
लहानपणीच्या माझ्या आठवणींमध्ये घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात कुठलं तरी पुस्तक वाचत बसल्याच्या आठवणी बऱ्याच आहेत. मी खूप लहानपणी वाचायला सुरुवात केली, असं आई सांगत असे. तसं, घाटे घराण्यात वाचन वर्ज्य नव्हतं, पण ते फार गांभीर्यानेही घेतलं जात नव्हतं. आईचं माहेरचं आडनाव वेलणकर. घाटे आणि वेलणकर या दोन्ही बाजूंनी ‘शहाणे करूनि सोडावे सकळजन' हा वसा उचलला होता. दोन्ही पणजोबा आणि आजोबा शिक्षक होते. माझे मामा हे माझं खरं स्फूर्तिस्थान. त्यांनीही सुरुवातीला शिक्षक म्हणूनच नोकरी केली. पुढे ते पोस्टखात्यात गेले. तिथून ते अतिरिक्त महासंचालक म्हणून निवृत्त झाले. ते साहित्य अकादमीच्या संस्कृत भाषा विभागाचे सदस्य होते, पंतप्रधानांचे सल्लागार होते आणि संस्कृततज्ज्ञ म्हणून जगभर प्रसिद्ध होते. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते अतिशय भुकेले वाचक होते. आईच्या मते माझं वाचनवेड हा त्यांचा वारसा आहे. पण माझं मत विचाराल, तर माझं वाचनवेड आईमुळे जोपासलं गेलं. ती चांगली वाचक होती. ती रोजनिशीही लिहीत असे. त्यातली जी काही पानं वाचायला मिळाली त्यावरून वाटतं की ती लिहीत राहिली असती तर चांगली लेखक झाली असती.
अगदी लहान असताना माझे धाकटे काका मला फिरायला नेत. त्यांच्या बोटाला धरून चालता चालता वयाच्या दुसऱ्या वर्षाअखेर मी लालबागमधल्या दुकानांच्या पाट्या वाचू लागलो. तिसऱ्या वर्षी भारतमाता चित्रपटगृहातील चित्रं आणि पोस्टर्स पाहून जोडाक्षरं काढू लागलो, वृत्तपत्रांचे मथळे वाचू लागलो. त्या काळात मला मराठी, गुजराती आणि हिंदी वृत्तपत्रं वाचायची संधी मिळाली. दरम्यान, मोठा भाऊ शाळेत जाऊ लागल्याने मी त्याची पाठ्यपुस्तकंही हाती येतील तशी वाचू लागलो. माझ्या आईला याचा फार अभिमान वाटत असे. हळूहळू मी घरात येणाऱ्या पुड्यांचे कागदही वाचू लागलो. थोडक्यात, शाळेत प्रवेश घेतला तेव्हा अंकलिपीसह सर्व काही मी वाचून काढलेलं होतं. त्यामुळे वर्गात लक्ष केंद्रित करणं मला अवघड होत असे. माझे वडील मला विदूषक म्हणत. त्या विदूषकी चाळ्यांमुळे मला बऱ्याचदा शिक्षा व्हायची, असंही आई सांगते.
