आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

बोस्टन, केंब्रिज, हार्वर्ड : अमेरिकेचा दीर्घ शिक्षण इतिहास

  • कौमुदी वाळिंबे
  • 19.04.25
  • वाचनवेळ 15 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
boston camridge

तुम्हाला हॅरी पॉटरमधला डंबलडोर माहिती आहे ना? हॉगवॉर्ट्‌‍स स्कूलमधल्या आपल्या विद्यार्थ्यांच्या वाढीवर बारीक लक्ष असलेला, धीरगंभीर, प्रेमळ आणि डोळ्यांत मिश्कील चमक असलेला म्हातारबाबा डंबलडोर. प्रत्येक शहराला एक व्यक्तिमत्त्व असतं असं म्हणतात. बोस्टन शहराचं व्यक्तिमत्त्व हॅरी पॉटरमधल्या डंबलडोरशी मिळतंजुळतं आहे. फरक हा, की बोस्टन म्हणजे चिरतरुण डंबलडोर आहे. इतिहासाचा प्रदीर्घ वारसा असलेलं बोस्टन, काळ बदलत नेण्याची ताकद आणि ऊर्मी बाळगणारं बोस्टन. ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका' समजून घ्यायचं असेल तर या शहराची भेट घेणं अटळ आहे.

अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरच्या सर्वांत महत्त्वाच्या शहरांत बोस्टनची गणना होते. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाची पहिली ठिणगी इथे पडली. जगप्रसिद्ध ‘बोस्टन टी पार्टी'बद्दल शाळकरी वयातच आपण वाचलेलं असतं. बोस्टनमधे फिरताना त्या इतिहासाच्या खुणा ठायी ठायी दिसतात. किंबहुना, इथे येणाऱ्यांनी तो इतिहास जाणून घ्यावा यासाठी इथे आखीव-रेखीव ‘फ्रीडम ट्रेल' आहे. शहरातला अगदी वर्दळीचा असा हा मध्यवर्ती भाग. बोस्टन ही मॅसेच्युसेट्स राज्याची राजधानी असल्यामुळे या राज्याचं स्टेट हाऊस (विधान भवन), बोस्टन सिटी हॉल (महापालिका), शेकडो कंपन्या, वित्तीय संस्था आणि लॉ फर्म्सची कार्यालयं, हरतऱ्हेची दुकानं, छोटी-मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पब्ज आणि कॅफेज याबरोबरच ‘बोस्टन कॉमन' आणि ‘पब्लिक गार्डन्स' ही भली मोठी पार्क्स आणि या गजबजलेल्या परिसराच्या अंतरंगातून विणलेला फ्रीडम ट्रेलचा धागा. गंमत म्हणजे, इतिहास जाणून घेत असताना एक क्षणही वर्तमान नजरेआड होत नाही.

या भागातून फेरफटका मारताना आणखी एक बाब पटकन लक्षात येते, ती म्हणजे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजांची इथली उठावदार उपस्थिती. इथल्या शिक्षणसंस्था या बोस्टनच्या सामाजिक वास्तवाचा महत्त्वपूर्ण भाग आहेत; केवळ तोंडवळ्यापुरता मर्यादित नाही, तर शहराचा डीएनए असावा इतका महत्त्वाचा.

खुद्द बोस्टनसहित ‘ग्रेटर बोस्टन' अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या आजूबाजूच्या 10-15 मैलांच्या पट्ट्यात नामांकित अशा पन्नासाहून अधिक शिक्षणसंस्था आहेत. जगभरातून लाखो विद्यार्थी दरवर्षी तिथे धडपड करून प्रवेश मिळवत असतात. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या बौद्धिक, आर्थिक कुवतीनुसार आणि आवडीनुसार शिक्षण घेता येईल इतके विविध पर्याय तिथे सहजी उपलब्ध आहेत. एवढ्या प्रचंड विद्यार्थिसंख्येसाठी हजारो तज्ज्ञ शिक्षकांची जणू फौज तैनात असते. संगीतक्षेत्रात जगप्रसिद्ध असणारं बर्कली कॉलेज ऑफ म्युझिक, स्कूल ऑफ द म्युझियम ऑफ फाइन आर्ट्‌‍स, बेंटली-ब्रँडाइस-नॉर्थ ईस्टर्न-सफोक-टफ्ट्‌‍स या खासगी युनिव्हर्सिटीज, युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्स ही सरकारी युनिव्हर्सिटी, इमर्सन-इमॅन्युअल-रेजीज-सिमन्स-व्हीलॉक ही कॉलेजेस... किती नावं घेणार! काय काय बघणार! थोडक्या काळात बोस्टनची ओळख करून घेण्यासाठी आलेल्या पर्यटकाला या सगळ्यांशी ‘हाय-हॅलो' करणंही शक्य होणार नाही. पण फ्रीडम ट्रेल पूर्ण केल्यावर बाजूच्या तीन-चार मैलांतच तीन इतक्या महत्त्वाच्या (आणि प्रेक्षणीयही) संस्था आहेत की त्यांचं दर्शन तरी घ्यायलाच हवं.

