‘हल्ली मुलांना वाचायचा कंटाळा येतो’, ‘त्यांना अजिबात वाचायला आवडत नाही’, इथपासून ‘आता कुणी पुस्तकं विकत घेऊन वाचत नाही ओ’, अशी खंत व्यक्त करणारे अनेकजण आपल्याला दिसतात. नवीन पिढी पुस्तकंच वाचत नाही, हातात सतत मोबाईल असतो, सतत सोशल मीडियावर पडलले असतात, अशा अनेक टिप्पण्या आजच्या जेन झी विषयी आपण करत, ऐकत असतो. पण या समजांना तडा देणारा एक ग्रुप नाशिकमध्ये गेल्या दोन वर्षांपासून काम करतो आहे आणि वाढतो आहे.
एका तरुण मुलाकडून मला 'नाशिक रीड्स' विषयी समजलं. गुगलवर या ग्रुपला शोधलं तर त्यावर एक फोन नंबर मिळाला. फोनवरची मुलगी म्हणाली,
‘‘कोणत्याही रविवारी सकाळी साडेनऊ वाजता आनंद अभ्यासिकेच्या उद्यानात या.’’
अशी किती मुलं पुस्तकं वाचतात, काय वाचतात, हे पाहण्यासाठी रविवारी सकाळी सकाळी निघाले. कुसुमाग्रज स्मारकाच्या बाजूलाच असणाऱ्या 'आनंद अभ्यासिका' या पाटीपाशी थांबले. तिथे अभ्यासिकेच्या बाजूला एक छानसं उद्यान दिसलं. सकाळी सकाळी किलबिलाट करणारे पक्षी, रस्त्याच्या बाजूला असूनही असलेली शांतता, भरपूर झाडं, काही ठिकाणी सुबकसे बाक… तिथं जाणारी रम्य वाट. उद्यानात आजूबाजूच्या बाकांवर बसलेली, झाडांच्या शेजारी बसून पुस्तकांवर चर्चा करणारी मुलं-मुली… हे वेगळंच चित्र पाहत होते. तिथे ‘नाशिक रीड्स’ हा उपक्रम सुरू करणारी सोहा कुलकर्णी भेटली.
सोहाला विचारलं, ‘‘ही कल्पना तुझ्या डोक्यात कशी आली? तू लहानपणापासून वाचन करतेयंस का?’’
ती म्हणाली, ‘‘नाही, मी भोपाळला एम. टेक. केलं आणि नाशिकला परत आले. एमबीएची तयारी सुरू केली. त्यावेळी एकांनी सुचवलं की, इतर पुस्तकंही वाचली पाहिजेत. एमबीए करायचं तर निदान काही उद्योजक, आंत्रप्रीनर्सबद्दल तरी माहिती हवंच. तेव्हा अलेक्स बनयानचं ‘द थर्ड डोअर’ हे पुस्तक वाचलं. यात एक अठरा वर्षांचा मुलगा बिल गेट्स, लेडी गागा अशा प्रसिद्ध व्यक्तींचं आयुष्य, ते यशस्वी कसे झाले, हे जाणून घ्यायला निघतो. त्याच्या त्या अनुभवांवरचं ते पुस्तक खूप काही शिकवून गेलं आणि तिथून मी चांगली पुस्तकं मिळवून वाचायला लागले.’’
या उपक्रमात सोहाची टेक्सटाईल डिझायनर असलेली बहीण तीर्थाही सहभागी झाली. या दोघींनी आपली पुस्तकं वाचण्याची इच्छा सोशल मीडियावर टाकली आणि दोनच महिन्यांत १२०हून अधिक तरुणांनी त्यांच्या या उपक्रमाला प्रतिसाद दिला.
दर रविवारी साडेनऊ ते साडेदहा असा एक तास आनंद अभ्यासिकेच्या उद्यानात जमायचं ठरवलं. नुसतं ठरवलं नाही तर या मुलांनी नेटाने आपापल्या घरून पुस्तकं आणून ती वाचायला सुरुवात केली. या उपक्रमाचं नाव ठरलं नाशिक रीड्स.
मी पोचले तेव्हा ही जेन झी मंडळी हातात पुस्तकं घेऊन वाचण्यात गर्क होती. झाडांच्या भोवती असलेल्या छोट्या छोट्या कट्ट्यांवर पुस्तकं वाचणाऱ्यांपैकी दोन मुली एमिली ब्रॉन्टेच्या ‘वुदरिंग हाइट्स’ची चर्चा करत होत्या. एकोणिसाव्या शतकातल्या काळचे संदर्भ, त्यावेळचं इंग्रजी आणि वातावरणही पूर्ण अनभिज्ञ. तरीही त्या मुली ते वाचत होत्या. एका बाकावर वयाने थोड्या मोठ्या वाटणाऱ्या बाई बसलेल्या होत्या. त्यांचं नाव आरती. त्या दुसऱ्या महायुद्धावरचं ‘द लास्ट सनराईज’ हे पुस्तक वाचत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘मी नोकरी करते, घरात पुस्तक वाचायला वेळ मिळत नाही. म्हणून इथे येते. या पुस्तकात छोट्या मुलाच्या नजरेतून पाहिलेलं दुसरं महायुद्ध आहे.’’