पण माझ्या शाळाप्रवेशापूर्वीच माझ्या, किंबहुना आमच्या कुटुंबाच्या जीवनावर परिणाम करणारी एक घटना घडली. माझे वडील कृष्णा देसाई या तथाकथित राजकीय पुढाऱ्याने केलेल्या चाकूहल्ल्याला बळी पडले. एका दिवसात आम्ही संपन्नावस्थेमधून विपन्नावस्थेत आलो. त्यानंतर मी मिळवू लागेपर्यंत आश्रित म्हणून जगलो. काही व्यक्तींच्या वागण्याबद्दल माझ्या मनात कायमस्वरूपी कटुता असली तरी त्यांनी आम्हाला आर्थिक मदत केली म्हणून मी शिकू शकलो, हेही मी विसरू शकत नाही. तरीही ती मदत प्रेमाने झाली असती तर अधिक चांगलं झालं असतं, असं मात्र अजूनही वाटतं. माझ्या वडिलांच्या काही मित्रांनी मात्र आमच्यावर कधीही न फिटणारे उपकार केले. तर हा काहीसा वैयक्तिक भाग सांगण्याचं कारण असं, की वडिलांच्या अकस्मात मृत्यूने आईला मोठा मानसिक धक्का बसला होता. ती सतत आजारी असायची. त्याचा ताण अर्थातच आमच्यावरही होता. तो दूर करण्यासाठी आईला मदत करून जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळात मी काही ना काही वाचत राहायचो. आईला प्रकृतीच्या कारणासाठी मुंबई सोडायचा सल्ला मिळाला. माझ्या वडिलांचे मित्र नाना देसाई हे तेव्हा मुंबईचे सिटी इंजिनियर होते. त्यांचे बंधू सांगलीला डॉक्टर होते. ते तेव्हा सांगलीचे महापौरही होते. त्यांनी माझ्या आईवर विनामूल्य उपचार करण्याचं मान्य केलं. मात्र, त्यासाठी आम्ही सांगलीच्या परिसरात राहणं आवश्यक होतं. त्यामुळे मग आईसह आमची रवानगी सांगलीला लागून असलेल्या माधवनगरला झाली.
माधवनगर हे तेव्हा एक आखीव-रेखीव खेडं होतं. तिथे आम्ही दीड वर्ष राहिलो असू; पण त्या काळाने माझ्या वाचनाला आणि पुढे आयुष्यालाही महत्त्वाचं वळण दिलं. माधवनगरला जाताना आईच्या आग्रहामुळे आमच्या सामानासोबत एक छोटी पत्र्याची ट्रंक भरून पुस्तकं घेतली होती. मोठ्या माणसांची चरित्रं, साने गुरुजींच्या गोड गोष्टी, ‘बालमित्र'चे अंक वगैरे त्यात असावेत. माझ्या काकांनी आमच्यासाठी ‘चांदोबा'ची वर्गणीही भरली. मुंबईला मी किंग जॉर्ज या उच्चभ्रू शाळेत होतो. माधवनगरला लोकलबोर्डाची शाळा होती. दोन्ही शाळांतल्या वातावरणांत खूपच फरक होता. माधवनगरच्या शाळेत जाताना आम्ही बसायला स्वत:चं बसकर घेऊन जायचो. बाकीची मुलं पेंडीची किंवा ज्वारीची पोती आणत. ते पाहून मग आम्हीही आमची पोती घेऊन जाऊ लागलो. शाळेच्या भिंतींमध्ये मोठमोठ्या नक्षीकामाच्या उभ्या खिडक्या होत्या. जमीन आठवड्यातून एकदा सारवली जायची. त्यासाठी रानड्यांच्या गोठ्यातून शेण यायचं. आमचं घर या रानड्यांच्या गोठ्याजवळच होतं.
तिथे शाळेत दुसरीच्या वर्गात जे शिकवत असत त्यापेक्षा जास्त अभ्यास माझा पहिलीतच झालेला होता. शिवाय भावाची चौथीपर्यंतची सर्व पुस्तकंही वाचून झालेली होती. मी इतर मुलांच्या तुलनेत वेगळं आणि शुद्ध बोलायचो. त्यामुळे वर्गाचे मास्तर माझ्याशी खूपच प्रेमाने वागायचे. परिणामी, माझं वाचन अनिर्बंध बनलं होतं. साने गुरुजी केव्हाच वाचून संपले होते. घरात चांदोबा येताच तो वाचून पूर्ण व्हायचा. माधवनगरला वृत्तपत्रं येत नसत. त्यामुळे मी आईबरोबर जेव्हा सांगलीला जात असे त्या वेळी त्या-त्या जागी जे मिळेल ते वृत्तपत्र किंवा पुस्तक वाचायला सुरुवात करत असे. आईचं ‘निघायचंय बरं का...' ऐकलं की ते पुस्तक मिटून निघायचं. मी कुणाकुणाच्या घरी अशी किती तरी पुस्तकं अर्धी-पाव वाचली. पुढे चुकूनमाकून ती परत हातात पडलीच, तर जिथपर्यंत आधी वाचलेलं असायचं त्या पानावरचा मजकूर दिसला की आधीचं वाचलेलं आठवू लागत असे. मग मी पुढचं वाचायला लागायचो.