‘पब्लिक गार्डन्स'ला लागूनच असलेल्या आर्लिंग्टन स्ट्रीटवर ‘ताज बोस्टन' आहे. हो, आपल्या टाटांचंच ‘ताज'! या हॉटेलपासून जवळच कॉमनवेल्थ ॲव्हेन्यू सुरू होतो. त्या रस्त्यावर दहा मिनिटांच्या अंतरात केन्मोअर स्क्वेअर आहे. या केन्मोअर चौकात पब्लिक गार्डन्सच्या दिशेला पाठ करून उभं राहिलं की कॉमनवेल्थ ॲव्हेन्यूवरचे पुढचे दोन मैल रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ‘बोस्टन युनिव्हर्सिटी'चा पसारा आहे. चौकाच्या डाव्या बाजूला जरा आत सुप्रसिद्ध ‘फेनवे पार्क' हे बेसबॉल स्टेडियम आहे. इथे जेव्हा रेड ‘सॉक्स गेम', म्हणजेच स्थानिक टीमचा सामना असतो, तेव्हा आबालवृद्धांच्या गर्दीने हा चौक ओसंडून वाहत असतो. ‘युनिव्हर्सिटीची फेरी सुरू करताना मध्येच हे काय?' असं वाटलं असेल तुम्हाला. पण त्याचं असं आहे, की ‘खेळ' आणि त्यातही बेसबॉल, अमेरिकन फुटबॉल, बास्केटबॉल आणि आइस हॉकी ही बोस्टनची सार्वत्रिक वेडं आहेत. युनिव्हर्सिटीतले विद्यार्थी त्याला अपवाद कसे असणार? म्हणून ‘फेनवे पार्क'चा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येत नाही.

कॉमनवेल्थ ॲव्हेन्यूवर आपली गाडी पुढे सरकली की बोस्टन युनिव्हर्सिटीच्या (बीयू) सुखद ब्राऊनस्टोनमधल्या इमारती नजरेत भरतात. 1839 साली स्थापन झालेलं हे विद्यापीठ. वेगवेगळ्या विषयांच्या संशोधन, अध्यापनाला वाहिलेली अठरा स्कूल्स आणि कॉलेजेस त्याच्या छत्राखाली येतात. तीस हजारांवर विद्यार्थी आणि चारेक हजार शिक्षकगण हा इथला मुख्य गोतावळा. सात नोबेल विजेते, पस्तीस पुलित्झर विजेते यांसहित विविध क्षेत्रांत जागतिक दर्जाचं काम केलेल्या अगणित व्यक्ती इथेच घडल्या. इथल्याच एका लॅबमधे 1875 साली अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलने जगातला पहिला टेलिफोन निर्माण केला. अमेरिकेतल्या महिलांना मताधिकार मिळण्याच्याही चाळीसेक वर्षं आधी, 1877 साली इथे पहिल्यांदा एका महिलेने पीएच.डी. मिळवली आणि ती याच विद्यापीठात शिकवू लागली. आजही नाट्याभिनयापासून मूलभूत विज्ञानापर्यंत, पत्रकारितेपासून आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत हरेक विषयावर इथे सकस अभ्यास करायला मिळतो.

