
हाडाचा शिक्षक म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण म्हणून चंद्रकांत भंडारी यांच्याकडे बघता येईल. मुंबईमध्ये प्रदीर्घ काळ माध्यमिक शिक्षक म्हणून भंडारी सरांनी काम केलं आहे. त्यांचं काम दोन प्रकारात विभागता येईल. एक म्हणजे अंध विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयोग आणि सर्वच विद्यार्थ्यांसाठी केलेले विविध उपक्रम.
मुंबईत नायगाव दादर विभागातल्या सरस्वती विद्यालय या शाळेत सर शिकवत होते. या शाळेत प्रामुख्याने गिरणी कामगारांची मुलं, फेरीवाल्यांची मुलं, पोलिस लाईनमधली मुलं येत होती. हा सगळा कष्टकरी वर्ग. या मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असायची.
या शाळेसमोर कमला मेहता ही अंध विद्यार्थ्यांसाठीची शाळा होती. या शाळेत सातवीपर्यंतचेच वर्ग भरत असत. त्यापुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना डोळस मुलांच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागे. या मुलांना प्रवेश द्यायला इतर शाळा फारशा उत्सुक नसत.
२००९-१० या शैक्षणिक वर्षात अशा ३०-४० अंध मुलींना सरस्वती विद्यालय शाळेने प्रवेश दिला. आता शिक्षकांपुढे खरं आव्हान उभं होतं.
अंध व्यक्तींची समज कितपत असेल याबाबत आपण काही ठोकताळे बांधलेले असतात. पण कित्येकदा या मुली हे ठोकताळे बाद ठरवत होत्या, असं शिक्षकांना दिसलं. एक दिवस शेजारून जाणाऱ्या एका शिक्षिकेला ‘बाई, आजची तुमची साडी किती सुंदर आहे’, असं त्या मुलींना म्हणताना भंडारी सरांनी ऐकलं. ते चक्रावूनच गेले. त्या साडीच्या पदराच्या हलक्याशा, ओझरत्या स्पर्शाने त्यांना साडी सुंदर आहे हे कळलं होतं.
सरांचा वर्ग संपल्यावर एखाद दिवशी त्या मुली म्हणत, ‘सर, आज तुमचा मूड ठीक नव्हता का? नेहमीसारख शिकवलं नाहीत आज तुम्ही’. म्हणजे आवाजाच्या पोतावरून बोलणाऱ्या व्यक्तीची मनःस्थिती त्यांच्या लक्षात येत होती. अशाप्रकारे अंध विद्यार्थिनींना शिकवताना आपल्यालाच अधिक डोळसपणे शिकवण्याची गरज आहे याची मनोमन खूणगाठ सरांनी बांधली.
अंध विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान शिकवणाऱ्या दोन शिक्षिका शाळेत येत असत. पण इतर विषय, विशेषतः भाषा कोणी शिकवायची? भंडारी सरांनी ते आव्हान स्वीकारलं. वर्गात एका डोळस विद्यार्थ्याच्या बाजूला एक अंध विद्यार्थी याप्रमाणे मुलं बसवायला त्यांनी सुरूवात केली. सुरूवातीला डोळस मुलं त्यासाठी फारशी तयार नव्हती, मात्र हळूहळू एकमेकांना समजून घेत मुलं छान एकत्र बसू लागली. अंध मुलांच्या अडचणी समजून घेत त्यांना मदतही करायला लागली. या डोळस विद्यार्थ्यांमध्ये आज मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीवर असलेला एक लोकप्रिय अभिनेता होता, तो म्हणजे सिद्धार्थ जाधव. आजही सिद्धार्थ अनेक मुलाखतीत आपल्या जडणघडणीविषयी बोलताना भंडारी सरांचा उल्लेख आवर्जून करतो.
या शाळेत अंध विद्यार्थिनींना संगीताचं विशेष प्रशिक्षण देण्यात येत होतं. त्यामुळे आंतरशालेय संगीत स्पर्धांमध्ये सरस्वती विद्यालय नेहमीच प्रथम क्रमांकावर राहात असे. भंडारी सरांच्या पुढाकाराने असे निरनिराळे उपक्रम सतत चालू असत.
या विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवताना भंडारी सरांनी अनेक प्रयोग केले. अनेक लेखक-कवींना ते आपल्या शाळेत आमंत्रित करत असत. नारायण सुर्वे, आनंद यादव, केशव मेश्राम, भालचंद्र नेमाडे, मधू मंगेश कर्णिक, शांताबाई शेळके असे अनेक मान्यवर साहित्यिक मुलांना भेटायला, गप्पा मारायला शाळेत येत असत. शांता शेळके यांची ‘पैठणी’ ही कविता अंध मुलींना समजावी यासाठी भंडारी सर शाळेत चक्क पैठणी घेऊन आले. ‘तू माझी कविता कशी शिकवतोस हे पहायला मला यायचं आहे,’ असं म्हणत साक्षात शांताबाई वर्गात हजर झाल्या. शाळकरी मुलींची उत्सुकता डोळ्यात घेऊन बाकावर बसल्या. पैठणीचा स्पर्श आणि शांताबाईंचा सहवास यामुळे विद्यार्थिनी भारावून गेल्या. तर असे अनेक प्रयोग.