लवकरच माधवनगरचं वास्तव्य संपलं. तिथून आम्ही पुण्याला आलो. इथलं पर्यावरण वाचनपूरक होतं. त्या काळात ‘पर्यावरण' हा शब्द जन्माला यायचा होता. तेव्हाचा प्रचलित शब्द होता ‘वातावरण'. पुण्यात आल्याबरोबर आईने पहिली गोष्ट केली, ती म्हणजे वाचनालय शोधलं- ‘किताबमिनार वाचनालय'. या वाचनालयाने माझं वाचन रुळावर आणलं हे मान्य करायला हवं. या वाचनालयाचे असंख्य नियम आणि पोटनियम होते. त्याचे मालक-चालक सज्जनराम बोडस हे गृहस्थ पुस्तकांवर अतोनात प्रेम करणारे, खरा वाचक ओळखणारे आणि शिस्तीचे करडे होते. त्याचा परिणाम म्हणजे वाचनालयातल्या कुठल्याही पुस्तकात फाटकं पान नसे आणि कुठलंही पुस्तक अपूर्ण नसे. दुसरं म्हणजे त्या काळी बऱ्याच मासिकांतून क्रमश: कादंबऱ्या छापल्या जात. ते सर्व भाग एकत्र करून, त्यांची व्यवस्थित पुठ्ठा बांधणी करून वाचनालयाच्या सदस्यांना ते वाचायला उपलब्ध करून दिले जात. त्यामुळे त्या कादंबऱ्या पुस्तकरूपाने बाजारात येण्याच्या आधीच किताबमिनारमधे सलगपणे वाचायला मिळत असत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे वेगवेगळ्या वह्यांमध्ये उपलब्ध पुस्तकांच्या याद्या अकारविल्हे पाहावयास मिळत. त्यामुळे कुठलं पुस्तक वाचनालयात उपलब्ध आहे आणि कुठलं नाही ते ताबडतोब कळत असे. माझं वाचनवेड पाहून बोडसांनी वाचनालयाचे नियम गुंडाळून अनेक वेळा मला सवलती दिल्या. माझ्या वाचनवेडाची खात्री पटल्यावर ते ‘काय वाचावं' याच्या सूचनाही मला करू लागले. मी लेखक बनल्यानंतर पाठीवर त्यांची कौतुकाची थापही मिळू लागली.
तेव्हा पुण्यात आमचा मुक्काम सदाशिव पेठेत होता. वाचनालयात जायचं तर बाजीराव रस्ता ओलांडून जावं लागत असे. तेव्हा मुंबईच्या मानाने पुणं तसं किरकोळ पण बेशिस्त शहर होतं. मात्र, माधवनगरच्या मानाने ते मोठं आणि गर्दीचं शहर होतं. अर्थात तेव्हा बाजीराव रस्ता बोळकंडीवजाच होता. तरीही चौथीपर्यंत आईची सोबत असेल तरच वाचनालयात जाता येत असे. मला आठवतं, तेव्हा विश्रामबागवाड्यात पुण्याची नगरपालिका होती. त्यामुळे तिथे कुत्री पकडणाऱ्या गाड्या, सफाई कामगार आणि इतर कर्मचारी यांची कायम गर्दी असे. आई बरोबर असल्याने साहजिकच वाचनालयातून तिच्या पसंतीची मासिकं आणि काही वेळा मला वाचायला बालवाङ्मय आणलं जाई. पैकी ‘गोट्या-चिंगी', ‘कॅप्टन प्रताप' ही पुस्तकं मला त्यातल्या त्यात बरी वाटत, तर ‘चंदू' खूप आवडत असे. गोट्या आणि चिंगी यांच्या व्रात्यपणाला मर्यादा होत्या. कॅप्टन प्रताप दुसऱ्या महायुद्धातला साहसी पण बराचसा गंभीर फौजी माणूस. चंदू मात्र चांगलाच खट्याळ होता. या कथांबरोबरच वि. वा. हडप, नाथमाधव, ह. ना. आपटे आणि भा. रा. भागवत हेही मला वाचायला मिळू लागले. माझी चौथीची परीक्षा झाली आणि आई खूप आजारी पडली. त्या सुट्टीत प्रथमच मी एकटा पुस्तक बदलायला जाऊ लागलो.
