कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला देशभरातल्या तरुणांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिलाय. ही जेन झी पिढी आपली हटके स्टाइल, हटके भाषा घेऊन आंदोलनात उतरली. लाठीहल्ला, अश्रुधूर, धमक्या या कशालाही न डरता मुलं डटून राहिली. त्यांच्या निर्भयतेपुढे, कल्पकतेपुढे सरकारही नमल्याचं सध्या तरी दिसतंय.
हा हा म्हणता दिल्लीतल्या आंदोलनाचं लोण देशभर पोहोचलं आहे. पुण्यात गेल्या आठवड्यात कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने तीन, तर इतर विद्यार्थी संघटनांच्या मदतीने चार मोर्चे काढले गेले. या प्रत्येक मोर्चाला तरुणांसोबतच त्यांच्या पालकांनीही तुफान प्रतिसाद दिला. त्यात अर्थातच जेन झींची (२७ वर्षांखालील तरुण मुलं-मुली) उपस्थिती लक्षणीय होती. शुक्रवारी पुण्यात शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चामध्ये जवळपास १० हजार तरुण मंडळी पावसाची पर्वा न करता सहभागी झाली होती. दिल्लीतील तरुणांच्या आंदोलनाचं प्रतिबिंब या मोर्चामध्ये दिसून आलं.
२१ वर्षांची इकरा डेंटिस्ट बनण्याचं शिक्षण घेत आहे. ती पाच-सहा मैत्रिणींसोबत मोर्चात सहभागी झाली होती. या सगळ्यांचाच आयुष्यातला हा पहिलाच मोर्चा होता. मोर्चात सहभागी व्हावं असं का वाटलं हे विचारल्यावर इकरा म्हणाली, ‘‘दिल्लीत तरुणांना झालेली मारहाण पाहून आम्हाला खूप वाईट वाटलं. मी स्वतः ‘नीट’ची परीक्षा दिली आहे. त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे आम्हाला माहीत आहे. सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाया जातो. मानसिक स्वास्थ्य बिघडतं. मात्र सरकार त्याची कसलीही जबाबदारी घेत नाही. महिनाभर आंदोलन करूनही सरकार त्याकडे लक्ष देत नाही, याचं वाईट वाटलं. म्हणून आम्ही मोर्चात सहभागी व्हायचं ठरवलं.’’
हेही वाचा - जेन झींनी एका दिवसात देशाला काय दिलं?
२२ वर्षांचा शुभम सध्या पिंपरीमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय. तो त्याच्या दोघा मित्रांसोबत मोर्चाला आला होता. तो म्हणाला, ‘‘पोरांनी राजीनामाच तर मागितला होता, जीव नाही. मग एवढा वेळ का लावला? ज्या निष्पाप मुलांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबियांची विचारपूससुद्धा सरकारमधील लोक करू शकले नाहीत. महिनाभर आंदोलन केल्यानंतर आम्ही दोषींवर कडक कारवाई करू, एवढंच पंतप्रधान म्हणतायत. ते महिनाभर काहीच का बोलले नाहीत? सरकारच्या ज्या गोष्टी पटत नाहीत त्याविषयी आम्ही बोलत राहणार. आमच्यासाठी कुठलाही पक्ष महत्त्वाचा नाही. आम्हाला महत्त्वाचं आहे आमचं चांगलं जगणं.’’
तरुणांच्या या मोर्चात वेगळीच ऊर्जा जाणवत होती. बहुतांश जण कोणत्याही राजकीय विचारसरणीला बांधील नव्हते. पण त्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत त्यांना माहिती होती आणि त्यावर व्यक्त होण्याचं भानही होतं. अलीकडेच बारावीची परीक्षा दिलेली अमूल्या सांगत होती, ‘‘मोर्चाला यायच्या आधी घरची लोकांनी पोलिसांच्या फटक्यांची भीती दाखवली. पण मी त्यांना सांगितलं, आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी माझी दिल्लीलाही जायची तयारी आहे. तिथे जे काही होईल, ते सहन करण्याचीही तयारी आहे. मारलं तर मारूदेत. मी काही चुकीचं करत नाही एवढं मला माहितीय आणि तेवढं बास आहे.’’ अमूल्याचं घर भाजप समर्थक असल्याचं ती सांगत होती.
