आम्ही कोण?
ले 

कॉक्रोच आंदोलनात अवतरली जेन झी भाषा!

  • टीम युनिक फीचर्स पोर्टल
  • 20.07.26
  • वाचनवेळ 3 मि.
cjp protest posters

नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी भारतभर मोर्चे आयोजित केल्यानंतर २० जूनला, म्हणजे महिन्याभरापूर्वी कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके आणि इतर तरुण मंडळींनी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन सुरू केलं. तरुणांच्या या आंदोलनाला साथ देत सोनम वांगचुक यांनी सुरू केलेलं उपोषण, संसदेवर मोर्चा काढण्याची हाक, वांगचुक यांना जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये दाखल करणं आणि एकूणच पोलिसांची दडपशाही अशी नाना वळणं या आंदोलनाने महिन्याभरात घेतली. पण या काळात आंदोलनातल्या आणखी एका गोष्टीकडे देशाचं लक्ष वेधलं गेलं, ती म्हणजे या तरुण मंडळींनी जुन्या चाकोरीला छेद देत डोकं लढवून काढलेल्या घोषणा आणि पोस्टर्स. एरवी राजकीय पक्षांच्या आंदोलनांमध्ये बघायला न मिळणारी कल्पकता आणि भाषा या आंदोलनातून समोर आली. त्यातील काही शब्द आक्षेपार्ह वाटू शकतात, भाषा आक्रमक वाटू शकते. पण तरुणांच्या मनात काय खदखदतंय याची झलक त्यातून बघायला मिळते. म्हणून त्यातील काही निवडक घोषणा आणि पोस्टर्सची दखल घेण्याचा हा प्रयत्न. 

cjp protest posters cjp protest posters cjp protest posters

या आंदोलनात पेपरफुटीबद्दलच्या सरकारच्या भूमिकेवर सर्वात जास्त चर्चा झाल्याचं पाहायला मिळतं. सरकारच्या भूमिकेवर टीका करणारे, त्यांना त्यांच्या कर्तव्याची आठवणी करून देणारी पोस्टर्स सर्वात जास्त झळकताना दिसली. संविधान, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहिद भगतसिंग यांच्या विचार आणि फोटोंचे कटआउट्स असणारे पोस्टर्स, बॅनर्स आणि टी- शर्ट्स आंदोलनात प्रामुख्याने दिसत आहेत. सोबतच जय भीम, इन्कलाब झिंदाबाद, संविधान झिंदाबादच्या घोषणा आंदोलनाच्या केंद्रस्थानी होत्या.

cjp protest posters cjp protest posters cjp protest posters cjp protest posters

कॉक्रोच जनता पार्टीचं हे आंदोलन कुण्या राजकीय पक्षाशी निगडित नाही. त्यामुळे तरुणांची रोजच्या जगण्यातली भाषाच या आंदोलनाची भाषा आहे. राजकीय पक्ष जसं बोलतात किंवा आंदोलन करतात तसं स्वरूप इथे पाहायला मिळालं नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी या तरुण आंदोलनकर्त्यांची मागणी होती. पण त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे बॅनर्सदेखील आंदोलनकर्त्यांच्या हाती दिसत होते. सरकारवर होणाऱ्या टीकेचा जोर प्रचंड होता. त्यातही या दोन नेत्यांवर सभ्यता ओलांडून टीका करणारी काही पोस्टर्सही बघायला मिळाली. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, नरेंद्र मोदी इस्तीफा दो, मोदी सरकार डरती है-पोलीस को आगे करती है अशा घोषणाही मोठ्या आवाजात दुमदुमत होत्या. 

cjp protest posters cjp protest posters cjp protest posters cjp protest posters

आत्ताची तरुण पिढी नेमकी कशी आहे याची प्रचिती देणारी अनेक पोस्टर्स पाहायला मिळाली. आम्ही मागे हटणार नाही, सरकारने चुकीच्या पिढीशी पंगा घेतलाय अशा आशयाचे पोस्टर्स घेऊन मुलं-मुली उभे होते. अनेक तरुण-तरुणी आंदोलनस्थळीच पोस्टर्स रंगवताना दिसून येत होती. 

cjp protest posters

तरुण पिढीचा विक्रमी सहभाग हे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य. त्यामुळे आंदोलनस्थळावरच्या बॅनर्स आणि पोस्टर्समध्ये तरुण जेन-झी पिढीच्या सर्जनशीलतेची झलक दिसून आली. शब्दांची फोड करून त्यातून नवा शब्द बनवण्याची पंतप्रधानाची सवय आहे. त्या सवयीची नक्कल करणारे अनेक बॅनर्स आंदोलनकर्त्यांच्या हाती दिसत आहेत. तरुणांनी मोदी, आयपीएल अशा शब्दांची फोड करून आपल्याला हवी तशी (अर्थातच टीकात्मक) मांडणी केल्याचं दिसत होतं.

cjp protest posters cjp protest posters cjp protest posters

या आंदोलंनात सोशल मीडियावरील मीम्सचीही चलती होती. सरकारवर व्यंगात्मक टीका करणारे अनेक मीम्स पोस्टर्सवर उतरल्याचं दिसलं. या व्यतिरिक्त जंतर मंतरच्या परिसरात आंदोलनाशी निगडित अनेक बॅनर्स लावली गेली आहेत, ज्यावर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनांच्या मागण्या, सरकारविरोधी घोषणा, संविधानाचे फोटो, नीट पेपरफुटीमुळे प्राणत्याग करणाऱ्या तरुणांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर्सदेखील उभारले गेले आहेत.

cjp protest posters cjp protest posters cjp protest posters cjp protest posters cjp protest posters cjp protest posters

एकंदरीत, या आंदोलनातील पोस्टर्स आणि घोषणांमधून केवळ सरकारविरोधातील संतापच नव्हे, तर तरुण पिढीची अफाट कल्पकता आणि सजगताही दिसून आली. प्रस्थापित राजकीय चौकटी मोडून तरुणाई आपल्या रोजच्या जगण्यातील भाषा, मीम्सचा वापर करून आंदोलनाचा-विरोधाचा नवा मार्ग शोधू पाहतेय असं दिसलं. पोस्टर्स आणि घोषणांपलीकडचं या वेगळेपणाचं आणखी एक उदाहरण म्हणजे सोमवारी सकाळी आंदोलनावर लाठी चार्ज करणाऱ्या पोलिसांना ही तरुण मंडळी ‘मेलडी’चं वाटप करताना दिसली. या मेलडीचा संदर्भ वेगळा सांगण्याची गरज नाहीच!

cjp protest posters cjp protest posters

टीम युनिक फीचर्स पोर्टल | 9156308310 | uniquefeatures.portal@gmail.com

टीम युनिक फीचर्स पोर्टल







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results