आता वाचनालयातून मी बाबूराव अर्नाळकर, मधुकर अर्नाळकर, व. ग. देवकुळे, रामराव भालेराव यांच्या कथा, तसंच ‘रम्यकथा प्रकाशना'च्या कथामाला आणायला लागलो होतो. यांतली बरीच पुस्तकं घरी येईपर्यंत वाचून होत. रम्यकथा प्रकाशनात सदानंद भिडे नावाचे एक लेखक होते. ते ‘शृंगारकथा' नावाची एक माला लिहीत. त्यात त्या काळाच्या मानाने जरा जास्तच शृंगार असे. बंद खोलीत नायक नायिकेचे कपडे उतरवायचा किंवा ती त्याचे कपडे उतरवायची. नंतर त्यातली एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला फसवायची नि पैसे-दागिने घेऊन पसार व्हायची, या साच्यातल्या त्या गोष्टी असत. गोष्टींसोबत पुस्तकात अर्धनग्न स्त्री-पुरुषांची चित्रंही असत. (आजकालच्या जाहिरातींमधले स्त्री-पुरुष त्यापेक्षा जास्त नग्न असतात!)
तरीही, सदानंद भिड्यांची पुस्तकं मी फार चवीने वाचू शकलो नाही. त्याला कारण होतं माझं माधवनगरचं वास्तव्य. त्या काळात शिक्षणाचा अजूनही म्हणावा तसा प्रसार झालेला नव्हता. त्यामुळे बहुजन समाजातील मुलं जरा उशिरानेच शाळेत दाखल होत असत. माधवनगरमधे माझ्या अवतीभोवती अशीच मित्रमंडळी अधिक असत. सदानंद भिडे जे लिहीत, त्या विषयाच्या पुढच्या टप्प्यांची माहिती मला या मित्रांमुळे दुसरीत असतानाच झालेली होती. घराशेजारीच गोठा असल्यामुळे ‘गायीला बैल दाखवणं', ‘म्हशीला रेडा दाखवणं' वगैरे गोष्टींचा माझा गृहपाठ तेव्हाच झाला होता. शिवाय चिमण्यांपासून गिधाडांपर्यंत अनेक पक्ष्यांच्या प्रणयक्रीडांकडेही आमचं लक्ष असायचं. त्या वेळी माझा एक प्रश्न माझ्या मित्रांना चक्रावून टाकणारा ठरला होता; पण त्यामुळेच मी त्यांच्यात सामावून गेलो. माझ्यासाठी ही दारं खुली करणारा प्रश्न होता : ‘गायी, म्हशी, शेळ्यांना अनुक्रमे वळू, रेडे, बोकड दाखवतात; पण माणसांत मात्र मुलीला दाखवायला आणतात, हे कसं?' माझ्या समस्त मित्रांनी ‘च्या मायला, बामणाचं पोरगं बाराचं दिसतंय!' असं म्हणून मला त्यांच्यातलाच एक समजायला सुरुवात केली ती यानंतरच. माधवनगरलाच मी कबुतरांच्या ढाबळीवर जाऊ लागलो. तिथेही हे ज्ञान बरंच वाढलं. या साऱ्यामुळेच सदानंद भिड्यांच्या पुस्तकांपेक्षा मला शृंगारविरहित बाबूराव अर्नाळकर बरे वाटत असत.
