आम्ही कोण?
लेखमालिका : ऑनलाईन फ्रॉड : रोज नवा अध्याय

'लोन' ॲपपासून सावधान!

  • योगेश जगताप
  • 22.05.25
  • वाचनवेळ 3 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
loan app

अजिंक्य त्याच्या जवळच्या मित्राला फोन लावतो.

अजिंक्य : सिद्धार्थ, माझ्या मैत्रिणीला ५ हजार रुपये लागतायत अर्जंट. क्लासची फी भरायचीये तिला. एका महिन्यात परत देतो. देशील का ५ हजार?

सिद्धार्थ : अरे आज्या, काय सांगू तुला माझी परिस्थिती. दोन महिने झाले काम नाही. माझ्याच उधाऱ्या झाल्यात लोकांकडं.

अजिंक्य : बघ ना यार सिद्ध्या, काहीतरी जुगाड कर.

सिद्धार्थ : खरंच नाही रे. पण एक आयडिया आहे. मोबाईल ॲपवरून लोन घेतो का? माझ्या मित्रांनी घेतलंय लोन. १५ दिवस ते तीन महिन्यांपर्यंत कर्ज फेडून टाकायचं.

अजिंक्य : खरंच?

सिद्धार्थ : तुला खोटं वाटतंय तर लिंक पाठवतो. जाऊन बघ!

अजिंक्यने त्या लिंकवरून ॲप डाउनलोड केलं. विनाकटकट त्याला ८ हजार रुपयांचं कर्ज मिळालं. अजिंक्य एकदम खूष झाला. कर्ज फेडायला त्याला तीन महिन्यांचा वेळ मिळाला. ॲपमध्ये माहिती भरताना अजिंक्यने बँक अकाऊंट नंबर, आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर दिला. याशिवाय त्या ॲपला कॉन्टॅक्ट आणि गॅलरी वापरण्याची परवानगीही देऊन टाकली. अजिंक्यने तीन महिन्यात कर्जाचे सगळे हप्ते व्यवस्थित भरले. मात्र चौथ्या महिन्यात मित्रांच्या आलेल्या वॉटसॲप मेसेजने तो गांगरून गेला. ते मेसेज असे होते..

"लेका कर्ज घेतलं तू. ते लोक माझ्याकडे का पैसे मागतायत? वर सांगतायत तू फोन उचलत नाहीये."

"अजिंक्य, तुला मी माझा चांगला मित्र समजायचे. मी तुझ्यासोबत काढलेला फोटो बाहेर कुणालाही दाखवू नको असं सांगितलं होतं. एका अनोळखी नंबरवरून तोच फोटो दाखवून कर्जाचे पैसे मागतायत माझ्याकडे.”

या मेसेजेसने अजिंक्य गोंधळून गेला. त्याला काय करावं सुचेना. आपण तर सगळं कर्ज फेडलय, मग हा काय प्रकार आहे हे त्याला कळेना. मग तो त्याच्या माहीतगार असलेला मित्र दीपककडे गेला. दीपक अनेक वर्षं पोलीसमित्र म्हणून काम करतो. त्याला ऑनलाईन गुन्ह्यांबाबत बरीच माहिती असते. दीपक घडला प्रकार ऐकून घेतो.

दीपक : अरे अज्या. सध्या कर्ज देण्याऱ्या ऍपचा सुळसुळाट झालाय. लोकांना पैशांची अडचण भासली की ‘कमी कागदपत्रात झटपट लोन' देणाऱ्या ॲपकडे वळतात. पैसे अकाउंटला जमा होतात, लोक परतफेडही करतात. पण खरा त्रास त्यानंतर होतो. कारण त्या ॲपला आपण गॅलरी आणि कॉन्टॅक्ट वापरायची परवानगी दिलेली असते. आपल्या मोबाईलमधले कॉन्टॅक्ट वापरून, फोटो वापरून आपल्याच मित्रांना खोटे मेसेज केले जातात. पैसे मागितले जातात. आपण जर रिस्पॉन्स नाही दिला तर ते गप्प बसतात. पण घाबरलो की आपली लुबाडणूक होते. त्यामुळे तू घाबरून जाऊ नको.

अजिंक्य : असा लोचा आहे होय. ज्याने मेसेजेस केले त्याला धरतोच!

दीपक : थंड घे! असे सापडत नसतात ते लोक. ते काम पोलिसांना करू दे. तू आधी तुझ्या सोशलमीडिया अकाउंटवरून सगळ्या मित्र-मंडळींना, नातेवाईकांना सांग की तुझ्या नावे कुणी पैसे मागितले तर देऊ नका. त्यानंतर मग सायबर क्राईम विभागात जाऊन रीतसर तक्रार दे. आणि कितीही तंगी असली तरी अशा झटपट पैशांच्या नादाला परत लागू नको.

अजिंक्य : नाही भावा. घोडचूक झाली. परत असं काही करत नसतो मी. पण आभारी आहे भावा. महत्त्वाची माहिती दिलीस.

या प्रकरणातून अजिंक्यने धडा शिकला. असा प्रकार तुमच्या आजूबाजूला घडत असेल तर तुम्हीही सावध राहा. इतरांनाही याबाबत जागरूक करा.

योगेश जगताप | 9561190500 | yogeshjagtap8819@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results