माया कानडीया या अंध विद्यार्थीनीचे पाठ्यपुस्तकांतील सगळे धडे पाठ असायचे. वर्गातल्या डोळस मुलांचं वाचन ती करून घ्यायची. एसएससी परीक्षेत राज्यात अपंग विद्यार्थी गटात ती पहिली आली. इतर विद्यार्थ्यांनी देखील चमकदार कामगिरी केली. एका अंध मुलीने पुढे स्वतःचा कवितासंग्रह लिहिला. नारायण सुर्वे यांनी तिच्या त्या कविता वाचल्या होत्या आणि त्यांचं कौतुक केलं होतं.
इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘संकल्प ते समारोह’ असा एक उपक्रम भंडारी सरांनी सुरू केला. वर्षाच्या सुरूवातीला मुलांनी दोन संकल्प करायचे. संकल्प अभ्यासाशी निगडीत असला पाहिजे अशी अट नव्हती. चांगल्या सवयी लागण्यासाठी कोणतीही दोन संकल्प असायला हवेत- उदा. खोटं बोलणार नाही, आईला घरकामात मदत करेन, रोज व्यायाम करेन. मुलांनी वर्गात ते जाहीर सांगायचे. सगळे संकल्प वर्गात मोठ्या अक्षरात भिंतीवर लिहून ठेवायचे. वर्षाच्या शेवटी त्यातले किती पूर्ण झाले ते सांगायचं. ज्या मुलांनी ते पूर्ण केले असतील त्यांना सर पुस्तकाचं बक्षीस देत असत. सरांनी अशी आतापर्यंत पाच लाख रुपयांची मराठी पुस्तकं भेट, बक्षीसरूपात दिलेली आहेत.
'अभ्यास जत्रा' असा एक उपक्रम सर राबवत असत. या उपक्रमात विद्यार्थी शालेय अभ्यासावर आधारित स्वतःच काही प्रयोग करून एक मॉडेल तयार करत. हे मॉडेल वर्गात सगळ्यांना बघण्यासाठी ठेवलं जाई. पालकांनी एक दिवस शाळेला भेट द्यायची आणि त्या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या त्या मॉडेलविषयी बोलायचं, तो विषय समजावून सांगायचा, असा तो उपक्रम होता. आपल्या अभ्यासाविषयी मुलं बोलत आहेत आणि पालक ऐकत आहेत हे चित्र फार सुंदर दिसायचं. पुढे न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, राम शेवाळकर, राम जोशी आणि मधुकरराव चौधरी यांच्या मदतीने हा उपक्रम मुंबईतल्या जवळपास ५० शाळा आणि पेणमधल्या शाळेतही पोचला.
पुढे सर निवृत्त झाले आणि जळगावला स्थायिक झाले. जळगावला आल्यावर आपल्या पत्नीच्या सहाय्याने सलग नऊ वर्ष सरांनी ‘गल्ली तुमची, पालक सभा आमची’ आणि ‘कुटुंब तुमचं, प्रबोधन आमचं’ असे शैक्षणिक-सामाजिक उपक्रम विनामोबदला राबवले. या दोन्ही उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची शैक्षणिक आणि सर्वांगीण प्रगती होण्यासाठी त्यांनी विद्यार्थी आणि पालक यांच्याशी अनौपचारिक संवाद साधला. त्यांच्या या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक शैक्षणिक संस्थांसाठी समन्वयक म्हणूनही सरांनी काम केलं आहे. २००८ ते २०२३ या काळात भंडारी सरांनी 'अभ्यास जत्रा' उपक्रम जळगावमध्येही राबवला. विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी राबवलेले उपक्रम आणि त्या दरम्यान आलेले अनुभव यावर आधारित सतरा पुस्तकं सरांनी लिहिलेली आहेत.
भंडारी सरांनी अशी हजारो मुलं घडवली. आताही त्यांची पुस्तकं आणि ते स्वतः मुलं, पालक आणि शिक्षक यांना मार्गदर्शन करत आहेत.
वृषाली जोगळेकर | joglekarvrushali.unique@gmail.com
वृषाली जोगळेकर युनिक फीचर्समध्ये कार्यरत असून समाजाच्या विविध क्षेत्रांतील कर्तुत्ववान आणि धडपड्या व्यक्तींबद्दल लिहिण्यात त्यांना विशेष रस आहे.