बीयूचं हे खुलं वातावरण जणू बाह्यदृश्यातही झिरपलंय. युनिव्हर्सिटीच्या प्रशासकीय इमारती, वेगवेगळ्या विषयांची डिपार्टमेंट्स, लायब्ररीज, म्युझिक आणि ड्रामा हॉल्स, ऑडिटोरियम्स, जिम्नॅशियम्स, एरिना, खेळांची खुली मैदानं, युनिव्हर्सिटी रेडिओ स्टेशन, विद्यार्थ्यांच्या डॉर्मिटरीज- हे सगळं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ऐसपैस पसरलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या सोईसाठी वेगवेगळी दुकानं, रेस्टॉरंट्स, कॅफेज, ग्रोसरी स्टोअर्स, अगदी गॅस स्टेशनही तिथे कायमस्वरूपी ठाण मांडून आहेत. रहदारीच्या रस्त्यावर मध्यातून मेट्रो धावते. दोन-तीन मिनिटांच्या अंतरावर तिचे थांबे आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, इतर अनेक छंदांत रस घ्यावा, व्यायाम करावा, हवं ते खेळावं, खावं-प्यावं, मजा करावी, आयुष्यभराचे मित्र-मैत्रिणी जोडावेत आणि इतकं सगळं करताना त्यांच्या राहण्यासाठी, जाण्या-येण्यासाठी सुटसुटीत सोय असावी- असा हा सगळा प्रपंच आहे.

दिवसाच्या कोणत्याही प्रहरी हा रस्ता तरुणाईने फुलून गेलेला असतो. कुणी झपाझप कुठे तरी निघालंय, कुणी आपल्याच तंद्रीत रेंगाळतंय, काहीजण ग्रुपमधे हास्यविनोद करत चाललेत, कुणी कानाला स्पीकर्स लावून जॉगिंग किंवा रनिंग करताहेत, तर काहीजणांची रस्त्याच्या कडेला बाकावर बसून चक्क वाचनसमाधी लागलीय. शिवाय इथे एकाला एक लागून विद्यार्थ्यांच्या खिशाला परवडणारी विविध प्रकारची रेस्टॉरंट्स आहेत. बर्फ पडत नसेल तेव्हा संध्याकाळच्या वेळी अगदी फुटपाथवरही खुर्च्या टाकून लोक जेवण-गप्पा करत असतात. शहर आणि विद्यापीठ परिसर इतका असा एकमेकांत मिसळलेला आहे. आपापल्या निवडीच्या क्षेत्रातलं करियर घडवण्याचा प्रयत्न सुरू असताना आयुष्यातल्या इतर पैलूंशी ओळख पुसट होत नाही. किंबहुना तसं होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम आखण्यापासून ते पायाभूत सुविधा उभारण्यापर्यंत दक्षता घेण्यात आलेली आहे. ‘कँपस टूर' घेतली तर यातले कितीक बारकावे समजत जातात. सुट्ट्यांचा आणि परीक्षांचा काळ वगळता इथल्या विद्यार्थी गाइड्सकरवी ‘कँपस टूर' मिळू शकते. ही टूर मोफत असली तरी त्यासाठी ॲडव्हान्स बुकिंग तेवढं करावं लागतं.

कँपस टूरमध्ये विद्यापीठाच्या मागच्या बाजूला चार्ल्स नदीचं विस्तीर्ण पात्र दिसतं. स्वच्छ काळंशार पाणी. ही नदी पुढे दोनेक मैलांवर अटलांटिक समुद्राला मिळते. नदीपात्रात कयाकिंग, सेलिंग, कनूइंग करणारे दिसतात. दरवर्षी ऑक्टोबरमधे इथे जगप्रसिद्ध ‘रिगाटा'चं (रोइंग शर्यत) आयोजन केलं जातं. इरीशिरीने ‘रिगाटा'त भाग घेणं ही कित्येक विद्यापीठांची (आणि कित्येक विद्यार्थ्यांसाठी कौटुंबिकसुद्धा) परंपरा आहे. त्यामुळे थंडी संपून वसंतऋतू सुरू झाला रे झाला की नदीपात्रात सराव करण्यासाठी रोइंगपटू आलेच म्हणून समजा. अरे हो, इथे एक महत्त्वाचा तपशील सांगितला पाहिजे. चार्ल्स नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलंय ते बोस्टन आणि उत्तर किनाऱ्यावर आहे केंब्रिज. सुरुवातीच्या ‘सेटलर्स'नी एकाच वेळी ही दोन स्वतंत्र, जुळी गावं वसवली. पुढे बोस्टनवाल्यांनी केंब्रिज विलीन करून घेण्याचे बरेच प्रयत्न केले; पण केंब्रिजने आग्रहाने स्वतःचं वेगळं अस्तित्त्व राखलं. अर्थात पर्यटकांना पटकन हे कळण्याचं कारण नाही. त्यांच्या लेखी नदीपलीकडची एमआयटी (मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीसुद्धा बोस्टनचीच!

