणांना विचारला, तेव्हा प्रधानांचा राजीनामा घेतला तरी शिक्षणव्यवस्थेत काहीच बदल होणार नाही असं ५५% तरुणांचं मत आहे. तर ४५% तरुणांच्या मते प्रधानांच्या राजीनाम्यामुळे आणि आंदोलनाच्या तीव्रतेमुळे शिक्षणव्यवस्थेतील मूलभूत बदलासाठी किमान सुरुवात होईल,असं त्यांना वाटतं.
कॉकरोच जनता पार्टी म्हणजे सोशल मीडियावर तयार केलेला फुगा आहे. त्यांचं जमिनीवर काही नेटवर्क नाही किंवा त्यांच्याकडे स्वतःची अशी विचारसारणी नाही, अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. वेगवेगळ्या शहरांत झालेल्या सभांना गर्दी जमवून अभिजित दिपकेने हा प्रचार खोडण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र लोकांमध्ये अजूनही कॉकरोच जनता पार्टी म्हणजे केवळ सोशल मीडिया सेन्सेशनच आहे. याबद्दल विचारलं असता कॉकरोच जनता पार्टीचा प्रभाव जमिनीवर नाही असं जवळपास ७३% तरुणांना वाटलं. मात्र असं असलं तरी विद्यार्थ्यांचे प्रश्न कॉकरोच जनता पार्टी प्रभावीपणे मांडते, या मुद्द्याशी ७५% तरुण सहमत आहेत.
कॉकरोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांच्या निमित्ताने लोकांना २०११ साली झालेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाची आठवण झाली. कॉकरोच आंदोलनसुद्धा त्याच प्रकारातील आहे असा म्हणणारा एक गट समाजात आहे. मात्र ८१% तरुणांच्या मते कॉकरोच आंदोलनाची तुलना अण्णा आंदोलनाशी करणं चुकीचं आहे. हे पूर्णतः वेगळं आंदोलन असून फक्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहेत, अशी तरुणांची धारणा आहे.
एखादं आंदोलन जोर धरू लागलं की त्याविषयी कुत्सित प्रतिक्रिया देणं किंवा बदनामीचा प्रयत्न सुरू होतो. कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपकेच्या बाबतीतही तसे प्रयत्न झालेच. अभिजितला मोदी-शहांचा सपोर्ट आहे, अन्यथा त्याला अमेरिकेतून आल्यावरच अटक केली असती, त्याचं आंदोलनच होऊ दिलं नसतं अशी चर्चा लोकांमध्ये होती. अभिजितने आधी आम आदमी पार्टीचं काम केलंय, म्हणून त्याला 'आप'चा हस्तक ठरवलं. तर तो वारंवार राहुल गांधींच्या विरोधात बोलतो म्हणून त्याला संघ-भाजपचा हस्तक ठरवलं. मात्र तरुणांना असं काही वाटत नाही. जवळपास ८६% तरुणांना अभिजित भाजपला किंवा अन्य कुणाला पूरक काम करतोय असं वाटत नाही. त्याचा स्वतंत्र विचार असून आता तो फक्त विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढतोय, अशी तरुणांची भावना आहे.
हेही वाचा - कॉक्रोच आंदोलनामुळे निर्माण झालेले प्रश्न
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या सुरुवातीच्या दिवसात विरोधी पक्षांनी स्वतःला कॉकरोच जनता पार्टी किंवा सोनम वांगचुक यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवलं होत. १० जुलैनंतर मात्र आधी अन्य विरोधी पक्ष व नंतर काँग्रेसनेही सोनम वांगचुक यांना पाठिंबा जाहीर केला. विद्यार्थ्यांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जाण्यासाठी विरोधी पक्षांनी कॉकरोच जनता पार्टीला साथ द्यावी, असं ९०% तरुणांना वाटतंय.
सरकारने नरमाईची भूमिका घेतली नाही तर तीन आठवड्याहून जास्त काळ उपाशी असलेल्या सोनम वांगचुक यांच्या जीवाला धोका आहे, असं अनेक डॉक्टर सांगताहेत. उपोषण कालावधीत वांगचुक यांचं वजनही ८ किलोने कमी झालं आहे. देशासाठी वांगचुक यांनी दिलेलं योगदान मोठं असून त्यांच्यासारख्या माणसाचा उपोषण करताना नाहक बळी जायला नको, अशी भावना देशातील अनेकांची आहे. त्यामुळे सरकारने प्रतिसाद न दिल्यास वांगचुक यांनी उपोषण थांबवावं आणि वेगळ्या मार्गाने लढा सुरू ठेवावा, असं ६४% तरुणांना वाटतंय.
कमी कालावधीत भरपूर पाठिंबा मिळालेल्या कॉकरोच जनता पार्टीने सक्रिय राजकारणात भाग घ्यायला हवा का, असं विचारलं, तेव्हा ५४% तरुणांनी त्याला सकारात्मक उत्तर दिलं. सोशल मीडिया फॉलोअर्स आणि लढा देण्याची चिवट वृत्ती या गोष्टींचा विचार करता कॉकरोच जनता पार्टी चांगलं राजकारण करेल, असा विश्वास या तरुणांना आहे.
एकंदरीतच कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. प्रत्येकालाच आंदोलनात सहभागी होता येत नसलं तरी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, शिक्षणव्यवस्थेतील बदल,विरोधी पक्षांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर एकत्र लढणं या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तरुणांचं एकमत आहे. एखाद्या व्यवस्थेविरोधात दीर्घकालीन लढाई लढत असताना हे एकमत किती टिकाव धरत, यावर त्या आंदोलनाच्या यशापयशाचं मोजमाप पुढे करता येईल.
टीम युनिक फीचर्स पोर्टल | 9156308310 | uniquefeatures.portal@gmail.com
टीम युनिक फीचर्स पोर्टल