भिडे, अर्नाळकर यांची सर्व पुस्तकं महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाचून होत. मग वि. वि. बोकील, श्री. ज. जोशी, श्री. ना. पेंडसे, र. वा. दिघे असे वेगवेगळे लेखक वाचून झाले. त्या वेळी ‘संजय', ‘नवल' आणि ‘अमृत' ही डायजेस्ट मासिकं होती. यांपैकी ‘संजय' आणि ‘नवल' डायजेस्टमध्ये मोठमोठ्या इंग्रजी आणि फ्रेंच कादंबऱ्यांची भाषांतरं येत असत. व्हिक्टर ह्युगोच्या ‘ल मिझराब्ल'चा अनुवाद मी ‘संजय'मध्येच वाचला. उषा आपटे या बाईंच्या ‘द्युमाचे तीन शिलेदार', ‘वीस वर्षांनंतर', ‘प्रिझनर ऑफ झेंडा' आदी बऱ्याच भाषांतरित कादंबऱ्या वाचल्या. भा. रा. भागवतांनी ‘ज्युल्स व्हर्न' आणि ‘एच. जी. वेल्स' मराठीत आणले. पुढे ‘नवल'चं रूपांतर मासिकात झालं. ‘उपेक्षित साहित्यप्रकारांना वाहिलेलं मराठीतील एकमेव मासिक' असं बिरूदही मासिकात छापलं जाऊ लागलं. ‘नवल'मधल्या गोष्टी बाबूराव अर्नाळकरांच्या गोष्टींपेक्षा काहीशा वेगळ्या असत. त्यात माझं खरं लक्ष वेधून घेतलं ते नारायण धारप यांच्या कथा-कादंबऱ्यांनी. ते इतरत्रही लिहीत असत. त्यामुळे मग मी इतर मासिकांमधल्या त्यांच्या कथा वाचू लागलो. पुढे त्यांच्याशी ओळख आणि मग चांगली मैत्रीही झाली.
पाचवी ते सातवी ही वर्षं अशा साऱ्या वाचनात गेली. याच दरम्यान माझे सर्वांत मोठे काका लष्करातली नोकरी सोडून पुण्यात आले होते. ते टी. वॉकर्स या कंपनीत नोकरी करत आणि त्यांच्याच औषधी कारखान्यात माडीवर राहत असत. त्यांनी आम्हाला इंग्रजी शिकवायला सुरुवात केली. त्या वेळी आठव्या इयत्तेपासून इंग्रजी सुरू व्हायचं. पण काकांमुळे आठवीत यायच्या आधीच माझे ‘तर्खडकर भाषांतर पाठमाले'चे तीनही भाग पाठ झाल्यामुळे मी आठवी ते दहावीपर्यंत इंग्रजी विषयात पहिला आलो.
सातवीमधून आठवीत येताना माझ्या आयुष्यावर परिणाम करणारी एक घटना घडली. पाचवी ते सातवीपर्यंत आम्हा चार विद्यार्थ्यांचा एक गट जमला होता. आमचे वर्गशिक्षक आम्हाला ‘चांडाळचौकडी' म्हणत, तर आम्ही त्यांना ‘गुंड्याभाऊ' म्हणायचो. त्यांनी आमची चौकडी फोडायचा निश्चय केला. आम्हा सर्वांना सारखेच मार्क असूनही त्यांनी आठवीत आमच्यापैकी प्रत्येकाला वेगवेगळ्या तुकडीत टाकलं. परिणामी, आठवी ते दहावी मी ‘ड' तुकडीत होतो. ‘ड' तुकडीतली ही तीन वर्षं मला बरंच काही शिकवून गेली. याला कारण बरोबरचे विद्यार्थी आणि आम्हाला मिळालेले शिक्षक.