चार्ल्सच्या दक्षिण तटावर पसरलेल्या ‘बीयू'च्या भागात उभं राहिलं की पलीकडे एमआयटीचा परिसर दिसतो. नदीलगतच्या केंब्रिजमधे 168 एकरांवर ही युनिव्हर्सिटी पसरली आहे. दोन्ही शहरांना जोडणारे जे अनेक पूल आहेत त्यातल्या मॅस-ॲव्ह (मॅसॅच्युसेट्स ॲव्हेन्यू) ब्रिज किंवा हार्वर्ड ब्रिज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुलावरून गेलं तर आपण थेट एमआयटीच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी जाऊन पोहोचतो. मॅस-ॲव्हमुळे एमआयटीचं कँपस जवळपास मधोमध विभागलं जातं. पूर्वेकडच्या भागात बहुतांश शैक्षणिक इमारती, पश्चिमेकडे विद्यार्थी निवास आणि इतर इमारती अशी ढोबळ विभागणी आहे. इथेही शहर आणि विद्यापीठ एकमेकांच्या हातात हात घालूनच आहेत, पण बोस्टन युनिव्हर्सिटीपेक्षा एमआयटी परिसर थोडा अधिक गंभीर आहे.

मॅस-ॲव्हला खेटून पूर्वेकडे एमआयटीचं भव्य प्रवेशद्वार तुम्हाला दिसेल. तीन मजली उंच, रुंद खांबांवर तोललेलं छत आणि रस्त्यापासून वर चढत नेणाऱ्या पायऱ्या. खांबांच्या वरच्या भागात आधी युनिव्हर्सिटीच्या संस्थापकाचं आणि त्याही वर संस्थेचं नाव कोरलेलं आहे. ही कुठली इमारत आहे हे माहीत नसणाऱ्यालाही थबकायला लावणारा आब त्या दृश्यात आहे. 1861 साली एमआयटीची स्थापना झाली आणि 1865 साली तिथे प्रत्यक्ष विद्यार्जनाला सुरुवात झाली. या संस्थेशी संबंधित असणाऱ्या तब्बल 81 तज्ज्ञांचा आजवर नोबेल पुरस्काराने सन्मान झाला आहे. इथे शिकवणाऱ्या, शिकणाऱ्या शेकडोजणांनी जागतिक पातळीवर शिक्षण, उद्योग, सामाजिक सेवा, तसंच राजकारण या क्षेत्रांमधे अमीट ठसा उमटवलेला आहे. एमआयटीला एक राष्ट्र मानलं आणि इथल्या शिक्षक-विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या उद्योगांची एकत्रित आर्थिक कामगिरी मोजली तर ती ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत जगात अकराव्या क्रमांकावर असलेल्या देशाएवढी भरेल, अशी गमतीदार टिप्पणी इथे गांभीर्याने केली जाते.

