आम्ही कोण?
ले 

सीजेपी आंदोलन आणि सरकारचा लाठीहल्ला : काय म्हणतोय जागतिक मीडिया?

  • मन्सूर मुल्ला, मयूर पटारे
  • 24.07.26
  • वाचनवेळ 7 मि.
int media on cjp

जगभर भारताची प्रतिमा ‘सर्वांत मोठा लोकशाही देश' अशी आहे. जगातील अनेक गरीब आणि विकसनशील देशांत लोकशाही व्यवस्था डळमळीत झाल्या; पण भारताने लोकशाही टिकवून ठेवली याबद्दल जगात भारताला मोठा मान आहे. पण गेल्या काही वर्षांत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जागतिक क्रमवारीत भारताचा क्रमांक बराच खाली गेला आहे. नाना पद्धतींनी लोकशाहीची गळचेपी चालू आहे असं देशात बोललं जात आहे. जगातल्या काही माध्यमांमध्येही हे मत व्यक्त झालेलं आहे. पण पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे, नेत्यांसोबतचे त्यांचे संबंध आणि अनिवासी भारतीयांमधील त्यांची लोकप्रियता यांमुळे या गळचेपीबद्दलची चर्चा मागे पडली होती. मात्र कॉक्रेोच पार्टीच्या आंदोलनामुळे आणि २० तारखेला आंदोलनातील तरुण मुलांना झालेल्या अमानुष मारहाणीमुळे जगभरातील माध्यमं भारतीय लोकशाहीबद्दल लिहू-बोलू लागली आहेत. युरोप-अमेरिकेपासून चीन-जपानपर्यंत सगळीकडे भारतातील घडामोडींचे पडसाद उमटत आहेत. त्यातून भारताच्या प्रस्थापित प्रतिमेला तडे जात आहेत.

हेही वाचा - जेन झींनी एका दिवसात देशाला काय दिलं?

बीबीसी, अल जझीरा, द न्यूयॉर्क टाइम्स, द गार्डियन, द वॉशिंग्टन पोस्ट आणि डी डब्ल्यू न्यूज या जगातील मोठ्या आणि आघाडीवरील माध्यमं या सर्वांचं भारतातील घडामोडींवर बारीक लक्ष आहे, हे त्यांनी केलेल्या वार्तांकनातून कळत आहे. इंग्लंडच्या ‘द गार्डियन'ने संसद मोर्चा वर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर या आंदोलनाची गंभीर दखल घेतली आणि त्यांच्या डिजिटल पोर्टलवर याबाबत विस्तृत बातम्या दिल्या. विद्यार्थ्यांच्या संसद मोर्चावेळी घडलेल्या घटनांचा उहापोह या बातम्यांत करण्यात आलाय. कॉक्रोच जनता पार्टीच्या स्थापनेमागची पार्श्वभूमी आणि आंदोलनांच्या मागण्या सविस्तर समजून सांगणारा लेख, सोनम वांगचुक यांचं उपोषण, त्या उपोषणावरील पोलिसांची दडपशाही, संसद मोर्चा, राहुल गांधींचं पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलन या सगळ्यांची दखल घेत या घटनांचं सविस्तरपणे वार्तांकन केलं गेलं. सर्वात महत्त् वाचं म्हणजे या आंदोलनामागे तिथे जमलेल्या तरुणांच्या भावना टिपल्या गेल्या. आंदोलनामागची कारणं, तरुणांचा निर्धार आणि पोलिसांच्या लाठीचाराबद्दलची आपबिती सांगणारे अनेक अनुभव या वार्तांकनात नोंदवले गेलेत. विद्यार्थ्यांवर पोलिसी अत्याचार होत असताना मोदी मात्र या सर्व प्रकरणावर गप्प आहेत, असं निरीक्षणही या वृत्तांत नोंदवलं गेलं आहे.

cjp protest posters

ब्रिटिश वृत्तसंस्था 'बीबीसी'ने या आंदोलनाला अतिशय गंभीरपणे कव्हर केलेलं दिसतंय. सोशल मीडियावर सुरू झालेली ही चळवळ आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून एका मोठ्या युवा आंदोलनाचं स्वरूप घेतेय, असं बीबीसीने आपल्या वृत्तांकनातून आधीच नोंदवलं होतं. दिल्लीच्या जंतर-मंतरवर जमा झालेल्या हजारो तरुणांना बीबीसीने ग्राउंड रिपोर्टिंगद्वारे जगासमोर आणलं. आंदोलकांनी चेहऱ्यावर कॉक्रोचचे मुखवटे लावणं, हातात पुस्तकं आणि तिरंगा घेऊन निदर्शनं करणं वगैरे कृतींतून तरुणांमधील पेपर लीक, नीट, स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार, बेरोजगारी आणि शिक्षण क्षेत्रातील गोंधळ याबद्दलचा राग स्पष्ट होतोय, असं बीबीसीनं म्हटलंय. या आंदोलनावर झालेला पोलीस लाठीमार, अश्रूधूर आणि आंदोलकांच्या अटकेचीही बीबीसीने दखल घेतली. सत्ताधाऱ्यांकडून या आंदोलनाला राजकीय टवाळी किंवा विरोधकांचे षड्यंत्र ठरवण्याचा प्रयत्न झाला तरी हा ‘सामान्य युवा आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त आवाज' आहे, असं बीबीसीने अधोरेखित केलं आहे. भारतातील तरुणांना भेडसावणारे रोजगाराचे प्रश्न, ढासळलेली शिक्षण व्यवस्था आणि प्रशासकीय अपयश याविरुद्धचा हा जनक्षोभ आहे. पारंपरिक विरोधी पक्षांपेक्षा वेगळं राहून, तरुण स्वतःचा आवाज उठवण्याचा नवीन मार्ग शोधत आहेत आणि या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत राहणं केंद्र सरकारसाठी अवघड बनलंय, हेही ‘बीबीसी'ने नोंदवलं आहे.