केळकर सर आम्हाला संस्कृत शिकवत. उंच, देखणे, अंगात कायम सिल्कचा शर्ट- त्याला सोन्याची बटणं, खाली दुटांगी धोतर. ते खूप कडक आणि शिस्तप्रिय होते. त्यांचं संस्कृतवर खरोखर प्रेम होतं. ते अतिशय रसिक आणि रंगेलही होते. ते आम्हाला पाठ्यपुस्तकाच्या पलीकडेही बरंच काही शिकवत. “पावसात भिजलेली वसंतसेना, शकुंतलेला पटवणारा दुष्यंत, ‘कुमारसंभवा'तले ९ ते १४ सर्ग वाचले तर कामशास्त्राची पुस्तकं वाचायची गरजच पडणार नाही, पण त्यासाठी संस्कृत मात्र यायला हवं,” असं ते सांगत. रघुवंशातील राजांचे उद्योग आणि इतर अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. त्यामुळे पुढे संस्कृतचं वाचन चालू राहिलं. ‘समास आणि संधी फोडून वाचा, म्हणजे आहे ते ज्ञान पुरेसं ठरेल' हा त्यांचा मंत्र मी आजही पाळतो.
दुसरे शिक्षक म्हणजे इंग्रजीचे य. गो. जोशी. वृद्ध, निवृत्तीला पोहोचलेले, अतिशय सभ्य. त्यांच्या उजव्या तर्जनीचं पेर तुटलेलं होतं. त्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांनी ‘साडेनऊ' हे टोपणनाव दिलेलं होतं. ते अतिशय सुंदर आणि मन लावून शिकवायचे. सुटीच्या दिवशी ते जादा वर्ग घेत, अगदी नि:शुल्क. शाळेतल्या कुणालाही त्या वर्गाला येण्याची मुभा होती. माझा क्रिकेटचा सामना नसेल तर मी आवर्जून त्या वर्गांना जायचो. ‘पुस्तकी इंग्रजी आणि अमेरिकन इंग्रजी यात फरक आहे; त्यांची लिपी एक आहे पण त्या दोन वेगळ्या भाषा आहेत,' हे त्यांच्यामुळेच आम्हाला कळलं.
वा. रा. जोशी गणित शिकवायचे. त्यांच्या कपाळावर खोक पडल्याची खूण होती. ती खूण त्या काळात टाटा मर्सिडीज ट्रकवर जे बोधचिन्ह असे तशी दिसत असे. त्यामुळे आम्ही त्यांना ‘मर्सिडीज जोशी' म्हणायचो. त्यांच्यामुळे आमचं अंकगणित सुधारलं; पण आमच्या बीजगणिताच्या बापट सरांनी आम्हाला खरंखुरं जीवनशिक्षण दिलं. त्यांनी फ्रॉइड वाचला होता की नाही ते मला माहीत नाही, पण ‘दुनियेतील प्रत्येक गोष्टीत सेक्स असतंच' असं त्याचं मत होतं. बीजगणित शिकवताना ते त्यात ‘अनंगरंग रतिशास्त्र', ‘शुकबहात्तरी', ‘गाथा सप्तशती', तसंच कामशास्त्रावरील इतर अनेक ग्रंथांचे संदर्भ देत असत. ‘उणे आणि अधिक संख्यांचा गुणाकार नेहमीच उणे असतो, कारण संसारात बाईच नेहमी वरचढ असते,' अशा पद्धतीने ते शिकवत असत. मी ‘अ' किंवा ‘ब' तुकडीत गेलो असतो तर या सर्व शिक्षकांच्या शिकवण्याला मुकलो असतो, शिवाय शिक्षणही नीरस झालं असतं, आणि पुढे स्त्री-पुरुष संबंधांबद्दल मी जे नि:संकोच वाचन केलं तेही बहुधा झालं नसतं.