कॉक्रोच पार्टीचं आंदोलन सुरू झाल्यापासून घरच्यांचं म्हणणं-काँग्रेसच्या काळात पेपर फुटले नव्हते का, आंदोलनाच्या स्टेजवर देव-धर्माचा अपमान करणारे लोक आहेत, पेपरफुटीसाठी दोषी असणाऱ्या लोकांवर कारवाई करणार असतील तर शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा कशाला हवा वगैरे वगैरे..पण त्याकडे लक्ष न देता अमूल्या या मोर्चात सामील झाली होती.
अमूल्याची मैत्रीण समीक्षाही सोबत होती. ती म्हणाली, ‘‘इन्स्टाग्राम अकाऊंट उघडलं की मला आंदोलनाचंच फीड येतं. ते पाहिलं की दिल्लीला जायची इच्छा होतेय. ते शक्य नव्हतं. त्यामुळे पुण्यात तरी जायलाच पाहिजे म्हणून मी इथे आले.’’
हेही वाचा - सीजेपी आंदोलन आणि सरकारचा लाठीहल्ला : काय म्हणतोय जागतिक मीडिया?
मोर्चात सहभागी झालेल्या तरुणांनी दिल्लीप्रमाणचे हजारो पोस्टर्स बनवून आणली होती. मराठी-हिंदी-इंग्रजी अशा सगळ्या भाषांमधली, ही पोस्टर्स होती. सोशल मीडियावरील मिम्स, चित्रपटातील डायलॉग, डिजिटल व्हायरल कंटेंटचा वापर केलेला होता. त्या जोडीने पोरं त्वेषाने घोषणासुद्धा देत होती. इंकलाब जिंदाबाद, जय भीम, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, नरेंद्र मोदी इस्तीफा दो, मोदी तेरी तानाशाही नही चलेगी, जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है, जब जब मोदी डरता है, हिंदू-मुस्लिम करता है, कितना गम है गोली मै तेरे, देखा है, अब देखेंगे, ये अंदर की बात है, पुलिस हमारे साथ है, हम लेके रहेंगे आझादी या आणि अशा कित्येक घोषणा तरुणांच्या तोंडी होत्या. इथे लिहिता येणार नाही अशा शिवराळ भाषेत मंत्र्यांची खिल्ली उडवली जात होती. तरुणांच्या मनातली चीड त्या घोषणांमधून जाणवत होती. पोलिसांच्या समोरही ही तरुण मंडळी कुठलीही भीडभाड न बाळगता या घोषणा देत होते.
तरुणांच्या या गर्दीला कुठलाही राजकीय चेहरा नव्हता. कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा या मोर्चात पहायला मिळाला नाही. विद्यार्थी संघटनांचे काही कार्यकर्ते, सिनेमा-नाटक-पत्रकारिता क्षेत्रातील तरुण आणि ज्येष्ठ मंडळी या मोर्चात सहभागी होती. पण मोर्चाचं नेतृत्व त्यांच्याकडे, नव्हे तर सर्वसामान्य जेन झी तरुणांकडे असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. तरुणांचे वेगवेगळे गट गाणी म्हणत होते, घोषणा देत होते, हलगीच्या ठेक्यावर नाचत होते. रस्त्याच्या कडेला उभे असणारे सामान्य नागरिक या सगळ्या गोष्टी मोबाईलवर टिपून घेत होते. मोर्चात सहभागी झालेल्यांकडे कुतूहलाने बघत होते.
हेही वाचा - कॉकरोच आंदोलनाविषयी तरुण काय विचार करतात?