int media on cjp

आखाती देशातून कार्यरत असलेल्या ‘अल जझीरा'नेही ग्राऊंडवर उतरून हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर कव्हर केलं आहे. त्यांच्या अहवालानुसार, इंटरनेटवर व्यंगात्मक पद्धतीने सुरू झालेलं हे आंदोलन आता देशातील सर्वात मोठी युवा चळवळ बनली आहे. यांना सोशल मीडियावर मिळालेला प्रतिसाद भारतातील जेन-झी तरुणांमधील असंतोष दाखवतो. ‘नीट' पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य संकटात आल्याने तरुणांमध्ये सरकारविरोधात मोठा रोष असल्याचं त्यांनी आपल्या बातम्यांतून सांगितलंय. अल जझिराने आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईची, बळाच्या वापराची आणि विरोधी पक्षनेत्यांना व आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या घटनांची कडक शब्दांत दखल घेतली आहे. सोबतच आंदोलन दडपण्याचा आणि सोशल मीडिया खाती ब्लॉक करण्याचा सरकारचा निर्णयही त्यांनी आंतरराष्ट्रीय वेशीवर टांगला आहे. अल जझिराच्या म्हणण्यानुसार, ‘कॉक्रोच जनता पार्टी' हे आता व्यंगातून तयार झालेलं पेल्यातील वादळ राहिलं नसून भारतातील तरुण पिढीचा सरकारविरोधातील आक्रोश बनला आहे.

int media on cjp

‘डी डब्ल्यू न्यूज' ही जर्मनीस्थित वृत्तसंस्था गेल्या एक महिन्यापासून या आंदोलनाचा आढावा घेताना दिसतेय. त्यांच्या डिजिटल पोर्टलवर या आंदोलनातील घटनांची नोंद करणारा एक लाईव्ह कॉलम सुरू आहे. एका ऑनलाईन मीमवरून एका राष्ट्रीय चळवळीने आकार कसा घेतला या उत्सुकतेपोटी सुरुवातीचं वार्तांकन झालं. ‘डी डब्ल्यू'ने बातम्या, लेख, छायाचित्रं आणि व्हिडीओजच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेला प्रसिद्धी दिली, विशेषतः विश्लेषणात्मक वार्तांकनांवर त्यांनी जोर दिला. महिनाभरापूर्वी या वृत्तसंस्थेने २० मिनिटांचा सविस्तर व्हिडीओ रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. हे आंदोलन कितपत यशस्वी ठरेल, धर्मेंद्र प्रधान आणि मोदी यांच्यावर तरुणांचा राग का आहे याचं विश्लेषण केलं गेलं. ‘नीट' परीक्षा देणारे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधून त्यांची मतं देखील या रिपोर्टमध्ये नोंदवली गेली. सध्याचं भाजप सरकार स्वतःच्या चुका मान्य करत नाही, उलट दोषींनाच पाठीशी घालतं, सत्ताधारी राजकारणी स्वतःला देव समजायला लागले आहेत, असं निरीक्षण राजकीय विश्लेषकांनी या रिपोर्टमध्ये नोंदवलं. सोनम वांगचुक यांचं उपोषण दडपण्याबाबतही ‘डी डब्ल्यू'ने व्हिडीओ रिपोर्ट केला. बातम्या आणि रिपोर्टिंगच्या माध्यमातून तरुण आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची आणि परखड मतांची प्रभावी दखल घेतल्याचं दिसून आलं. आंदोलकांचा रोष धर्मेद्र प्रधानांवरून नरेंद्र मोदींकडे वळायला लागलाय, असं निरीक्षणही या बातम्यांतून नोंदवलं गेलं.