याच ‘ड' तुकडीत बरीच मुलं खडकी, फुगेवाडी अशा ठिकाणांहून सायकलींवरून यायची. ती वयाने बऱ्यापैकी मोठी होती. काही तर विवाहित होती. हॉकी, फुटबॉल, कबड्डी, रस्सीखेच आदी ताकदीच्या आणि दांडगाईच्या खेळांची विजेतेपदं ती मुलं सातत्याने शाळेला मिळवून देत. त्यातले काहीजण आपल्याला मूल झालं म्हणून पेढे वाटून मग विवाहित आयुष्याच्या रंगेल आणि रंगीन रात्रींची चविष्ट वर्णनंही करत असत. मी शाळेकडून क्रिकेट खेळत असे; त्यामुळे मधल्या सुट्टीनंतर त्यांच्याबरोबरच बाहेर पडत असे. सराव सुरू व्हायला वेळ असेल तेव्हा शाळेच्या मुख्य इमारतीपासून दूर, एका कोपऱ्यात असलेल्या पॅव्हेलियनमध्ये त्यांच्याकडची पिवळ्या कव्हरची पुस्तकं मला पाहायला मिळत; विड्याही ओढायला मिळत. ही पुस्तकं किताबमिनारमध्येही होतीच; पण बोडसांनी ती माझ्या हाती कधीच लागू दिली नसती. कारण त्या पुस्तकांचं रजिस्टर ते त्यांच्या गल्ल्याखाली ठेवत आणि ती पुस्तकं स्वत: ग्राहकाला देत. परत घेताना पान अन् पान तपासून घेत.
बोडसांच्या नजरेतून सुटून मला वाचायला मिळणारी प्रौढ पुस्तकं म्हणजे चंद्रकांत काकोडकर आणि काही अनुवादित पुस्तकं. त्यात मात्र बऱ्यापैकी शृंगार असे. अशा पुस्तकांसोबतच मी ‘ओसाडवाडीचे देव', ‘मायापूरचे रंगेल राक्षस' आदी पुस्तकंही वाचनालयातून आणून वाचली. त्यांतल्या विनोदांमुळे ती कायमची लक्षात राहिली. या पुस्तकांनी मला विनोदी वाचनाची गोडी लावली.
बोडसांप्रमाणे माझ्या वाचनावर उपकार करणारे आणखी एक गृहस्थ म्हणजे कृष्णकुमार गोळे. त्यांचा मुलगा धनंजय माझा वर्गमित्र होता. त्यांच्याकडे ‘फ्री प्रेस जर्नल' हे वृत्तपत्र यायचं. ते मी रोज वाचायचो. त्यात ‘ब्रिगिंग अप फादर' ही कॉमिक स्ट्रिप असे, ती मी आधी वाचत असे. मग क्रीडावृत्त, म्हणजे अखेरचं पान. सुरुवातीस त्या वर्तमानपत्रातले बरेच शब्द कळत नसत. मग मी वीरकर शब्दकोशाची मदत घ्यायचो. माझं वाचनवेड धनंजयच्या बाबांच्या लक्षात आलं. मग ते धनंजयसाठी जी पुस्तकं आणायचे ती मलाही वाचायला मिळू लागली. सुरेश शर्मांनी अनुवादित केलेले (चित्रशाळा प्रेसने काढलेले) टारझनचे सोळा भाग, भा. रा. भागवतांनी केलेले अनुवाद, त्यातही रॉबिन हुडची पुस्तकं मी पुन्हा पुन्हा वाचली. ‘शिंग फुंकता रॉबिनहुडचे / शेरवुड जंगल भंगेल / कडी लोटतील रंगेल' ही त्या पुस्तकातली सुरुवात आणि ‘उचलला तीरकमठा की निघाला भामटा' हे रॉबिनहुडच्या उद्योगाचं वर्णन आजही लक्षात आहे. तसंच ‘मायापूरचे रंगेल राक्षस'मधला अंगावर तोफगोळे पडू लागल्यावर ‘कसला किल्ला कसला हल्ला, या डासांनी जीवच खाल्ला' असं म्हणणारा घंटासुर मी विसरू शकत नाही. (माझा मुलगाही घंटासुराचा फॅन आहे हे विशेष.)