त्या भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्या-केल्याच गंमत आणि गांभीर्य यांचं अवखळ मिश्रण आपल्याला जाणवू लागतं. दाराच्या आत पाऊल टाकलं की एका भल्या मोठ्या हॉलमधे, चार मजली उंच छताखाली आपण दाखल होतो. इथेही छत तोलून धरताहेत असं वाटणारे भक्कम खांब हॉलच्या कोपऱ्यांमधल्या चौथऱ्यांवर विसावले आहेत. वर छतापाशी कोरीवकाम, संस्थेचा उद्देश सांगणारं. नवागताला नकळत मूक करणारा जणू तो एक गंभीर गाभारा. पण छे, ते होणे नाही! कारण या गाभाऱ्यात छताच्या बाजूने स्वच्छ मोकळा प्रकाश भरून राहिलेला आहे. हॉलच्या कोपऱ्यातल्या चौथऱ्यांवर किंवा त्याला टेकून कुणी विद्यार्थी आरामात पहुडलेला दिसतो. त्याचा अभ्यास सुरू असतो किंवा निव्वळ टंगळमंगळ. डावीकडे एटीएम मशिनसारखा दिसणारा इंटरॅक्टिव्ह स्क्रीन संपूर्ण एमआयटी परिसराची माहिती करून देण्यासाठी खुणावतो, आणि प्रवेशद्वाराच्या समोर दिसतो नजर पोचेल तिथवर जाणारा एक लांबसडक कॉरिडॉर. दिवसभरात हजारो विद्यार्थ्यांची इथून जा-ये सुरू असते. संस्थेच्या अनेक इमारती या कॉरिडॉरने जोडल्या जातात. नवीन आलेल्या पर्यटकाने किमान लगतच्या बिल्डिंग-10पर्यंत जावं, तिथल्या ‘किलियन कोर्ट' या हिरवळीच्या मैदानाचं दर्शन घ्यावं. हवामान चांगलं असतं तेव्हा इमारतीबाहेर आणि नसतं तेव्हा आतल्या लॉबीमधे अनेकजण- विद्यार्थी आणि शिक्षकही- तन्मयतेने कशाकशाची प्रॅक्टिस करत असतात. कुणी जग्लिंग करताना दिसतं, कुणी एकचाकी सायकलवर बॅलन्सचा सराव करत असतं, कुणी आणखी काही. हे कसबी कलाकार सर्कशीतून सुटून तर इथे आलेले नाहीत ना, अशी शंका मनाला चाटून जावी. बरं, त्या कॉरिडॉरमधून फिरताना कुठे गंभीर लॅब दिसते, तर कुठल्याशा खोलीतून चक्क पियानो ऐकू येत असतो. शिक्षणाबाबत तुम्ही पंतोजीपद्धतीने विचार करणारे असाल, तर इथे तुम्हाला धक्का बसेल, पण खुल्या नजरेने पाहाल, तर आपणही या निखळ आनंदयात्रेचा एक भाग व्हावं अशी इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही.

स्थापनेनंतरच्या दीडशे वर्षांत एमआयटीने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विकासातून पृथ्वी आणि अंतराळाचा वेध घेतला व जगाच्या प्रगतीला वेग दिला. केवळ तंत्रज्ञदृष्टीने नव्हे, तर सर्वांगीण वृत्तीने जगातल्या घटनांची, समस्यांची चिकित्सा केली. आपल्या कार्याची मळलेली पायवाट सोडून नव्या वाटेने नव्या ध्येयांचा पाठपुरावा केला. म्हणूनच एमआयटीचे तज्ज्ञ पर्यावरण संरक्षण, अविकसित प्रदेशांमधे शुद्ध पाण्याची उपलब्धता, गरिबातल्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत तंत्रज्ञान आणि ज्ञान पोचवणं, अशा कुठल्याही कामात आयुष्य झोकून देताना दिसतात. आजघडीला इथल्या बत्तीस वेगवेगळ्या विभागांतून दहा हजारांवर विद्यार्थी आपापली दिशा शोधताहेत. एवढंच नाही, तर इथलं ज्ञान बंदिस्त राहू नये म्हणून एमआयटीने इथल्या दोन हजारांहून अधिक अभ्यासक्रमांचं संपूर्ण कोर्स-मटेरियल इंटरनेटवर सर्वांना उपलब्ध करून दिलं आहे. त्या सगळ्या बारकाव्यांत जायचं तर आपल्याला एक वर्षसुद्धा अपुरं पडेल!

पण किलियन कोर्टमधे जाऊन आपण ज्या बिल्डिंग-10 मधून बाहेर पडलो त्यावरचा घुमट मात्र नक्की बघा. एमआयटीच्या प्रसिद्ध फोटोंमधे दिसणारी हीच ती इमारत. इमारतीच्या पुढ्यात हिरवळ, हिरवळीपलीकडे नदीकाठचा मेमोरियल ड्राइव्ह हा रस्ता आणि त्यापलीकडे चार्ल्स. पण त्यात फारसं न गुंतता आल्यापावली परत फिरावं, मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडून पुन्हा मॅस-ॲव्हवर उतरावं. रस्त्यापलीकडे गणितातली विविध चिन्हं जोडून निर्माण केलेली धातूची पोकळ मनुष्याकृती लक्ष वेधून घेईल. त्यामागे आहे ती स्टुडंट सेंटरची इमारत आणि बाजूलाच आहे लक्ष वेधून घेणारं क्रेस्गी ऑडिटोरियम- इमारत बांधणीतला एक अभिनव प्रयोग. एक अखंड छतच तीन बाजूंनी जमिनीवर उतरलेलं आहे. त्यामुळे त्या भव्य ऑडिटोरियमला आत कुठेही खांबांची गरज नाही. याचं कौतुक करत मॅस-ॲव्हवरून आणखी पुढे उत्तरेकडे मार्गस्थ व्हावं. पाच मिनिटांच्या अंतरावर एमआयटी म्युझियम आहे.