int media on cjp

अमेरिकास्थित ‘द न्यूयॉर्क टाइम्स' ने ‘विद्यार्थी आंदोलनाचा गंभीर मुद्दा सरकारने अतिशय असंवेदनशील पद्धतीने हाताळला आहे,' असं नमूद केलं आहे. ‘भारतातील आंदोलक तरुण रक्तबंबाळ आहेत, पण हरलेले नाहीत' अशा शब्दांत त्यांनी या आंदोलनाचं वर्णन केलं आहे. भारतातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या तीव्र असंतोषाला या आंदोलनाने वाचा फोडली, प्रस्थापित व्यवस्थेतील त्रुटींविरुद्ध तरुणांचा हा एल्गार आहे, असं ‘न्यूयॉर्क टाइम्स'चं म्हणणं आहे. सध्याची राजकीय व्यवस्था आमच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते, असं या तरुणांचं म्हणणं आहे. त्यामुळे हजारो तरुण 'Cockroaches Never Die' असे टी-शर्ट आणि मास्क घालून रस्त्यावर उतरलेत.' असं त्यांनी आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 

int media on cjp

अमेरिकेतीलच ‘द वॉशिंग्टन पोस्ट' या इंग्रजी माध्यमानेही आपल्या वेबपोर्टलवरून 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाची दखल घेतली आहे. यातून त्यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी'ची चळवळ, व्यवस्थेवर संतापलेल्या तरुणांनी या चळवळीला दिलेला उत्स्फूर्त पाठिंबा, नीट पेपरफुटीनंतर दिल्लीसोबतच देशभरात सुरू झालेलं आंदोलन, सोनम वांगचुक यांचं उपोषण, २० जुलैच्या संसद मोर्चावरील लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करून बळाने मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न अशा अनेक पैलूंवर भाष्य केलं आहे. विद्यार्थ्यांसह सर्वांना एकत्र आणणारं हे आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील सरकारसमोरील सर्वांत मोठं आव्हान आहे. हे चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे आणि आंदोलकांना प्रत्युत्तर म्हणून बळाचा वापर केल्यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली असल्याचंही त्यांनी एका वृत्तात नोंदवलं आहे.

int media on cjp

अभिजित दिपकेचं आंदोलन, त्यानंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण, विद्यार्थ्यांचा संसदेकडे निघालेला मोर्चा, राहुल गांधींचं आंदोलन आणि त्यांना झालेली अटक या घटनांमुळे मोदी सरकारवर दबाव वाढत चालला आहे, तरुणांच्या आंदोलनाने मोदींसमोर नवं आव्हान उभं केलं आहे अशा आशयाच्या बातम्या ‘फ्रान्स २४' या वृत्तसंस्थेने दिल्या. ‘द जपान टाईम्स'ने देखील असंच निरीक्षण नोंदवलं असून मोदींच्या शैक्षणिक आणि आर्थिक धोरणांमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याचं नोंदवलं आहे. या आंदोलनामुळे भारतातील विरोधी पक्षांना मोदींविरोधात मुद्दा मिळाल्याचं ते म्हणतायत. कॉक्रोच जनता पार्टी ही मोदींच्या धोरणांविरोधातील आजवरची सर्वात मोठी चळवळ आहे, असा उल्लेखही ‘द जपान टाईम्स'ने केला आहे.

int media on cjp

प्रशासनाने आंदोलन दडपण्यासाठी पोलीस ताकदीचा झटकन वापर केला, पण केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांना जबाबदार धरण्यात ते अजूनही दिरंगाई करत आहेत. सहानुभूती आणि सुधारणांच्या मार्गाने तणाव कमी करता आला असता, मात्र तसं करण्याऐवजी सरकार परिस्थिती ताणू पाहतंय. शिक्षण पद्धतीतील पारदर्शकतेसाठी सुरू झालेला एक छोटा लढा सरकारच्या या अडेल वृत्तीमुळे राजकीय अहंकाराविरुद्धचा मोठा लढा बनलाय, असं या सर्व वार्तांकनातून सांगितलं जातंय. 

हेही वाचा - ..आणि आम्ही ठरवलं आपणही मोर्च्यात जायलाच हवं

नरेंद्र मोदींनी गेल्या दहा-बारा वर्षांत जगभरात फिरून स्वतःविषयी आणि आपल्या सरकारविषयी एक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न चालवला होता. आपल्या कार्यकाळात देशात सारं काही आलबेल आहे, असं भासवण्याच्या या प्रयत्नांना ताज्या घडामोडींमुळे आणि त्याच्या जगभरातील वार्तांकनामुळे तडा जाताना दिसतोय. या वार्तांकनांना पूर्वग्रहदूषित, परकीय हस्तक्षेप, आंतरराष्ट्रीय कट असं म्हणायचं की जे घडलं त्याचा धडा घेऊन सरकारने पावलं टाकायला हवीत असं म्हणायचं, हे ज्याच्या त्याच्या बौद्धिक क्षमतेवर आणि मनाच्या मोकळेपणावर अवलंबून आहे.

मन्सूर मुल्ला, मयूर पटारे







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results