एक मुलगी इराणी-फ्रेंच लेखिका मार्जेन सत्रापीचं ‘पार्सेपोलिस’ हे पुस्तक वाचत होती. इराणमधल्या इस्लामी क्रांतीच्या वेळी मार्जेनला तिच्या आईबाबांनी बळंबळंच प्रगत देशात धाडतात. आतापर्यंत मोकळ्या वातावरणाची सवय झालेल्या आपल्या मुलीला भविष्यातला इराण झेपणार नाही, असं त्यांना वाटत असतं. त्याबद्दलचं हे पुस्तक. हे पुस्तक वाचल्यावर ‘एखाद्या कालखंडात जगभरात किती वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात, त्याची जाणीव मला होतेय. त्यामुळे आपण आतापर्यंत पुस्तकं का वाचली नाहीत’, असा प्रश्न पडल्याचं या मुलीने बोलून दाखवलं.
एक मुलगी शंतनू नायडू यांचं ‘आय कम अपॉन अ लाईटहाऊस’ हे आत्मचरित्र वाचत होती. त्यांच्या आणि रतन टाटांच्या नात्याबद्दलचं तरल वर्णन त्यात आहे. एकाच्या हातात ‘माईन काफ’ हे हिटलरचं आत्मचरित्र होतं. तो म्हणाला, ‘मी स्वतःला वाचनाची सवय लावण्याचा प्रयत्न करतोय. इथे त्याला प्रोत्साहन मिळतंय.’ आणखी एक मुलगा ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ हे पुस्तक वाचत होता, तर त्याच्या शेजारीच पुस्तकात गुंग झालेल्या मित्राच्या हातात ‘हंड्रेड डॉलर्स स्टार्ट अप’ होतं.
या उद्यानात वाचन करायला येण्यासाठी वार्षिक ९९ रुपये असं नाममात्र मूल्य आहे. हा उपक्रम सुरू झाल्यावर इथं येणाऱ्यांचे परिचित, मित्रमैत्रिणीही इथं पुस्तकं घेऊन यायला लागले. ‘नाशिक रीड्स’चे तसे अडीचशेच्या आसपास सभासद आहेत,
इथं येणाऱ्यांपैकी काहींच्या घरात वाचनाची संस्कृती आहे, तर काहींच्या घरात अजिबात नाही. काही मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेली आहेत, पण बरीचशी इंग्रजी माध्यमातली. पुस्तक वाचून बघावं म्हणूनही काहीजण इथे आले आणि नियमित येऊ लागले. ज्यांनी अजिबात वाचलं नव्हतं, त्यांनाही वाचनाची गोडी लागली.
‘‘पुस्तकांनी आम्हाला एकत्र आणलं. घर, शाळा, कॉलेज, क्लास, टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया यांतून कधीही न दिसणारं वेगळंच जग आम्हाला पुस्तकातून दिसतं,’’ असं मुलं सांगत होती. ही मुलं पुस्तकांची आदलाबदली करतात. त्यावर चर्चा करतात. वादविवाद होतात. एखाद्या पुस्तकातली एकाला न समजलेली वेगळी बाजू दुसऱ्याला समजते, तेव्हा त्यावर विचारमंथन होतं. या चर्चा खूप काही देऊन जातात. आपला पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनच बदलतो, असं तिथं भेटलेली एक मुलगी सांगत होती.
इथं आणखी एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे मोबाईल आपापल्या खिशात किंवा पर्समध्ये होते. वाचन एके वाचन. इथं येणाऱ्या काही तरुण मंडळींची आता एकमेकांशी छान मैत्री झाली आहे. त्यामध्ये वकील, सामाजिक कार्यकर्ते, आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, फायनान्स, सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्यांपासून विविध शाखांच्या विद्यार्थ्यांपर्यंत अनेक जण आहेत. दोन नोकरदार तर सिन्नरहून येतात. मुलांना आत्मचरित्रपर पुस्तकं तसंच यशस्वी होण्यास प्रोत्साहन देणारी पुस्तकं वाचायला आवडताहेत. अनेकांना ‘ग्राफिक कादंबऱ्यां’चा परिचय झाला. काहींना जुन्या इंग्रजी कादंबऱ्या, कथा, रहस्यकथा, मोसादसारखी पुस्तकं, प्रेमकथा वाचायला आवडतात. अगदी चार्ल्स डिकन्सचं ‘टेल ऑफ टू सिटीज्’ पासून डेल कार्नेगीच्या पुस्तकांपर्यंतचा खजिना इथं उलगडला जातो. त्यातून विशिष्ट कालखंड, वेगवेगळे देश, त्यांचा इतिहास, दृष्टिकोन, युद्धांचे माणसांवर झालेले परिणाम, माणसांचे नात्यांमधले संघर्ष… असं बरंच काही कळतं आहे. वाचनप्रेम बहरतं आहे.
शिल्पा दातार | 7020659314 | mrs.shilpapankaj@gmail.com
शिल्पा दातार या मुक्त पत्रकार आहेत.