कृष्णकुमार गोळे म्हणजे गणपतराव बोडस (दादा) यांचे जावई. त्यामुळे दादा बऱ्याचदा त्यांच्याकडे असत. त्यांचं चरित्र तर मी वाचलंच, पण त्यांच्याकडून बऱ्याच नाटकांच्या जन्माच्या आणि नटांच्या हकीगतीही मला ऐकायला मिळायच्या. तसंच, शुद्ध मराठी कसं बोलावं हे मी त्यांच्याकडून शिकलो. एखादा शब्द चुकीचा उच्चारला गेला की दादा कान पिळत. सुटीत बाबा गोळे सोडून इतर गोळे मंडळी दादांकडे मिरजेला जात असत. कुटुंबीय जरी परगावी गेले तरी बाबा मला ‘येत जा' असं आमंत्रण देत असत. त्यांच्याबरोबर मला कॅरम खेळायला मिळे. ते मला पुस्तकांच्या दुकानात घेऊन जात आणि पुस्तकं निवडायला सांगत. धनंजय परत यायच्या आत मी ती वाचून पूर्ण करत असे. दिवाळीच्या सुटीत आणखी मजा असे. बाबांचे क्लासेस होते- ‘कृष्णकुमार गोळेज क्लासेस'. त्यांचे गुजराती आणि पारशी विद्यार्थी त्यांना खाऊच्या पेट्या भेट म्हणून देत. दिवाळीच्या सुट्टीत बाबा एकटे असले तर या पेट्या संपवण्याची जबाबदारी आम्हा दोन-तीन मित्रांवर असायची.
इंग्रजी वाचनाची भूक मी ‘फ्री प्रेस जर्नल' आणि मुंबईहून काका आले की वाचायला मिळणाऱ्या ‘टाइम्स ऑफ इंडिया'वर भागवत असे. पुढे काही दिवस मी सकाळी पेपरची लाइन टाकायला जात होतो; पण पेपरवाल्याच्या दृष्टीने तो तोट्याचा व्यवहार होता. कारण ‘सकाळ', ‘केसरी', ‘तरुण भारत', ‘नवशक्ती', ‘टाइम्स' हे फुकट वाचून नंतर पेपर टाकायचे म्हटलं की मला लाइन पूर्ण करायला खूप उशीर व्हायचा. गिऱ्हाइकं तक्रार करायची. त्यामुळे हा उद्योग लवकर संपला. दरम्यान मी दहावीत गेलो होतो. आठवीपासून मी शाळेच्या क्रिकेट संघात होतोच. आता टेबल टेनिसही खेळू लागलो होतो. त्यामुळे पहाटे लवकर उठून पाणी मारणं, लाकडं फोडणं आणि आईला स्वयंपाकात मदत करणं हे सांभाळून खेळाचा सराव करावा लागे. त्यात पेपर टाकणं अडचणीचं होऊ लागलं होतं. त्यामुळे हा उद्योग संपला त्याचं वाईट वाटलं नव्हतं, पण रोजचं पेपर वाचन संपलं एवढंच.
एकंदर, मॅट्रिक होईपर्यंत जे मिळेल ते, मिळेल तेव्हा वाचून काढायचं, अशी माझी परिस्थिती होती. त्या काळात माझ्या वाचनाला विशिष्ट दिशा नसली तरी माझी सर्वाधिक पसंती बाबूराव अर्नाळकरांच्या रहस्यकथांनाच होती. त्यामुळे माझ्या रहस्यकथा वाचनाबद्दलच आधी लिहितो.