मॅस-ॲव्हवरूनच पुढे जात राहिलो की मैलभरावर जगातल्या सर्वश्रेष्ठ हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा मुख्य परिसर लागतो- हार्वर्ड यार्ड. जाताना रस्त्यावर आणि हार्वर्ड यार्डच्या आजूबाजूलाही उत्फुल्ल केंब्रिज शहर. 1630 साली केंब्रिज वसलं आणि 1636 साली हार्वर्डची स्थापना झाली. शहर आणि युनिव्हर्सिटीने एकमेकांच्या साथीने भरभराट पाहिली. एका टप्प्यावर शहराला मागे टाकून विद्यापीठाने दिगंत कीर्तीचा रस्ता धरला. सुरुवातीला केवळ धार्मिक शिक्षणाची सोय असणाऱ्या या विद्यापीठाने अठराव्या शतकात धर्माची कात टाकली. त्यानंतर ‘धर्मविषयक अभ्यास' हा इथल्या चिंतन-संशोधनाचा केवळ एक भाग बनून राहिला. ‘व्हेरिटास' (सत्य) हे या विद्यापीठाचं घोषवाक्य आहे. इथल्या आजवरच्या नोबेलविजेत्यांचा आकडा आहे किमान 150! मग इतर सन्मानांची तर मोजदादच नको! एकूण अकरा विभागांतून वीस हजारांवर विद्यार्थी आणि साडेचार हजारांवर शिक्षक इथे आहेत. जगातली सर्वांत मोठी खासगी ॲकॅडमिक लायब्ररी हार्वर्डने उभारली आहे. अमेरिकेचे एकूण आठ राष्ट्राध्यक्ष या विद्यापीठाचे विद्यार्थी होते. त्याशिवाय जगभरच्या इतर अनेक देशांचे राष्ट्रप्रमुखही विद्यार्थिदशेत इथे शिकत होते. विज्ञान-तंत्रज्ञान, गणित, उद्योग, अर्थशास्त्र, कायदा अणि न्यायव्यवस्था, सामाजिक चळवळी, इतिहास, साहित्य, संगीत, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांतलं जागतिक नेतृत्व इथे निर्माण झालं.

इतकं सगळं वाचल्यावर वाटेल, की युनिव्हर्सिटीचं आवार गंभीर चेहऱ्यांच्या डुढ्ढाचार्यांनी भरलं असेल की काय! या समजावर उतारा घेण्यासाठी बाहेरच्या हार्वर्ड स्क्वेअरमधे जरा टेका. भुयारी मेट्रो स्टेशनमधे ये-जा करण्याचे जिने त्या चौकातच आहेत. शिवाय पायऱ्या-चौथऱ्यांनी बांधून काढलेला एक खोलगट भागही आहे. म्हटलं तर अनेकांसाठी ही विसाव्याची जागा, नाही तर तिथे मध्यभागी उभं राहून आपली कला सादर करणाऱ्यांसाठी रंगमंच. चौकातल्याच मोकळ्या जागेत न्यूजपेपर आणि बुकस्टॉल. त्या बाजूला व्हिजिटर सेंटर. बरेच लोक या पेपरस्टॉलपाशी रेंगाळत असतात. कुणी दमलेला जीव काही तरी खात-पीत पायऱ्यांवर बसून पलीकडचं गिटारवादन ऐकत असतो. फुटपाथवर येऊन गिटार वाजवणारा म्हणजे भिकारी असणार असं खास भारतीय समज करून घेऊ नका. तो हार्वर्डमधे फिजिक्स शिकवणारा प्राध्यापकही असू शकतो! बाजूलाच ‘कँपस टूर' घेऊन जाणारी एखादी विद्यार्थी गाइड हार्वर्ड आणि येल विद्यापीठांच्या एकमेकांशी असलेल्या स्पर्धेविषयी जोरजोरात माहिती देत असते. थोडक्यात काय, हार्वर्ड चौकात आनंदमेळा फुललेला असतो!