मोर्चात सहभागी झालेली २६ वर्षीय अनन्या ही कायद्याची विद्यार्थिनी. साहजिकच तिच्याशी बोलताना वकिली पेशाचा आणि ज्यामुळे कॉक्रोच पार्टीची ठिणगी पडली त्या सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या विधानाचा विषय निघाला. ती म्हणाली, ‘‘वकिलाचं काम न्याय मिळवून देण्याचं आहे. मी स्वतःसुद्धा त्यासाठीच लॉ करतेय. पण आता न्यायव्यवस्थादेखील तरुणांना न्याय देण्यात अपयशी ठरतेय. म्हणूनच मला या मोर्चात सहभागी व्हावं असं वाटलं. सरन्यायाधीशांनी तरुणांना झुरळ म्हणणं हे तर धक्कादायक होतंच, पण आता आंदोलनात तरुणांना मारहाण झाली, त्याचे व्हिडिओ बघायला आम्हाला वेळ नाही, असं ते म्हणतात. देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्ती असं कसं वागू शकते, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.’’
२५ वर्षांचा अनुप स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय. तो मराठवड्यातल्या परभणीचा. गेल्या तीन वर्षांपासून तो विविध स्पर्धा परीक्षा देतोय. दोन-तीन पेपर फुटण्याचा अनुभव त्यालाही आहेच. तो म्हणाला, ‘‘पेपर फुटतो तेव्हा केलेली मेहनत वाया जाते. घरचे आणि समाजातले कायम आशेने विचारत राहतात, नोकरीचं काय, सेटल व्हायचं काय? या सगळ्यांना काय उत्तर द्यायचं? देशभरातल्या मंत्र्यांची-उद्योगपतींची मुलं परदेशातल्या चांगल्या कॉलेजमध्ये शिकतात. शेतकरी-शेतमजूर आणि कामगारांच्या मुलांसाठी मात्र तालुका-जिल्हा सोडून शहरात शिक्षणासाठी जाणं हीच मोठी अचिव्हमेंट असते. त्यातही चांगलं शिक्षण मिळालं नाही, पेपर फुटत राहिले तर आमच्या गरीब पालकांनी कुठवर पैशाची जुळणी करायची? या सगळ्याचं उत्तर सरकारने द्यायला हवं.’’
हेही वाचा - ‘कॉक्रोच जनता पार्टी’ – जेन झी म्हणतेय ग्राऊंडवर उतरा
या मोर्चामध्ये जेन झीसोबत त्यांचे पालक होते. सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते होते. अभिनेते होते. हमीद दलवाई रिसर्च फाउंडेशनच्या इला दलवाई, अभिनेता ओंकार गोवर्धन, अभिनेत्री गौरी देशपांडे, रॅपर संबाटा ही त्यातली काही नावं. ‘‘ही तरुणांची लढाई आहे, त्यांनी ज्या मेहनतीने हा लढा दिला आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे आणि या सगळ्याचं क्रेडिटही त्यांचंच आहे,’’ अशीच या सगळ्यांची भावना होती.
कॉक्रोच जनता पार्टी सुरू झाल्यानंतर आणि सोशल मीडियावर तिला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर हे तरुण रस्त्यावर उतरतील का याबद्दल सर्वांनाच शंका वाटत होती. पण दिल्लीतल्याच नव्हे, तर देशातल्या विविध शहरांमध्ये रस्त्यावर उतरून जेन झींनी ही शंका फेडली. सरकारच्या विरोधात बोलता येऊ शकतं, हे या मुलांनी दाखवून दिलं. चाकोरी मोडून डोकी लढवून आंदोलन यशस्वी करता येतं हेही दाखवून दिलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापेक्षाही हे यश अधिक महत्त्वाचं आहे.
योगेश जगताप | 9561190500 | yogeshjagtap8819@gmail.com
योगेश जगताप हे युनिक फीचर्समध्ये संपादकीय विभागात कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर माहितीपर रिपोर्ताज करण्यासोबतच कष्टकरी आणि तरुणांसाठी काम करणाऱ्या धडपड्या व्यक्तींबद्दल लिहिण्यात त्यांना रस आहे.