आता उठून विटकरी बांधकामाच्या त्या धीरगंभीर भासणाऱ्या आवाराकडे जाऊ या. जवळपास बावीस एकरांचा हिरवळ आणि वृक्षराजीने बहरलेला हा परिसर. हिरवळीवर, झाडांखाली निवांत पडण्यासाठी धातूच्या खुर्च्या, अगदी आरामखुर्च्याही टाकलेल्या असतात. चारही बाजूंनी विद्यार्थी निवास, लायब्ररीज, चर्च आणि प्रशासकीय इमारती. इथलं सर्वांत जुनं बांधकाम 1720 सालातलं आहे. संपूर्ण यार्डची साधारण मध्यात विभागणी करणारी एक इमारत आहे, त्या बाजूलाच युनिव्हर्सिटीला ज्या देणगीदाराचं नाव देण्यात आलं त्या जॉन हार्वर्डचा पुतळाही. या पुतळ्याच्या डाव्या बुटाला हात लावून फोटो काढून घेणं ‘लकी' असतं म्हणे! जगभरातून कुठून कुठून आलेल्या माणसांची कधी कधी तिथे फोटो काढून घेण्यासाठी रांग लागलेली दिसते. सर्वश्रेष्ठ विद्यापीठाच्या भूमीवरही ‘लक'वरचा विश्वास अबाधित राहिलेला दिसतो! शिवाय या समजुतीमुळे ब्राँझच्या पुतळ्याचा डावा बूट भलताच चकाकतोय ते निराळंच.

हार्वर्डच्या पुतळ्याला वळसा घालून यार्डाच्या आतल्या भागात जाताना उजव्या हाताला वायडनर लायब्ररीची भारदस्त इमारत दिसते. या लायब्ररीसमोर पुन्हा हिरवळ आणि झाडांनी आच्छादलेलं आवार आहे. विद्यापीठाचा पदवीदान समारंभ इथे होतो. आवाराच्या दुसऱ्या टोकाला असलेलं चर्च मागे टाकलं की हार्वर्ड यार्डच्या बाहेर पडता येतं. पलीकडे युनिव्हर्सिटीचं सायन्स सेंटर आहे. इथे तळमजल्यावरच 1944मधे तयार केलेला ‘मार्क 1' हा आदिम कॉम्प्युटर मांडून ठेवलाय. त्याच्या निर्मितीपासून निवृत्तीपर्यंतची सगळी माहिती वाचताना सत्तर वर्षांत जग केवढं बदललं आहे आणि त्या बदलांची बीजं समोर मांडून ठेवलेली आपण पाहतो आहोत, हा थरार जाणवल्याशिवाय राहत नाही.

काळ आणि विषय कोणता का असेना, शिकणाऱ्या, शिकवणाऱ्यांच्या मनात बदलाची बीजं पेरत राहणं, अज्ञाताचा वेध घेण्याच्या इच्छेला खतपाणी घालणं, नवीन कल्पनांच्या अंकुरांना सुरक्षित वातावरण पुरवणं आणि यशस्वी होऊ शकणाऱ्या कल्पना अमलात आणण्यासाठी धैर्यवान मनांची मशागत करत राहणं- या कर्तव्यांमधे इथल्या विद्यापीठांकडून कधी कुचराई झाली नाही.

हार्वर्ड यार्डातली आपली फेरी संपलेली असते. अजून वेळ आणि ताकद असेल तर हार्वर्डचाच भाग असलेली आजूबाजूची इतर म्युझियम्स आणि आर्ट एक्झिबिशन्सही आपण पाहू शकतो. पण हार्वर्ड युनिव्हर्सिटी म्हणजे इतकंच नव्हे. नदीपलीकडच्या बोस्टनमधे इथल्यापेक्षा तिप्पट विस्तार आहे- जगप्रसिद्ध बिझनेस स्कूल, मेडिकल स्कूल, खेळांची स्टेडियम्स असं बरंच काही. पण आत्तापर्यंत नजरेस पडलेलंसुद्धा इतकं असतं, की त्याची मनात सुसंगत मांडणी लावणं निकडीचं वाटायला लागतं.

शिक्षण-संशोधनात मग्न असतानाच आपापल्या आवडीनुसार, कुवतीनुसार आयुष्याच्या हरेक पैलूची पायाभरणी करणारे शेकडोजण आपण दिवसभरात पाहिलेले असतात. विद्यापीठांच्या बाहेरचं बोस्टन-केंब्रिजचं आणखी एक वास्तव आहे मोठमोठ्या हॉस्पिटल्सचं, आधुनिक ज्ञान-तंत्रज्ञानावर आधारलेल्या उद्योगांचं. मात्र, त्यांचीही नाळ या शिक्षणसंस्थांशीच जोडलेली आहे. त्या अर्थाने या जुळ्या शहरांतला बहुतांश रोजगार इथल्या शिक्षणाशी निगडित आहे. दोन्ही शहरं मिळून जेमतेम साडेसात लाखांची लोकवस्ती आहे. तरीही कोणत्याही मोठ्या शहराप्रमाणे इथे अधिक-उणे घटक आहेत, वेगवेगळी विश्वं आहेत, पण त्यांच्यात मूलभूत विसंगती मात्र जाणवत नाही, एकाचा दुसऱ्याशी अर्थाअर्थी संबंध नाही असं होत नाही. विद्यापीठांनी आपला समृद्ध वारसा कसोशीने जपलाय, मात्र तरुण खांद्यांवर त्याचं ओझं टाकलेलं नाही. शिक्षणव्यवस्था तरुणाईसमोर कठीण आव्हानं ठेवते. त्या आव्हानांचं दिव्य पार करून इथून बाहेर पडताना विद्यार्थी एक सघन व्यक्तिमत्त्व घेऊन बाहेर पडेल याची जबाबदारी या प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या व्यवस्थेने पेललेली असते. आपल्या संशोधन-अध्यापनातून काळाला वळण लावताना मिळणाऱ्या अनुभवातून व्यवस्थेला नवे धडे मिळतात. त्यातून शिक्षणसंस्थांमधे बदल होत जातात. शेकडो वर्षं अव्याहत चाललेलं आणि त्यामुळे सतत अंतर्गत ऊर्जा निर्माण होत राहिलेलं हे चक्र आहे. जागतिक क्रमवारीत इथल्या विद्यापीठांनी राखलेलं अव्वल स्थान म्हणजे याची पोचपावती आहे.

बोस्टन-केंब्रिजच्या रस्त्यांवर, चार्ल्सच्या काठांवर नवख्यालाही पदोपदी ती ऊर्जा जाणवते. आपलं आयुष्य व्यवहाराच्या रहाटगाडग्यात अडकलेलं असलं तरी शाळा-कॉलेजमधले सोनेरी दिवस मनात जिवंत असतात. इथला काळ तशाच सळसळत्या दिवसांवर स्थिरावलाय... कैक वर्षं, कायमचा. तो परिपक्व असला तरी त्याने कोवळीक आणि तारुण्य गमावलेलं नाही. कधी तरी तुम्हीसुद्धा त्या काळात न्हाऊन घ्या, मनाच्या कोपऱ्यातल्या सोनेरी दिवसांना टवटवी आणा. या चिरतरुण डंबलडोरकडे ते सामर्थ्य आहे. म्हणून विचारलं, तुम्हाला डंबलडोर माहिती आहे ना?

इट मॅटर्स नॉट व्हॉट समवन इज बॉर्न, बट व्हॉट दे ग्रो टु बी. -डंबलडोर

(मुशाफिरी दिवाळी 2015च्या अंकातून साभार)

कौमुदी वाळिंबे | kaumudee.valimbe@gmail.com

कौमुदी वाळिंबे







प्रतिक्रिया लिहा...

आडवा छेद

migration

जागतिक स्थलांतरितांमध्ये भारतीय सर्वाधिक, पण त्यांच्याबद्दलचे अभ्यास मात्र तुटपुंजे

ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्यानंतर अमेरिकेतील आणि त्यानिमित्ताने जगभरातील भारतीय स्थलांतरितांचा व...

  • गौरी कानेटकर
  • 16.04.25
  • वाचनवेळ 4 मि.
ambedkar jayanti

बाबासाहेब, आपल्या भारतात दलितांवरचे अत्याचार वाढतच आहेत...

भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना लागू होऊन ...

  • मृदगंधा दीक्षित
  • 14.04.25
  • वाचनवेळ 4 मि.
electric car

भारतापुढचा नवा पेच : खत महत्त्वाचं की इलेक्ट्रिक गाड्या?

‘अन्न‌’ विरुद्ध ‌‘इंधन‌’ हा जुना रंगलेला वाद, तो अद्याप शमलेला नाही. कारण पेट्रोलचा भडका कमी क...

  • मुकुंद कुलकर्णी
  • 11.04.25
  • वाचनवेळ 3 मि.

Select search criteria first for better results